त्या तिघी

त्या तिघी (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

अनला बापट 


गेल्या दोन तीन दिवसापासून मेघा एकदम आनंदात होती.कितीतरी दिवसाने..छे हो..दिवसाने कसली, ती वर्षांनी परत येत होती.

तिला विचारलं तर सांगेल चार वर्ष आठ महिने आणि सत्तावीस दिवसाने ती परतली आहे.

मेघा मुंबईच्या विमानात चढली आणि तिला हा प्रवास काही तासांपेक्षा काही मिनिटाचा व्हावा असे वाटत होते. कारण,आज खूप दिवसांनी.... खूप दिवसांनी काय पहिल्यांदाच ती तिच्या ह्या दोन विशेष मैत्रिणींना भेटणार होती.

ह्या दोघी तिच्या बाल मैत्रिणी नव्हत्या बरं..पण तरीही त्यांना भेटायची घाई झाली होती तिला.

खरंतर गेल्या दोन-अडीच वर्षांच्या कालावधीत जीवनात आलेल्या ह्या दोघी मैत्रिणी, पण ह्या छोट्याश्या अवधीत त्या इतक्या जवळच्या झाल्या होत्या की वाटे जणू जन्मोजन्मीचे काहीतरी नाते होते.

तिने विमानात बसल्याबरोबर, लगेच व्हॉटस ॲप कॉल वर दोघींनाही एकत्र फोन लावला आणि उत्साहाने सांगितले "बघा गं, मी बसले गं, चला उद्या भेटू प्रत्यक्ष.."

आणि त्या दोघींच्याही चेहऱ्यावर जो निखळ आनंद तिला दिसला तो आनंद तिच्या आनंदाला द्विगुणित करून गेला..

त्या तिघींच्या ग्रुपकरता प्रोफाइल फोटो ठेवायला तिने त्या तिघींचे वेगवेगळे फोटो घेऊन एकत्र कोलाज करून बनवलेला फोटो, प्रोफाइल फोटो म्हणून ठेवलेला. फोन संपताच मेघाने तिघींचा कोलाज करून बनवलेला फोटो पुन्हा एकदा बघितला आणि मनातच म्हणाली.."बस उद्या प्रत्यक्ष भेटलो तिघी की हा बदलून खरोखर एकत्र आल्यावर काढलेला फोटो लावेन इथे."

फोटो बघता बघता ती भूतकाळात सरली.. कोरोना आणि त्यामुळे असलेले लोकडाऊन...तिला घरी राहायला बाध्य करून गेले होते.. खूप दिवस तिने घरकाम, बागकाम वगैरे करण्यात मन लावले पण तरीही रिकामे वाटायचे, काहीतरी कमी आहे असे भासायचे...

अशात तिच्या एका भारतातील मैत्रिणीने तिला भारतातल्या काही साहित्यिक समुहांविषयी माहिती पाठवली आणि "तू छान कविता करतेस तर तिथे जॉईन हो, नवीन काही शिकायला मिळेल आणि त्या क्षेत्रात ओळखी पण होतील" असे तिला म्हणाली.

सुरूवातीला वेळ जाईल ह्या उद्देशाने ती त्या समूहात जॉईन झाली. काही दिवसात तिला त्या समूहात लिहिले जाणारे साहित्य वाचण्यात आणि नवीन साहित्य प्रकार शिकण्यात आनंद येऊ लागला. 

त्याच समूहात लिहीत असताना एकदा तिला एक वैयक्तिक संदेश आला,"आजच्या उपक्रमातील तुमची कविता खूप सुंदर झाली आहे"...संदेश वाचताच ती उडालीच, त्याचे कारण म्हणजे हा संदेश लिहिणारी, साधारण कोणी नसून त्या समुहातल्या सगळ्यात प्रसिद्ध लेखिका "रजिया" होत्या...मेघा पण रजियाची अगदी मनापासून चाहती होती. मेघाला त्यांचे लिखाण अतिशय आवडायचे.. खरंतर मेघाच काय, समूहात जवळ जवळ सगळेच लोक रजियाला एका वेगळ्या ऊंचीवरची समजायचे. त्यामुळे, मेघाला तिच्या आवडत्या लेखिकेकडून, म्हणजे रजिया कडून मिळालेला हा अभिप्राय मेघासाठी एखाद्या अवॉर्ड पेक्षा कमी नव्हता.

मेघा खूप आनंदली तिने त्या आनंदात लगेच त्याला संदेशला उत्तर पण लिहिले..आणि त्यात तिने आपण रजियाच्या लिखाणाचे किती मोठे फॅन आहोत हे पण लिहून पाठवले..त्यानंतर दोघींमधे वरच्यावर वैयक्तिक संदेश व्यवहार सुरू झाला..पण अजून मैत्री म्हटली जाईल तसा व्यवहार नव्हता.

दरम्यान दुसऱ्या एका समूहातील एका बाईने फक्त गप्पा मारायला काही निवडक मैत्रिणींचा एक वेगळा समूह बनवला. त्यात तिने तिच्या जवळ-जवळ आठ-दहा वेगवेगळ्या वयोगटातील मैत्रिणींना घेतले होते. त्यातच पुन्हा ह्या दोघी पण एकत्र झाल्या आणि हो, त्यात इतर बायकांबरोबर पण मैत्री झाली आणि मग सुरवातीला झूम मीटिंग करून सगळ्या एकत्र यायच्या ..खूप गप्पा मारायच्या...हळू हळू वयाने मोठ्या बायकांचे मीटिंग मधे यायचे कमी झाले. काही दिवसाने मीटिंग मधे दोन चार बायकाच येऊ लागल्या..त्यात एक होती अनामिका. ती तशी मेकॅनिकल इंजिनिअर पण साहित्यात रस..आणि काही वैयक्तिक कारणाने नोकरी सोडून घरी असल्याने मिळणारा पुष्कळ वेळ ती साहित्य लिहिण्यात घालवायची. अनामिका मेघाला बरीच फ्री वाटली..तिच्या बोलण्यात एक प्रेमळ अधिकार वाटायचा. हळू हळू त्या समूहावर बाकी कोणी काही बोलायचे नाहीत. म्हणून मेघाने ह्या दोघी म्हणजे रजिया आणि अनामिका ह्या दोघींना घेऊन एक वेगळाच समूह बनवला..समूहाचे नाव ठेवले ,"त्रिशक्ती". त्यात त्या तिघी एकमेकाशी बोलताना कधी "तुम्ही" वरून "तू" वर आल्या कळलेच नाही.

सुरवातीला साध्या साहित्यिक चर्चा आणि इतर गोष्टींवर चर्चा व्हायच्या. पण नंतर त्यांच्यातले मानसिक अंतर घटत गेले आणि जरी वेगवेगळ्या जागी राहत असल्या तरी त्यांच्या स्वभावात असलेला एकसारखेपणा त्यांना अजून जवळ घेऊन आला.

इथे ह्या त्रिशक्ती समूहात फक्त तिघीच असल्यामुळे त्यांना एकदम मोकळ्या मनाने बोलता यायचे..त्यात बोलता बोलता एकदा मेघाने आपल्या दुर्धर आजाराबद्दल सांगितले, नंतर नवऱ्याच्या वाईट स्वभावा बद्दल आणि बदललेल्या नात्यांबद्दल..असे जवळ जवळ सगळे काही ती त्यांना सांगू शकली कारण अनामिकेने आपल्या आजाराबद्दल मोकळ्या मनाने त्यांना सर्व सांगितले.

रजिया स्वतःच्या सासरच्या लोकांच्याबद्दल अगदी मोकळे होऊन बोलायची, एवढी मैत्री त्या तिघींची झाली होती. पण तिघी अजून एकदाही भेटू शकल्या नव्हत्या कारण अनामिका अहमदाबादला राहत होती तर रजिया दुबईला आणि मेघा तर लंडनला..त्यामुळे वेळेच्या समयपत्रकावर वेगवेगळ्या वेळी उठणाऱ्या झोपणाऱ्या तिघी...पण तरीही दिवसातून कसेबसे काही क्षण त्या काढूनच घ्यायच्या एकदुसऱ्याशी बोलण्याकरता. त्यात कधी मेघाला जागे रहावे लागायचे तर कधी त्या दोघींना!

त्यामुळे दिवसात एकदा तरी फोन करणाऱ्या ह्या मैत्रिणींना त्या आता भेटणार होत्या त्याचा आनंद देवदर्शनापेक्षा अधिक होता.

मेघाला त्यांना भेटायची एवढी ओढ का लागली होती त्याचे पण एक कारण होते. ते म्हणजे दोन वर्षापूर्वी तिच्या आजारपणामुळे आणि घरातल्या वातावरणामुळे आयुष्याशी पूर्णपणे निराश झालेली मेघा, फक्त हे आयुष्य कधी संपते ह्याचाच विचार करत असायची..पण ह्या दोघी तिच्या जीवनात आल्या आणि आयुष्याला एक वेगळाच रंग मिळाला.तो रंग म्हणजे आत्मविश्वासाचा..तो रंग तिच्या जीवनात भरला अनामिका आणि रजियाच्या प्रेमळ स्वभावाने. त्यामुळे मेघा, जीवनात आपल्याला अजून बरेच काही करता येऊ शकते..करायचे आहे आणि करूच.. ह्याचा आत्मविश्वास तिच्यात निर्माण झाला.

अगदी तिच्या एका कठीण म्हणता येईल अशा होणाऱ्या ऑपरेशनच्या अगोदरही त्यांनी केलेल्या कॉल मुळे ती ऑपरेशन थिएटरमधे पण हसतमुख होती.

दोघी इतक्या सहजपणे आपल्या समस्या सांगून जायच्या की मेघाला आपले दुःखपण सहन करण्यासारखे आहे असे वाटू लागले..आणि अनेक वेळा त्यांचे सांगितलेले "नुस्खे" म्हणजे उपाय ती आपल्या फरफटणाऱ्या संसारात करून बघू लागली आणि प्रयत्नांमुळे म्हणा किंवा तिच्या इच्छाशक्तीमुळे म्हणा..पण जे पूर्वी ती फार थकल्यासारखी आणि सारखी आजारी राहत होती ते हळू हळू कमी झाले आणि आता थोडे सुसह्यपण झाले. 

नवऱ्याच्या बाबतीत पण तसेच.. रजियाचा नवरा फार जुन्या विचारांचा..ती एवढी सुंदर लिहायची पण त्याला त्याचा गंधपण नव्हता आणि मुख्य म्हणजे त्यांच्यात वयाचे खूप अंतर असल्याने दोघांचे विचार मिळत नव्हते. तसेच अनामिकेचे पण. अतिशय वेगळे स्वभाव दोघांचे. नवरा फार सात्विक स्वभावाचा..त्यामुळे आज काय संकष्टी, आज काय सोमवार असे म्हणून शारिरीक संबंधात कधीच दोघे एका बिंदूवर यायचे नाही असे तिने बिनधास्त मेघाला सांगून टाकले होते..त्यानंतर मेघाने पण आपल्या वैवाहिक जीवनात नवऱ्याने केलेला अपमान, उपहास सर्व काही दोघींबरोबर शेअर केले..

आता आताशा तर त्या तिघी आठवड्यात तीन चार दिवस फोन करूनच बोलायच्या कारण लिहायला भरपूर टाईप करावे लागायचे आणि मेघाला त्याचा त्रास आणि अनामिकेला त्याचा आळस!

मनातल्या मनात मेघा ह्या दोघींचे आभार मानत होती..कारण आई बहीण नसलेल्या मेघाला ह्या दोघींनी एवढे मानसिक बळ दिले होते की तिच्या दुर्धर आजारातून बरी होऊन आता ती भारतात परत फिरत होती.

असो..पण आता तिघींनी भेटायचे ठरवले तेव्हा मेघा मनात विचार करत होती कश्या असतील दिसायला दोघी..तशाच का जशा झूम मीटिंग मध्ये दिसतात? खरं ती येणार आहे म्हणून रजिया आणि अनामिका मुंबईला येणार होत्या..कारण मेघाला असलेला दुर्धर आजार..त्यामुळे तिला जास्त प्रवास न करावा लागो हा हेतू. अनामिकाने हॉटेल बुक केले होते. रजिया दुबईहून तर अनामिका अहमदाबादहून मुंबईला एव्हाना पोहचल्या होत्या. आणि आता थोड्यावेळात ती पण पोहचणार होती.

"थोडीही देर मे हम मुंबई एअरपोर्टपर उतरेंगे..आप अपनी कुर्सी की पेटी बांध ले" एअर इंडियाच्या विमानतल्या हवाई सुंदरीने ही अनाउंस्मेंट केली आणि मेघा एकदम विचारातून बाहेर आली..विमानतळावर त्या दोघी येणारच होत्या..ती लगबगीने बाहेर निघायच्या मार्गाला लागली.

"स्वागत मेघा" असा बोर्ड घेऊन ड्रायव्हर उभा होता..तिला थोडा राग आला कारण दोघी एअरपोर्ट वर का नाही आल्या म्हणून, पण पुन्हा मनात वाटले की बहुतेक गाडीत असतील..म्हणून एवढी थकून गेली असून सुद्धा ती भराभरा गेली ड्रायव्हरच्या मागे.

गाडीत दोघी बसलेल्या होत्या..खूप आनंदाने त्यांनी हिला "वेलकम" म्हटले आणि रजियाने ड्रायव्हर कडे डोळ्याने इशारा करत म्हणाली "आता बाकी सगळे हॉटेल वर जाऊन बरे"..

"हो हो.."तिने लगेच नेहमीप्रमाणे इशारा समजून घेतला आणि गाडीत बसली.

त्या दोघी अगदी तशाच दिसत होत्या जशा झूम मीटिंग मध्ये दिसायच्या..तिला खूप आनंद झाला..आजची पूर्ण रात्र जगायचे असे ठरलेच होते त्यांचे.

हॉटेल आले..ती उतरली आणि डिक्कितून सामान काढायला लागली.

तेवढ्यात तिला डिक्किमधे व्हीलचेअर दिसली.."ही माझ्या करता आणली होती का?" ती खो खो करत हसत म्हणाली.

तेवढ्यात रजिया खाली उतरली तिने व्हील चेअर कारजवळ घेतली. आणि अनामिकेला चेअरवर बसवले..

मेघा तिला तशा अवस्थेत पाहून स्तब्ध झाली..काय बोलावे ते सुचेना.

"नाही ही माझ्याकरता आहे" अनामिका नेहमी प्रमाणे अधिकारवजा आवाजात म्हणाली.

"अरे पण तुला.." मेघा अजून काही बोलणार त्यापूर्वीच रजिया म्हणाली," हो मला पण आज सकाळी आल्यावरच कळले..ही वेडी आपल्याला एवढ्या कथा सांगायची, कसे स्ट्रोंग बनावे ते सांगायची..पण स्वतः.." तिला तिचा आवढा गिळणे अवघड झाले.

मेघाच्या डोळ्यातपण पाणी आले, "हे केव्हा कसे झाले डियर?"

"हे सगळे आधीच झालेले आहे...पण माझी अनामिका तुमच्या दोघींच्या संपर्कात आली आणि एकदम बदलून गेली. खरंतर आयुष्यात कोणीही हिच्याशी लग्न करणार नाही हे हिला माहित आहे तरीही तिने स्वतःचा एक संसार कल्पनेतच रचला..एवढेच नव्हे तर तिची मुलं पण एक कल्पनाच आहे. फक्त तुम्हाला तुमच्या संसाराला ती आपल्या अनुभवाने सांगत आहे असे भासवायला म्हणून" मागून हॉटेलच्या दाराजवळ उभी असलेली एक बाई हे सगळे सांगत होत्या.

रजिया ने हळूच सांगितले," अनामिकेची आई"

मेघा मनात विचार करायला लागली, "अरे हिच्या बोलण्याने, आधार देण्याने, वेगवेगळ्या समस्यांना समजून घेण्याने मुख्य म्हणजे मला एक आधार दिल्याने, हिच्या मुळे मी अगदी मरणाच्या दारातून परत आले आणि ही...ही स्वतः अशी आहे दिव्यांग?" तिला अनामिका बद्दल आधीच असलेले प्रेम अजून वाढले.. तिने मनातच ठरवले,"आत्ता पर्यंत ही आपली आधार बनली आहे तशी हीच आपला आधार असेल..आपण हिला कधीच आधार देणार नाही..म्हणजे कधीच हिला हीचे अपंगत्व भासू देणार नाही...हिला "बिचारीच्या कॅटेगरीत" नाही टाकायचे" हा विचार मनात येताच तिने रजियाकडे पाहिले. जणू रजिया पण तिचा विचार समजून गेली होती.. समजणारच.... शेवटी जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या त्या!

मेघा डोळ्यातलं पाणी पुसून विषय बदलत म्हणाली, " ए चला गं मुलींनो लवकर रूममध्ये. आपल्याला आपल्या नवऱ्यांविषयी गॉसिपिंग करायचे आहे खूप आणि मला तर तुम्हाला कडकडून मिठी पण मारायची आहे!" आणि त्या तिघी एकत्र खूप जोरात हसू लागल्या..

रजियाने लगेच रोमँटिक प्रत्युत्तर दिले,"बिल्कुल मेरी जान...हम भी कबसे आँखे बिछाये बैठे है तेरे इंतजार मे!"

"हो ग चला लवकर नाहीतर माझा नवरा इथे आला तर आपल्याला आज एकत्र बसू पण नाही देणार" महणत अनामिकेने आपली व्हील चेअर स्वतःच हॉटेल मध्ये जाणाऱ्या चढणाकडे वळवली..तिघी मनमोकळ्या हसत होत्या आपापल्या समस्यांना विसरून .एकत्र ते चढण चढता चढता त्या तिघी मैत्रीच्या वेगळ्याच पायऱ्या चढत होत्या, हे त्यांच्या लक्षातही आले नाही!

©सौ. अनला बापट

2 Comments

Post a Comment
Previous Post Next Post