वर्तुळ (अक्षरचाफा कथा स्पर्धा)
✍️नीला महाबळ गोडबोले
लतानं अर्धवट झोपेतच पाण्यासाठी हात पुढे केला.
डोक्याजवळ ठेवलेलं तांब्याभांडं स्वत:जवळ ओढलं.
उन्हाळ्यामुळे घशाला कोरड पडली होती. ती अधाशासारखी दोन भांडीभरून पाणी घटाघटा प्याली...
तेवढ्यात तिला बाथरूमचाही कॉल आला.एवढा वेळ अंगात भरलेला आळस तिने आळोखे पिळोखे देत झटकला.केस सारखे केले.पदर नीटनेटका केला नि ती अंथरुणातून उठली.
तिची नजर घड्याळाकडे गेली.
रात्रीचे साडेतीन वाजले होते.
तिच्या पलीकडे झोपलेल्या निशाच्या
डोक्यावरून तिने हलकासा हात फिरवला.
थोडी चुळबुळ करून निशा पुन्हा गाढ झोपून गेली.
डोळ्यातून ओघळलेले कालचे अश्रू तिच्या गालावर वाळून गेले होते .
लताने दिवा लावला. दिव्याच्या प्रकाशात तिची नजर शेजारच्या खाटेवर गेली. खाट रिकामीच होती.
या खाटेवर तिचा नवरा प्रसाद झोपत असे.
" हे अजून आले नाई म्हणायचे , का येऊन बाथरूमला गेलेत?" ती स्वत:शीच पुटपुटली..
बाथरूमकडे तिची पावलं आपोआप वळली. तिथे प्रसाद नव्हता.
तिची नजर दाराकडे गेली.
दाराला आतून कडी नव्हती.
तिने बाहेर जाऊन पाहिलं. घराभोवती हिंडून फिरून पाहिलं..
पण प्रसाद कुठेच नव्हता.
आतामात्रं तिला काळजी वाटू लागली.
तिने त्याचा मोबाईल लावला.
पण मोबाईल बंद होता.
" अजून घरी आले नाहीत...मंजे कुठे गेलं असतील एवढ्या रात्री?
बाई,बाटलीच् काय,सुपारीचं पण व्यसन नाई त्यांना ..मग अजून घरी का आले नाईत..?."
प्रसाद....... .
..त्याचं आयुष्य म्हणजे एखादी कादंबरीच.....
सुमारे पंंचेचाळीस वर्षांपूर्वी रस्त्यावरच्या एका उकिरड्यावर एक नवजात अर्भक पडलेलं.
माता,माऊली,आई अशा मोठमोठ्या नावांनी जिला संबोधलं जातं नि जिच्याविणा तिन्ही जगाचा स्वामीही भिकारी ठरतो त्या जन्मदात्रीनेच या आपल्या पोटच्या गोळ्याला सरकारी हॉस्पिटलच्या कोपर्यावरच्या कचर्याच्या कोंडाळ्यात टाकलं होतं नि तिचं पुढचं आयुष्य जगायला निघून गेली होती.
या इवलुश्या मासाच्या गोळ्याचं पुढे काय होईल, ते जगेल की मरेल , जगलं तर त्याला कोण सांभाळेल ..
याचा विचारही तिच्या मनात आला नसावा..
तिला काळजी होती ती फक्त तिच्या सुखाची ..
.या नको असलेल्या पोरामुळं ती अडकून पडणार होती.
म्हणूनच तिला ते नको होतं..
घरातील नको असलेली वस्तू जितक्या सहजतेनं टाकली जाते,तितक्या सहजतेनं या जिवंत गोळ्याला उकिरड्यावर टाकून ती पसार झाली होती.
जन्माला घालायला कारणीभूत असणार्या नरानं तर त्याचा कार्यभाग
उरकल्यावर पलायन केलं होतं.
आपल्यामुळे एक जीव या भूतलावर अवतरलाय,याची जाणीवही त्याला होती की नव्हती हे त्या परमेश्वरालाच ठाऊक!
नाव,गाव,आई,वडील,घर,दार,प्रेम ,माया ...असं इहलोकीचं काहीच नसलेल्या त्या पोराला परमेश्वरानं पोटात भुकेची जाणीव आणि त्यासाठी रडणं मात्रं शिकवून पाठवलेलं होतं.
पोटात भुकेचा डोंब उसळल्यावर त्याने तोंडातून आवाज काढायला सुरुवात केली.थोड्यावेळाने तेवढीही शक्ती त्या लेकरात राहिली नाही. लहान लहान होत तो आवाजही बंद झाला.
झाडावर टपून बसलेला एक कावळा इकडे तिकडे पहात उकिरड्यावर उतरला. त्याने त्या गोळ्याच्या अंगभर चोच लावून पाहिली. कान त्याला मऊसर बरा वाटला म्हणून चोचीनं कुरतडायला सुरुवात केली.
त्या वेदनेनंच बाळाला शक्ती दिली नि ते एकदाच जोरानं किंचाळलं..
कुठून कुणास ठाऊक पण एक कुत्री वेगाने धावत आली नि त्या कावळ्याला तिने हुसकावून लावलं.
चारी बाजूला तोंड करून ती जोरजोरात भुंकू लागली.
कर्मधर्मसंयोगाने रस्त्यावरून जाणार्या एका सद्गृहस्थाचं लक्ष त्या अर्भकाकडे गेलं.
त्यांनी पळत जाऊन जवळच्या पोलिसचौकीतून पोलिसाला आणलं.
पोलिसाने ते अर्भक जीवंत असल्याची खात्री करून घेतली.त्याची चौकीत नोंद केली नि वरिष्ठांच्या सुचनेनुसार त्याला गावातील अनाथाश्रमात नेलं.
त्या दिवसापासून त्या लेकराचा "अनाथ" म्हणून प्रवास सुरू झाला.
आश्रमानेच त्याला " प्रसाद " या नावानं ओळख दिली.
अन्न ,पाणी ,वस्त्र,निवारा याच आश्रमात त्याला मिळाले.
काळा वर्ण, जाड ओठ, थोडा वेडावाकडा नि कोणत्याही भावभावनांचा आजिबात पत्ता नसलेला मख्ख चेहरा... पण कोणाचंही लक्ष वेधून घेतील असे मोठे ,निष्पाप ,बोलके डोळे!
प्रसाद दिसामासी मोठा होत होता.
आश्रमात त्याला दोस्तमंडळी मिळाली होती.
आश्रमातील सेवक वर्ग या अनाथ पाखरांसाठी जितकं करता येईल तितकं करत होता.
धनिक लोक पैसे,वस्तू या स्वरुपात आश्रमाला मदत करीत होते.
कोणी लग्ना-कार्यातलं उरलेलं अन्न आश्रमाला देत होते.
या दिवशी मुलांना जिलबी,श्रीखंड,गुलाबजाम यांची मेजवानी मिळे.
इतर दिवशी मात्रं भाकर नि डाळ-भात पोटात ढकलावे लागे.
सरकारी नियमांनुसार सार्या मुलांसोबत प्रसादलाही सरकारी शाळेत घातलं.
शाळेतले शिक्षक या अनाथ मुलांना किती शिकवायचे हे त्यांना नि मुलांनाच ठाऊक.....
पण रोजच्या रोज स्वत:चं डोकं, पाय,हात यांना मालीश करून घ्यायचे.
घरची भाजी आणणे, भाजी निवडणे, घरातील साफ सफाई,धुणं भांडी अशी अनेक कामे ते या अनाथ मुलांकडून करून घेत नि त्यांना घरातील शिळं अन्न खायला देत असत.
"या कामांबद्दल कुणाला सांगायचं नाही,नाहीतर नापास करीन " या गुरुजींच्या धाकाने मुले तोंडाला कुलुप लावीत.
प्रसाद नववी पास झाला. दहावीत गेला.तीन वर्षे दहावीची बोर्डाची परीक्षा देत होता.पण एकाही विषयात दोन नाहीतर तीनपेक्षा जास्त गुण मिळत नव्हते.
कसे मिळणार?
गुरुजींच्या घरच्या कामांत अक्षर ओळखही झाली नव्हती.
अंक लिहिता काय मोजताही येत नव्हते.
शास्त्र हा शब्द उच्चारताही येत नव्हता.
इतिहास,भूगोल हे कशाशी खातात ,हेही माहीत नव्हतं.
मराठीशी जिथं वैर होतं तिथे इंग्रजीची अवस्था काय असेल,याची कल्पनाच केलेली बरी!
प्रसादला "प्रसाद" अशी स्वत:ची सही लिहिता येत होती .पण ही लिहिलेली अक्षरे त्याला वाचायला येत नसत.
गुरुजींचे उपकार मात्रं नक्कीच होते.
त्यांनी लावलेल्या कामांमुळे प्रसाद सर्व प्रकारच्या कामांत तरबेज झाला होता.
दिवस-दिवस न दमता,न कंटाळता तो कामे करू शकत होता.
कामातच तो आई-वडील,नातेवाईक, देव सगळं पाहू लागला होता.
आज प्रसादचा अठरा वर्षांचा वाढदिवस होता.
त्याला नवीन कपडे शिवले होते.
गोडाचं जेवण सार्या आश्रमवासीयांना दिलं गेलं.
आश्रमातील मावशींनी प्रसादचं औक्षण केलं.
संचालकांनी त्याच्या हातावर शंभर रुपयाची नोट ठेवली.
प्रसादने आश्रमातील सार्यांना नमस्कार केला.दोस्तांच्या गळाभेटी झाल्या. सगळ्यांची मनं भरलेली होती,डोळे वहात होते.
कुणालाच काय बोलावं ते सुचत नव्हतं.
प्रसादची पुन्हा भेट कधी होईल, तो पुन्हा दिसेल की नाही या विचारांनी कुणी बोलूही शकत नव्हते.
बोलत होते ते फक्त डोळे नि स्पर्श!
प्रसादने आपली कापडी पिशवी उचलली. नि तो आश्रमाच्या दाराशी आला.
वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर प्रत्येक लेकराला आश्रम सोडायला लागत असे.
मुलगा आता प्रौढ झालाय तेंव्हा त्यानं जगाच्या पाठीवर कुठेही जावं नि कष्ट करून आपलं आयुष्य जगावं.
प्रसाद आश्रमाबाहेर आला.
ज्या आश्रमानं आपल्याला अठरा वर्षे जगवलं, देता येईल तितकं दिलं त्या आश्रमाला त्याने डोकं टेकून नमस्कार केला.
दोस्तांचा निरोप घेतला नि न आवरणार्या हुंदक्यासहीत तो चालू लागला.
आश्रमातल्या गमतीजमती,दोस्त ,माया करणार्या मावशी यांनी काळीज भरलं होतं..
जड पाय भराभरा पुढेही जात नव्हते.
एका बाजूला कालच्या आठवणींनी गर्दी केली होती नि दुसरीकडे उद्याच्या काळजीने मनाला घेरलं होतं.
एकही ओळखीचं किंवा नात्याचं माणूसच काय जनावरही नसलेल्या या मोठ्या जगात जायचं कुठे? भूक लागली तर खायचं काय?
मरण आलं तर जाळायला कोणं?
त्याची पावले पुढेच जाईनात..
त्याला रस्त्याच्या कडेला एक वडाचा पार दिसला.
तो झाडाला टेकून बसला.
झाडाच्या मागच्या बाजूला त्याला छोटीशी देवळी दिसली.
त्यात दत्तगुरुंची प्रसन्न मूर्ती होती.त्याने द्त्तगुरूंना मनापासून नमस्कार केला.
" देवा,आता तुम्हीच मला मार्ग दाखवा" .... ... त्याने मनोमन प्रार्थना केली.
देवापुढे पैसे ठेवण्यासाठी पिशवी काढली.पिशवीतल्या एका छोट्याशा पाकिटात त्याने आश्रामात कधी कुणी दिलेले पैसे ठेवले होते.त्यातलं रुपयाचं नाणं काढून त्याने देवापुढे ठेवलं ..
तेवढ्यात एक कागदाचा तुकडा त्याला पिशवीबाहेर पडलेला दिसला.
त्याने तो पाहिला.
त्याला त्याच्यावरचं काहीच वाचता येत नव्हतं.
पण त्याची आठवण पक्की होती.
सहा महिन्यांपूर्वी जवळच्या शहरातून एक साहेब आश्रमात आले होते. त्यांना प्रसाद फार आवडला होता.
"आश्रमातून बाहेर पडशील तेंव्हा माझ्या घरी ये.मी तुला काम देईन"
त्या गृहस्थांंनी प्रसादला एका कागदावर आपला पत्ता लिहून दिला होता. तोच हा कागद होता.
प्रसादचे डोळे चमकले.विचारांना पूर्णविराम मिळाला.
दत्तगुरुंनी त्याला वाट दाखवली होती.
त्या घुमटीशेजारी बसलेल्या कुत्र्याला त्याने आश्रमातील मावशींनी दिलेल्या पोळीतील अर्धी पोळी खाऊ घातली.
पिशवी उचलून तो शहराकडे जाण्यासाठी स्टॅंडकडे झपाझप चालू लागला.
खाल्लेल्या पोळीला जागून कुत्राही त्याच्यासोबत चालू लागला.
संध्याकाळी पत्ता विचारत तो शहरातील परांजपे साहेबांच्या घरी पोहोचला.
एका मोठ्या रहिवासी वसाहतीत त्यांचा टुमदार बंगला होता.
वसाहतीत अनेक सधन व्यावसायिक,उद्योगपती रहात होते.
कॉलनीचे स्वत:चे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी असलेले एक सभागृहही होते.
या सभागृहात परांजपे साहेबांनी प्रसादची राहण्याची व्यवस्था केली.
सभागृह स्वच्छ ठेवणे, टाक्यांतून पाणी भरणे अशी कामे त्याच्याकडे
सोपवली.
परांजपे साहेबांच्या घरचीही अनेक कामे प्रसाद करू लागला.
त्याबदल्यात दोन वेळचे जेवण त्याला मिळत असे.
जात्याच लाघवी,कष्टाळू असलेल्या प्रसादच्या वसाहतीतील सगळ्यांशी ओळखी झाल्या.
कुणाचं आवार घाण झालेलं दिसलं की झाडून स्वच्छ कर, कुणाच्या आजींना हात धरून देवाला ने, कुणाचं दळण आणून दे, कुणाच्या मुलाला शाळेत सोड...अशी कामे तो एका पैशाचीही अपेक्षा न ठेवता स्वत:हून करू लागला.
लहान मुले हा प्रसादचा जिव्हाळ्याचा विषय..
" वहिनी, तुम्ही बाहेर जाऊन या,मी बाळाला सांभाळतो".
कॉलनीतील बायका मुलांना प्रसादवर सोपवून बिनधास्त बाहेर जाऊ लागल्या,आपली कामे करून येऊ लागल्या.
लहान मुलांना माणसांची जाण फार चांगली असते.
प्रसादमधील माणसाला लहान मुलांनी आपलसं केलं.
त्यामुळे प्रसादभोवती नेहमी मुलाबाळांचा गराडा असे.
प्रसादचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तो कुठेही असला तरी त्याच्याभोवती कुत्री गोळा होतं..
हा त्याच्या शुद्ध आत्म्याचा प्रभाव किंवा तो आपल्यातलं काढून घालत असलेल्या अन्नाचा परीणाम असावा.
थोड्याच कालावधीत त्याने कॉलनीबरोबरच आसपासच्या लोकांना आपलसं केलं.
कोणी त्याच्याकडून काम करून घेऊन पैसे देत, कधी कोणी त्याला अन्न देत तर कोणी कपडे.
एका सद्गृहस्थांनी त्याला सायकलही दिली.
प्रसादशिवाय कुणाचं पान हलेनासं झालं.
गोड बोलणं, कोणत्याच कामाला नाही नं म्हणणं,कष्ट, अत्यंत चोख काम,प्रामाणिकपणा यांवर तो सार्यांना घरातील सदस्य वाटू लागला.
त्याचं अनाथपण संपलं.
घरातील समारंभ ,सणवार हे प्रसादशिवाय होईनासे झाले.
आई वडिलांनी सोडून दिलेल्या प्रसादला किती माय-बाप,किती काका-काकू,मावश्या,भाऊ-बहिणी,आजी-आजोबा मिळाले याला गणतीच नाही..
"तुला आई -वडिलांना शोधावसं,भेटावसं नाही वाटत ?"
लोक विचारीत.
"ज्यांना मी जिवंत आहे की नाही हे पहावसंही वाटलं नाही , एक दिवसाच्या पोटच्या गोळ्याला उकिरड्यावर टाकून देताना हात थरथरला नाही, त्यांना मला का भेटावसं वाटेल?
.मला आई-वडील म्हणजे काय असतं हे माहीतच नाही."
तो निर्विकारपणे सांगायचा.
त्याचा तो भावहीन चेहरा पाहून विचारणार्याच्या पोटात गलबलून यायचं...
पाच सहा वर्षे अशीच गेली.
एका मॉलमधे त्याला नोकरी लागली.
चांगला पगार मिळू लागला.
साधी राहणी,सुपारीच्या खांडाचंही नसलेलं व्यसन , इतर जास्तीची केलेली कामं यांमुळे त्याचे बॅंकेत पैसे साठू लागले.
एकदा झाडावरून पडला नि एक पाय अधू झाला.
जीवावर बेतलं होतं पण पायावर निभावलं.
पण त्याचं काम कमी झालं नाही.
पहाटे चहाच्या टपरीवर काम ,नंतर मॉलमधील नोकरी, संध्याकाळी कुणाचं घरचं तर कुणाच्या ऑफिसचं स्वच्छतेचं काम , रात्री कुणाची वॉचमनची ड्यूटी...
तो अव्याहत काम करत होता.
त्याने भाड्याचीच स्वत:ची एक खोली घेतली.
आता प्रसादला लग्नाचे वेध लागले.
घरदार असलेल्या दारुड्या,कुचकामी मुलांना सहज मुली मिळत होत्या.
पण ज्याच्या जाती-धर्माचा,कुळाचा ,आई-बापांचा पत्ता नाही त्या अत्यंत कष्टाळू,प्रामाणिक,निर्व्यसनी मुलाला मात्रं लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती.
त्याच्या घराशेजारील एका मावशीच्या ओळखीनं नवर्याने सोडून दिलेल्या लताचं स्थळ प्रसादला सांगून आलं नि गंगेत घोडं न्हालं. प्रसादचं लग्न झालं.
घरोघरी केळवणं झाली.
भेटवस्तू दिल्या गेल्या.
प्रसाद,लताचा संसार भरून गेला.
लता दिसायला सुस्वरूप होती.नीटनेटकी राहणारी नि स्मार्ट.
स्वत:चं चांगलं करून घेण्याची ओढ असणारी...जगरहाटीची जाण असणारी..व्यवहारी!
प्रसाद दिसायला सुमार...भीती वाटावी असा..
साधासुधा...गबाळा
आपलं -परकं न पहाणारा..
अत्यंत अव्यवहारी..
स्वार्थ म्हणजे काय हेच माहीत नसलेला...
दोघांच्यात भांडणे सुरू झाली.
पण माणसांसाठी भुकेल्या प्रसादनं
बायकोला कधीच वाईट वागवलं नाही..
तो तिच्यावर फक्त प्रेमच करीत राहिला..
या सद्वर्तणुकीचं फळं देवानं त्याच्या पदरात घातलं.
त्याच्या संसारवेलीवर एक मुलगा नि एक मुलगी अशी गोंडसे फुले उमलली.
दोन्ही मुले शाळेत जाऊ लागली.
प्रसाद अजून कष्ट करून त्यांचे लाड पुरवू लागला.
लताही आता
चार घरची कामे करून संसाराला हातभार लावत होती.
प्रसादने पत्र्याचेच पण स्वत:च्या मालकीचे घर बांधले.
मुलगा छान शिकून मोठ्या शहरात नोकरीला लागला.
प्रसादने त्याला स्वत:जवळची पुंजी देऊ केली.
त्यावर मुलाने शहरात स्वत:चं छोटासं घर घेतले..
त्याचे लग्न होऊन तो मार्गी लागला..
प्रसाद नि लता फार खुश होते.
धाकटी मुलगी निशा लहान होती.
नववी -दहावीत होती.
तिचे शिक्षण करून लग्न लावून दिले की त्यांचा संसार सफल-संपूर्ण होणार होता..
शून्यातून विश्वनिर्मितीचं समाधान प्रसादला मिळणार होतं.
माणूस एक चिंतत असतो..
दैवानं मात्रं काहीतरी वेगळच योजलेलं असते.
एके दिवशी निशाला उलट्या सुरू झाल्या.
घरगुती औषधपाणी केलं पण कमी व्हायची चिन्हे दिसेनात.
शेवटी तिला डॉक्टरांकडे नेलं.
डॉक्टरांनी स्त्रीरोग तज्ञांकडे जायला सांगितलं.
स्त्रीरोग तज्ञांनी तिला दिवस गेले असून चार महिने झाले आहेत ,असं सांगितलं तेंव्हा पायाखालची जमीन सरकली.
शेजारच्या मुलाने सुस्वरूप नि निरागस असणार्या निशासोबत जबरदस्ती केली होती नि कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.
प्रसाद नि लताने अनेक हॉस्पिटले पालथी घातली .
पण चार महिने झालेले असल्याने कुणीच अबॉर्शन करायचा धोका पत्करायला तयार नव्हतं.
प्रसंग फार अवघड होता.
आई फार आजारी आहे असे सांगून
व्यवहारी लता मुलीला घेऊन बहिणीच्या गावी गेली.
तिथे एका नातेवाईकांनी बिजवराचे स्थळ आणले.
मुलगा वयानं मोठा असला तरी दिसायला चांगला होता,सुशिक्षित व सधन होता.
त्याला लताने सगळी कल्पना दिली.
निशा त्याला आवडली.
पण निशाच्या होणार्या बाळाची जबाबदारी घ्यायला मात्रं तो तयार नव्हता.
"निशाच्या होणार्या बाळाची सावलीही त्यांच्या संसारावर पडता कामा नये"....या अटीवर तो लग्नाला तयार झाला..
निशा बाळंतीण झाल्यावर बाळाला अनाथाश्रमात सोडून दोन महिन्यांनी
लग्न उरकायचे,असा लताने प्लॅन ठरवला.
निशा नि प्रसाद याला तयार नव्हते.
" मी सांगते तसं झालं नाही तर मी जीव देईन , पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे..."
लतापुढे बापलेकांना शरणागती पत्करावी लागली..
पाच महिने वार्यासारखे सरले.
एके दिवशी निशाला कळा सुरू झाल्या.
प्रसादला फोन गेला.
प्रसाद लगेच आला.
निशा बाळंतीण झाली.
मुलगी झाली.
त्या बाळाकडे पाहून निशा सारखी रडत होती.
बाळाला अनाथाश्रमात सोडायला नको म्हणून आईला विनवत होती.
तिच्या आईचंही बरोबरच होतं.
निशाचं उभं आयुष्य तिच्या समोर उभं होतं.
हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला.
बहिणीचं घर गाठलं.
रात्री नऊला तिघे भाड्याच्या गाडीत बसले.
बाळासहित रात्री उशीरा आपल्या शहरात आले.
कुणाला दिसू नये म्हणून ही रात्रीची वेळ मुद्दामच निवडली होती.
गाडी कृष्णाच्या मंदिराजवळ थांबली.
प्रसाद बाळाला घेऊन उतरला.
इथेच मागे आश्रम होता.
बाळाला आश्रमाच्या समोरील कट्ट्यावर ठेऊन तो घरी जाणार होता.
निशानं बाळाला शेवटचं छातीशी धरलं नि धाय मोकलून रडली.
लतानं तिच्या हातातून बाळ काढून घेतलं नि प्रसादकडे सोपवलं.
पाठमोर्या प्रसादकडे पहात असतानाच गाडी लता नि निशाला घेऊन घराकडे वळली..
मायलेकी घरी आल्या.
पोट भुकेची जाणीव करून देत होतं.
पण मन तोंड उघडायला तयार नव्हतं.
प्रसादसाठी दार उघडं ठेऊन
थोडसं पाणी पिऊन दोघीही अंथरुणावर आडव्या झाल्या.
दमलेली शरीरं निद्रेच्या कधी आधीन झाली,ते कळलच नाही.
आता बाथरूमसाठी लता उठली होती.
सगळीकडे शोधूनही तिला प्रसाद कुठेच सापडत नव्हता.
तिला काय करावं ते समजत नव्हतं.
कुणाला काही सांगायचीही सोय नव्हती.
ती तशीच अंथरुणावर पडून राहिली.
पहाटे सहाला तिचा फोन वाजला.
फोनच्या आवाजानं निशाही उठून बसली.
फोन प्रसादचाच होता.
" अहो,तुमी कुठाय ?"
लता तिच्या चिरक्या आवाजात ओरडली.
" शांतपणे ऐक मी काय सांगतो ते.
मी बाळाला घेऊन आश्रमात गेलो.
बाळाला आश्रमाच्या कट्ट्यावर ठेवणार तेंव्हाच ती मुलगी रडायला लागली जणु काय तिला इथे आश्रमात रहायचं नव्हतं.
मी तिच्यकडं पायलं न मला तिच्याजागी मीच दिसू लागलो.
आई-बापानी उकिरड्यावर सोडलेला,
कावळ्यानं टोची मारलेला.
अनाथाश्रमात सगळे भोवताली असूनही मनातून एकटाच असलेला.
प्रत्येक क्षणी असुरक्षिततेने ग्रासलेला.
आई-बाप ,नातीगोती म्हणजे काय असतं ,हेही माहीत नसलेला.
"अनाथ" हा शिक्का माझ्यावर जो बसला तो कधीच निघाला नाही.
आणि तो मरेपर्यंत कधी पुसलाही जाणार नाही.
मला लेकरं झाली,नातवंडं झाली तरी मी अनाथ म्हणूनच मरणार...
माझं दु:ख कुणालाच कधी समजणार नाही.
या लेकराचं आयुष्य न संपणार्या दु:खानं भरून जायला नको.
तिचा बाप नालायकच आहे.
तिच्या आईचं उभं आयुष्य समोर आहे.
पण तिचा आजोबातर अजून जिवंत आहे.
हा आजोबा तिला "अनाथ" होऊ देणार नाही. जीवात जीव असेपर्यंत तिला तो सांभाळेल. तिचं शिक्षण करेल,चांगला मुलगा बघून लग्न लावून देईल.
माझ्या कपाळीचा कलंक मी या चिमणीला लागू देणार नाही.
मी चिमणीला घेऊन दूरवर जातोय.
आश्रमातून बाहेर पडल्यावर सोबत काहीच नसताना मी माझं छोटं का असेना माझं जग तयार केलं..
आता पुन्हा तेच करेन.
आता तर माझ्यासोबत जगाचा अनुभव आहे आणि मुख्य म्हणजे माझी नात आहे.
मला शोधायचा प्रयत्न करू नका.
निशाचं लग्न कर .तिला माझा आशीर्वाद सांग.
लग्नानंतर तू शहरात पोराकडं जाऊन रहा.."
बाळाच्या रडण्याचा आवाज आला नि फोन बंद झाला....!!
एक वर्तुळ पूर्ण होता होता थांबलं होतं..
नीला महाबळ गोडबोले
सोलापूर