ता-थई -तै -तत्

 

अक्षरचाफा कथा स्पर्धा 


#ता-थई -तै -तत् 

✍️ सायली पानसे

     दीपा आणि विराज दोघेही सॉफ्टवेअर  कंपनीत कामाला होते .कामाचे मेल , गप्पा , कॉफी असं करत करत गाडी प्रेमापर्यंत कधी पोहोचली हे त्यांचं त्यांना देखील समजलं नाही.दोघेही अनाथ होते  आणि हाच दोघांना जोडणारा अजून एक समान धागा होता.दोघेही एकेकांना अगदी पूरक होते. ३/४ महिन्यांतच दोघांनी एका देवळात काही जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्न केलं .राजाराणीचा  संसार  सुरु झाला.

    विराज खूपच  समजूतदार  होता. जमेल  तशी 

दीपाला घरातही  मदत  करायचा. दीपा सुद्धा नोकरी सांभाळून सगळं हवं नको ते पाहत होती.आत्तापर्यंत ' आपलं माणूस आणि त्यांचं प्रेम ' न मिळालेल्या दोघांनाही आता हक्काचं माणूस मिळालं होतं , प्रेम करायला , रागवायला , दुखलंखुपलं बघायला.दोघंही अगदी ' सातवे अस्मानपे ' वगैरे अशीच काहीशी होती.अगदी दृष्ट लागेल एखाद्याची इतकं प्रेम होतं दोघांचंही एकमेकांवर.

    सुरुवातीचे  काही  दिवस  सुट्टी म्हणाली  की भ्रमंती 

,कामे  ह्यातच  वेळ  जायचा  दोघांचाही.विराज ला भटकंती मनापासून आवडायची.दीपा ही अगदी मनमुराद आनंद लुटायची भटकंतीचा.आज खूप दिवसांनी सुट्टीच्या दिवशी ते निवांत घरी होते. विराज दुपारी 

मस्त पिक्चर बघण्यात दंग होता.इतक्यात त्याला ' ता थै तै तत् '  आणि पाठोपाठ घुंगरांचा आवाज आला.

त्याला स्वतःलाच काही समजायच्या आत तो मस्तकात तिडीक जाऊन उठला .दीपाच्या दिशेने जात , चिडूनच तिच्या पायातून ते घुंगरु  हिसकावून दूरवर भिरकावत दीपाकडे रागाने पाहू लागला.

   विराज  स्वभावाने अतिशय  शांत होता.त्यामुळेच दीपाला हे  त्याचे  वागणे खूपच  अनपेक्षित होते.  ती बावचळली , घाबरली .थोडा वेळ तशीच स्तब्ध उभी होती.विराज मात्र  चिडून  कधीच  तिथून  निघून गेला होता." हा असं का वागला असेल ?? " असा विचार करतंच दीपाने ते घुंगरु  उचलून एका बॉक्स मध्ये घालून कपाटात ठेऊन दिले. विराज शांत झाल्यावर त्याला विचारु  , असा विचार करुन दीपा पुढच्या कामाला लागली.

      थोड्या वेळातच विराज शांत झाला.दीपाची 

माफी मागतच तिला म्हणाला ," ह्या घुंगरांमुळेच मी अनाथ झालोय." दीपाला काही समजेना ." माझी आईला नृत्याची खूप आवड होती.वडिलांचाही याला 

काहीच  आक्षेप नव्हता .मी ८ वर्षांचा  असताना  माझे 

वडील  अचानक आम्हाला  सोडून गेले.साठलेल्या थोड्याफार पुंजीमध्ये घर चालवणं अवघड  होऊ लागलं.

आईच्या डोक्यात काय आलं कुणास ठाऊक , पायात घुंगरु  बांधून तमाशात लावणीचे कार्यक्रम करु  लागली.एवढ्यावरच थांबली नाही .पैशाच्या हव्यासापायी मला एक दिवस एका दूरच्या नात्यातल्या आजोबांकडे सोडून गेली.किती रडलो होतो मी ती निघाल्यावर तिचा पदर धरुन .तिला तिळमात्र काहीही फरक पडला नाही .कालांतराने ते आजोबाही गेले .मी स्वतःला अनाथ च समजू लागलो.आज घुंगरांचा आवाज ऐकला आणि हे सगळं आठवून माझा ताबा सुटला .तुला  मी एक विनंती करतो तू परत त्या घुंगरांना हात लावू नकोस " 

      दीपाला खूप वाईट वाटलं.विराजसाठी ती एवढं नक्कीच करु  शकणार होती. दीपाची कथक नृत्याची आवड मात्र आज कायमची कपाटात बंद झाली होती.वेळ मिळेल तेव्हा नृत्याचे विडिओ बघणे , कथक चा लेखी अभ्यास हे मात्र सुरुच ठेवले तिने .त्यात विराजला काही आक्षेप घेण्याचे कारणही नव्हते आणि अर्थात त्याचा आक्षेप नव्हताही .

    वर्षभरातच त्यांना येणाऱ्या बाळाची चाहूल लागली.विराज तर दीपाची खूप काळजी घेत होता.त्याला काय करु  आणि काय नको असे झाले होते दीपा साठी.एखादे आई वडील लाड करतील त्याप्रमाणेच तो दीपाचे लाड करत होता.कोडकौतुक करत तिचे हट्ट पुरवत होता.मातृदिनाच्या दिवशीच दीपा विराज ला एक गोड़ मुलगी झाली.त्यांनी तिचं नाव ' ईशा ' ठेवलं .दोघे मिळून तिची छान काळजी घेत होते.ईशासाठी दीपाने नोकरीतून ब्रेक घेतला होता.

    ईशाच्या बाळलीला बघण्यात , तिचे हट्ट पुरवण्यात आला दिवस कसा संपायचा दोघांनाही समजायचे नाही.आईवडिलांचे प्रेम न मिळालेली दीपा इशाला भरभरुन प्रेम देत होती.दोघांनाही कायम असेच वाटायचे ईशाला काही कमी पडू द्यायचे नाही.बघता बघता ईशा १२ वर्षांची झाली. आईचे कानातले , तिच्या पर्स ह्यावर डल्ला मारु  लागली.बाबाची आणि ईशाची तर चांगलीच दोस्ती होती.दोघे एका पार्टीत आणि दीपा  बिचारी एका पार्टीत .

    एक दिवस असंच आईच्या कपाटात खुडबुड करताना ईशाला ते घुंगरु  सापडले .तिने लगेच पायात घातले आणि तिचे पाय थिरकायला लागले.दीपा ला काय करावे समजेचना. आज मात्र विराज काही न बोलता तिथून निघून गेला.ईशा तेवढी मोठी नक्कीच होती.बाबाला हे आवडलं नाही हे तिच्याही लक्षात आलं .

दुसऱ्या दिवशी मात्र बाबाला लाडीगोडी लावून तिने घरात डान्स करणार नाही पण डान्स क्लास लावून कथक शिकण्याबाबत विचारले.आवडले नसले तरी लेकीपुढे विराजचे काही चालले नाही.

      दुसऱ्याच दिवशी डान्स क्लास मध्ये 

ऍडमिशन  घेतली देखील, सोडायला आणि आणायला आई येणार ह्या अटीवर.विराजच्या दृष्टीने ती अट असली तरी मायलेकींसाठी ती पर्वणीच होती.दीपाच्या डोळ्यातलं स्वप्न आणि नृत्याची आवड ईशाने तिच्या डोळ्यात बघितली होती.मायलेकींचा कथक क्लास मस्त सुरु झाला.दीपा इतकी खुश होती की तिच्या चेहेऱ्यावर ते अगदी सहज प्रतिबिंबित होत होतं.ईशा सुद्धा तेवढीच खुश होती.विराज सारख्या चाणाक्ष माणसाने थोडे दिवसातच ते ताडलं होतं.तरीही तो शांतच होता.तो ऑफिसमधून घरी यायच्या आत दोघी घरी परत येत असल्याने त्याला फारसा फरक पडत नव्हता .

      मातृदिनानिम्मित डान्स कलासचा  प्रोग्रॅम  होता.ईशाचा आज तिथीने वाढदिवस होता.वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून तू माझा प्रोग्रॅम बघायला यायचंस अशी गळ घातली होती ईशाने विराजला.आईही माझ्याबरोबर डान्स करणार आहे हेही तिने विराजला सांगितल्यामुळे दीपाला विराज येणार नाही याची खात्रीच होती.

  प्रोग्रॅम मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे  तिथे गुरुंच्या मदतीला काही मुली आल्या होत्या. त्यांच्याबरोबर   एक  आजी  देखील  होत्या.आजी एवढ्या सफाईने  मुलींचा मेकअप करत होत्या की दीपा ला देखील आश्चर्य वाटले.ईशाची तर आजीशी छान गट्टी झाली होती थोड्याच वेळात. ईशाचे पूर्ण नाव जेव्हा त्या आजीला समजले , आजींनी  तिथल्या तिथे ईशाला घट्ट मिठीत घेतले.ईशाला , दीपा ला काही समजेचना.आजीच्या डोळ्यातले पाणी थांबता थांबेना.

      दीपाने आजींना पाणी दिले .त्यांना बसवले.आजींनी विचारले ," तू विराज ची बायको का ग?? आणि ईशा तुमची मुलगी का ?? " दीपा ला अजूनही काही समजत नव्हते.आजी बोलू लागल्या ," विराजचे वडील गेले आणि मी अगदी एकटी पडले.विराजचे शिक्षण , त्याचे हट्ट पुरवण्यासाठी पैसे लागणारच होते.त्यामुळेच मी माझ्या नृत्याच्या आवडीचा पैसे कमावण्यासाठी वापर करायचे ठरवले.तमाशात लावणी , जिथे मिळेल तिथे काम करुन पैसे मिळवू लागले. माझ्या लक्षात आले विराज साठी घराचं असं वातावरण अजिबात चांगलं नाही.तो वेगळ्याच खाईत लोटला जाईल माझ्यामुळे.म्हणूनच काळजावर दगड ठेऊन त्याला दूरच्या काकांकडे सोडून आले.रोज नव्याने मरत होते मी.काका गेल्यावर मी विराजला घ्यायला गेले तेव्हा त्याने मला झिडकारले.दूर लोटले.मी पूर्णतः कोसळले.विराज मला आई म्हणून स्वीकारायला तयारच नव्हता.मी हरले होते.ज्याच्यासाठी हा मार्ग स्वीकारला होता तोच आज माझा राहिला नाही म्हणल्यावर मी माझं नृत्य पूर्ण थांबवलं . ह्या गुरुंनी माझ्या जगण्याला नवा अर्थ दिला."

        दीपाला आणि ईशाला काय बोलावे काही समजेचना ." आई ,आजी म्हणत दोघी आजीच्या गळ्यात पडल्या." " चला चला आवरा लवकर .आता प्रोग्रॅम आहे ना ," म्हणत आजींनी त्यांना तयार केले.दीपाला आज प्रोग्रॅम संपवून आजींना घेऊन कधी घरी जातोय असे झाले होते.तिला खात्री होती विराज त्यांना समजून घेईल याची.

      थोड्याच वेळात पडदा उघडला .दीपा आणि  ईशाने वंदन करुन समोरच्या पहिल्याच खुर्चीत विराजला पाहिले आणि त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.आजचा डान्स मातृदिनावरच  आधारित  होता.

दोघींचे हावभाव , लयबद्ध हालचाली इतक्या अप्रतिम सुंदर होत्या की कार्यक्रम संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला .विराजला दोघींचेही खूप कौतुक वाटले.आज  प्रथमच आईच्या आठवणीने विराजच्या  डोळ्यात पाणी  दाटले होते.कार्यक्रम संपताच त्या दोघी विराज ला घेऊन पडद्यामागे जाऊ लागल्या.

      दीपाने  तेवढ्या वेळात घडली घटना विराजला 

सांगितली. २  च  मिनिटात  विराज आईसमोर उभा होता.दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली.आज मातृदिनानिम्मित नियतीनेच विराज ला दिलेली ही सुंदर भेट होती. चौघेही आनंदात घरी पोहोचले.

     ईशालाही तिच्या वाढदिवसाचं खूप छान गिफ्ट मिळालं होतं.घरी पोहोचल्या पोहोचल्या तिघींना सोफ्यावर बसवून विराज म्हणाला ," ता थई तै तत् " !

सायली पानसे .


ही कथा तुम्हाला आवडेल.

आठवणींची संदूक

Post a Comment (0)
Previous Post Next Post