पंढरीची वारी

           पंढरीची वारी  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ जयंत कोपर्डेकर 

   भास्कररावांची बदली आता पुण्यात झाली. त्यांना प्रमोशन मिळाले. निवृत्त व्हायला त्यांना आता फक्त एक वर्ष उरले होते. दोन बेडरूमचा एक फ्लॅट भाड्याने घेऊन ते पुण्यात राहू लागले. आणि नवीन ऑफिस सुरू झाले. मोठी पोस्ट मिळाल्याने तसे ते खुशच होते. ते आणि त्यांची बायको दोघेच घरी. त्यांना दोन मुलं. मुलगी लग्न झाल्यावर तिच्या सासरी गेली. आणि मुलगा नोकरी निमित्त दिल्लीत राहतो.

    भास्करराव तसे मूळचे सांगलीतले. मध्यमवर्गीय कुटुंबातले. शिक्षण पूर्ण झाले आणि सरकारी नोकरी मिळाली. नंतर लग्न झाले. पण सरकारी नोकरीमुळे दर तीन वर्षांनी बदली व्हायची. त्यामुळे त्यांनी अनेक गावे पाहिली. त्यांची बायको मात्र गृहिणी. मुलं संसार यातच ती रमली. हे दिवसभर ऑफिसात त्यामुळे मुलांचे संगोपन, शिक्षण सार तीनच केलं.

    भास्करावांना सगळे नाना म्हणून ओळखत. सरकारी दप्तरी नोकरी, त्यामुळे अनेक लोकांशी रोजचा संबंध. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा होता. त्यात हे बोलबच्चन त्यामुळे त्यांच्या मित्र परिवारात सर्वांचे लाडके. पहिल्यापासूनच बेधडक वृत्तीचे. त्यामुळे ऑफिसला सगळे त्यांना टरकून असायचे.

    कामानिमित्त अनेकांशी संपर्क यायचा, त्यामुळे बाहेर जेवण, पार्ट्या करणे हे ओघाने येत गेले. आणि त्यामुळेच नानांना दारूचे व्यसन लागले. सुरुवातीला फक्त शनिवार, रविवारी दारू पिणारे आता रोजच पिऊ लागले. जिथे बदली झाली तिथे त्यांचे मित्र मंडळ तयार व्हायचे. आणि पार्ट्यांना सुरुवात व्हायची. त्याचबरोबर रमीचा डाव पाडायचा. पैसे लावून खेळणे हे ओघाने यायचे. मग दिवसभर ऑफिस, रात्री दारू पार्टी, पत्ते हाच नित्यक्रम झाला. रात्री अपरात्री कुणीतरी त्यांना घरी सोडायचे.

    शाळा कॉलेज गावी झाले. त्यात तेव्हा त्यांना व्यायामाची आवड. तालमीत रोज जात. त्यामुळे शरीर पैलवानासारखे होते. पण पुढे ऑफिस, संसार, पार्ट्या यामुळे व्यायाम सुटला. हळूहळू बीपी चा त्रास सुरू झाला.

   आता पुण्यात आल्यावर मात्र चांडाळ चौकडी सुटली. मित्रपरिवार नसल्याने व घरी दोघेच त्यामुळे रात्री एकटेच पीत बसत. इतकी वर्ष बायकोने त्यांना खूप वेळा समजावले. पण काही उपयोग होत नव्हता. आता निदान ऑफिस सुटल्यावर नाना घरी तरी राहत होते.

    त्यादिवशी ऑफिसमध्ये काही कामानिमित्त ते उमेश रावांना भेटले. काम झाल्यावर थोड्या गप्पा झाल्या. जाताना उमेशराव म्हणाले.

   " तुमची ओळख झाली छान वाटले. वेळ मिळेल तेव्हा गप्पा मारायला येत जा."

मग नानांचा तो उद्योगच झाला. रोज दुपारनंतर ते उमेश रावांकडे जाऊ लागले. दोघेही साधारण समवयस्क. उमेशराव मुळचे पुण्यातलेच. टिपिकल मध्यमवर्गीय. त्यांना दोन मुलं, दोघेही सेटल झालेली. घराणं वारकरी संप्रदायातले. त्यांचे वडील नियमित वारी करायचे. आळंदी देहूला नित्य नियमाने जायचे. तेच संस्कार उमेशरावांवर झालेले. तेही वारी करायचे.

    त्यांच्या सहवासात नानांना बरे वाटू लागले. अनेक विषयावर दोघे गप्पा मारायचे. ऑफिस सुटल्यावर दोघेही ऑफिसच्या आवारात अर्धा तास फिरत. सुरुवातीला नानांची दमछाक होत असे. पण हळूहळू त्यांना सवय झाली. एकदा चार दिवस नाना ऑफिसला आले नाही त्यामुळे उमेशराव त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेले. तर कळाले की त्यांच्या लिव्हरला सूज आली होती. आता बरे आहे.

   मग उमेशरावांनी त्यांना पुन्हा एक लेक्चर दिले. दारू सोडायला सांगितली. पण तेव्हापासून हळूहळू नानांची दारू कमी झाली, फिरणे रोज चालू झाले. नाना व त्यांची बायको मग रोज जवळच्या बागेत तासभर फिरू लागले. दोघांना त्यामुळे बरे वाटू लागले. तब्येतही सुधारू लागली.

    एक दिवस उमेशराव चार वाजता नानांच्या केबिनमध्ये गेले व म्हणाले.

" नाना चला जरा बाहेर जाऊन येऊ, बाहेर म्हणजे आळंदीला जाऊ आज एकादशी आहे ना."

दोघेही जिपने आळंदीला पोहोचले. उमेशरावांची ओळख असल्याने त्यांना लगेच दर्शन झाले. त्या वातावरणामुळे नाना भारावून गेले. मग दोघेही सभा मंडपात बसले. अर्धा तास ध्यानात बसल्याने दोघांची मने शांत झाली.

    आता आठ दहा दिवसातून एकदा तरी ते आळंदी देहूला नेयमीत जाऊ लागले. नानांची तब्येत आता खूपच छान झाली. दारू खूपच कमी झाली, पण सुटत मात्र नव्हती. दिवस पुढे पुढे सरकत होते. उमेश रावांनी रजेचा अर्ज भरला, तेव्हा नाना त्यांच्या केबिनमध्ये आले. कारण विचारल्यावर उमेशराव म्हणाले,

" मी दरवर्षी वारी करतो. म्हणून रजेचा अर्ज टाकला. मला मनापासून वाटते तुम्ही पण यंदा माझ्याबरोबर चला. आता रोज तुम्ही बऱ्यापैकी चालता. अजून एक महिना अवकाश आहे. आता तुमचे चालणे हळूहळू वाढवा. म्हणजे प्रॅक्टिस होईल. "

    खूप विचार करून शेवटी नानांच्या मनाची तयारी झाली. आणि त्यांनी पण रजा टाकली. मग मानाच्या त्यांच्या दिंडीत उमेशरावांनी दोघांचे नाव नोंदवले. तयारी झाली तेव्हा उमेशराव म्हणाले.

"  नाना आपण वारीला निघतोय, तिथे आपण फक्त माऊली असतो आणि इतर सगळेच माऊली असतात. आपले पद, प्रतिष्ठा, मानपान सगळे इथेच ठेवून वारीला निघायचे. वारी ज्या ज्या गावातून जाते तिथले लोक तुमचे ओळखीचे आहेत. कुणालाच सांगायचे नाही. कुणाच्या घरी जायचे नाही. दिंडी बरोबरच राहायचे. "

अशा साऱ्या सूचना नानांना त्यांना दिल्या.

   मग ठरलेल्या दिवशी दोघेही आळंदीत पोचले. दिंडीत हजेरी लावली. दुसऱ्या दिवशी वारीला सुरुवात होणार होती. पण आदल्या दिवशीचा माहोल बघूनच नाना भारावून गेले. सगळे वारकरी हजारोच्या संख्येने जमले होते. पांढरे शुभ्र कपडे, डोक्यावर टोपी, हातात पताका, गळ्यात टाळ सगळेच वारकरी.

    भेटल्यावर फक्त माऊली म्हणून एकमेकांना ओळख द्यायचे. सगळेच एकमेकांच्या पाया पडत होते आणि हरिनामात दंग होते. आदल्या दिवशी संध्याकाळी दिंडीची सभा झाली. सगळ्यांची हजेरी झाली आणि सगळ्या सूचना दिंडी प्रमुखांनी दिल्या. दिवसभराचा कार्यक्रम सांगितला. मग भजन झाले आणि जेवल्यावर सगळे तंबूत विसावले.

    नाना पहिल्यांदाच तंबूत झोपले. त्या साऱ्या वातावरणांनी भारावून गेले होते. नंतर कधी झोपले कळलेच नाही.

    सकाळी तुतारीच्या आवाजाने त्यांना जाग आली. सगळं आवरून झाल्यावर चहा नाश्ता झाला. तयार होऊन सगळे ओळीत थांबले होते. दिंडी प्रमुखांनी इशारा करताच सगळे चालू लागले. टाळ मृदुंगाच्या तालावर सगळे वारकरी हरिनामाचा गजर करत शिस्तीत चालत होते. माऊलीची पालखी आली तसे सगळे हरिनामाचा गजर करत राहिले. उत्साह शिगेला पोचला. पालखीतल्या पादुकांचे दर्शन झाले आणि पालखी मार्गस्थ झाली.

    वारकरी आत्यानंदाने नाचत होते. बायका फुगड्या खेळत होत्या. टाळकरी टाळ वाजवत तालात नाचत होते. पताका खांद्यावर घेऊन वारकरी नाचत होते. बायकांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन होते. पालखीच्या पुढे व मागे मानाच्या दिंड्या ओळीत शिस्तीत चालत होत्या. इतर वारकरी पण पालखी बरोबर चालत होते. जागोजागी पालखीचे स्वागत लोक करीत होते. फुलांचा वर्षाव होत होता.

   ग्रामस्थलोक पालखीच्या दर्शनाला गर्दी करीत होते. बैलांची जोडी पालखी ओढत होती. तर मानाचा अश्व डौलात चालला होता. सारे वातावरण भक्तिमय झाले होते. पुढे प्रत्येक ठिकाणी पालखीचे स्वागत होत होते. बऱ्याच ठिकाणी स्वागताच्या कमानी उभारल्या होत्या. तर वारकऱ्यांच्या स्वागताचे फ्लेक्सही दिमाखात झळकत होते. पोलीस बंदोबस्त करत होते आणि गर्दीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत होते.

  पालखी सोहळा म्हणला की त्याबरोबरच हौवशे, नवशे, गवशे लोकही असतातच. त्याचा प्रत्ययही येत होता. ठिकठिकाणी वारकऱ्यांना गावकरी लोक खाऊ, केळी, गुडदाणी, चिक्की वगैरे वाटत होते. तर त्यांना चहा पाण्याची व्यवस्था ही काहींनी केलेली दिसत होती. छोट्या छोट्या गावात पालखीचा विसावा होत होता. त्या ठिकाणी दिंडीतल्या लोकांना चहा नाश्ता दिला गेला. तर गावातले लोक पालखीचे दर्शन घेऊन जात होते. दुपारी जेवणासाठी पुन्हा पालखी थांबली. दिंडीतल्या वारकऱ्यांना दिंडीतच जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक दिंडीचा एक ट्रक असतो. त्यात तंबू, जेवणाची सामग्री, वारकऱ्यांचे सामान, इत्यादी सर्व काही असते. आचारी व त्यांचे मदतनीस पण असतात.

    त्यांची जेवणे झाली. इतर वारकऱ्यांना सुद्धा गावकरी मोफत जेवण देतात. चोपदारांनी इशारा करताच पालखी पुन्हा पुढे जाऊ लागली. संध्याकाळी मुक्कामाचे गाव, जागा सगळे ठरलेले असते. पालखी मुक्कामाला आली. तसे सगळे वारकरी आपापल्या दिंड्यांनी केलेल्या सोयीप्रमाणे विसावले.

    मग सगळे एकत्र जमले. माऊलीचे आरती झाली. पुढच्या सूचना दिल्या गेल्या. नंतर हे आपापल्या दिंडीत जाऊन जेवण विश्रांती घेऊ लागले. वारकरी संध्याकाळी भजन कीर्तनात रंगून गेले.

   दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा पालखी मार्गस्थ झाली. असे ठरलेल्या वेळापत्रकानुसार शेवटी पालखी पंढरपुरात पोचली. एकादशी दिवशी सकाळीच वारकरी रांगेतून विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन परत जातात.

    हा सारा प्रवास नानांनी याची देही याची डोळा पाहिला. रोजच ते भारावून जात होते. एवढे प्रचंड वारकरी त्यांना कुणी आमंत्रण दिलेले नसते, हात जोडून विनंती केलेले नसते, पण फक्त त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी सारे चालत, चालत वारी बरोबर पंढरपुरात पोहचतात. त्यांना कशाचीच काळजी चिंता त्यावेळी नसते. भक्तिरसात ते नाऊन निघालेले असतात. ते दमत नाहीत, थकत नाहीत, ना कुठली चिंता, ना कुठली काळजी, फक्त एकच आस त्या पांडुरंगाचे दर्शन.

    नानांनी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन घेतले. फराळ झाला आणि ते दोघे एसटीने पुण्यात परतले. घरी आल्यावर नानांच्या बायकोने त्यांना औक्षण केले. घरात गेल्यावर त्यांनी सगळे वर्णन त्यांच्या बायकोला सविस्तर सांगितले.

    वारीतून परतल्यावर त्यांना एक वेगळीच अनुभूती आली. त्या साऱ्या प्रवासात त्यांना कुणाचीच आठवण आली नाही. सिगरेट, दारूला शिवले सुद्धा नाहीत. पण भक्ती रसात ते डुंबून जात होते. एक प्रकारचे मानसिक समाधान त्यांना मिळत होते. कोण कुठले लोक, पण सारे गुण्यागोविंदाने एकत्र आले होते. कुणीच कुणाची जात, धर्म, वंश काहीच विचारत नव्हते. ते सारे फक्त माऊली होते. भक्तीरसात न्हावून निघालेले होते. एरवी ऊन पावसाचा त्रास होणारे नाना इथे उन्हात पावसात आरामात चालत होते, न थकता, न दमता.

    देवावर श्रद्धा नसणारे कधीही देव देव न केलेले नाना आता विठ्ठल चरणी नतमस्तक झाले होते. आणि आता पूर्ण समाधानी होते. त्यांचे वजनही कमी झाले होते. त्यामुळे ते आनंदी, प्रसन्न, हसतमुख वाटत होते. विशेषता त्यांच्या बायकोला हा बदल जास्त जाणवला.

    आता त्यांचा दिनक्रमच बदलला. रोज पहाटे उठल्यावर फिरणे, हास्य क्लब मग योगा करून ते दोघे घरी यायचे. रोजची पूजा आता नाना करू लागले. त्यांची बायको आरती नैवेद्य करत होती. ऑफिस सुटल्यावर वाचन, टीव्ही, मग संध्याकाळी पुन्हा फिरणे. देवळात जाऊन नियमित देवदर्शन. जेव्हा असेल तेव्हा प्रवचन कीर्तनाचा लाभ, तर आठवड्यात एकदा तरी आळंदी देहूचे दर्शन. असा नित्यक्रम सुरू झाला.

   नाना आणि त्यांची बायको दोघेही हे मात्र कबूल करत होते की उमेशरावांमुळेच नाना बदलले. ते तसे सर्वांना सांगतही होते. आता त्यांची सारी व्यसने सुटली. तब्येतही छान झाली, आणि साधू संतांच्या चरणी त्यांची सेवा सुरू झाली.

    कोण म्हणतं फक्त व्यसनांनीच नशा येते. भान हरपते.  कधी तुम्ही वारीतल्या भक्ती सागरात नाऊन तर बघा. तुम्हाला कुठल्याच नशेची गरज पडणार नाही. टाळ, मृदुंग, पखवाज यात तुम्ही इतके न्हाऊन निघता की आयुष्यातली सगळी दुःख कुठल्या कुठे पळून जातात. असंख्य लोक आपली दुःखे माऊलीच्या चरणी टाकून निर्धास्त नाचत असतात.

    एक वारी झाली आणि परतवारीत त्यांना भक्तीरसाचा हा प्रसादच मिळाला. आता दरवर्षी नियमित वारी करण्याचा त्यांनी संकल्प सोडला.

माऊली..  माऊली...  माऊली...


लेखक . जयंत गणपतराव कोपर्डेकर.

Post a Comment (0)
Previous Post Next Post