तुम अगर साथ हो ... भाग अठ्ठावीस

 तुम अगर साथ हो ... भाग अठ्ठावीस  


हो ना करता शेवटी एकदाची रैना बसने सगळ्यांना भेटायला निघाली. गगन जिथे राहायचा ते शहर तिच्या कॉलेजच्या शहरापासून जवळच होते. त्यामुळे तो डायरेक्ट लोकेशनवर येणार होता. गृपच्या नेहमीच्या कॅफेमध्येच सगळे जमणार होते. रैनाला भेटायला सगळेच उत्सुक होते. वैदेही तर अक्षरशः ढगात तरंगत होती. रैनाला जेव्हा कळेल तिचा गृप, ती ज्यांची आवडती होती ते लोक आत्ता तिच्याबद्दल काय विचार करतात तेव्हा तिची काय प्रतिक्रिया असेल याचे मनात हजार वेळा तरी वैदेहीने चित्र उभे केले होते.

 

"हर्षल अजूनही तिच्यावर प्रेम करतो पण जेव्हा तिच्याच तोंडून सत्य बाहेर पडेल तेव्हा त्याला माझ्याकडे येण्याशिवाय गत्यंतर नाही. मी आणि हर्षल... वाव..." वैदेहीने स्वतःभोवती एक गिरकी घेतली. 


ठरलेल्या वेळी सगळे हजर झाले. कुणी उघडपणे काही बोलत नसलं तरी आतून सगळेच अस्वस्थ होते. एक वैदेही तेवढी उत्साहाने फसफसत होती. विनोद करुन हसविण्याचा प्रयत्न करत होती. पण अगदी तिच्या विनोदावर हसणं सुद्धा सगळ्यांच्या जीवावर आले होते.


"वैदेही प्लिज, जरा गप्प राहतेस का? तुझ्या पाचकळ विनोदावर कुणालाच हसायला येत नाही हे समजतं नाही का तुला? तू खूश आहेस असं का मला वाटतंय? कारण मुळात सगळे गंभीर विचारात असताना तुला हे विनोद सुचतात कसे? आय मीन तुला काहीच कसं वाटत नाही आहे या परिस्थितीबद्दल? की तुला माहीत आहे हे कुणी आणि का केलं म्हणून तू चील आहेस?" मिहीका भडकली होती. सगळेच थोड्या संशयाने वैदेहीकडे पाहू लागले. 


"काहीही काय मिहीका, मी का खूश असेन. मला सगळ्यांचे गंभीर चेहरे पाहवले नाहीत, वातावरण थोडं हलकं करावं म्हणून मी जोक करत होते." 


थोड्या वेळात रैना आली, नेहमी प्रमाणेच हसऱ्या चेहऱ्याने. सगळ्यांना मिठी मारून विश करून ती एका खुर्चीत बसली. काही वेळाने तिच्या लक्षात आले की सगळे अगदी हंसिकासुध्दा पहिल्यासारखी मोकळेपणाने बोलत नाही पण आपापसात खाणाखुणा चालल्या आहेत. काहीही न बोलता तिने मोबाइल काढून गगनला मेसेज केला. तो पंधरा मिनीटात पोहोचणार होता. 


"रैना तुला एक गोष्ट विचारायची आहे, प्लीज शांतपणे ऐकून घे." शेवटी मिहीकाने सुरुवात केली.


"हां बोल ना मिही." रैनाने मोबाइल बाजूला ठेवला.


"अम्म, तू जेव्हा गावी गेली होतीस तेव्हा आम्हा सगळ्यांना एक फोटो आला होता. त्यात तुझं एका मुलीसोबतचे चॅटिंग होतं. त्यावरून असं वाटत होतं की..." मिहीका क्षणभर थांबली. 


"काय वाटत होतं मिहीका?" 


"असं वाटत होतं की... तुम्ही दोघी रिलेशनशिपमध्ये आहात." एक विचित्र अबोला पसरला.


"ओ... अच्छा म्हणजे... "


"हो आम्हा सगळ्यांना वाटलं की तुला मुलींमध्ये इंटरेस्ट आहे. म्हणून तर तू कोणत्याही मुलाबद्दल तसला विचार करत नाहीस. ही वैदेही तर इंडीरेक्टली असं ही म्हणाली की याच कारणासाठी तू माझ्याशी इतकी घट्ट मैत्री केलीस." हंसिका भडाभडा बोलून गेली.


"अगं ए, मी कधी असं म्हणाले? उगाचच माझ्यावर आरोप करू नकोस हंसिका." वैदेही घाबरली होती.


"तू तसं म्हणालीस. तेव्हापासूनच सगळ्यांना रैनाचा अजून संशय येऊ लागला." 


"एक मिनिट, एक मिनिट... हंसिका शांत हो थोडी. मला तो फोटो दाखवेल का कुणी? मला आला नाही म्हणून विचारतेय." रैनाने सगळ्यांवर नजर फिरवत विचारले. हर्षलने काहीही न बोलता फोटोज् उघडून तिच्यासमोर धरले. रैनाने त्यांच्यावरून नजर फिरवली. लगेच तिला सगळा उलगडा झाला.


"हे फोटो कुणी पाठवले तुम्हाला?" तिने शांतपणे विचारले.


"पता नहीं, आम्ही शोधायचा प्रयत्न केला पण काही उपयोग नाही झाला. तो नंबर त्यानंतर बंदच झाला." झुबेरने माहिती दिली. 


"ओके पण मी सांगू शकते हे कुणी केलं असेल. आता मला फक्त इतकंच जाणून घ्यायचं आहे की तुमचा सगळ्यांचा यावर विश्र्वास आहे का? तुम्हाला काय वाटतं मी लेस्बिअन आहे?" रैनाची नजर धारदार झाली होती. मनातून ती दुखावली गेली होती पण वरुन तिने कठोरपणाचा आव आणला.


"हो... म्हणजे जे चॅट आहे ते वाचून तर आम्हाला तसंच वाटतंय." वैदेही बेधडक म्हणाली.


"शिवाय तू मागे एकदा मेसेज केला होतास, तू आणि या मुलीचे नाते आता बदलले आहे म्हणून... सो वुई थॉट की कदाचित हे खरं असावं. लूक रैना हे असं असण्यात काहीच गैर नाही. वाईट फक्त याचं वाटतं की तू हे आमच्याबरोबर शेअर नाही केलंस. आपण इतक्या जवळच्या मैत्रिणी होतो, तू निदान मला तरी सांगायचंस." हंसिका म्हणाली.


"अच्छा म्हणजे हे सगळं खरं आहे असं तुम्ही आधीच ठरवून टाकलं आहे. माझे मित्र मैत्रिणी म्हणवता आणि एकदा तरी मला सरळ विचारावं असं तुम्हाला कुणालाच वाटलं नाही?" 


"आम्ही सगळ्यांनी तुला हजार एक तरी कॉल केले होते पण तुझा फोन लागलाच नाही. मी तुझ्या आईला ही कॉल केला होता एकदा, त्या म्हणाल्या तू बाहेर गेली आहेस." हंसिका म्हणाली.


"ओह... माझा फोन बंद पडला होता. आई कामाच्या गडबडीत सांगायला विसरली असेल. नंतर मी मामाकडे गेले तेव्हा माझ्याजवळ बेसिक फोन होता. त्यामुळे मी जास्त कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला नाही." रैना हताश होऊन म्हणाली. 


"ते जाऊ दे. आम्हाला सांग ही भूमी कोण आणि तुझे तिचे काय नाते आहे?" अनिकेत थोडासा इम्पेशन्ट झाला होता. 


"कळेल सगळं. इन फॅक्ट तेच सांगायला इतक्या लांबून इतक्या उत्साहाने मी इथे आले होते." उदास हसत रैना म्हणाली. तिला दुरून चालत येणारा गगन दिसला होता. 


गगन रैना जवळ आला. त्याला पाहून तिने हात हलवला. 


"मला उशीर तर नाही झाला ना?" हसून त्याने विचारले.


"नाही उलट तू अगदी वेळेवर आलास." बाजूने जाणाऱ्या वेटरला एक खुर्ची आणण्यासाठी सांगून रैना म्हणाली. सगळे गोंधळून दोघांचे बोलणे ऐकत होते. काळा इन केलेला शर्ट, निळी पँट घातलेला हसतमुख गगन छान दिसत होता. त्याचे व्यक्तिमत्त्व आकर्षक आणि प्रभावशाली दिसत होते. या देखण्या तरुणाचा आणि रैनाचा काय संबंध असावा हे अजूनही कुणाच्या लक्षात येत नव्हते.


"तर लोकहो, हा गगन, डॉक्टर गगन मोहिते. माझा हो

णारा नवरा." रैना शांतपणे म्हणाली आणि गृपवर जणू बॉम्ब पडला. 

Post a Comment (0)
Previous Post Next Post