तुम अगर साथ हो ... भाग सत्तावीस

 तुम अगर साथ हो  ... भाग सत्तावीस 


मामाकडे येऊन पंधरा एक दिवस झाले होते. रैनाला आता आईची ओढ लागली होती. इतकी वर्षे हॉस्टेलवर राहत असताना जेवढी आई बाबांची आठवण येत नव्हती त्याच्यापेक्षा जास्त आठवण आता येत होती. काही महिन्यांत लग्न होईल त्यांनतर दोघांना हवे तेव्हा भेटता येणार नाही अशी कल्पना करूनच तिला कसेसे होऊ लागले. त्यामुळे शक्य तेवढे दिवस त्यांच्यासोबत घालवावे म्हणून तिने परत चांदोरीला जाण्याचा निर्णय घेतला. मामा मामी आणि उज्वलचा निरोप घेऊन ती बसमध्ये बसली. कनक तिथले शूट पूर्ण होईपर्यंत मामाकडेच राहणार होती. 

"मला जे फील होतंय त्यावरून सांगते, तू काही दिवसातच आम्हा सगळ्यांना एक छान बातमी देणार आहेस." उज्वलकडे नजरेने इशारा करत कनकला मिठी मारत रैना तिच्या कानात पुटपुटली. 


संध्याकाळ ओसरून रात्र हळुवार तिची चादर पसरत असताना रैना घरासमोर आली. पद्मा रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती तर दिनकर टीव्ही पाहत बसले होते. रैनाला बघून त्यांना आनंद झाला.


"पद्मा हे बघ कोण आलंय." स्वयंपाक घराकडे पाहत त्यांनी हाक मारली. पदराला हात पुसत बाहेर आलेली पद्मा रैनाला पाहून खूश झाली.


"अगं बाई रैना तू! आणि या वेळेला कशी आलीस? मामाने एकटीला कसं सोडलं तुला? सोबतीला कुणाला तरी घेऊन यायचं ना?"


"आई अगं किती ते प्रश्न... मला तुम्हा दोघांची खूप आठवण येत होती म्हणून आले. मामाला काही म्हणू नकोस मीच त्याला एकटी जाईन म्हटलं. इतक्या वेळा एकटी आली आहे हॉस्टेलवरून मग आता आले तर काय झालं? आता मला घरात घेणार आहेस की बाहेरच उभं करशील?" रैना हसून म्हणाली.


"ये ग राणी. मला आपली काळजी वाटली म्हणून म्हटलं. पटकन हातपाय धुवून ये, ताट घेतेय जेवायला." पद्मा स्वयंपाक घरात जात म्हणाली. 


जेवण झाल्यावर आईला आवरा आवरीला मदत करून रैना झोपायला तिच्या खोलीत गेली. स्टडी टेबलवर तिचा दुरुस्त केलेला मोबाइल ठेवला होता. तिने सिम कार्ड घालून तो चालू केला आणि गगनला व्हिडिओ कॉल केला. त्याचा हसरा चेहरा पाहून तिला खूप आनंद झाला. पंधरा वीस दिवसांनी दोघे एकमेकांना बघत होते. मनात गोड भावनांनी गर्दी केली होती पण शब्द फुटत नव्हते. काही ऑकवर्ड क्षणानंतर हळूहळू संभाषणात सहजता आली. 


"आपण कधी भेटायचं?" गगनने विचारले.


"भेटूया लवकरच. माझ्या फ्रेंड्सना तुझी ओळख करून द्यायची आहे."


"मग पुढच्या आठवड्यात?"


"हो चालेल, मी आई बाबांना सांगते तसं." रैनाने होकार दिला.


"आई बाबांना सांगणार तू?" 


"हो मग. त्यांच्या कानावर तरी घालते. ते नाही म्हणणार नाहीत मग असं गुपचूप, लपून छपून का भेटायचं?"


"वेडी रे माझी बायको... अगं लपून भेटण्यातच मोठी गंमत असते. एक प्रकारचं थ्रिल असतं त्यात. तुला नाही का त्याचा अनुभव?" गगन परत मस्करीच्या मूडमध्ये आला.


"हट, मला नाही तसला अनुभव. पण तू मात्र चांगला अनुभवी खेळाडू दिसतोय." रैनाने बाजी पलटवली.


"हां मग, मी किती हँडसम आहे हे तर तुला माहीतच आहे. पोरी अशा नुसत्या माझ्या मागे मागे फिरायच्या. मी त्यांच्याकडे नुसतं हसून पाहावं यासाठी जीव टाकायच्या."


"हो का, छानच की. मग करायचं ना त्यांच्यापैकी कोणाशी लग्न." 


"काश..."


"हम्म ..."


"एक मिनिट थांब, मला काहीतरी जळण्याचा वास येतोय. इथे घरात तर काही नाही जळत आहे...वेट वेट... तुला तर जेलसी वाटत नाही आहे ना?"


"छे छे, मी का जळेन..." तिचे शब्द आणि भाव यात एकवाक्यता नव्हती. गगनला मौज वाटली आणि थोडं बरं ही वाटले.


"मस्करी करतोय ग राणी. अगदी शपथ घेऊन सांगतो, आत्तापर्यंत मी आयुष्यात एकाही मुलीकडे कधी त्या नजरेने पाहिलं सुध्दा नाही. पण तुला पाहताक्षणी वाटलं हीच ती ..." त्याच्या शब्दागणीक तिचा रुसवा विरघळत चालला होता. 


....................................................


रैनाची सगळी मित्र मंडळी सुट्टीच्या निमित्ताने  इकडे तिकडे पांगली होती. हर्षल कानपूरला गेला होता. हंसिका नानीकडे भावनगरला, वैदेही धुळ्याला, मिहीका आणि श्रेयस परदेशी ज्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला जाणार होते त्याच्या ओरीइंटेशन प्रोग्रॅममध्ये अडकले होते. झुबेर दुबईला जाण्याच्या तयारीला लागला होता. थोडक्यात सांगायचे तर सगळेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त होते. रैनाने गृपमध्ये आपण परत ऑनलाईन आल्याचा मेसेज केला. तिने इतरही काही मेसेज पाठवले पण कुणाचाही कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. न राहवून तिने हंसिकाला कॉल केला. 


"ओ तू आलीस म्हणजे!" हंसिका उद्गारली.


"हो, मी गृपवर मेसेज केला पण सगळ्यांनी इग्नोर केलं." 


"हम्म." 


"हंसिका, काही झालंय का मी नसताना? कुणीच का माझ्याशी बोलत नाही? तुझा रिस्पॉन्स ही मला थोडा थंडच वाटतोय." 


हंसिकाला वाटले तिला सांगून टाकावं सगळं पण तसं करण्यासाठी आपण योग्य व्यक्ती आहोत का अशी तिला शंका आली म्हणून तिने सावध पवित्रा घेतला. 

"अं, सगळे थोडे बिझी आहेत त्यामुळे असेल. मी ही नानीकडे आलीय. म्हणून जास्त बोलू शकत नाही."


"ओके. मी पुढच्या आठवड्यात तुम्हा सगळ्यांना भेटायला यायचा विचार करतेय."


"पुढच्या आठवड्यात? मला नाही वाटत कोणी भेटेल म्हणून. कारण बहुतेक सगळे बाहेर आहेत. मी स्वतः रिझल्ट लागायच्या आधी काही दिवस येणार आहे. मला वाटतं सगळ्यांचा तोच प्लॅन आहे. तू नव्हतीस तेव्हा एकदा आम्ही भेटलो होतो तेव्हा डिस्कस झालं हे." 


हंसिकाचे बोलणे ऐकून रैना खट्टू झाली पण तसं न दाखवता तिने "मग ठीक आहे, मी ही तेव्हाच येते" म्हटलं.


"ऐक ना रैना पण मला वाटतं तू भेटायचा मेसेज टाक गृपवर. जर मॅनेज होण्यासारखं असेल तर पाहता येईल. तसं तर आम्हा सगळ्यांना तुला भेटायची फार उत्सुकता आहे." 


"उत्सुकता? आणि ती का बरं?" 


"उत्सुकता म्हणाले का मी? अगं मला इच्छा म्हणायचे होते." हंसिकाने स्वतःला टपली मारुन घेतली.


"तेच तर सांगतेय मी कधीपासून. एक काम करते, मी नक्की तारीख ठरवते आणि सगळ्यांना कळवते." रैनाने कॉल बंद केला. लवकरात लवकर गगनला घेऊन जाऊन गृपला भेटायचे तिने नक्की केले.


क्रमशः 


लोभ असावा 


Post a Comment (0)
Previous Post Next Post