तुम अगर साथ हो ... भाग सव्वीस
"मिही, रैनाचा मेसेज आला होता मला. तिचा फोन खराब असल्याने बंद आहे म्हणाली." हंसिकाने मिहीकाला कॉल केला होता.
"मूर्ख मुलगी... तू सांगितलंस का तिला तिच्या पाठीमागे इथे काय काय बोललं जातंय?"
"नाही न, मला समजलं नाही कसा विषय काढावा. शिवाय ती खूपच एक्साईटेड वाटत होती. कसली तरी गुड न्यूज सांगायची आहे म्हणत होती."
"मिही, मला तर असा संशय येतोय की ते सगळं खरं असावं.... म्हणजे तिच्या बोलण्यावरून मला ही आता थोडी शंका येतेय." थोडं थांबून हंसिका पुढे म्हणाली.
"का ग असं काय म्हणाली ती?"
"अगं बोलताना तिने कुठल्या कनकचा उल्लेख केला तर मी म्हणाले आधी भूमी आता कनक अशा किती मैत्रिणी आहेत तुझ्या? तर म्हणाली कनक माझी बहीण आहे आणि गूड न्यूज ही आहे की भूमीचे आणि माझ्या नात्याने नेक्स्ट स्टेप घेतली आहे असं काहीसं. मला एक्झॅक्ट शब्द आठवत नाहीत पण मीनिंग हाच होता."
"व्हॉट द हेल!" मिहिकाला धक्का बसला होता.
"ऐक ना, पुढे म्हणाली मी थोड्या दिवसांत तुम्हाला भेटायला येईन तेव्हा सगळं काही सांगेन. आपण सांगूया का सगळ्यांना ही नवीन डेव्हलपमेंट?"
"नको थांब थोडं, तिला स्वतःला सांगू दे जे काय आहे ते. आपण उगाच घाई नको करायला." मिहीका विचार करत म्हणाली. तिचे बरोबरच होते कारण ते समजतात तसे नसून दुसरेच काही कारण असेल तर रैनाला मोठा मनस्ताप झाला असता.
गेल्या काही दिवसांपासून वैदेही सतत हर्षलच्या संपर्कात होती. तिला त्याची काळजी असल्याचे दर्शविणारे मेसेजेस पाठवत होती. त्याला खरं तर अजूनही तिच्यावर दाट संशय होता. काही काही प्रसंग त्याच्या लक्षात येत होते ज्यावरून त्याला असे वाटत होते की ती रैनाचा दुस्वास करते.
'तसे जरी असेल तरी ती माझ्या का इतक्या मागे लागली आहे? तिला माझ्या रैनासाठीच्या भावना समजल्या तर नाहीत? तिला ते ठाऊक असूनही माझ्या जवळ येण्याचा का प्रयत्न करत असावी?' उत्तर त्याला माहीत होते पण मानायला मन तयार होत नव्हते.
"हर्षल एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेव, काहीही झाले तरी मी कायम तुझ्याबरोबर असेन. कोणत्याही परिस्थितीत तुला कधीच एकटं सोडणार नाही." वैदेहीचा हा मेसेज पाहून हर्षल चिडला.
"तशी वेळ आलीच तर फक्त तूच नाही तर आपले इतर मित्र मैत्रिणीसुध्दा पाठीशी उभे राहतील अशी मला खात्री आहे. यात विशेष काही नाही." त्याने उत्तर दिले.
"बाकीचे हो पण रैना नाही. ती एक नंबरची स्वार्थी आणि घाणेरडी मुलगी आहे अशी माझी खात्री पटलीय. तिच्या भोळ्या सुंदर चेहऱ्यामागे किती घाण आहे ते समजले ना आपल्याला? आई बाप मरणाचे कष्ट करून शिकायला दूर पाठवतात आणि या चीप मुलीने चक्क त्यांच्या तोंडाला काळं फासले. अफेयर करायचंच असेल तर मुलं का मेली होती हिला मुलीशी सूत जुळवायला! तूच सांग हर्षल अशा घाणेरड्या मुलीवर कुठला मुलगा प्रेम करू शकेल? जर तसा कुणी असेल तर मी तर म्हणेन त्याने स्वतःला एकदा सायकट्रिस्टला दाखवले पाहिजे."
"मला तर वाटतंय तू ओव्हर रिॲक्ट करते आहेस. अनीवेज जाऊ दे जास्त लोड घेऊ नकोस तू. आणि हो अजून एक गोष्ट, कशीही असली तरी रैना आपली इतक्या वर्षांपासून मैत्रीण आहे. म्हणून निदान मी तरी तिचा कधी दुस्वास करणार नाही. एक मित्र म्हणून मी नेहमी तिच्या सोबत असेन, तू म्हणतेस तसं ती स्वार्थी आणि घाणेरडी असली तरीही. चल बाय." मेसेज पाठवून हर्षलने फोन बाजूला ठेवून दिला.
'खरंच माझी रैना अशी असेल का? ती तशी आहे हे मान्य केलं तरी माझं तिच्यावर जे प्रेम आहे ते कमी होणार नाही. आय लव्ह हर टू द मून अँड बॅक, आय विल अल्वेज.' भरुन आलेले डोळे त्याने पुसले. गेल्या काही दिवसांपासून त्याची अवस्था खरंच खूप खराब झाली होती. गृपच्या इतर लोकांसाठी रैना फक्त एक छान मैत्रीण होती पण त्याच्या आयुष्यात तिचे खास स्थान होते. इतर लोक तिच्याबद्दल भलं बुरं बोलत असताना तो फक्त ऐकून घेऊ शकत होता. सत्य माहीत नसल्याने ना रैनाचा बचाव करू शकत होता ना स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेऊ शकत होता. फक्त रैनासाठी हर्षलने म्हणून याच कॉलेजमध्ये पुढील शिक्षण घ्यायचे ठरवले होते. पण त्याने आता काही दिवस गावी जाऊन यायचे ठरवले.
....................................................
ओपीडी बंद झाली होती. आजच्या पहिल्या सेशनमधील सगळ्या अपॉइंटमेंट झाल्या होत्या. गगन जेवायला घरी जाण्याची तयारी करत होता पण त्याचा पाय काही निघत नव्हता. कारण आज रैनाकडून कोणतीच भेट आली नव्हती.
चार दिवसांपासून रोज काही ना काही निनावी भेटवस्तू येत होती. सुंदर टपोरी फुलांचा गुच्छ, रसरशीत स्ट्रॉबेरी, आंबट गोड मलबेरी आणि रासबेरी... सगळं काही पारखून निवडलेले उत्कृष्ट त्याबरोबर दोन चार ओळींचा सुंदर पण निनावी प्रेमसंदेश असायचा. संदेश जरी निनावी असला तरी गगनला पूर्ण खात्री होती की तो रैनाकडूनच आला असेल.
"चला साहेब निघा. आज काही मॅडमचा मूड दिसत नाही. तसंही तुम्ही थोडा जास्तच भाव खाल्ला आहे म्हणून चिडली ही असेल." कारची चावी उचलत तो उठला. दारावर टकटक झाली आणि स्मिता आत डोकावली.
"सर एक कुरिअर आले आहे." तिने बातमी दिली आणि गगनचा चेहरा उजळला.
"वाव, फायनली! जा घेऊन ये." तो परत खुर्चीवर बसला.
"सर नक्कीच प्रेमात पडले आहेत." मनाशी बोलत स्मिता बॉक्स घेऊन आली. गगनने नीट पॅक केलेल्या बॉक्सची चिकटपट्टी कटरने कापली. आतून एक सुबक बरणी निघाली जी सोनेरी मधाने भरली होती.
'आपलं प्रेम ही असेच आहे, कष्टाने मिळवलेले, शुध्द, गोड, सोनेरी मधासारखे...' चिठ्ठी वाचून गगनला आनंद झाला. त्याच आनंदाच्या भरात त्याने मोबाइल काढून रैनाला आय लव्ह यू चा एसएमएस पाठवला आणि ती बरणी काळजीपूर्वक धरून गुणगुणत केबिनबाहेर पडला.
दुपारचे जेवण करून बेडवर पहुडलेल्या रैनाने एसएमएस उघडून पाहिला आणि तिच्या चेहऱ्यावर लाजरे हसू पसरले. वाद झाल्यापासून गगनने पहिल्यांदा तिला काहीतरी प्रतिसाद दिला होता.
"हम्म खडूस माणसाचा राग वितळलेला दिसतोय. उज्वलने काय केले काय माहीत पण त्याला थँक्यू म्हणायला हवे." गगनला लव्ह यू टू चा रिप्लाय देत ती मोठ्याने म्हणाली. आता खोलीत ती एकटीच होती कारण कनकचे शूट चालू होते आणि उज्वल तिच्या बरोबर गेला होता.
"उज्वल किती काळजी घेतोय कनकची, ते ही स्वतःचा व्यवसाय सांभाळत. तसं पाहायला गेलं तर तिचं करिअरही त्याच्याचमुळे सुरु झालं. दोघे एकत्र छान दिसतात." तिच्या मनात विचार आला.
हा नक्की विचारच होता की येणाऱ्या भविष्याची नांदी हे कळेलच पुढील काही भागांत. तोपर्यंत लोभ असावा, प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत.
क्रमशः
किती उत्सुकता वाढवणार अजून.......सगळेच भाग send करा प्लीज
ReplyDeleteमला वाटते की कथे चे बाकी भाग स्वर्ग तुन वाचावे लागतील 😁
ReplyDelete