तुम अगर साथ हो ... भाग पंचवीस

 तुम अगर साथ हो ... भाग पंचवीस


चार दिवस झाले होते मामाच्या घरी येऊन. कनक आणि रैना मस्त एंजॉय करत होत्या. पारू मावशीच्या हातचे स्वादिष्ट जेवण करणे, शेतावर फिरायला जाणे, मामींनी कामात थोडीफार मदत करणे आणि उरलेल्या वेळात झोप काढणे असा त्यांचा दिनक्रम होता. कनक मात्र रोज सकाळी उज्वल सोबत व्यायाम करायची. एक दिवस रैनाने मेणवली घाटावर जायचा विषय काढला.


"उज्वल जर तुला वेळ असेल तर एक दिवस जाऊन येऊ ना मेणवलीला. गणपती आणि कृष्णाबाई मंदिराला पण जाऊ." 


"एक दिवस काय चला उद्याच जाऊ. पारू मावशी, आई बाबा सगळे तयार व्हा एक छान पिकनिक होईल." उज्वल उत्साहाने म्हणाला.


"अरे मी आणि पारू मावशी उद्या थोडं रैनाच्या रुखवताचे बघणार आहोत तर आम्हाला शक्य नाही. तुम्ही जाऊन या." मामी म्हणाल्या.


"मी तुमच्या तरुण पोरांमध्ये काय करणार? तुम्ही तिघे जाऊन मस्त फिरुन या. उद्याचा एक दिवस शेताकडे मी जाईन." मामांनीही अंग झटकले. 


बाकी सगळ्यांनी नकार दिल्याने उज्वल, रैना आणि कनकचे त्रिकूट फिरायला बाहेर पडले. गणपतीचे दर्शन घेऊन थोडावेळ घाटावर घालवून तिघे कृष्णा मंदिरात गेले. मंदिरात जायचे म्हणून दोन्ही मुली छान तयार झाल्या होत्या. पुढचा टप्पा म्हणजे मेणवली होता. 


मेणवली नानासाहेब फडणवीसांची जहागीरदारी होती. तिथे त्यांचा भलामोठा वाडा आजही दिमाखात उभा आहे. येणारा पर्यटक वाड्याला भेट दिल्याशिवाय पुढे जात नाही. ही पेशवेकालीन वास्तू अनेक नाट्यपूर्ण घटनांची साक्षीदार आहे.


मेणवली घाट तर बऱ्याच हिंदी मराठी चित्रपटांचे चित्रीकरणाचे स्थान आहे. कृष्णा नदीवरील नितांत सुंदर हा घाट अनेक चित्रपटांतून तुम्ही पाहिला असेल.


आज जेव्हा उज्वल, रैना आणि कनक घाटावर गेले तर तिथे कुठल्याशा मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. हे तिघे ही बघ्यांच्या गर्दीत सामील झाले. बऱ्याच वेळापासून चित्रीकरण चालू असावे. एकदम साधासा प्रसंग होता, मुख्य अभिनेत्री आपल्या मैत्रिणीसोबत धावत पायऱ्यांवरून येते आणि मुख्य अभिनेत्याला धडकते असा. पण अनेक वेळा री टेक घेवून ही तिला जमत नव्हते. क्रू वैतागला होता. शेवटी दिग्दर्शकाने पाच मिनिटांचा ब्रेक जाहीर केला. हिरॉईन टेचात तिच्यासाठी ठेवलेल्या छत्री खाली जाऊन बसली. मेकअपमन टच अप देऊ लागला.


"अरे किती सोपा शॉट आहे. ही हिरोईन चुकीच्या अँगलने धावतेय म्हणून तिला जमत नाही आहे." कनक मोठ्याने रैनाला सांगत होती. तिचे बोलणे त्या अभिनेत्रीने ऐकले. तिला प्रचंड राग आला.


"ए कोण ग तू मला जमत नाही म्हणणारी?आता दीड दमडीचे लोक मला ॲक्टिंग शिकवणार का?" ती उठून कनककडे आली.


"तिला दीड दमडीची म्हणायला तुझी ओळख काय आहे? आजपर्यंत तर तुला कधी बघितलं नाही?" उज्वल पुढे झाला.


"मी डायरेक्टरची भाची आणि या मूव्हीची लीड हिरोईन आहे. हीची काय लायकी आहे? नुसतं चांगलं थोबाड असलं म्हणजे झालं असं नसतं."


"हिच्याकडे निदान चांगलं थोबाड तरी आहे तुझ्याकडे तर तेवढंही नाही. वशिल्याने चित्रपटात घुसणारी घूस आहेस तू. आणि ॲक्टिंग कशाला म्हणतात ते समजलं असतं तुला तर एका सीनचे चाळीस रीटेक नसते घेतले तू चीचुंद्री तोंडाची." उज्वलने रागाने तोंड मोकळे सोडले होते. त्याचा चढलेला आवाज आणि आविर्भाव पाहून वैतागून दिग्दर्शक तिथे आला. उज्वलने तोडलेले तारे त्याने ऐकले होते.


"अजून एक गोष्ट, हीचे नाव कनक रेळेकर आहे. आणि ही तुझ्यापेक्षा शंभर पटीने चांगली ॲक्टिंग करू शकते. नुसता मामा दिग्दर्शक असून चालत नाही. स्वतःला अभिनय येणे ही गरजेचे आहे."  उज्वल ओरडत होता. कनक आणि रैना चुपचाप बाजूला उभ्या होत्या.


"एक मिनिट, तुझ्या मते ही मुलगी अभिनय करू शकेल? इतका कॉन्फिडन्स?" कनकला वरपासून खालीपर्यंत न्याहाळत दिग्दर्शकाने विचारले.


"हो, म्हणजे काय. कनक जा करून दाखव." उज्वलने कनकला पुढे ढकलले. विषयाला असे वळण मिळालेले पाहून ती भांबावली होती.


"अगं जा, मला पण पाहू दे जरा कसा अभिनय करतात." अभिनेत्रीने खिजवले. ते ऐकून कनक आत्मविश्वासाने पायऱ्यांपर्यंत गेली. डायरेक्टरने शॉट रेडी करायला सांगितले. सगळ्यांनी आपापली जागा घेतली. डीओपीने कॅमेराला डोळा लावला. मैत्रिणीचा रोल करणाऱ्या अभिनेत्रीला बोलावण्यात आले.


"मी नाही येणार. सकाळपासून चाळीस वेळा हीच्यामागे पळापळ करुन माझे पाय दुखायला लागले आहेत." तिने साफ नकार दिला.


"काही हरकत नाही, मी करेन ऍडजस्ट," म्हणत कनकने पोझिशन घेतली. दिग्दर्शकाने ॲक्शन म्हणता क्षणी जांभळ्या रंगाची गोटा वर्क केलेल्या अनारकली ड्रेसमध्ये ती मागे मैत्रिण आहे अशा आविर्भावात हसत पायऱ्यांवरून धावत सुटली. तिची जांभळी ओढणी तिच्या मागे वाऱ्यावर लहरत होती. कानातील मोठे मोठे ऑक्सीडाईज्ड झुमके छानसे हेलकावत होते. एका हाताने तिने डोळ्यावर आलेली सोनेरी केसांची बट कानामागे सारली. तिच्या सुंदर गुलाबी ओठातून हसू घरंगळले आणि योग्य त्या पॉइंटवर येऊन ती थांबली. सगळे आश्चर्याने थक्क झाले. तिचे सौंदर्य आणि ग्रेस पाहून प्रभावित झाले आणि दिग्दर्शकाने चक्क शॉट ओके केला. 


"येस, यू गॉट इट. या चित्रपटाची हिरोईन आता तूच प्ले करायची." तो आनंदाने ओरडला.


"बॉस काय कमाल स्क्रीन प्रेसेन्स आहे. काय ग्रेस आहे आणि ॲक्टिंग तर एकदम स्पीचलेस."


"मामा पण तू मला प्रॉमिस केलं होतं." हिरॉईन पाय आपटत म्हणाली.


"हो बेबी पण मुहूर्तालाच अर्ध्या चित्रपटाचं फुटेज खर्च केलास तू. मला नाही जमायचं ते. सो यू आर आऊट अँड कनक इज इन." दिग्दर्शक कनककडे वळला.


"सो कनक, तू ॲक्टिंग शिकलीस का?"


"हो सर, मी दिल्लीच्या फिल्म इन्स्टिट्यूटची विद्यार्थिनी आहे. मी मॉडेलिंग करतेय. काही सीरिअल्स मधून लहान मोठे रोल्स केले आहेत. कॅमेरा इज नॉट न्यू फॉर मी."  कनकने आपली ओळख करून दिली.


"वाह म्हणजे तू एक चांगली सीझनड ॲक्ट्रेस आहेस फक्त योग्य संधी मिळाली नाही असं म्हणता येईल. हरकत नाही, थीस इज युवर चान्स, ग्राब इट." हस्तांदोलन करत डायरेक्टर म्हणाला. एव्हाना फिल्मला नवी लीड हिरोईन मिळाल्याची बातमी अख्ख्या युनिटमध्ये पसरली होती. सगळे तिला पाहायला जमू लागले. पुढील सर्व फॉर्मलिटीज कनकने अगदी व्यावसायिक कौशल्याने हाताळल्या. उज्वल आणि रैना फक्त बाजूला उभे राहून तिला ते करताना पाहत होते.


"ओ माय गॉड, मी स्वप्नात तर नाही ना? मी एका मूव्हीची लीड रोल... ओ माय गॉड, ओ माय गॉड..." सगळं झाल्यावर कनक दोघांकडे येऊन चक्क उड्या मारू लागली. आता ती भानावर आली होती. एवढा वेळ जणू ती स्वप्नातच वावरत होती. तिने आनंदाने रैनाला घट्ट मिठी मारली. नंतर ती उज्वलकडे वळली. 

"तुझ्यामुळे हे सगळं झालं. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच." टाचा उंचावून तिने त्याच्या गालावर ओठ टेकवले. आणि चारशे चाळीस वोल्टचा धक्का बसल्यासारखा उज्वल मागे सरकला.


क्रमशः


Post a Comment (0)
Previous Post Next Post