तुम अगर साथ हो... भाग चोवीस
सकाळी दहा वाजता गगन हॉस्पिटलमध्ये आला. केबिनमध्ये येऊन पाच मिनिट झाली होती दारावर टकटक झाली आणि पाठोपाठ रिसेप्शनिस्ट स्मिताचा गोड चेहरा आता डोकावला.
"सर तुमच्यासाठी एक बुके आलाय, घेऊन येऊ?"
"माझ्यासाठी? कुणी पाठवला असेल? ये घेऊन." त्याच्या नजरेत आश्चर्य होते.
दोन मिनिटात सुंदर, लालबुंद गुलाबांचा बुके घेऊन स्मिता आत आली. बुकेवर एक छोटंसं कार्ड होतं, 'प्रेम हे फुलासारखं असावं, छोटंसं आयुष्य सुगंधाने दरवळावं'.
कार्डवर काही नाव नव्हतं पण गगनला अंदाज आली की कदाचित हे रैनाने पाठवले असावे. त्याच्या चेहऱ्यावर पुसटसे हसू उमटले.
"हम्म, माझं प्रेम आहे तुझ्यावर पण थोडंसं नाटक करायला काय जातंय."
"सर कुणाकडून आलंय हे?" स्मिता अजूनही तिथेच उभी होती याचे त्याला भान नव्हते.
"अं, असेल कुणीतरी. पण फुलं छान आहेत. तिथे ठेव कॉर्नर पीस वर." त्याने बुके तिच्या हाती दिला.
..........................................
रैना आणि कनक उज्वलच्या मागे शेतामध्ये फिरत होत्या. त्याने शेताचे एका मोठ्या ग्रीन हाऊसमध्ये रूपांतर केले होते. अवाकॅडो, झुकिनी, बेल पेपर्स, ब्रॉकली, लेट्यूस सारखी अनेक प्रकारच्या परदेशी भाज्या, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, मलबेरी सारखी फळे आणि विविध रंगांची फुले यांची अगदी शास्त्रोक्त पद्धतीने शेती केली जात होती तिथे. शिवाय शेताच्या काही भागात पारंपरिक बियाणे वापरुन पारंपरिक धान्य ही पिकवले होते.
"आपला परिसर थंड हवेचे ठिकाण असल्याने आजूबाजूला अनेक पंचतारांकित हॉटेल, रिसॉर्ट्स वगैरे आहेत. त्यामुळे या एक्झाॅटिक भाज्या, फळे आणि फुले यांना कायम मागणी असते. आपले हवामान थंड असल्याने काही गोष्टींची काळजी घेतली तर इथे या परदेशी भाज्या सहज पिकवता येतात. आपल्या फुलांना तर पार मुंबई पुणे पर्यंत मागणी असते." उज्वल सांगत होता.
"मग कमाई ही चांगलीच असेल तुझी." कनक म्हणाली.
"एखाद्या मोठ्या कंपनीच्या जनरल मॅनेजर इतकी तर सहज आहे." उज्वल हसत म्हणाला.
"वाऊ, किती छान. तुला आधीपासूनच शेतीची आवड आहे ना?"
"लहानपणापासून बाबांसोबत शेताला यायचो. बाबाही अगदी प्रयोगशील शेतकरी होते. त्यांचं पाहून गोडी लागली. मग पुढे जाऊन शिक्षण ही याच क्षेत्राचे घेतले. अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. त्यातून हे सगळं साकारलं."
"किती शिकलास?" कनकचे कुतूहल शमत नव्हते.
"मास्टर ऑफ ॲग्रीकल्चरल सायन्स आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातील हॉर्टिकल्चरची पदवी."
"ग्रेट, सगळ्यात जास्त काय आवडलं तर इतकं सगळं करत असतानाही तू पारंपरिक धान्य पिकावतोस." रैना प्रभावित झाली होती.
"आपली परंपरा आहे ती, सोडून कसं चालेल. माझा अजून एक उपक्रम ही चालू आहे. आपल्या भागात पारंपरिक पिढीजात पध्दतीने जे बी बियाणाचे वाण वापरले जायचे त्याचे मी संवर्धन करतोय. हे जे धान्य बघताय ते हायब्रीड नाही तर अस्सल देशी, गावरान बीज आहे. आम्ही काही जणांनी मिळून एक बीजबँक सुध्दा बनवली आहे. परिसरातील अनेक शेतकरी याचा लाभ घेत आहेत. हळूहळू जनजागृती होतेय. पारंपरिक वाणाचे गुणधर्म, महत्त्व, हेल्थ बेनिफिट समजल्याने अनेक जण हायब्रीडकडून पुन्हा गावरान कडे वळत आहेत."
"ही तर अतिशय आनंदाची बाब आहे. आय एम सो प्राउड ऑफ यू." दोघींच्या चेहऱ्यावर खरोखर अभिमान झळकत होता.
संध्याकाळ उलटून जात होती. संधिप्रकाश पसरत होता. शेतातील ताजी, ऑरगॅनिक फळं खाऊन तृप्त झालेल्या दोघींना घेऊन उज्वल घराकडे निघाला.
"उज्वल, इतकं सगळं छान वेल सेटल्ड आहेस, लग्नाचा विचार नाही केलास अजून की पाहून ठेवलीय एखादी?" रैनाने विचारले.
"तसं काही नाही ग. आई बाबा बघत आहेत पण गावात राहणाऱ्या शेतकऱ्याकडे मुली पाहायलाही ही तयार नाहीत." आरशातून मागे पाहत त्याने उत्तर दिले.
"व्हॉट नॉनसेन्स, हे काय कारण आहे. इतका हँडसम आहेस, चांगला कमावतोस, चांगलं घर दार, आई वडील आहेत. तुला नकार देणाऱ्या मूर्खच असतील." कनक भडकली होती. उज्वल गालात हसला.
त्रिकुट घरी पोहोचेपर्यंत पारूमावशींनी रात्रीचा स्वयंपाक केला होता. कृष्णा काठची चविष्ट भरली वांगी, खरपूस भाजलेल्या भाकऱ्या, सुगंधी आंबेमोहरचा भात आणि टोमॅटो घातलेली आमटी, करकरीत आंब्याचे लोणचे... अक्षरशः आडवा हात मारला सगळ्यांनी जेवणावर!
"अहाहा, काय जेवण आहे. मी तुला सांगते रैना इथून जाताना माझं वजन नक्की सात आठ किलोने वाढलेलं असेल. मस्त जिम करावी लागेल मला गेल्यावर." कनक आमटी भुरकत म्हणाली.
"गेल्यावर कशाला, रोज सकाळी उज्वल सोबत जात जा धावायला शेताकडे. सगळं पचून जाईल." पारू मावशी म्हणाल्या.
"तू धावायला जातोस?" कनकने रोखून पाहत विचारले.
"हो मग, वाळल्या वातीची ही अशी बॉडी आपोआप बनली काय?" त्याने हसून टोला लगावला. तिचे सकाळचे बोलणे त्याने ऐकलेले पाहून कनक गोरीमोरी झाली.
"चील काही नाही, येत जा तू ही सकाळी. तिथे मी काही जिम एक्विपमेंट्स ही ठेवली आहेत. त्यांचा वापर करू शकतेस."
"बरं ठीक आहे, सकाळी उठव मला. मी येते तुझ्या बरोबर. रैना तू ही येतेस का?"
"मी? नको बाबा. मी मस्त झोप काढणार. कॉलेज, अभ्यास याच्या नादात किती दिवस झाले मी मनसोक्त झोपले नाही. आता इथे फक्त तेच करणार. जा तुम्ही दोघे." रैनाने स्पष्ट नकार दिला.
"अजून एक उज्वल, तू काही तरी करणार होतास... ते गगन रागावला आहे म्हणून." रैना चाचपडत बोलत होती.
"अगं हो, सुरू झालाय प्लॅन. बघ दोन दिवसांत भावोजींचा कॉल येतो की नाही. पण तू स्वतःहून नको करू हां कॉल." त्याने हसत उत्तर दिले.
"कसला प्लॅन आणि काय कुणास ठाऊक. महाशय जास्त रागावू नयेत म्हणजे झालं." रैना स्वतःशी पुटपुटली.
क्रमशः