अगर तुम साथ हो ... भाग तेवीस
भल्या पहाटे कनक, रैनाची जोडी मामा मामीबरोबर निघाली. खरं तर मामाला आदल्या दिवशीच जायचे होते पण कनकची कपड्यांची खरेदी व्हायची होती म्हणून ते आज पहाटे निघाले. सकाळी नऊच्या सुमारास मामाच्या वाड्यासमोर गाडी येऊन थांबली.
सातारा जिल्ह्यात वाईजवळ एक लहानसे गाव होते जिथे मामा राहायचे. गावाजवळून कृष्णामाई वाहायची. तिच्या पाण्यावर गावाची तहान भागायची. तिच्या अमृतसिंचनाने आसपासची शेती सुपीक झाली होती. गावकऱ्यांना माईच्या उपकाराची जाणीव होती. त्यामुळे इतरत्र आढळणारे जल प्रदूषण इथे नावालाही नव्हते. नदी म्हटलं की तिच्या प्रवाहात कपडे, भांडी, गुरे ढोरे धुणे असे एरव्ही होणारे प्रकार इथे घडत नसतं. इतकंच काय गावकऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून नदीवरून पाणी आणणे ही बंद केले होते. नदीचेच पाणी व्यवस्थित उपसा करून, शुद्धीकरण करून नळाद्वारे पोहचवले जाई. हां नाही म्हणायला गावापासून थोडं दूर एका डोहासारख्या ठिकाणी गावातील मुलं पोहायला जायची इतकंच.
सदोदित हिरवीगार शेती, पाचगणीच्या पठारावरून येणारी शुद्ध थंड हवा, प्रदूषणमुक्त पाणी यामुळे वातावरण आल्हाददायक नसते तरच नवल. सर्व गोष्टींची सुबत्ता असल्याने माणसं ही सुखी समाधानी होती.
आल्या आल्या हात पाय धुतल्यावर स्वयंपाकाच्या पारूबाईने आलं, गवती चहा घातलेला घरच्या दुधाचा वाफाळता चहा आणला.
"उम्म, काय सुगंध आहे. मामा, या चहासाठी मी जन्मभर इथे राहायला तयार आहे." चहाचा सुगंध श्वासात भरून घेत डोळे मिटून कनक म्हणाली.
"अगं खुशाल रहा ना मग चिमणे. तुझ्या मामाचे घर आहे हे. तुम्हा पोरांनाच शहराची झगमग आवडते त्याला काय करणार. हवं तेवढं रहा." मामा म्हणाले.
"हो जरुर रहा, वाटलं तर कायमची रहा पण आधी अंघोळ करून ये, पाणी उपसून ठेवलंय." मामी हसत म्हणाल्या.
"हे काय ग मामी, किती मस्त मूडमध्ये होते मी. तू परत जमिनीवर घेऊन आलीस. ह्मम जातेय अंघोळीला, मॉम सारखी कमरेवर हात ठेवून नको बघू माझ्याकडे. छ्या, जगात कुठेही जा पण या अंघोळीपासून माझी सुटका नाहीच होणार." तोंड वेंगाडत कनक उठली.
"ही अंघोळ न करता आली होती का? आणि तू ग रैना?" मामाने विचारले.
"मामा अरे रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर मूव्ही, वेबसेरीज पाहत बसते आणि मग सकाळी उठायला उशीर झाला की आंघोळीची गोळी घेते. मी मात्र केलीय बाबा अंघोळ."
"ही चिमा अगदी तिच्या आईवर गेलीय. तिची आई ही अशीच रातभर पुस्तक वाचत जागायची ही मोबाइल बघते एवढाच काय तो फरक." मामा आठवणीत रमले होते.
"बरं मामा उज्वल कुठे आहे, आल्यापासून दिसला नाही?" रैनाने उत्सुकतेने विचारले.
"शेतावर गेला असेल. पहाटे लवकर जावं लागतं त्याला. हा भलामोठा पसारा वाढवून ठेवलाय पोराने." मामा कौतुकाने म्हणाले.
उज्वल मामाचा दत्तक मुलगा. लग्नाला अनेक वर्ष होवूनही मूलबाळ नसल्याने मामा मामींनी तपासण्या केल्या. त्यात त्यांना मुल होणं शक्य नसल्याचे आढळल्यावर त्यांनी उज्वलला बाळ असताना रीतसर दत्तक घेतले होते. थोडं मोठं झाल्यावर बाहेरून कुठून कळण्याआधी मामांनी स्वतः त्याला त्याबद्दल सांगितले होते. पण याचा कोणत्याच नात्यावर काही विपरीत परिणाम झाला नाही. उज्वलने कुटुंबाला आणि कुटुंबाने उज्वलला पूर्णपणे स्वीकारले होते. तो दत्तक असल्याचेही सगळे विसरून गेले होते. रैना आणि कनकचा तर काही प्रश्नच नव्हता कारण त्या जन्मायच्या आधी हे घडले होते. उज्वल आता सव्वीस वर्षांचा होता, कनक चोवीस तर रैना बावीस. लहानपणी सगळे सुट्टीमध्ये एकत्रच रहायचे पण गेल्या आठ नऊ वर्षांत कुठल्यातरी कार्यक्रमाच्या निमित्ताने एक दोनदा वगैरे अगदीच ओझरती भेट झाली होती.
अंघोळ करून कनकने टी शर्ट आणि ट्रॅक पँट घातली. धुतलेले केस टॉवलमध्ये गुंडाळून ती मस्त गुणगुणत मोबाइलमध्ये पाहत येत होती तर अचानक समोरून येणाऱ्या व्यक्तीला धडकली. तिच्या हातातील मोबाईल पडता पडता वाचला.
"व्हॉट द फ.." तिच्या तोंडातील शब्द अर्ध्यातच विरले. त्याऐवजी आश्चर्यदगार निघाले.
"उज्वल... उज्वल आहेस ना तू! माय गॉड, किती बदलास!"
"हो मी उज्वल आहे पण तू कोण आहेस?" त्याने तिला ओळखले नव्हते.
"अरे कनक आहे ती. मीना आत्याची मुलगी." तिथे आलेल्या मामींनी उत्तर दिले.
"कनक! किती सुंदर दिसतेय, एखाद्या हिरोईनसारखी."
"हो तर मग, हिरोईनच व्हायचं आहे ना मॅडमला." पाठोपाठ रैनाचा आवाज आला.
"रैना... किती वर्षांनी भेटतोय आपण तिघे. छान वाटलं तुम्हा दोघींना पाहून." उज्वल म्हणाला आणि फ्रेश व्हायला निघून गेला. कनक अजून ही तो गेला त्या दिशेने पाहत होती.
"भेंडी ये उज्वल इतना कैसे बदल गया, आधी किती रडका आणि वाळली वात होता. आता तर एकदम माचो मॅन दिसतोय." कनक रैनाला म्हणाली.
"त्यात काय एवढं, वयात आल्यावर सगळेच बदलतात. स्वतःच्या दिसण्याबद्दल थोडे जास्त काँशस होतात."
"हां बोलल्या आजीबाई... चला किचनमध्ये काही खायला आहे का बघू." कनक रैनाला ढकलत किचनकडे घेऊन गेली.
पारुबाईने मस्त आंबोळ्या आणि नारळाची चटणी बनवली होती. सोबत ताजे लोणी आणि मस्त मिरचीचे लोणचे होते.
"बाकी काही म्हणा पण टीव्ही, इंटरनेटमुळे जगभरचे पदार्थ कुठेही खाता येतात. आता हेच बघा काही वर्षांपूर्वी आंबोळी, घावन खायची तर कोकणात असं वाटायचं. आता आमच्या पारू मावशी कोकण्यांना कंपेटिशन देतील अशा आंबोळ्या इथे वाईला बनवतात." पोटभरून आंबोळ्या खात उज्वल म्हणाला बाकीच्यांनी त्याला मान डोलावून पाठींबा दर्शविला.
"आज तुमच्या दोघींचा काय प्लॅन आहे?" उज्वलने विचारले.
"तसा प्लॅन तर काहीच नाहीये. आम्ही इथे फक्त मजा करायला आलोय." कनकने उत्तर दिले.
"मग एक काम करू. मी माझी थोडी बाहेरची कामं उरकून एक वाजेपर्यंत येतो. जेवण करू. थोडावेळ आराम करून चार वाजता शेतावर जाऊ. चालेल का?"
"हो नक्की जाऊन या, आवडेल तुम्हाला." मामा अभिमानाने म्हणाले.
"हो चालेल, जाऊया की. चार वाजता नक्की ना?" रैनाने कन्फर्म केले.
असेच टंगळमंगळ करण्यात चार वाजले. आल्यापासून रैनाने गगनला दोन तीन वेळा कॉल केला पण त्याने तो उचलला नाही. शेताला जातानाही जीपमध्ये बसल्या बसल्या ती फोन लावायचा प्रयत्न करत होती पण लागतच नव्हता. मनोमन ती अस्वस्थ झाली होती. तिची अस्वस्थता उज्वलने हेरली.
"काय झाले रैना, काही प्रॉब्लेम?"
"अरे ते..." रैनाने हळूच आपला प्रॉब्लेम सांगितला. कनक मागच्या सीटवर बसून बाहेरचं निसर्गसौंदर्य रेकॉर्ड करत होती.
"एवढंच ना, थांब मी प्रयत्न करतो त्यांचा रुसवा घालवण्याचा. मला फक्त आता ते जिथे असतील तिथला पत्ता दे."
"आता तो गेला असेल परत, थांब देते पत्ता." रैनाने पत्ता दिला. उज्वल जरा बाजूला जाऊन फोनवर बोलू लागला. काही वेळात तिच्या जवळ येवून त्याने हसून थंबस् अपचा इशारा केला.
नेमकं काय करणार तो गगनचा रुसवा घालवायला, वाचा पुढील भागात
क्रमशः
लोभ असावा
प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत