तुम अगर साथ हो ... भाग बावीस
साखरपुडा पार पडला. देशमुखांची होणारी संभाव्य अडचण ओळखून मोहित्यांनी मोजकी मंडळी सोबत आणली होती. हसतखेळत जेवणं उरकली. मोहित्यांकडील एक बुजुर्ग पानाला चुना लावत विचारते झाले.
"देण्या घेण्याचे काय ठरले आहे माधवराव?"
"विशेष काही नाही. देशमुखांनी त्यांची लेक द्यावी आणि मोहीत्यांनी सून म्हणून ती घ्यावी असे ठरले आहे." पप्पा हसत म्हणाले. बैठकीत माफक हसण्याचे आवाज निघाले.
"मस्करी म्हणून ठीक आहे. मी खरंच विचारतोय." काकांनी आपले घोडे दामटले.
"पण मी मस्करी करत नाही काका. खरंच सांगतोय. फक्त लग्नाचा खर्च निम्मा निम्मा करायचं ठरलंय."
"असं कसं, आपला मुलगा डॉक्टर आहे, स्वतःची प्रॅक्टिस करतो. गडगंज हुंडा आणि सोनं द्यायला पाहिजे यांनी. अजूनही वेळ गेली तसं बोलून घ्या." पानाची पिंक टाकत काकांनी पुडी सोडली. वातावरण थोडे गंभीर झाले.
"आपला मुलगा डॉक्टर असला तर यांची मुलगीही इंजिनिअर आहे. दिसायला लाखात एक आहे. स्वभावाने एक नंबरी सोनं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोहित्यांना देवाने भरभरून दिलं आहे. दंडात धमक आणि मनगटात ताकद दिली आहे. त्यामुळे कुणाकडून काही घेण्याची गरज भासणार नाही." शांत सुरात पण ठामपणे उत्तर आले.
"माधव मूर्खपणा करू नकोस. गगनसारख्या मुलाचा हा अपमान आहे. कसली कसली व्यंग असणारी, दमडी न कमावणाऱ्या पोरांना लाखोंचा हुंडा मिळतो."
"असेल काका. पण जे आहे ते आहे. आम्ही स्वखुशीने हा निर्णय घेतलाय. त्यामुळे यात विचार करण्यासारखे काही आहे असं वाटत नाही." पप्पांनी थोडं कठोर बोलत विषय संपल्याचे सूचित केले.
"रैना, मॉम म्हणत होती अरेंज मॅरेज आहे हे, हो ना?" रात्री कपड्यांच्या घडी घालत कनकने विचारले.
"तुला काय वाटतं?" मेकअपचे सामान व्यवस्थित ठेवत रैनाने प्रतिप्रश्न केला.
"तुमच्या दोघांतील केमिस्ट्री पाहून तर लव मॅरेज असावे असं वाटतं बाई."
रैनाने तिला ती आणि गगन कसे भेटले आणि लग्न कसे जमले याची कथा सांगितली.
"वॉव ही तर एकदम फिल्मी लव्ह स्टोरी झाली. यू आर सो लकी ज्याच्यावर प्रेम केलं तोच नवरा होईल."
"येस आय एम." रैनाने दुजोरा दिला.
"ऐक ना मी काय म्हणते आता तुझ्या कॉलेजला सुट्ट्या आहेत तर आपण मामाच्या गावी जाऊ या का? किती वर्षे झाली जाऊन."
"हो चालेल, उद्या विचारून बघू आईला. ए पण तिकडे तुझे असले शॉर्ट कपडे चालणार नाहीत हां. तुला साधे कुर्ते आणि लेगिंग्ज घ्यावे लागतील." रैनाने चिडवले.
"हो यार, तुला आठवते का लहानपणी कुणाच्या तरी लग्नात मी बॅकलेस चनिया चोली घातली होती तर मामाने चारचौघात हिच्या ब्लाऊजला कपडा कमी पडला का म्हणून मॉमला खडसावले होते. त्यानंतर तिकडे जायचं म्हटलं की मॉम अगदी काळजीपूर्वक कपडे निवडायची."
"लहान खेड्यात थोडा ऑर्थोडॉक्स पणा असतोच ग. आपणच समजून घ्यायचं देश तसा वेश. बरं ते जाऊ दे, मला फोटो दाखव ना आजचे." रैनाने विषय बदलला. दोघी पलंगावर लोळत मोबाईलवर फोटो पाहू लागल्या.
"माझे मित्र मैत्रिणी असते तर अजून मजा आली असती. त्यांना कुणाला माहीत ही नाही." रैना चुकचुकली.
"मग का नाही बोलावलं तू?"
"चार दिवस आधी सांगून सरप्राइज द्यावं म्हणून नव्हतं सांगितलं. नंतर थॅन्क्स टू यू, तुझ्यामुळे मोबाइल फुटला. सगळे कॉन्टॅक्ट त्याच्यामध्ये असल्याने कळवताच आलं नाही."
"मी सॉरी म्हटलं ना? मी मुद्दाम थोडीच केलं. तेव्हा नाही तर आता कळव ना."
"आता? ते कसं?"
"आर यू रिअली डंब? तुझे फ्रेंड्स एफबी, इंस्टावर नाहीत का? तुझ्या जागी मी असते तर किती तरी ऑप्शन शोधले असते कॉन्टॅक्ट करण्याचे."
रैनाच्या डोक्यात ट्यूब पेटली. "मला तुझा मोबाइल दे जरा. मी एफबी अकाऊंट चेक करते माझं."
रैनाने हंसिकाला मेसेज केला.
"हॅलो डियर, कशी आहेस. ऐक ना, आय हॅव ए न्यूज फॉर यू पीपल. पण ती प्रत्यक्ष भेटल्यावर सांगेन."
तिचा मेसेज पाहून हंसिका ताडकन बिछान्यावर उठून बसली.
"अगं तू आहेस कुठे. तुझा मोबाइल बंद आहे. आम्ही सगळ्यांनी कमीत कमी हजार वेळा तरी तुला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला."
"मी कुठे असणार, घरीच ना? काही पण विचारते. आणि मोबाइलचं म्हणशील तर त्या दिवशी कनकचा धक्का लागून पडला आणि बंदच झाला, दुरुस्तीला दिलाय."
"ओके... कसली न्यूज म्हणत होतीस, गूड ऑर बॅड?"
"गुड."
"आणि ही कनक कोण? आधी भूमी जिच्याशी तासंतास बोलायचीस तू आणि आता कनक?" हंसिकाला राग आला होता. खरं तर तिला रैना बद्दल उठलेली राळ सांगायची होती पण कसं सांगावं कळत नव्हते.
"कनक माझी मावस बहीण आहे. आणि न्यूज 'त्या' भूमीबद्दलच आहे. आमचं रिलेशनशिप बदललं आहे आता. वुई आर नॉट जस्ट फ्रेंड्स नाऊ. त्याबद्दलच सांगायचं आहे पण असं नाही, भेटून सांगेन."
हंसिका हादरली. 'म्हणजे एक्झॅक्टली काय सांगायचं आहे हिला... 'त्या' हा शब्द असा हायलाईट का केलाय तिने? तिच्याबद्दलच्या अफवा खऱ्या तर नाहीत?'
"कधी येणार आहेस तू मग?"
"सध्या तरी आम्ही मामाच्या गावाला जायचा प्लॅन करतोय. त्यामुळे हे दोन आठवडे तरी शक्य नाही. पण मी मेसेंजरवरुन तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहीन. आणि प्लीज कुणाला काही बोलू नकोस न्यूजबद्दल कारण मला त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहायचे आहेत. सगळ्यांना हॅलो सांग माझा. बाय मिस यू ऑल." रैनाने लॉग आऊट केले.
मामाकडे जायचा कनक आणि रैनाचा प्लॅन सगळ्यांनी उचलून धरला. इतकंच नाही तर अनायासे मामा मामी साखरपुड्याला आलेच होते तर त्यांच्याबरोबरच जायचे ठरले.
"गगन ऐक ना, उद्या मी आणि कनक मामाबरोबर त्याच्या गावाला जातोय. दहा बारा दिवस राहून येऊ." संध्याकाळी बाबांच्या फोनवरून रैनाने गगनला कॉल केला.
"दहा बारा दिवस! मग माझ्याबरोबर कशी बोलशील?"
"माझ्याकडे जुना बटणाचा फोन आहे त्यावरून बोलत राहू आपण. मी येईपर्यंत जुना फोन दुरुस्त होऊन आला असेल."
"पण दहा बारा दिवस खूप होतात. तू ये ना चार पाच दिवसात. आपण कुठेतरी फिरायला जाऊ, वन डे पिकनिक लाईक ए डेट."
"बऱ्याच वर्षात गेले नाही तिकडे, शिवाय कनकही सोबत आहे. फिरायला काय आपण आता कधीही जाऊ शकतो ना."
"थिस इज नॉट फेअर हां. एका दिवसातच तू मला डावलायला लागलीस." गगनला राग आला होता. पुढे काही न बोलता त्याने फोन बंद केला.
रागावला वाटतं, आता याचा रुसवा काढावा लागेल. स्वतःशी ती पुटपुटली.
कसा काढेल रैना गगनचा रुसवा, वाचा पुढील भागात
क्रमशः
लोभ असावा