तुम अगर साथ हो ... भाग एकवीस

 तुम अगर साथ हो ... भाग एकवीस 



अजून एक आठवडा आहे कार्यक्रमाला असं म्हणत असताना एक दिवशी सकाळीच गगनच्या पप्पांच्या म्हणजे माधवरावांचा रैनाच्या बाबांना कॉल आला.

"नमस्कार दिनकरराव. एक अनपेक्षित अडचण उभी राहिली आहे. म्हणजे तशी फार मोठी नाही पण तुम्ही साथ दिली तर निभावून नेता येईल."


"हो बोला ना माधवराव, काय झाले?" 


"माझे चुलत बंधू आजारी आहेत म्हणजे थोडे जास्त सिरीयस आहेत हे तुम्हाला माहीत आहेच. आमचे गुरुजी म्हणतात की पुढच्या आठवड्यात होणारा कार्यक्रम थोडा अलीकडे करून घ्यावा. म्हणजे दुर्दैवाने काही विपरीत झाले तर काही दिवस काही शुभ कार्य करता येणार नाही. त्यानंतर फारसे शुभ मुहूर्त नाहीत."


"बरं, तसं असेल तर मग कधीचा मुहूर्त काढलाय गुरुजींनी?"


"ते म्हणतात परवा दिवशी चालेल. मला समजतंय जरा घाई होईल पण तुम्ही प्लीज यावर विचार करावा असं वाटतं. जर जमणार नसेल तर ठरलेल्या दिवशी करू पण मनात धाकधूक लागलीय म्हणून हा प्रस्ताव मांडतोय."


"हम्म जरा जास्तच घाई होतेय पण मी घरात सगळ्यांचा विचार घेऊन तुम्हाला कळवेन थोड्या वेळाने. चालेल का?"


"हो हो कळवा. आणि हो जास्त लोड घेऊ नका नसेल जमत तरी सांगा आम्ही समजू शकतो. कारण सात दिवसाची तयारी एका दिवसात करणं म्हणजे खायचं काम नाही."


दिनकररावांनी पद्मा, शुभांगी, सुनील आणि इतर लोकांसमोर अडचण मांडली. सगळ्यांची पहिली प्रतिक्रिया तर कसं शक्य आहे अशीच होती. पण चर्चेदरम्यान मार्ग सुचत गेला आणि लक्षात आले की हे समजतो तितकं अवघड ही नाही. सगळी खरेदी झाली होती, साफ सफाई झाली होती. कार्यक्रम रितीनुसार घरातच होणार होता त्यामुळे हॉल वगैरेची भानगड नव्हती. जी थोडीफार कामं शिल्लक होती ती नाही केली असती तरी चालली असती किंवा थोडक्यात झाली असती. 


"ठीक आहे दाजी त्यांना होकार कळवून टाका. मी स्वयंपाकी आणि भांडी घासणाऱ्या बायकांची जोडणी करतो. पद्माताई तुम्ही बाहेरगावच्या ज्यांना आमंत्रण करायचं आहे त्यांना कॉल करून सांगा. शुभांगी गावातील आमंत्रण करेल. दाजी तुम्ही पूजा सांगणाऱ्या भटजींना बोलून पहा. ते जर अवेलेबल नसतील तर पाहुण्यांना सोय करायची विनंती करा."


  सुनीलने फटाफट कामाची विभागणी करून टाकली. सगळं आवाक्यात असलेलं लक्षात आल्यावर सगळेच उत्साहाने कामाला लागले. मोहित्यांच्या घरी निरोप पोहोचला.


रैनाला जेव्हा समजले कार्यक्रम परवा होणार ती हतबुद्ध झाली.

"आई अगं मी माझ्या मित्र मैत्रिणींना नाही आमंत्रण दिलं. त्यात माझा फोन दुरुस्तीला दिलाय. कसं करू?"


"बेटा आता नाईलाज आहे. तसंही घरगुती पद्धतीने कार्यक्रम करायचं ठरलंय. त्यांना सांग काय अडचण आली ते समजून नक्की घेतील. तू लग्नाला बोलव सगळ्यांना, चांगलं चार दिवस आधी बोलव हवं तर."


यावर काही वाद न घालता रैना तयारीला लागली. आदल्या रात्री कनकने रैनाला छानशी मेंदी काढून दिली.


सकाळी दहाचा मुहूर्त होता. रैनाची सर्व जबाबदारी त्या दिवशी कनकने स्वतःकडे घेतली होती. तिची छानशी सागरवेणी घातली. त्यावर भरपूर गजरे माळले. आदल्या दिवशी पाठवलेली साखरपुड्याची साडी अगदी छान चापून चोपून नेसवली. सुंदर मेकअप केला. आयलायनर, काजळमुळे रैनाचे डोळे अजून टपोरे दिसत होते. गोऱ्या गालांवर ब्राँझ ब्लश अगदी नैसर्गिक दिसत होता. कनकने लाल रंगाची लिपस्टीक हाती घेतली तर रैनाने तिला थांबवले.

"ऐक ना कनक, प्लीज ही पिंक शेडची लावशील का? मला डार्क रेड नाही आवडत."


"अगं पण रेड अजून खुलून दिसेल." 


"नको ना. मला पिंकच हवी आहे."


कनकने रैना म्हणते ती गुलाबी लिपस्टीक लावून दिली. तिने आपले व्यावसायिक कौशल्य वापरून तयार केल्याने रैना एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. 


"कनक अगं किती छान तयार केलंय तू हिला. लग्नात ही अशीच करशील का?" लेकीकडे कौतुकाने पाहत पद्मा म्हणाली.


"हो मावशी, नक्की करेन. माझी प्रिय बहीण आहे ही." कनकने रैनाला मिठी मारली.


"चल आता तू तयार हो," रैनाने कनकसमोर ड्रेस धरला. 


इकडे गगनच्या घरी भूमीने पिच्छा पुरवून त्याला शेरवानी घालायला लावली. हलका हिरवा रंग त्याला खुलून दिसत होता. शेरवानीच्या कुर्त्यावर तिने मध्यभागी पाचू असलेला मोत्यांचा ब्रोच लावला. डोक्यावर फेटा बांधला आणि त्यावरही तसाच ब्रोच लावला. पायात मोजडी घातल्यावर गगन रुबाबदार दिसू लागला.


"वाह ब्रदर तू तर एखाद्या राजकुमारासारखा दिसतोय." बोटांचा मोर नाचवत भूमी म्हणाली.


"राजकुमार म्हणे, माझे बॉडी पार्टस गुदमरत आहेत या कपड्यांमध्ये. प्लिज मला शर्ट पँट घालू दे ना." गगन वैतागला होता.


"अजिबात नाही हां. तू हेच कपडे घालायचे. आज तुझा स्पेशल दिवस आहे तर तू स्पेशल दिसायचं. भंगार तर तू रोजच दिसतोस." जीभ बाहेर काढून ती म्हणाली आणि त्याला नेमका अर्थ कळेपर्यंत तिथून पळून ही गेली.


मोहिते मंडळी देशमुखांच्या घरी पोहोचली. आदर सत्कार झाला. पूजेची सर्व तयारी झाली. भटजींनी रैनाला बोलवायला सांगितले. हॉलमध्ये खाली जाजमावर पूजा मांडली होती. दोन सुंदर महाराजा खुर्च्या बाजूला मांडल्या होत्या. 


हिरवी गर्भरेशमी साडी, केशरी पदर. त्यावर सुंदर सोनेरी लाल चोचीचे पक्षीगण. अंगभर सोनेरी बुट्टे, अधूनमधून नाजुक फुलपाने. कोपरापर्यंत येणारा, खानदानी बुट्ट्यांचा साज मिरवणारा, आरी वर्क केलेला केशरी ब्लाऊज.


सुंदर साडीत सजलेली, केसांची सागरवेणी घातलेली, निमुळत्या गळ्यात लहानसं नेकलेस, गोंडस गुलाबी हातात हिरव्या केशरी बांगड्या घातलेली लावण्यखणी रैना कनकसोबत बैठकीत येताच गगनकडील नातेवाईक बायका स्तिमित झाल्या.


"वाह वाह, रूप असावं तर असं!" कुणीतरी बोलून गेलं.


विधी सुरू झाले. पूजा संपल्यावर भूमी सुंदर सजवलेल्या तबकात अंगठ्या घेवून पुढे झाली. रैना आणि गगनने एकमेकांच्या बोटात अंगठ्या सरकवल्या. या सुंदर क्षणांचे फोटो आठवणीत राहण्यासाठी कॅमेऱ्यामध्ये साठवले गेले.


रैनाचा आनंद आभाळात मावत नव्हता. गगनची अवस्थाही तशीच होती.


‘आज मैं ऊपर आसमाँ नीचे’, रैनाचे मन गात होते.


आई आपल्या स्वप्नात हरवलेल्या मुलीकडे पुन्हा पुन्हा पाहत होती. तिच्या अंगणीची तुळस दुसऱ्या घरी रुजण्यासाठी सज्ज होत होती. बाबा कुणाच्या नकळत डोळे टिपत होते. जगाची ही रीत कित्येक बाबांना मुलीच्या जन्मापासूनच व्याकूळ बनवते...



 क्रमशः 

2 Comments

  1. पुढे काय होणार खूप उत्सुकता निर्माण होतेय...पण रैनाच्या बाबतीत वाईट झालेला शेवट कधीच आवडणार नाही

    ReplyDelete
  2. पांच भाग वाचून झाले भाग 22 लवकर लिहा खूप छान कथा लिहली आहे उसुकता वाढत चालली लवकर पोस्ट करा

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post