तुम अगर साथ हो... भाग वीस
अजून दहा एक दिवस होते कार्यक्रमाला. दोन्ही घरात तयारी सुरू होती. गगनच्या घरी काकांचे आजारपण लक्षात घेऊन थोडी आधीच खरेदी वगैरे आटोपून घेतली गेली होती.
साखरपुड्याला चांदीचा मान असतो म्हणून सगळ्यात आधी रैनासाठी पैंजणाची खरेदी झाली. भूमीने तिच्या आवडीने मोराची डिझाईन असलेले भरघोस दिसणारे पैंजण निवडले. मम्मीला ते बरेच जाड वाटत होते. त्यांच्या मते रैनाला नाजूक पैंजण शोभून दिसले असते पण भूमीच्या हट्टापुढे त्यांचे काही चालले नाही. नंतर नेकलेस आणि कानातल्यांचा सेट घेतला. रैना आणि गगनसाठी मॅचिंग ‘he and she’ रेंजमधील हिऱ्याच्या सुंदर अंगठ्या निवडल्या गेल्या.
मम्मीने सुनेसाठी गर्द हिरवी कांजीवरम सिल्क साडी जिला केशरी काठ पदर होता पसंत केली. त्यातील ब्लाऊज पीस काढून घेऊन रैनाकडे शिवायला पाठवून दिले.
रैना संध्याकाळची गच्चीवरील कठड्याला टेकून गगनबरोबर फोनवर बोलत होती. तेवढ्यात मागून कुणीतरी भौक्क करत आले. रैना दचकली आणि तिच्या हातातली मोबाइल खाली पडला. तिने वळून पाहिले तर कनक, तिची मावसबहिण ऊभी होती.
"डफर, असं कोण करतं? माझा मोबाइल पडला खाली. थांब आणते."
रागावलेली रैना धावतच पायऱ्या उतरून खाली गेली. उंचावरून पडल्याने मोबाईल बंद पडला होता. तिच्या मागोमाग आलेल्या कनककडे पाहून ती ओरडली, "बघ तू काय केलं. बंद पडला माझा फोन. माझे सगळे कॉन्टॅक्ट त्याच्यातच आहेत आता काय करू?" तिच्या डोळ्यात पाणी होते.
"अग चील, गॅजेट आहे ते दुरुस्त करता येतं. मी इतक्या वर्षांनी तुला भेटायला तुझ्या आनंदात सामील व्हायला इतक्या लांबून आले आणि तुला त्याचे काही नाही. मी काय मुद्दाम असं केलं का, जस्ट मस्करी म्हणून आले होते तुझ्या मागे." कनकसुध्दा चिडली. तिचा राग पाहून रैनाला वाईट वाटले. तिने दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला शांत केले.
"ओके, माफ कर मला. मी थोडी जास्तच रिऍक्ट झाले. कशी आहेस कणू? किती सुंदर दिसते आहेत आणि थॅन्क्स फॉर कमिंग." रैनाने कनकला मिठी मारली.
कनक, रैनाच्या मोठ्या मावशीची मुलगी. वयाने रैनापेक्षा एक वर्षाने लहान होती. ती दिल्लीला राहायची. लहानपणी दोघींचे एकमेकींशी छान जमायचे पण मोठ्या झाल्यावर गाठीभेटी कमी झाल्या. त्यातून ती दिल्लीसारख्या ठिकाणी वाढलेली तर रैना लहानशा खेड्यात. राहणीमान आणि वागण्याबोलण्यातील फरक सहज जाणवू लागला. कधी कधी तुलनाही होऊ लागली. त्यामुळे त्यांचे नाते आधीसारखे राहिले नाही.
कनक दिसायला रैना सारखीच सुंदर होती. तिला अभिनेत्री बनायचे होते. सध्या ती मॉडेलिंग करत होती. पण यासाठी तिने खूप आधीपासून काम सुरू केले होते. स्वतःचे व्यवस्थित ग्रूमिंग करून घेतले होते. आधीची उंच शरीरयष्टी नियमित व्यायाम करून तिने अजून सुडौल बनवले होते. मूळचा गोंडस देखणा चेहरा निरनिराळ्या उपायांनी अजून छान दिसायचा. मोठ्या शहरात आणि झगमगत्या दुनियेत वावरत असल्याने अद्ययावत फॅशनचे तोकडे कपडे कपडेसुध्दा कॅरी करण्यात सहजता आली होती. आतासुध्दा तिने मिनी स्कर्ट आणि क्रॉप टॉप घातला होता जो तिला शोभून दिसत होती. रैनाचे सौंदर्य सोज्वळ सालस होते तर कनकचे मादक आणि समोरच्याला आव्हान देणारे.
त्या रात्री कनक रैनाच्या खोलीत झोपणार होती. दोघी उशिरापर्यंत गप्पा मारत बसल्या होत्या. जुन्या आठवणींना उजाळा दिला जात होता, स्वतःच्या आयुष्यात काय चालू आहे याची माहिती दिली, घेतली जात होती. मधल्या काळातील दुरावा मिटल्यासारखे वाटत होते.
इथे रैना कुटुंबासोबत अगदी आनंदात होती आणि दुसरीकडे तिच्या पाठीमागे वेगळेच नाट्य रचले जात होते. सकाळी दहा वाजता एकाच वेळी एका अनोळखी नंबरवरून हंसिका, मिहीका, श्रेयस, अनिकेत, झुबेर, हर्षल आणि कार्तिक अशा सगळ्यांना काही फोटो आले. त्यांनी उघडून पाहिले तर ते व्हॉट्स ॲप चॅटचे स्क्रीनशॉट होते. पाहणाऱ्यांना धक्काच बसला. वाचून असे वाटत होते की ते दोन प्रेमिकांमधील संवाद असावे. यात धक्का बसण्याची गोष्ट ही होती की त्यातील एका व्यक्तीचे नाव भूमी असल्याचे लक्षात येत होते तर दुसरीचे रैना... फोटो पाठोपाठ मेसेज ही आला,
"बघा ज्या रैनाला तुम्ही आदर्श, सालस, सोज्वळ समजता तिचे खरे रूप. फोटोवरून समजलेच असेल तिला मुलांमध्ये नाही तर मुलींमध्ये इंटरेस्ट आहे. शी हज ए गर्लफ्रेंड जिला ती दिवसरात्र असे 'प्रेमभरे' मेसेज पाठवत असते."
फोटो पाहून गोंधळलेले मेसेज पाहून हादरले. मिहीका आणि हर्षल तर इतके चिडले की त्यांनी त्या नंबरवर कॉल करायला सुरुवात केली पण नंबर स्वीच ऑफ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. लगेचच गृपवर मेसेजेसचा पाऊस पडायला सुरुवात झाली.
"कुणी केला असेल रे हा खोडसाळपणा. बाय गॉड सांगते जर ती व्यक्ती हातात सापडली मी तर तिचा जीवच घेईन." मिहीकाचा राग टोकाला पोहोचला होता.
"हो ना, किती घाणेरडा आरोप आहे हा आणि ते ही रैनावर. आय मीन रिअली सिक इट इज." वैदेही म्हणाली.
"वैदेही, तुला ही फोटो आणि मेसेज आले का?" हर्षलचा वैदेहीवर दाट संशय होता.
"हो म्हणजे काय, हे बघ." वैदेहीने लगेच तिच्या चॅट विंडोचा स्क्रीनशॉट पाठवला. तिलाही साधारण त्याच वेळेस मेसेज आल्याचे दिसत होते.
"अरे कुणी रैनाला कॉल केला का? तिलाही पाठवले असतील का फोटो?" अनिकेतने विचारले.
"मी लगेच केला होता पण बंद दाखवतोय." हंसिका रडवेली झाली होती.
"कुणाला माहीत आहे का ही भूमी कोण आहे?" कार्तिकने विचारले.
"हो मला माहीत आहे, ती तिची गावाकडची मैत्रीण आहे. नुकतीच रि कनेक्ट झाली. मी पाहिलंय बऱ्याचदा तिचा कॉल, मेसेज येतात." हंसिका दिवसातील बहुतांश वेळ रैना सोबत राहायची त्यामुळे ती एकमेव सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन होती.
गृपवर दिवसभर याच गोष्टीची चर्चा होत होती. फिरून फिरुन सगळे एकच निष्कर्ष काढत होते तो म्हणजे कुणीतरी रैनाला बदनाम करण्यासाठी मुद्दाम हे करतंय. पण पुन्हा मनात पाल चुकचुकायची. हर्षलची अवस्था तर अजून बेकार होती. त्याचे मन हे मान्य करायला धजवत नव्हते.
"यार रागावू नका पण मला वाटतं यात काहीतरी तथ्य असावे. उगाच कुणी कुणावर इतका गंभीर आरोप करत नाही. रैनाची वागणूक ही पहा ना एकदा. इतकी देखणी आहे, कॉलेजमधील पोरं तिच्या नुसत्या एका नजरेसाठी तडफडत असतात. किती तरी हँडसम स्मार्ट मुलं आजूबाजूला घुटमळत असतात पण ती कुणावर नजर सुध्दा टाकत नाही. कॉलेजचे सोडा आपल्या गृपमध्ये सुध्दा हर्षल, कार्तिक, अनिकेत, झुबेर सारखी हँडसम आहेतच की. पण ती कुणालाच स्पेशल अटेंशन देत नाही. हंसिका, मिहीका आणि दुसऱ्या एक दोन मुली हिच्या बेस्ट फ्रेंड्स. फक्त मुली? मला वाटतं आपल्याला खरंच काही माहीत नाही तिच्याबद्दल." वैदेहीने पुडी सोडली.
"ज्या गोष्टीबद्दल आपल्या माहीत नसतं त्याबद्दल बोलू नये हा कॉमन सेन्स आहे. तुझ्यासारख्या स्कॉलर मुलीला तो असू नये याचं आश्चर्य वाटते. तू म्हणते तसं तुला जर तिच्याबद्दलच माहीत नसेल तर तिच्या सेक्शुअल ओरिएंटेशनबद्दल कसं काय तू इतकं बेधडक बोलू शकतेस? तू खरंच तिची मैत्रीण आहेस का?" श्रेयस भडकला.
"अरे मी तर फक्त मला वाटतं तेच बोलून दाखवलं यात इतकं चिडण्यासारखे काय आहे?"
"हे बघ वैदेही इथे सगळ्यांच्या मनात प्रश्न आहेत पण कुणीच ते मोठ्याने बोलून दाखवत नाहीये. मला मात्र तुझ्या मुद्द्यात दम आहे असं वाटतंय." अनिकेतने पाठींबा दर्शविला.
अनेकवेळा प्रयत्न करूनही रैनाशी संपर्क होवू न शकल्याने हंसिकाने तिच्या आईला कॉल केला. पद्मा कामात होती.
"हॅलो हंसिका बोल बेटा."
"काकू रैना कुठे आहे, तिचा फोन लागत नाही."
"रैना बाहेर गेली आहे कनक बरोबर. चार्ज नसेल तिचा फोन. तुला कॉल करायला सांगते मी. बेटा मी जरा कामात आहे, ठेवते फोन." पद्माने कॉल कट ही केला. हंसिका हताश नजरेने मोबाइलकडे पाहत राहिली.
क्रमशः