तुम अगर साथ हो... भाग एकोणवीस

 तुम अगर साथ हो... भाग एकोणवीस 



परीक्षा संपली आणि रैनाला गावी जायचे वेध लागले. नवीन नातं तिला खुणावत होतं. पहिल्यांदाच ती प्रेमात पडली जी पडली होती! खरं तर सगळ्यांना आताच साखरपुड्याचे आमंत्रण द्यावं असे तिला वाटत होते. आपल्या आनंदात आपली माणसं सहभागी व्हावी असे वाटण्यात काही वावगे नाही. पण विचारांती तिने कार्यक्रमाच्या चार दिवस आधी कळविण्याचे ठरवले.


"तयारी झाली का मॅडम, सामान वगैरे बांधले?" गगनने विचारले. तो तिला न्यायला येणार होता. 


"हो अल्मॉस्ट. उद्या सकाळी दहा वाजता निघू या. मी हॉस्टेल बाहेरच्या बस स्टॉपवर येते."


"बस स्टॉपवर का, मी हॉस्टेलवर आलो तर चालणार नाही का? तुझ्या बॅग्स जड असतील ना म्हणून म्हणतोय."


"हॉस्टेलवर फक्त पालकांना यायची परवानगी आहे. शिवाय बॅग फारशी जड नाही. मी करेन मॅनेज."


सकाळी आठ वाजताच रैना रेक्टर मॅडमला भेटून आली.

"मॅम मी दहा वाजता निघतेय. मी पुढे याच कॉलेजमध्ये एम इ करायचे ठरवले आहे तर मला हीच खोली मिळेल का?"


"तसा नियम तर नाही. नवीन अकॅडमीक इयरसाठी नवीन अर्ज येतात ना. म्हणजे टेक्निकली तुझं ग्रॅज्युएशन झाल्याने तुला परत नवीन विद्यार्थिनी समजलं जाईल. एक काम कर तू आजच अर्ज देवून ठेव फक्त तारीख नको घालू. आणि हो तुझं राहिलेलं सामान नेणार नसशील तर व्यवस्थित पॅक करून स्टोर रुममध्ये नेऊन ठेव. नियमाप्रमाणे खोली रिकामी करावी लागेल." तिच्यापुढे अर्ज ठेवत मॅडम म्हणाल्या. 


रैनाने अर्ज तर भरुन दिला पण मनाच्या कोपऱ्यात आपल्याला पुढे शिक्षण घेण्याची परवानगी मिळेल का असा विचार रुंजी घालत होता. हो गगनने जरी तशी खात्री दिली असली तरी सासरच्या बाकीच्या लोकांचे काय? त्यांच्या काही वेगळ्या अपेक्षा असतील तर...



"साडे नऊ वाजल्यापासून गगन बस स्टॉपवर उभा होता. रैना अजून आली नव्हती. नऊ पंचावन्न वाजता हातात बॅग आणि खांद्यावर सॅक लावलेली तिची आकृती दुरून चालत येताना दिसली तसा तो पुढे झाला आणि तिच्या पुढ्यात उभा राहिला. तिने वर पाहिले. डोळ्यांना डोळे भिडले आणि तिने नजर झुकवली. पुढे होवून त्याने तिच्या हातातील बॅग घेतली. येणाऱ्या जाणाऱ्या बसेस ना अडचण नको म्हणून त्याने गाडी थोडी लांब पार्क केली होती. डिकीत बॅग ठेवून दोघे निघाले. 


"कसे गेले पेपर? अभ्यास झाला होता ना व्यवस्थित?" बोलायला सुरुवात करावी म्हणून त्याने प्रश्न केला.


"छान गेले पेपर. मी सुरुवातीपासूनच अभ्यास करत होते म्हणून फारसा ताण आला नाही." रैनाने उत्तर दिले. कॉलवर भरभरून बोलणाऱ्या दोघांना आज समोरासमोर काय बोलावे ते सुचत नव्हते. गगनने एफएमचा आवाज वाढवला.


आपकी नज़रों ने समझा

 प्यार के काबिल मुझे

 दिल की ऐ धड़कन ठहर जा

 मिल गयी मंजिल मुझे 

आपकी नज़रों ने समझा

.

.

.

.

.

.


आपकी मंज़िल हूँ मै

 मेरी मंज़िल आप है 

आपकी मंज़िल हूँ मै

 मेरी मंज़िल आप है 

क्यों मै तूफ़ा से डरू

 मेरा साहिल आप है

 कोई तुफानो से कह दे 

मिल गया साहिल मुझे

 दिल की ऐ धड़कन ठहर जा

 मिल गयी मंजिल मुझे 

आपकी नज़रों ने समझा....



  लताबाई त्यांच्या स्वर्गीय आवाजात गात होत्या. 


'कसं काय जादू झाल्यासारखं आपल्या भावनांना सूट होणारी गाणी लागतात. मला एक्झॅक्टली हेच वाटतंय हा बाजूला असताना. प्रेम होणं तर दूर आतापर्यंत हा शब्द सुध्दा मनाच्या आसपास फिरकला नव्हता आणि आता मी चक्क प्रेमात पडलेय. बस्स फक्त काही दिवस मग मी सगळ्यांना दाखवेन माझी निवड किती क्लासी आहे.' रैना विचारात होती.


एव्हाना गाडी गावाबाहेर पडली होती.जुनी मधुर गाणी ऐकत प्रवास सुरू होता. दोघांमधील निःशब्द अबोला आणि अर्थपूर्ण हिंदी प्रेमगीत आणि सकाळचा सुंदर नजारा. तो अबोलाही बोलका वाटत होता...



तीन तासांनी गगनचे गाव आले. गाडी हायवे सोडून गावाच्या दिशेने वळली. थोड्या अंतरावर बस स्टॉपवर रैनाला तिचे बाबा उभे असलेले दिसले.


"गगन गाडी थांबव."


"का ग काय झाले?"


"ते बघ, बाबा आणि सुनीलमामा उभे आहेत."


"अरेच्चा खरंच की."


गगनने कार बाजूला उभी केली. खाली उतरून त्याने दोघांना पायाला हात लावून नमस्कार केला. तोपर्यंत दुसऱ्या बाजूचे दार उघडून रैना बाहेर आली.


"बाबा, मामा तुम्ही इथे? मी पोहचवले असते ना रैनाला सुरक्षित."


"हो तशी खात्री आहे आम्हाला पण आमचे काही काम होते म्हणून इकडे आलो होतो. ते संपवून परत निघालो होतो तर तिची आई म्हणाली घेऊनच या म्हणून थांबलो." बाबा हसून म्हणाले.


"अच्छा हो का. चला मग घरी, चहापाणी वगैरे घेऊन जा."


"नाही, नको. उशीर होईल. गावात काही कामं वाट बघत आहेत. आता तर येणं जाणं होतच राहील ना. चल बेटा तुझी बॅग घेऊन ये."


काही तासांचा हा प्रवास संपल्याच्या जाणीवेने दोघेही हिरमुसले.


"हां मामा आता सांगा मला असे रस्त्यात का उभे होतात आणि त्यांच्या घरी का नाही आलात?" रैनाने मनात खदखदणारा प्रश्न विचारून टाकला.


"बेटा गगनचे चुलत काका जरा जास्तच आजारी आहेत म्हणून समजलं. तू त्यांच्या घरी असताना जर दुर्दैवाने त्यांना काही झालं तर... कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडली तरी छोट्या गावात त्याचा बाऊ केला जातो. म्हणून शुभांगी आणि पद्माचे म्हणणे पडले की तुला परस्पर घेऊन यावे." दिनकररावांनी स्पष्टीकरण दिले. 


काही ठिकाणी आजही पायगुण, वाईट नजर, बाहेरचा फेरा वगैरे गोष्टींवर विश्वास ठेवला जातो. त्यामुळे त्यांची काळजी अनाठायी नव्हती.


क्रमशः 


Post a Comment (0)
Previous Post Next Post