तुम अगर साथ हो... भाग अठरा
"गगन, रैनासोबत बोललास का? काय म्हणते ती, कधी करायचा साखरपुडा?" पप्पांनी गगनला कॉल केला होता.
"हो, दोन दिवसांपूर्वीच बोलणं झालं आमचं या विषयावर. ती म्हणते तिची परीक्षा आहे आता महिन्याभरात, ती झाली की करू."
"अजून एक महिना? अरे पण खूप उशीर नाही का होणार?"
"हो पप्पा बरोबर आहे तुमचं पण कार्यक्रम म्हटलं की दहा बारा दिवस तरी जातील तयारीत. त्यामुळे अभ्यासाला वेळ पुरणार नाही म्हणते. शिवाय हे शेवटचं सेमीस्टर आहे तिचं. इतक्या वर्षाचे अकॅडमीक रेकॉर्ड चांगलं असताना फक्त काही दिवस कमी मिळाले तयारीला म्हणून खराब होऊ नये असं वाटतं तिला. मला तर पर्सनली पटतंय हे. पण तरीही तुमची इच्छा असेल तर तयार आहोत आम्ही."
"हम्म बरोबरच आहे तिचं. जाऊ दे हा महिना. तिची परीक्षा झाल्यानंतर काढू मुहूर्त. तसं कळवतो मी दिनकररावांना आणि तारीख काढून घेतो भटजीकडून, चालेल ना?"
"हो चालेल." मम्मी सोबत थोडा वेळ बोलून गगनने फोन ठेवला. दोन दिवसांपूर्वी हाच संवाद रैना आणि तिच्या आई वडिलांमध्ये ही झाला होता. तिने प्रयत्नपूर्वक त्यांना तिचे म्हणणे पटवून दिले होते. त्यामुळे ते वाटच पाहत होते गगनच्या पालकांच्या निरोपाची.
वडिलधाऱ्यांनी सल्लामसलत करून साखरपूड्यासाठी परीक्षा झाल्यानंतर दोन आठवडयानंतरचा मुहूर्त धरला. गगनने रैनाला तारीख कळवली.
"बस् अजून सहा आठवडे फक्त. मग मी राजरोसपणे तुला भेटायला येऊ शकतो. आपण डेटवर जाऊ शकतो. येशील ना?" मिश्किलपणे त्याने विचारले.
हा कार्यक्रम प्रथेनुसार रैनाच्या घरी होणार होता. दोन्ही घरी जोरात तयारी सुरू झाली. इकडे रैना अभ्यासात बुडून गेली होती. काही दिवसांत मित्रमंडळी वेगळी होणार होती. त्यांच्या विरहाच्या कल्पनेने डोळे भरून येत होते. कुणी जॉब करणार होतं तर कुणी पुढील शिक्षणासाठी इतर ठिकाणी जाणार होतं. रैनाने पुढचे एम ई चे शिक्षण घ्यायचे ठरवले होते.
"गगन लग्न झाल्यानंतरही मी माझे शिक्षण पुढे चालू ठेवू शकते ना?" व्हिडिओ कॉलवर बोलताना तिने विषय काढला.
"तुला शिकायचं आहे का अजून?"
"ऑफ कोर्स शिकायचे आहे. तुझ्या घरचे परवानगी देतील ना?"
"कुणाच्या परवानगीची आवश्यकता का आहे? तुला जर शिकावेसे वाटले तर शिक, जॉब करायचा असेल तर कर अगदी तुला गृहिणी व्हायचं असेल तरी चालेल मला. फक्त एंड ऑफ द डे तू माझ्या जवळ असली पाहिजे. रोज रात्री झोपायच्या आधी माझ्या पायाला तेल लावलं पाहिजे, डोक्याची मालिश करून दिली पाहिजे, बास्स इतकीच अपेक्षा आहे माझी."
"काय! पायाला तेल, डोक्याला मालिश... यासाठी मी जवळ पाहिजे!" रैना हतबुद्ध झाली होती.
"फक्त यासाठीच नाही, बायको म्हणून अजून ज्या गोष्टी करायच्या असतात ती तू करशीलच असं मी गृहीत धरलं आहे." गगनचा चेहरा गंभीर होता तर त्याच्या शब्दागणिक रैनाच्या चेहऱ्यावरील भाव बदलत चालले होते. ते पाहून त्याला आतून गुदगुल्या होत होत्या. शेवटी कंट्रोल करणं मुश्किल झाले आणि तो जोरजोरात हसायला लागला. आत्ता कुठे तिच्या डोक्यात प्रकाश पडला.
"तू मस्करी करतोय ना माझी?"
"हो मग... वेडाबाई तुला खरंच असं वाटलं की मी हे सगळं तुझ्याकडून करून घेईन. चेहरा बघ तुझा, किती घाबरली आहेस." तो परत हसायला लागला.
"तुझ्या तर आता... थांब भेटच तू मला एकदा. मग बघ काय करते तुझं."
"ओS होS, मग कधी भेटायचं? ए पण जे काय करशील ते प्रेमाने कर हां." डोळा मारत तो म्हणाला आणि तिने पटकन कॉल कट केला.
"चहाटळ आणि चावट कुठला." ओंजळीत चेहरा लपवत ती म्हणाली.
परीक्षेच्या आधी चार दिवस हॉल तिकीट घेण्यासाठी गेलेल्या मित्र मंडळींची शेवटची एकदा पार्कींग लॉटमध्ये बैठक जमली. पुढे कोण काय करणार याची चर्चा सुरू झाली.
"मी दुबईला जातोय. माझ्या काकांची तिकडे कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. त्यांनी जॉब ऑफर दिलीय मला." झुबेरने जाहीर केले.
"अरे वाह वाह, अभिनंदन." त्याच्या पाठीत बुक्क्या मारुन आनंद व्यक्त करण्यात आला.
"मी कॅनडा, युके आणि यूएस मधील काही युनिव्हर्सिटीमध्ये ॲप्लिकेशन केलंय. जिथे ऍडमिशन मिळेल तिकडे जाईन फरदर एज्युकेशनसाठी." श्रेयसने बातमी दिली.
"वाह ये भी सही हैं. मोठा माणूस झाल्यावर आम्हाला विसरु नकोस म्हणजे झालं. आणि मी पण जॉबसाठी दोन तीन ठिकाणी ॲप्लिकेशन टाकलेत, पाहू काय होतंय." त्याच्या पाठीवर हात ठेवून अनिकेत म्हणाला.
"माझं काही ठरत नाही आहे अजून. पप्पा म्हणतात नोकरी शोध पण मला पुढे शिकावं वाटतंय." कार्तिक बिनधास्त होता.
"मी एम इ करणार आहे, इथेच." रैनाने जाहीर केले.
"मी पण तेच करणार आहे." हर्षल उत्स्फूर्तपणे म्हणाला.
"अरे वाह मस्तच, कुणीतरी सोबत राहील माझ्या." रैनाला आनंद झाला.
"मला नाही माहीत मी काय करेन. मम्मा जॉब करू देणार नाही. पप्पा घरी बसू देणार नाही... मी सरळ नानीकडे जाईन म्हणते, यांच्यापासून दूर." हंसिका स्वतःशी पुटपुटली.
"भावा कधी? एकदा परीक्षा झाली की परत संधी मिळणार नाही." कार्तिकने पुन्हा एकदा हर्षलला डिवचले.
"मिळेल, ती याच कॉलेजमध्ये एम इ करणार आहे. आता परीक्षेच्या टेंशन मध्ये नको काही."
"तू एक नंबरचा भित्रा आहेस. तुझं काहीच होऊ शकत नाही." कार्तिक चिडून म्हणाला आणि हर्षलचा चेहरा पडला.
"ए काय झालं रे?" वैदेहीचे त्यांच्याकडे लक्ष गेले.
"काही नाही, हा मूर्ख रैनाला प्रपोज करणार आहे पण सारखा काही तरी कारण सांगून पळ काढतोय. आता एक्झाम झाल्यावर पाहू म्हणे."
"तुमच्या तिघांचं काही दुसरं ठरतंय का, कधी पासून बघतेय एकमेकांच्या कानात खूसुर फूसुर चालू आहे?" मिहिकाच्या तीक्ष्ण आवाजाने तिघे दचकले.
"काही नाही... ते आम्ही..."
"ओ गॉड मिही... तू मागच्या जन्मात पोतराज होतीस का ग, कायम फटकारे मारत असतेस." श्रेयसने छेडले.
"पोतराज? हे काय असतं?" सगळ्यांचे कुतूहल जागृत झाले.
"अरे आमच्या गावाकडे ना एक प्रथा आहे. त्यात कुटुंबातील एक मुलगा देवाला अर्पण केला जातो. तो असे रंगीबेरंगी कपड्यांचा स्कर्ट टाईप कपडे घालून वरती शर्ट न घालता डोक्यावर देवीची पाटी किंवा छोटासा देव्हारा घेऊन गावोगाव फिरतो. चौका चौकात खेळ दाखवतो. त्याच्या अंगात देवी येते मग तो स्वतःच्या उघड्या अंगावर चाबकाचे फटकारे मारून घेतो. लोक त्याला धान्य, पैसा वगैरे देतात."
"उघड्या अंगावर चाबकाचे फटके! हाऊ हॉरीबल... अमानुष आहे हे... ए मी अशी वागते का रे?" मिहीकाच्या डोळ्यात पाणी आलं.
"ए ए वेडी, रडतेस काय. हो हे अमानुष वाटतं पण तो स्वतःहून तसं करतं. कदाचित त्याला त्यातून कसलेसे सुप्त समाधान मिळत असावं जसं मला तुझा ओरडा खावून मिळतो... रडू नकोस ग, गिल्टी वाटतंय मला." तिला जवळ घेत श्रेयस म्हणाला.
"ओके, ओके. या सिच्युएशनचे मी जे इंटरप्रिटेशन केलं आहे ते तुम्हाला पण जाणवतंय का? आय थिंक श्रेयस इज इन लव्ह विथ मिहीका." अनिकेत टाळ्या वाजवत म्हणाला.
"येस येस मला ही तेच वाटतं. प्रश्न आहे या दोघांना काय वाटतं." रैना हसत म्हणाली.
प्रसंगाला अचानक असे वळण मिळालेले पाहून श्रेयस, मिहीका गोंधळले. श्रेयसने क्षणात निर्णय घेतला.
"मिहीका शहा, आय थिंक आय लव्ह यू, विल यू मॅरी मी?" तिच्यासमोर गुढघ्यावर बसत उजवा हात पुढे करून तो म्हणाला.
"भाई ये बंदा तो छुपा रुस्तम निकला, कितना फास्ट फॉरवर्ड!" झुबेर उद्गारला. सगळे श्वास रोखून मिहीकाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत होते. क्षणात तिच्या नजरेसमोर श्रेयसची अनेक रूप सरकून गेली. तिला मुद्दाम चिडवणारा, ती चिडल्यावर शांत करणारा, अप्रत्यक्षपणे तुझ्या रागाला आवर घाल सुचवणारा... तिचा चेहऱ्यावर मंद हसू पसरले आणि तिने आपला उजवा हात त्याच्या पुढे केलेल्या हातात दिला.
चला अनपेक्षितरित्या एक लव्ह स्टोरी मार्गी लागली. बाकीच्या तर अजून तळ्यात मळ्यात करत आहेत. काय होईल त्यांचे वाचू येणाऱ्या भागांत.
क्रमशः
लोभ असावा
प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत