तुम अगर साथ हो ... भाग सतरा

 तुम अगर साथ हो ... भाग सतरा 




युथ फेस्टिवल दरम्यान रैना जेव्हा तडकाफडकी गावी निघून गेली त्यावेळेस तिने कोणाशीच संपर्क ठेवला नव्हता. हंसिकाला रैनाची आई पद्माचा रैनाबद्दल विचारपूस करणारा कॉल आला होता. पण त्यानंतर काय झाले हे कुणालाच माहीत नव्हते.



"तू तिची सगळ्यात जवळची मैत्रिण आहेस आणि तुलाही तिने काही कळवले नाही? असली कसली मैत्री तुमची? तू एकटीच जीव टाकतेस तिच्यावर. मला नाही वाटत तिच्याकडून ही तसंच होतंय." वैदेहीने हंसिकाच्या मनात भरवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस हंसिकाने उडवून लावले असले तरी आज त्या आठवणीने तिच्या मनात शंका निर्माण झाली होती. 



सबमिशनच्या दिवशी रैना नको म्हणत असतानाही वैदेही तिची बॅग घेऊन गेली होती. अर्ध्या रस्त्यात तिने रैनाचे जर्नल काढून आपल्या बॅगमध्ये कोंबले. जर्नल मिळेनासे झाल्यावर  कावऱ्याबावऱ्या झालेल्या रैनाला सावरायला सगळ्यात आधी तीच पुढे झाल्याने कुणाला संशय आला नव्हता. हर्षलने सुचेता मॅमना शंका विचारण्याच्या बहाण्याने विचलीत केले तेव्हा वैदेहीला त्याचा हेतू लक्षात आला आणि तिचा जळफळाट झाला. पण उघडपणे काही बोलण्याचा मूर्खपणा तिने केला नाही. 



कोंबडं झाकून ठेवलं तरी सूर्य उगवायचा राहत नाही. सुचेता मॅमनी रागवल्यावर रडकुंडीला आलेल्या रैनाला इतरांनी आपण पुन्हा प्रयत्न करू असे म्हटले तर तिने मार्क्स गेले तर गेले सोडून दे असा सल्ला दिला होता. दुसऱ्या दिवशी मॅम निवळल्याचे ऐकून तिचा चेहरा पडला होता हे हर्षलने पाहिले होते. दोन आणि दोन चार करून त्याने जर्नल गायब होण्यामागे वैदेहीचा हात असावा असा अंदाज बांधला होता. फक्त त्याने कुणाजवळ बोलून दाखवला नव्हता. म्हणून जेव्हा जर्नल कचऱ्याच्या डब्यात मिळालं तेव्हा त्याची नजर आपसूकच तिच्याकडे वळली आणि तिच्या अस्वस्थतेने त्याच्या संशयाची पुष्टी केली. 



पण वैदेहीच्या असे करण्यामागे कारण काय असावे ते काही त्याच्या लक्षात येत नव्हते. 'रैनाला चांगले मार्क मिळू नये असे तिला वाटत असावे कदाचित.' त्याने अंदाज केला. 'काही असो तिच्यावर लक्ष ठेवले पाहिजे. आणि एकदा वैदेहीसोबत बोलून घेतले पाहिजे.' हर्षलने ठरवले. पण एक्झाम प्रीपारेशन लिव्ह सुरू झाली आणि त्याचं बोलायचं राहून गेलं. 



"हॅलो, आज संध्याकाळी भेटायचं का सगळ्यांनी, जाम कंटाळा आलाय यार." गृप चॅटवर वैदेहीचा मेसेज झळकला. 



"हो चालेल. मी तयार आहे." लगेचच श्रेयसने रिप्लाय केला.



"अरे गाढवा तू काय फोन हातातच घेऊन बसला होतास का, लगेचच हो हो करायला." तिच्या तडकफडक स्वभावानुसार मिहीकाने रागाने लाल झालेल्या ईमोजी सोबत मेसेज पाठवला.



"अगं चील, मी जस्ट मोबाइल हातात घेतला आणि मेसेज आला. बाकी कुणाचं माहीत नाही पण मी मात्र तुला खूप जास्त मिस करणार हां मिही." श्रेयस



"ते कशासाठी?" मिहीकाने उत्सुकतेने विचारले.



"सदानकदा बोंबलत असतेस. कधीही तुझा लाव्हा फुटायला तयारच असतो, कारण असो वा नसो. असला चिडका बिब्बा मी अजूनपर्यंत नाही पाहिला. तुझ्या या भुंकण्याची मला सवय झालीय ग, म्हणून." 



"तू भेट कुत्र्या संध्याकाळी मग बघते तुझ्याकडे." मिहीका



"तुमच्या भांडणातून एक गोष्ट तर क्लिअर झाली ती म्हणजे तुम्ही दोघं येणार आहात. चला, बाकीच्यांनी रिप्लाय कळवा." वैदेहीने टाईप केलं.



हो, नाही, फक्त अर्धा तास भेटू म्हणता म्हणता सगळे भेटायला तयार झाले. ठिकाण कॉलेज जवळचा कॅफे ठरले.  एकेक करत सगळे आले. शेवटचं भेटून एखादा आठवडाच झाला असेल पण कित्येक वर्षे लोटल्यासारखं वाटत होतं सगळ्यांना! त्यामुळे गळामिठी वगैरे मारून झालं. सगळे मस्ती करत सँडविच, कॉल्ड कॉफीचा आस्वाद घेत होते. तेवढ्यात अनिकेतचा धक्का लागून रैनाची कॉफी तिच्या मांडीवर ड्रेसवर सांडली.



"ओह शीट, आय एम सो सॉरी रैना. मी हे मुद्दाम नाही केलं." घाबरून तो माफी मागायला लागला.



"अरे इट्स ओके. काही नाही झालं, कॉल्ड कॉफी तर होती ती. मी पटकन साफ करून येते." म्हणत ती उठून वॉशरुमकडे गेली. 



"वेट मी पण येते," म्हणत वैदेही आणि हंसिकाही तिच्या मागोमाग गेल्या. 



आपला स्कार्फ आणि मोबाइल बेसिनजवळील कट्ट्यावर ठेवून रैनाने थोडासा हॅण्ड वॉश कॉफीचा डागावर चोळला आणि पाण्याने तो साफ करू लागली. हंसिका आणि वैदेही तिला मदत करू लागल्या. काही क्षणात डाग फिकट झाला.


"तुम्ही अजुन थोडा हॅण्ड वॉश लिक्वीड चोळा याच्यावर, मी आलेच," म्हणत वैदेही वॉशरुममध्ये गेली. 


"हम्म, डाग तर अल्मोस्ट गेलाय. पण हा एवढा भाग ओला, विचित्र दिसतोय." आरशात पाहत रैना म्हणाली.


"थांब आपण एक आयडिया करू." परत आलेली वैदेही म्हणाली आणि रैनाला घेऊन ती हॅण्ड ड्रायरजवळ गेली. ड्रायर खाली हात धरताच ऑटोमॅटिकली त्यातून गरम हवेचे झोत येऊ लागले. आपल्या हाताखाली तिने रैनाच्या ओल्या कुर्त्याचा भाग धरला. काही क्षणात कुर्ता वाळला सुध्दा. 



"वाह वैदेही, तू तर जेनियस आहेस. आम्हाला हे कधीच सुचलं नसतं. चल रैना झालं आपलं काम. माझं सँडविच माझी वाट बघत असेल." दार उघडून हंसिका बाहेर पडली सुद्धा. एकमेकींकडे पाहून खांदे उडवत उरलेल्या दोघीही तिच्या मागोमाग गेल्या.



थोड्या वेळाने कलकलाट करून झाल्यावर नवी एनर्जी भरून घेऊन सगळे जायला निघाले. परत जाऊन अभ्यासाला लागायचे होते!



 बसमधून उतरून वैदेही घरच्या दिशेने चालू लागली. मोबाइलमध्ये काही तरी पाहत स्वतःशी हसत जात असताना कुणीतरी झपकन समोर आलं. दचकून तिने वर पाहिले तर तो पवन होता. 



"काय रे दादा?" 



"वैदू मी जे विचारतो त्याचं खरं उत्तर द्यायचं. त्या रैनाचे जर्नल तू चोरले होते ना?" 



वैदेहीची बोबडी वळली. 

"दादा, मी... ते... नाही."



"खोटं बोलू नकोस. कुणी एकाने तुला तसं करताना पाहिलंय. तो आकाश शोधतोय चोराला. मला सुध्दा विचारलं त्याने पण तू माझी बहीण आहेस म्हणून मी माहीत नाही म्हणालो. सांग तू केलंस ना ते?" 



आता त्याला समजलंच आहे तर कशाला लपवायचे या विचाराने तिने निर्भिडपणे उत्तर दिले, "हो कारण मला तिला इंटर्नल मार्क्स मिळू द्यायचे नव्हते."



"आता झालं ते झालं परत त्या पोरीच्या नादाला लागू नकोस. तुझं तू अभ्यास कर असले नसते उद्योग करण्यापेक्षा. नाहीतर आकाश तुला सोडणार नाही. त्याचे प्रेम आहे तिच्यावर."  तिला सावध करून पवन निघून गेला.



"दादा उद्योग नाही आता तर मी कांड करणार. असला मसाला माझ्या हाती लागला आहे की तू विचार ही करू शकत नाहीस.


आकाश तू प्रेम करतो ना तिच्यावर मग तूच घेऊन जा तिला. हर्षल तिच्या तावडीतून नुसता सुटणारच नाही तर तो तिचा द्वेष करायला लागेल. नाही नाही फक्त हर्षल नाही तर सगळेच."


चुलत भावाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत वैदेही खुनशी हसली.


क्रमशः


Post a Comment (0)
Previous Post Next Post