तुम अगर साथ हो ... भाग सोळा

 तुम अगर साथ हो ... भाग सोळा


"अन्या मी हर्षलला तिला प्रपोज करायचा सल्ला दिला. काय डोळे फाडून बघत होता तिच्याकडे म्हणतोस... आयला ही सगळे स्कॉलर लोक एकजात फट्टू नाहीतर बावळट का असतात रे. यांच्यापेक्षा आपली नाक्यावरची पोरं बरी. आवडलेल्या पोरीला सरळ विचारून मोकळे होतात, ती नाही म्हणाली तर दुसऱ्या पोरीवर लाईन मारायला." अनिकेतच्या हातावर टाळी देत कार्तिक हसायला लागला. 



"काय रे, कोण कुणावर लाईन मारतय?" वैदेही, झुबेर सोबत हंसिकाने त्यांच्या बाजूला फतकल मारत विचारले.



"हे हे आला आपला हनी बनी. अगं आम्ही हर्षलबद्दल बोलत होतो. येडं पहिल्या सेमिस्टरपासून रैनाला लाईक करतं आणि अजून सांगायची हिंमत नाही. आज मी चांगलीच हवा भरली त्याच्यात. लवकरच आपल्याला क्यूट कपल दिसेल बघ." 



"हां भाई दोनो साथ में कितने अच्छे लगते हैं ना, बस एक बार ऑफिशियल हो जाए|"



"अगं पण रैना आहे कुठे हंसिका, तुम्ही नेहमी सोबत येता ना दोघी?" वैदेहीने प्रश्न केला.



"हो यार, नेहमी सोबत येतो पण आजकाल ती थोडं वेगळं वागायला लागली आहे. थोडा फ्री टाईम मिळाला की लगेच तिची गावाकडची मैत्रीण आहे भूमी म्हणून तिच्याशी कॉल वर बोलत बसते." 



"अँड यू आर जेलस, हो ना." कार्तिकने मुद्दाम हंसिकाला खिजवले.



"मी कशाला जेलस होऊ.... हो ना यार, वाटतं थोडं वाईट... ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. वुई शेअर लिटरली एवरीथिंग... वुई आर नॉट जस्ट फ्रेंड्स, फ्रेंडशिपपेक्षाही वेगळं, डिप असं आहे आमचं रिलेशन... तिच्या अशा वागण्याने मला खरंच थोडंसं इग्नोरड फील होतंय." हंसिका भावूक झाली होती. 



"नको असा विचार करू, आम्ही ही आहोत ना तुझे फ्रेंड्स. तसं ही अजून काही दिवस, नंतर एकदा परीक्षा झाल्या की प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या होणारच आहेत. परत कधी भेटू किंवा भेटू की नाही हे सुध्दा माहीत नाही." तिच्या गालावर हलकेसे थोपटत वैदेही म्हणाली. 



पाहता पाहता ती भूतकाळात गेली. कॉलेजचा पहिला दिवस होता. नव्या कॉलेजमध्ये कुणी ओळखीचं भेटेल की नाही या विचाराने बावरलेली ती. त्यातून सीनिअर लोकांच्या रॅगिंगचे किस्से कानावर आले होते. 



सावळा पण लोभस चेहरा, नाक डोळे प्रमाणात, छान शरीरयष्टीची ती देखणी मुलगी कुणाचे ही सहज लक्ष वेधून घ्यायची. इथे प्रवेश मिळाला म्हणजे बुद्धिमान असणारच होती. काळी जीन्स त्यावर पिवळसर रंगाचा कुर्ता घालून तिने कॉलेजच्या आवारात प्रवेश केला. कोपऱ्यावर बावळट बनायला गिऱ्हाईक शोधणारे सीनिअर्सचे टोळके सावध झाले. ती एक परफेक्ट सावज होती. तिच्या बावरलेल्या हालचालीतून ते स्पष्ट दिसत होते. त्यांनी आपसात नेत्रपल्लवी केली. त्यांच्यातील एक तिची वाट अडवायला पुढे सरसावला तेवढ्यात थोड्या दुरून त्यांच्यावर नजर ठेवून असलेला हर्षल पुढे झाला.



"अगं किती वेळ हा. मी कधीपासून तुझी वाट बघतोय. चल लवकर टाइमटेबल बघायचं आहे ना तुला?" तिचा दंड धरून जवळपास खेचतच तो तिला घेऊन गेला. त्याची पर्सनालिटी आणि मजबूत बांधा पाहून कुणी त्याच्या वाटेला जायची हिंमत केली नाही. 



"सॉरी, तुला असं जबरदस्तीने इथे आणण्यासाठी. ती सीनिअर मुलं... आय डोन्ट नो त्यांच्या मनात काय होतं. पण कधीपासून ते कुणाची तरी वाट पाहत होते. तुला बघून ते पुढे झाले म्हणून मला हे नाटक करावं लागलं." थोडं पुढे आल्यावर तिचा दंड सोडत तो म्हणाला.



"थँक्यू वेरी मच. तुम्ही मला वाचवलं. मला खरंच खूप भीती वाटत होती सेनियर्स लोकांची. इतकं काही ऐकलं होतं त्यांच्या रॅगिंगबद्दल. बाय द वे मी वैदेही पित्रे, फर्स्ट इयर..." हात पुढे करत तिने स्वतःची ओळख करून दिली.



"हॅलो मी हर्षल वर्मा, मी ही फर्स्ट इयर." हसून तिचा हात हातात घेवून तो म्हणाला.



"वर्मा? आणि इतकं छान मराठी?"



"हो कारण मी गेले तीन वर्ष महाराष्ट्रात राहतो आहे. मराठी शिकण्यासाठी क्लासेस लावले, मराठी मूव्हीज, नाटकं पाहतो. मराठी पुस्तकं, न्यूजपेपर वाचतो त्यामुळे बऱ्यापैकी चांगलं बोलता येतं." 



"वाह मस्तच." तोपर्यंत दोघं वर्गाजवळ पोहोचले. तिथे मुलं मुलींच्या घोळक्यात मिसळून गेले. दिवसाच्या शेवटी वैदेहीला परत हर्षल दिसला. आश्चर्य म्हणजे तो तिचे जुने वर्गमित्र अनिकेत, कार्तिक सोबत होता. तिला पाहून तिघे तिच्याकडे आले आणि अशा प्रकारे कॉलेजच्या पहिल्याच दिवशी हर्षल, वैदेही, कार्तिक आणि अनिकेतचा गृप बनला. काही दिवसांनी मिहिका आणि झुबेर त्यांना जॉईन झाले. रैना आणि हंसिका मात्र अजूनही त्यांच्यात नव्हत्या. 



एक महिन्याने कुणास ठाऊक का पण विद्यार्थ्यांना वेगवेगळया वर्गात अदलाबदली करण्यात आले. त्यादिवशी अगदी लेक्चर सुरू व्हायच्या आधी जीन्स आणि टी शर्ट घातलेली गोरी, थोडीशी गुबगुबीत पण गोड मुलगी आणि अबोली रंगाचा कुर्ता आणि पांढरी लेग्गिंग मधील सुबक, देखणी मुलगी वर्गात प्रवेश करत्या झाल्या. मागचे सगळे बेंच भरल्याने नाईलाजाने पुढून दुसऱ्या बेंचवर जाऊन बसल्या. नेमकं त्या दिवशी उशीरा आल्याने मिहिकाही तिथेच बसली होती. लेक्चर संपता संपता गोडुल्या हंसिकाची मिहिका बरोबर मैत्री झाली. आणि अशा पद्धतीने रैना आणि हंसिकाचा गृपमध्ये प्रवेश झाला. हळूहळू दोघी गृपचा अविभाज्य घटक बनल्या. 



पहिल्या भेटीतच वैदेही हर्षलवर मोहित झाली होती. फक्त त्याचे व्यक्तिमत्त्व आकर्षक होते म्हणून नाही तर ज्या पद्धतीची वागणूक त्याने तिला दिली होती त्यामुळे तिला आपण स्पेशल असल्याचे वाटले होते. जसजशी मैत्री वाढत गेली तसतशी ही प्रेमाची भावना खोलवर रुजत गेली. सगळ्यांची काळजी घेणे हे हर्षलच्या स्वभावातच होते पण वैदेही त्याचा सोयीस्कर अर्थ लावत होती. त्याला आपण आवडतो असे तिच्या मनाने घेतले होते. 



इकडे हर्षल मात्र रैनाने वर्गात प्रवेश करताक्षणी तिच्यावर मन जडवून बसला होता. त्याने कधीच बोलून दाखवले नसेल तरी ते एक ओपन सिक्रेट होते. कुठल्याशा गावातून आलेल्या या मुलीने हर्षलला आपल्यापासून हिरावून घेतले असे वाटून वैदेही मनातून रैनाचा दुस्वास करू लागली. पण आपल्या गोड स्वभावामुळे रैनाने सगळ्यांचे मन जिंकून घेतल्याने वैदेहीला उघडपणे काही बोलता येत नव्हते. 



"कानामागून आली आणि तिखट झाली. पण तू इतक्या सहजासहजी त्याला माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीस." ती नेहमीच रैनाच्या पाठीमागे दात ओठ खात पुटपुटायची. दुसरीकडे रैनाला याची काही खबरबात नव्हती. तीन वर्ष अशी जळफळण्यात घालवल्यावर आता काहीतरी केलेच पाहिजे असे वैदेहीच्या मनाने घेतले. आपली रेघ मोठी करण्यापेक्षा ती रैनाची रेघ लहान करण्याच्या मागे लागली. 



आणि एक दिवस तिला योग्य संधी मिळाली.



क्रमशः

Post a Comment (0)
Previous Post Next Post