तुम अगर साथ हो ... भाग पंधरा

 तुम अगर साथ हो ... भाग पंधरा 




"भावा, एक गुड न्यूज आहे. त्या सुचेता मॅडमने वैनीचे जर्नल ठेवून घेतले. काल वर्गात लई उडत होती. पण रात्री नंतर एकदम सुतासारखी सरळ झाली. आज वैनीचा चेहरा तू बघायला पाहिजे होता. आनंदाने नुसती नाचत होती."

आकाशला त्याचे मित्र उर्फ पंटर पवन आणि राघव माहिती पुरवत होते. 



"हम्म, बरं झालं. त्या बाकीच्या कुत्र्यांना तोंड बंद ठेवायला सांगा. कुठं तरी आपलं नाव भुंकतील आणि रेस्टिकेट व्हायची वेळ येईल आपल्यावर. ती सुचेता पुजारी प्रिन्सिपॉलच्या मर्जीतील आहे ऐकलंय. काल गाडीचे आरसे फोडून दहशत घातली म्हणून.. नाहीतर तिने आपल्याला भीक नसती घातली." सिगारेटचा धूर सोडत आकाश म्हणाला. 



"पव्या असंच नजर ठेवून रहा. तू कुठून माहिती काढतो विचारणार नाही पण पक्की खबर द्यायची. आता ते जर्नल कुठं गेलं ते समजायला हवं मला." पायाखाली थोटुक चिरडत आकाश म्हणाला आणि पवनला घाम फुटला. कारण त्याला माहीत होतं कुणी चोरले आणि कुठे टाकलं.



"काय ग रैना, हल्ली तुला नेहमीच कॉल्स येत असतात. अभ्यास करताना, जेवताना आणि अगदी लायब्ररीमध्ये अभ्यास करताना ही तू बोलत असतेस. काय प्रकार आहे, समवन स्पेशल इन लाईफ?" हंसिकाने विचारले आणि रैना चपापली. 



"अगं कुणी स्पेशल नाही. माझी एक मैत्रीण आहे तिच्यासोबत बोलत असते."



"अच्छा? आणि इतके दिवस होती कुठे ही मैत्रीण? आणि तिच्याशी बोलल्यावर इतकी का लाली येते तुझ्या गालावर?"



"लाली... काहीही काय हंसिका. माझ्यासारखी ती ही पुढे शिकायला दुसरीकडे गेली म्हणून मध्यंतरी कॉन्टॅक्ट नव्हता आमचा."



"हो का, बघू तरी काय नाव आहे तुझ्या मैत्रिणीचे? अच्छा भूमी का?" तिच्या हातातील मोबाइल खेचत त्यावरील नाव पाहून हंसिका म्हणाली.   


'बरं झालं मी नाव बदललं.' रैनाने सुटकेचा निःश्वास टाकला.



रात्री रोजच्याप्रमाणे रैनाने गगनला कॉल केला.

"मी काय म्हणत होते, माझं शिक्षण पुर्ण होईपर्यंत लग्न थांबले तर चालेल ना, जर मध्येच लग्न झालं तर अर्धवट राहील ते. कितीही म्हटलं तरी लग्नानंतर आतासारखं अभ्यासाला वेळ देता येणार नाही. म्हणून म्हणते."



तिने आपला पुढे शिकण्याचा इरादा अजून त्याला सांगितला नव्हता. आता त्याची काय प्रतिक्रिया असेल या विचाराने तिची धाकधूक होऊ लागली.



"हं, ठीक आहे. मी बोलतो मम्मी पप्पांसोबत. पण तू नको हा विषय काढू त्यांच्यासमोर."


गगनने आश्वासन दिले. तेवढ्यानेही रैनाला बरे वाटले.



चार दिवसांनी गगनने त्याच्या पालकांचा निदान साखरपुडा तरी करून घेण्याचा प्रस्ताव रैनाला सांगितला.



“रैना मला त्यांचे म्हणणे पटते. लेट अस मेक इट ऑफिशियल. करूया ना एंगेजमेंट. हवं तर लग्न तू म्हणशील तेव्हा करु.”


त्याच्या आवाजातील आतुरता तिच्या मनाची तार छेडून गेली. तीही गगनची भावी पत्नी म्हणवून घेण्यास आतुरली होती. 



“हो चालेल. पण तेही माझी फायनल एक्झाम झाल्यावर. आता फक्त दीड महिना राहिला आहे परीक्षेला.” रैनाने हिरवा कंदील दाखवला पण तिच्या अटी आणि शर्ती सह."



"ओ काय यार हे. तुला काही मन, प्रेम, भावना वगैरे नाहीत का ग? काय आनंद मिळतो तुला माझी अशी परीक्षा घेऊन?" 



"तसं नाही, जरा समजून घे ना. शक्य झालं तर मी आता लगेच लग्न करायला तयार आहे. पण सध्या परीक्षा ही माझी प्रायोरिटी असली पाहिजे ना. माझं, माझ्या आई वडिलांचं स्वप्न आहे ते. डॉक्टर होण्यासाठी तू ही वारेमाप मेहनत केली असेल. असं शेवटच्या क्षणी डिस्ट्रॅक्शन आलं असतं तर कसं वाटलं असतं तुला?" 



"ओ मॅडम, मी म्हणजे डिस्ट्रॅक्शन आहे का?"



"हो ना, अभ्यास करताना पुस्तकात सुध्दा तुझाच चेहरा दिसतो. मी कशी हॅण्डल करतेय माझं मला माहीत." बोलण्याच्या ओघात ती म्हणाली आणि भानावर येऊन स्वतःलाच एक टपली मारून घेतली.



"हाय, इधर भी आग लगी हैं उधर भी आग लगी हैं, करेगा चर्चा अब ये जमाना... धिन तिनक धीन..."



मिश्किल आवाजात तो गाऊ लागला आणि रैनाने लाजून फोन बंद केला.

**************************


"कधी सांगणार आहेस तिला?" कार्तिक हर्षलच्या कानात कुजबुजला. 



"अं... काय म्हणालास?" बाजूच्या रोमध्ये बसलेल्या रैनाकडे पाहताना त्याची तंद्री लागली होती. 



"मी म्हटलं रैनाला कधी प्रपोज करणार आहेस?" 



"प्रपोज! छे ,छे, काही तरी काय बोलतोय? असं काही नाही आमच्यात." हर्षलने गडबडीने स्पष्टीकरण दिले.



"कसं असतं ना ब्रो, मांजराला वाटतं आपण डोळे मिटून दूध पितोय, कुणाला काही कळणार नाही. पण जगाचे डोळे तर उघडे असतात ना. आम्हाला सगळ्यांना माहीत आहे, ती तुला आवडते. म्हणून नाकारण्यात अर्थ नाही. खूप कमी दिवस उरलेत. तुझ्या मनातील भावना बोलून टाक."



"सगळ्यांना माहीत आहे? तिलाही माहीत आहे का?"



"तोच तर वांधा आहे ना. त्या बावळट मुलीला मोठी मोठी इक्वेशन्स पटकन कळतात पण ही साधी गोष्ट अजूनही कळली नाही वाटतं. तू सांगून टाक."



"आणि ती नाही म्हणाली तर... आता निदान मैत्री तरी आहे. ती ही तुटेल."



"मला नाही वाटत मैत्री तुटेल म्हणून. तेवढी समजूतदार आहे ती. पण तू म्हणतो तसं नकार आला तर तू तो पचवू शकशील? पण एक गोष्ट सांगू, मला वाटतं असं उगीच झुरत बसण्यापेक्षा एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाकलेला बरा." 



हर्षलला कार्तिकचे बोलणे पटले. त्याने जास्त वेळ न दवडता तिच्याशी या विषयावर बोलायचे ठरवले. 

"फार फार तर काय होईल नाही म्हणेल. असं अधांतरी राहण्यापेक्षा निदान नात्याला एक दिशा तर मिळेल." त्याचे मन त्याच्याशी संवाद साधत होते. 



वेफर्स खाऊन झाल्यावर रिकामे पाकीट डस्टबिनमध्ये टाकायला गेलेल्या एका मुलीला डस्टबिन मध्ये कसलेसे पुस्तक असल्यासारखे वाटले. तिने ते बाहेर काढले आणि तिचे डोळे विस्फारले.



"रैना देशमुख... ये देखो तुम्हारा जर्नल. इधर डस्टबिन में पडा मिला!" ती जोरजोरात ओरडू लागली.



चार दिवसांपूर्वीच तो किस्सा घडल्याने सगळ्यांच्या अजून लक्षात होता. लगेच वर्गात हलकल्लोळ माजला. कुणी केले, तिकडे कसे आले जर्नल याविषयी जो तो आपला अंदाज, संशय मोठमोठ्याने मांडू लागला. काही जण जर्नल रैनाचेच आहे का कन्फर्म करायला धावले. पण हर्षलची नजर मात्र 'तिची' प्रतिक्रिया पाहण्यात गुंतली होती. त्याच्या अपेक्षेनुसार 'ती' अस्वस्थ झाली होती. ती कोण  ते आपल्याला माहीत आहे पण रैना आणि तिच्या गृपला कुठे माहीत आहे?

....................................................





क्रमशः




©️Savita Kirnale

Post a Comment (0)
Previous Post Next Post