तुम अगर साथ हो ... भाग चौदा

 तुम अगर साथ हो ... भाग चौदा 




रात्री जेवण झाल्यावर सुचेता मॅम फेरी मारायला घराबाहेर पडल्या. एका अंधाऱ्या कोपऱ्यावर तीन बाईक्सवर सहा लोक तोंडाला रुमाल बांधून आले. त्यांनी मॅडमना घेरले.


"आज तुम्ही कॉलेजमध्ये जे केलं ते एकदम चुकीचं होतं. भर वर्गात रैनाचा अपमान करून तुम्ही चांगलं नाही केलं. ती आपली जान आहे. याचा परिणाम तुम्हाला भोगावाच लागेल." म्होरक्या रागाने ओरडला. मॅडमच्या घराजवळ जाऊन त्यांनी मॅडमच्या ॲक्टिवाचे आरसे फोडून टाकले. मॅडम घाबरून थरथरत होत्या. कशाबशा त्या घरी आल्या. हा अनुभव त्यांच्यासाठी नवा होता. 


दुसऱ्या दिवशी


रैना, हर्षल आणि हंसिका जर्नल सबमिट करायला सुचेता मॅमकडे गेले. त्यांना पाहून मॅडमच्या चेहऱ्यावरील रंग उडाला.


"मिस रैना, मी तुम्हाला फुल्ल मार्क्स दिले आहेत इंटर्नलला. प्लिज तुम्ही इथून जा. आणि प्लिज तुमच्या बॉयफ्रेंडला सांगा की मी वचन देते की यापुढे पुन्हा तुम्हाला काही बोलणार नाही."


"कोण बॉयफ्रेंड, कुणाचा? आणि मॅम विना सबमिशनचे मार्क्स कसे दिले तुम्ही?" रैना गोंधळली.



"हा भोळेपणाचा आव आणण्यात काही अर्थ नाही. शिक्षक आहोत आम्ही, कधी रागावलो, काही बोललो तर  तुमच्या भल्यासाठीच असतं ते. विद्यार्थ्यांशी काही वैयक्तिक दुष्मनी नसते आमची. विद्यार्थी मात्र ते समजून न घेता आमच्याबद्दल मनात राग ठेवतात, दुस्वास करतात कधी कधी तर आमच्या जीवावर ही उठतात. असू दे, जा तुम्ही आता. आणि हो त्याला माझा निरोप द्यायला विसरू नका." कडवट स्वरात त्या म्हणाल्या.



"मॅम, मला वाटतं काही तरी गैरसमज झालाय." हंसिका पुढे सरसावली.



"गैरसमज आणि माझा? मिस हंसिका काल रात्री त्या गुंडाने माझ्या गाडीचे नुकसान करून धमकी देण्याआधी स्पष्ट शब्दात सांगितले की या त्याची गर्लफ्रेंड आहेत. यांनीच सांगितलं असेल ना त्याला वर्गातील घटना." रैनाकडे बोट दाखवत मॅडम म्हणाल्या.



"अहो मॅम, मी तसं का करेन. मी कुणालाही काही सांगितलं नाही. माझा कुणी बॉयफ्रेंडही नाही. तुम्ही कॉलेजमध्ये, हॉस्टेलवर कुणालाही विचारा. आमचा गृप सोडला तर बाकी कुणाशी मी फारसं बोलत सुध्दा नाही. मी का तुम्हाला धमकी देईन. देवा हे काय चालू आहे... आधी माझं जर्नल चोरीला गेलं. आता हा आरोप केला जातोय... मी काय कुणाचं वाईट केलंय." रैनाचा बांध फुटला. तिला रडताना पाहून मॅडम विरघळल्या.



"श्श... शांत हो, इथे नको रडू. विद्यार्थ्यांचा गैरसमज व्हायचा आणि परत... काल रात्री मी जेवल्यानंतर फिरायला बाहेर पडले. काही मुलं चेहऱ्यावर रुमाल बांधून सामोरी आली आणि तुझा अपमान केला, त्याची शिक्षा मिळेल वगैरे धमकवू लागली. जाताना त्यांनी माझ्या ॲक्टीवाचे आरसे फोडले. बोलणारा म्हणत होता की तो तुझा बॉयफ्रेंड आहे आणि तुला त्रास झालेला त्याला आवडणार नाही." 



"मॅम ते कोण होते याची आम्हाला कल्पना नाही. पण रैना खरं बोलतेय, तिचा कुणी बॉयफ्रेंड नाही. ती स्कॉलर, सर्वांची लाडकी आणि डिसेंट आहे हे तर अख्ख्या जगाला माहीत आहे. तिचा दुस्वास करणाऱ्या कुणी हे केलं असेल. आधी तिचं जर्नल चोरले आणि मुद्दाम तिच्या नावाने तुम्हाला त्रास दिला." विचार करत हर्षल म्हणाला.



"पण कुणी असं का करेल?" हंसिकाचे डोकं चालत नव्हते.



"रैनाला मेंटली डिस्टर्ब करायला. जेणेकरून तिचं अभ्यासातील लक्ष उडेल आणि ती शिक्षकांच्या नजरेतून उतरेल."



"हो असू शकतं. रैना ठेव ते जर्नल इथे. आणि काळजी घे. सुंदर मुलींवर एकतर्फी प्रेम करणारे भुंगे ही बरेच असतात." मॅडमने समारोप केला.



"काय झालं रैना, तुझा चेहरा असा का दिसतोय? मॅमनी ऐकलंच नाही का? अरेरे.. जाऊ दे तू नीट अभ्यास कर. नाही मिळाले इंटर्नल मार्क्स तर नाही मिळाले. होतं असं कधी कधी." वैदेही चुकचुकत होती.



"जाऊ दे म्हणजे, अगं तू डोक्यावर पडलीस का? उसने कितनी मेहनत की थी उस प्रोजेक्ट के लिए. सब बेकार हो गई ना? ते काही नाही रैना, आपण हवं तर प्रिन्सिपॉलकडे जाऊ पण तुला न्याय मिळालाच पाहिजे." झुबेर भडकला होता. 



"गाईज, गाईज  शांत व्हा. मॅमने आमची बाजू समजून घेतली आहे. त्यांनी जर्नल ठेवून घेतलं." रैना दोघांना शांत करत म्हणाली.



"येsssय." सगळे एकाच वेळेस चित्कारले पण 'तिच्या' चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. हर्षल रोखून तिच्याकडे पाहत होता. कारण कळलं नसलं तरी हे नक्की तिनेच केलंय याची खात्री होती त्याला.



"रैना, ऐक ना मम्मी पप्पा म्हणतात लवकरच लग्न करून घेवू." एक दिवस गगन म्हणाला. मात्र ते ऐकून रैना बेचैन झाली. जी गोष्ट ती पहिल्या दिवसापासून सांगायचा प्रयत्न करत होती ती आता सांगायलाच हवी होती. 



‘आता बोलायलाच हवे.’ तिने ठरवले.


"ऐक ना, मला तुला काही सांगायचे आहे."


"हां बोल. तुम्ही फक्त हुकूम करा राणी सरकार."


"चेष्टा नको रे. सिरीयस गोष्ट आहे." 


"सिरीयस, ओ माय गॉड, प्लीज डोन्ट टेल मी की तुला लग्न करायचं नाही. किंवा तुझं दुसऱ्या कुणावर प्रेम आहे." तो अजूनही तिची फिरकी घेत होता.


"गगन..." दुखावल्या स्वरात तिने त्याला थांबवले. तिच्या मनात काहीतरी डाचतयं हे त्याच्या लक्षात आले. 


"ओके ओके, आय एम सॉरी. बोल काय म्हणतेस?" 


"इतक्यात लग्न करणे गरजेचे आहे का?" 


"म्हणजे?"


रैना पुढे काही बोलणार तेवढ्यात तिची रूम पार्टनर खोलीत आली. तिला पाहून नंतर बोलते म्हणत रैनाने कॉल कट केला.


"काय ग, कुणाशी बोलत होती एवढ्या रात्रीची. काय चक्कर चालू आहे?"


"मैत्रिणीसोबत बोलत होते." रैनाला रचना फारशी आवडत नव्हती. अतिशय उथळ आणि वाया गेलेली मुलगी होती ती. तिला जर गगनबद्दल कळले असते तर अख्ख्या हॉस्टेलमध्ये तिखट मीठ लावून ही गोष्ट पसरवली असती म्हणून रैना तिच्यासमोर कधीच काही बोलत नसे.



"सुरुवातीला सगळे असंच म्हणतात. मग मैत्रिणीचा होतो मानलेला, दूरचा भाऊ आणि मग मित्र. त्यानंतर काही न सांगताच जगजाहीर होतं." घाणेरडे हावभाव करत रचनाने तिला काय म्हणायचं ते सुचवले आणि इअरफोन लावून मोबाइल पाहू लागली. 



काही क्षण विचार करून रैनाने कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये गगनचे नाव बदलून भूमी केले. आता कुणालाही संशय येणार नाही असे तिच्या भोळ्या मनाला वाटले. पण चांगल्या लोकांपेक्षा वाईट लोक जास्त हुशार असतात याची तिला कल्पना नव्हती. 



क्रमशः 

Post a Comment (0)
Previous Post Next Post