तुम अगर साथ हो तो ... भाग एक

 तुम अगर साथ हो तो ... भाग एक 




 ‘छे बाई, या आईला तर काही कळतंच नाही मुळी. लगेच निघ, अर्जंट आहे म्हणे. आणि तिचं हे अर्जंट काम म्हणजे परत एखादा दाखवून घ्यायचा कार्यक्रम असला ना तर... तर अशी रूसणार आहे ना मी.... बोलणारच नाही तिच्याशी.’


स्वतःशी बोलत एका हाताने छोटी बॅग तर दुसऱ्या हातात छत्री सावरत रैना हायवे वर उभी होती.



रैना... किती छान नाव, हो ना ? आणि नावाप्रमाणे मुलगीही. बी.ई.करायला गावापासून दूर, जिल्ह्याच्या ठिकाणी राहणारी.

दहावीला केंद्रात प्रथम आली तर डायरेक्ट बारावीला जिल्ह्यात प्रथम. आई बाबासोबत झगडून बीईसाठी परमिशन मिळवलेली. आणि त्याची जाणीव असल्यानेच झटून अभ्यास करणारी.


“अहो पोरीच्या जातीला काय करायचे आहे डॉक्टर, इंजीनीयर होवून. मी तर म्हणते ग्रैजूएशन करू द्या तिला आणि करू मग हात पिवळे तिचे. कशाला ते सात आठ लाख घालवायचे बीईमध्ये? शिवाय लग्नासाठी सात आठ लाख लागणारच. आणि इतकं करूनही नोकरी लागेल न लागेल. लग्नानंतर सासरच्या लोकांनी नोकरी करू नाही दिली तर सगळं वायाच ना. तेच पैसे तिच्या नावे एफडी करू म्हणते मी."


आईने बाबांना तिच्या मते योग्य सल्ला दिला.


“अगं शिकायचं म्हणते ती. तर शिकू दे. आज न उद्या या उडणाऱ्या पाखराच्या पायात बेड्या पडणारच आहेत. मग निदान बापाघरी तरी मनाचे करू दे. आहेच मग नंतर संसार, मूलंबाळं. शिवाय आई बापाचं कर्तव्य असतं ना ग आपल्या पाखरांच्या पंखात बळ भरण्याचं. बाकी ज्याचं त्याचं नशीब." बाबा भावनिक होवून म्हणाले.


“बरोबर आहे तुमचं. आपलं तर जीवन असंच गेलं, ताटातलं वाटीत अन् वाटीतलं ताटात करत. नुसतं नावच देशमुख, देशमुखी काय राहिली नाही. पोरीचं मात्र भलं व्हावं इतकी एकच इच्छा त्या परमेश्वराला.” त्या न दिसणाऱ्या अगाध शक्तीला हात जोडत त्या म्हणाल्या.


पण कितीही काहीही म्हटले तरी मातृहृदय ते. कधी लोकांच्या बोलण्याने तर कधी नातेवाईकांच्या टोचण्याने पोरीच्या लग्नाचा विषय उसळी मारून वर यायचाच. मग काही स्थळं बघायला यायची, रैनाला अर्जंट घरी यायचे फर्मान सुटायचे.


कॉलेजमध्ये यूथ फेस्टिवल चालू होते. अनेक इवेंट्स ऑर्गनाईज केले गेले होते.


रोज एक डे सेलेब्रेट व्हायचा.


एकदम धमाल चालू होती. रैना प्रत्येक इव्हेंट मध्ये भाग घेत होती. चॉकलेट डेसाठी अफलातून चॉकलेट्स बनवली. फ्लॉवर डेकोरेशनमध्ये, रांगोळीमध्ये, डान्स यात कोणत्या न कोणत्या क्रमांकाचे पारितोषिक तिने पटकावले होते. इतकंच काय फॅन्सी ड्रेस मध्ये प्रिन्सेस डायना बनून तिने सगळ्या पोरांना जणू हार्ट अटॅक दिला होता. टेक फेस्टमध्ये सुध्दा उत्तम कामगिरी केली होती तिने. तिचे मॉडेल बघायला दुसऱ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचीही गर्दी लोटली होती. 


आज तर ट्रॅडिशनल डे होता. सगळा कॅम्पस साडी, कुर्ते, शेरवानी अशा पारंपरिक कपड्यांनी बहरून गेला होता. मुली नऊवारी साडी, नथ, अंबाडा, गजरे नेसून मिरवत होत्या. इकडे तिकडे नुसतं सेल्फीचा कलकलाट सुरू होता. 


रैना वावरायला सोपी, वजनाने हलकी अशी जाॅर्जेटची गुलाबी रंगाची साडी नेसून गेली होती. गुलाबी साडी तिला पिवळा नाजूक काठ आणि तसाच पदर. साडीवर चोचीत चोच खुपसलेल्या शुभ्र हंस जोड्या. इतरांच्या भरजरी झगमगाटामध्ये ही नाजूक नारी लक्ष वेधून घेत होती. 


गोरीपान रैना, गोबरे गुलाबी गाल, निळसर घारे डोळे, त्यात रेखलेली जाडशी काजळ रेघ, मूळचे टपोरी नेत्र अजून रेखीव बनवणारी.


गुलाबी भरीव ओठ, त्यावर गुलाबीच लिपस्टिक. चाफेकळी नाक, त्याला अजून सुंदर बनवणारी हिऱ्याची चमकी.


निमुळती हनुवटी, हसताना अजूनच गोंडस दिसणारी. निमुळती मान तीवर रुळणारी मोत्याची माळ. स्लिव्हलेस ब्लाऊज मधून दिसणारे गोंडस बाहू. नाजूक मनगटावर शोभणारे मोत्याचे छोटेसे ब्रेसलेट. लेस इज मोर... कमीत कमी मेक अप आणि दागिन्यांनी खुललेले नैसर्गिक सौंदर्य. 


सोनेरी काया आणि


चंदेरी छाया तिची


वेड लावी जीवा...


निसर्गाने मनापासून निर्मिलेली सुंदर मुर्ती. वाटेवरच्या चोरालाही चोरण्याचा मोह व्हावा. उगाच नाही आईच्या जीवाला घोर लागलेला.


रैना आपली पर्स घेऊन कॉलेजमध्ये पोहोचली . तिचा ग्रुप नेहमीप्रमाणे पार्किंग लॉटमध्ये भेटणार होता.  

"ओ माय गॉड, रैना यू आर लूकिंग अब्सोलुटली गॉर्जास..." आपली गुजराती साडी सावरत मिहिका रैनाला मिठी मारत किंचाळली. तिचा आवाज ऐकून ज्यांनी रैनाला पाहिले नव्हते ते ही वळून पाहायला लागले. 


"माशाल्लाह! लगता हैं फलक से कोई हूर जमी पर उतरी हैं|" झुबेर पापणी न लवता तिच्याकडे पाहत म्हणाला. 


"ए यार, काय तुम्ही सगळे आज ओव्हर ॲक्टिंगची दुकान उघडून बसलात. दुसरं कुणी भेटलं नाही का आज गिऱ्हाईक बनवायला." लाजून रैनाचे गाल लालबुंद झाले होते. बेचैन होऊन तिने नजर खाली झुकवली. 


"अगं राणी, मस्करी नाही ही. तू खरंच आज अगदी कातील दिसतेय. आज नक्की दहा बारा प्रपोज पडतील, लाव पैज तू." हंसिका डोळा मारत म्हणाली. 


"ए आले ना सगळे. मग चला ना ऑडीटोरियममध्ये. श्रेयस आणि अन्या बोंबलत आहेत आपल्या नावाने. कधीपासून आपल्यासाठी जागा धरून बसले आहेत ते. रैना आणि मिहीका रॅम्प वॉकमध्ये भाग घेतलेल्यांनी ए २६ वर्गात जमायचं आहे." मोबाइलमध्ये मेसेज पाहत कार्तिक म्हणाला. हो चला चला म्हणत सगळे ऑडीटोरियमच्या दिशेने चालू लागले. मिहिका आणि रैना ए विंगकडे वळल्या. 


ए २६ वर्गाला तात्पुरते ग्रीन रुममध्ये बनवले गेले होते. वर्गाला जत्रेचे रूप आले होते. पोरी कलकलाट करत चेहऱ्याला मेकअपचा टच अप देत होत्या. मुलं धोतर, शेरवानी, खोट्या  मिशा दाढी चाचपून ठीक ठाक करत होती.


"रैना चल आपण ही फायनल टच अप करून घेऊ. थोड्या वेळात सुरू होईल प्रोग्रॅम." मिहीकाने एका त्यातल्या त्यात मोकळ्या कोपऱ्याकडे रैनाला खेचत नेले.


"हो चल, मी तुला मदत करते. पण मला नकोय काही. आहे हे छान आहे असं मला वाटतं." आरशात स्वतःला निरखत रैनाने उत्तर दिले.


"बेबी तू अगदी झोपेतून उठून जरी आलीस तरी स्टेज रेडीच दिसशील. पण मी आज तुझं काही ऐकणार नाही. थोडा मेकअप तर मी तुला करणारच आहे."


दोघी एकमेकींची चेष्टा मस्करी करत रंगरंगोटी करण्यात व्यस्त होत्या. आजूबाजूला जर थोडेसे लक्ष दिले असते तर चार पाच मुलांचे टोळके त्यांच्यावरच लक्ष ठेवून असल्याचे त्यांच्या लक्षात आले असते. कुणाच्याही नकळत रैनाचे वेगवेगळ्या भावमुद्रेचे कँडिड फोटोज् घेतले जात होते. प्रत्येक जण आपापल्यात गुंतला होता पण जरी कुणी पाहिले असते तरी त्या टोळक्याला हटकण्याचे धाडस कुणी केले नसते. मध्येच त्यातील एक मुलगा दुसऱ्याच्या कानाला लागला आणि मान डोलवत सगळ्यांना निघण्याचा इशारा करत ते तिथून निघून गेले. 



"भावा, काय रापचीक दिसतेय रे, एकदम खल्लास. तुझा विचार बदलला तर सांग, मी आहे लाईनमध्ये हां."


"अय पव्या, तू काय स्पेशल आहेस का? आणि आम्ही काय घोडं मारलंय. आम्हाला पण मोज की तुझ्या लाईनमध्ये."


"अरे अरे, भावांनो कशाला भांडताय. सगळे मिल बांट के खायेंगे, हाय काय आणि नाय काय, काय अक्या हो ना?" 


"ए दरिद्र्यांनो, साले कसले मित्र म्हणायचे तुम्ही. आपल्या आयटेमचे दर्शन घडवायला आणलं तर तुम्ही तिच्यावरच डोरे घालायला लागलाय. वहिनी आहे ती तुमची. म्हणून जरा इज्जतीत राहायचं. तुमच्यापैकी कुणी तिच्याकडे नजर उचलून जरी पाहिलं ना तर डोळे काढून त्यांच्या गोट्या बनवून खेळेन, समजलं?" आकाश कडाडला. त्याचा अवतार बघून मित्र नरमले. 


या सगळ्यापासून अनभिज्ञ रैना, मिहीका त्यांच्या बाजूनेच बॅक स्टेजकडे गेल्या. 


क्रमशः 


लेखिका- सविता किरनाळे 

वाचकहो, भाग थोडेसे लहान आहेत पण दररोज एक भाग नक्की वाचायला मिळेल. 

 ही कथा आम्ही लेखिकेच्या लिखीत परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. कथा, कथेचा कोणताही भाग इतर वेबसाइट्स, यूट्यूब चॅनेलवर नावासकट किंवा निनावी वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची खात्री बाळगावी. 


Post a Comment (0)
Previous Post Next Post