व्यथा
लेखक - मिलिंद अष्टपुत्रे
मी हल्ली लिहिणं सोडून दिलंय. हेच म्हणजे लेख, कथा वगैरे ..... लहानपणापासूनच मला जनजागृती करण्याची अतीव इच्छा होती. सुदैवाने माहेर आणि सासर दोन्ही पुढारलेले असल्याने मला काहीच अडचण आली नाही आणि मग मी वेड्यासारखी लिहू लागले. माझे टीकास्त्र मुख्यत्वे जातीभेद, जुन्या रुढी, कल्पना यांच्यावर चालले. वयाच्या सतराव्या वर्षापासून मी काही ना काही अखंड लिहितेयं.... थेट वयाच्या पंचावन्नाव्या वर्षांपर्यंत !! मी आता एकोणसाठ वर्षाची आहे. साठी चालू आहे. खरं म्हणजे तुम्ही म्हणाल की आता संसार पाश नाही म्हटले तरी ढिले झाले असणार, विचार आणि लेखन पक्व झाले असणार, म्हणजे लेखणी दुप्पट वेगाने चालली पाहिजे. पण माझ्या बाबतीत अगदी उलटं झालंय. गेल्या चार वर्षांत मी काही लिहिलं नाही. लिहावसंच वाटत नाही.
वयाच्या सतराव्या वर्षी मी माझी पहिली कथा लिहिली. कॉलेजच्या मॅगेझीन मध्ये ! कथा मला आता नीटशी आठवत नाही, पण अशीच हुंड्यावर होती. फार गाजली होती कॉलेजमध्ये ! घरूनही कौतुक सुमने मिळाल्याने मी मोहरले. डोक्यात असणाऱ्या कल्पना शब्दात पकडण्याचा खेळ मी खेळू लागले. या गोष्टीचे व्यसन एकदा लागले की दारू प्रमाणे ते माणसाचा कब्जा घेते. मग माणूस लिहीत सुटतो, मलाही त्याच व्यसनाने पछाडले. ऐन तारुण्यात ज्यावेळी बरोबरीच्या मुली इतर हव्याहव्याशा वाटणार्या विषयांत रस घेत होत्या, त्यावेळी मी मात्र लिखाणात रमत होते. लिखाणही तसे रटाळच ! प्रणय वगैरे काही नाही. मी त्यावेळी हुंडा ,जात-पात वगैरेवर लिहीत होते. बुवाबाजी वरच्या माझ्या एका लेखावर अक्षरशः लट्टू होऊन जयदीपने मला मागणी घातली.
जयदीप पेशाने डॉक्टर होता. माझे त्याच्याशी लग्न झाले तेव्हा मी बावीस वर्षांची होते. जयदीपने हुंडा मानपान काही घेतले नाही, त्यामुळे माझा त्याच्या विषयीचा अभिमान आणखीनच वाढला. लग्नानंतरही त्याने मला लिहिण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. माझे जीवन कृतार्थ झाल्यासारखे मला वाटले. आयुष्य जगावे तर असे !! सर्व भौतिक सुखे माझ्यापुढे हात जोडून उभी होती. काही कमी नव्हते. पण या सर्वाला कोणाची तरी दृष्ट लागली. मला मूल होत नव्हते. अनेक उपाय झाले. निरनिराळ्या टेस्ट झाल्या.
जयदीप स्वतः डॉक्टर असल्याने त्याने सर्व टेस्ट जातीने घेतल्या. दोघांचेही रिझल्ट नॉर्मल होते. आमच्या जिवात जीव आला, पण ईश्वराच्याच मनात नव्हते. मी आई कधीच होऊ शकले नाही. लग्नाला दहा वर्षे झाल्यावर मात्र सासूबाईंनी हाय खाल्ली, पण मला त्यांनी एका शब्दानेही कधी दुखावले नाही. नातवंडाचे तोंड न पहाताच त्या देवाघरी निघून गेल्या. एक दिवस जयदीप आणि मी संध्याकाळी बंगल्याबाहेरील बागेत बसलो होतो. तेवढ्यात मन्या काका तेथे आले. हे मन्या काका म्हणजे मामंजीं चे मित्र. जयदीप पंधरा वर्षांचा असतानाच मामंजी गेले होते, त्यावेळी मन्या काकांनीच घर सावरले होते.
आजही मन्या काका जणू आम्हा दोघांचे आयुष्य सावरायला आले होते. त्यांनी आमच्या पुढे एक प्रपोझल ठेवले. त्यांचा अमेरिकेत एक वकील मित्र होता. त्याचे सर्व कुटुंबच अमेरिकेत होते. एकुलता एक मुलगा तेथे डॉक्टर होता. मन्या काका दोन वर्षांपूर्वीच त्यांना भेटून आले होते. सर्व काही सुरळीत चालले होते. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. सुट्टीत पिकनिकला जात असताना त्यांच्या मोटारीला अपघात झाला. उघड्या मोटारीतून सात महिन्यांची त्यांची नात बाजूला दाट गवतात उडाल्यामुळे वाचली. बाकी सर्वच्या सर्व कुटुंब कामी आले. जवळचे असे फक्त मन्या काकाच असल्याने ही बातमी त्यांना फोनवर कळविण्यात आली. तातडीने मन्या काका अमेरिकेत गेले. सर्व स्थावर इस्टेट त्यांनी त्या सात महिन्यांच्या अर्भकाच्या नावे केली. ती दुर्दैवी पोर आम्ही दत्तक घ्यावे असे त्यांना मनापासून वाटत होते.
आम्ही तिचे 'डॉली' हे नाव बदलून 'मेधा' असे ठेवले. मी आई झाले, जयदीप बाबा झाला. आम्हाला स्वतःलाच मूल झाल्या सारखा आनंद झाला. मेधा च्या नावावर आधीच लाखो रुपये होते. त्या पैशांना आम्ही हातही लावला नाही. मेधा सहा वर्षांची झाल्यावर शाळेत जाऊ लागली. माझ्या अनेक कथा व लेख प्रसिद्ध झाल्याने मी लेखिका म्हणून ओळखली जाऊ लागले. जयदीप नावाजलेला डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होता. मेधा हळूहळू वाढत होती. खटपट करून आम्ही तिला भारतीय नागरिकत्व मिळवून दिले. ती जात्याच दिसायला सुंदर होती. जसजशी मोठी होऊ लागली तसतशी जास्तच सुरेख दिसू लागली. तिचा स्वभाव मात्र फटकळ होता. राग येईल किंवा अपमान वाटेल असे फटकन बोलायची. मी ज्या वेळी माझे टीकास्त्र हुंड्याच्या रुढीवर सोडले त्यावेळी मेधा अठरा वर्षांची होती. हुंडा घेणाऱ्या तरुणाशी कोणत्याही युवतीने लग्न करू नये, समाजातील प्रतिष्ठित लोकांनी ही रीत बंद करावी आणि तरुणांनीही हुंडा घेऊ नये यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले. लोकही भेटले की कौतुक करीत.
" तुम्ही म्हणता तसेच झाले पाहिजे !" असे म्हणत. मात्र इतरांजवळ ," पन्नास हजार खण खण वाजवून दिलेत मी माझ्या जावयाला !!" असे अभिमानाने सांगत. लोकांच्या अशा दुटप्पी वर्तणुकीमुळे माझ्या प्रयत्नांना काहीच यश येत नव्हते. अर्थात मीही चिकाटी न सोडता लेख लिहीत राहिले. त्यानंतर थोड्याच दिवसात माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे पर्व सुरू झाले.
मेधा त्यावेळी एकवीस वर्षांची असेल. बी. ए. च्या शेवटच्या वर्षाचा अभ्यास ती करत होती. माझी पन्नाशी उलटून आता दोन वर्षे झाली होती. जयदीप ही साठी कडे वाटचाल करीत होता. आयुष्य शांतपणे चालले होते. पण ती वादळापूर्वीची शांतता ठरली. एके दिवशी मेधा सोबत कोणीतरी स्मार्ट तरुण आमच्या घरी आला. मी काहीतरी लिहीत होते ,जयदीप बाहेर वाचत बसला होता.
" आई हा संदीप ...... माझा मित्र !आणि संदीप, ही माझी आई ! " मेधाने ओळख करून दिली.
त्या तरुणाने हसतमुखाने हात जोडले.
" संदीप इंजिनियर आहे...... बरं का ग आई !" मेधा आनंदाने ओथंबून बोलत होती.
" तुमचे लेख आणि कथा मला खुप आवडतात." संदीप म्हणाला. मला जरा बरे वाटले. त्यानंतर तासभर आम्ही बागेत गप्पा मारीत बसलो होतो. त्यानंतर संदीप बरेच वेळा आमच्या घरी आला. मेधाने एके दिवशी, " आम्ही दोघे लग्न करणार आहोत." असे घरात सांगितले. वावगे काहीच नव्हते. आम्ही खुशीने परवानगी दिली.
आता मला एका गोष्टीचा खुलासा करावासा वाटतो, तो म्हणजे मेधा च्या नावावर कित्येक लाख रुपये आहेत हे अजूनही तिला माहीत नव्हते .ते गुपित फक्त मला ,जयदीपला ,आणि स्वर्गवासी मन्या काकांना माहीत होते. ही रक्कम व्याज धरून आता कितीतरी वाढली होती. ते पैसे अर्थातच लग्नानंतर मेधाला मिळणार होते. संदीप विषयी जयदीपने पूर्ण चौकशी केली होती. प्रतिष्ठित आणि सधन कुटुंबातला तो होता. लग्न ठरल्यानंतर अर्थातच हुंड्याचा प्रश्न निघाला. मी पूर्णपणे हुंड्या विरुद्ध आहे हे माहीत असल्याने मंडळी थोडी बिचकून होती. पण अखेर संदीपच्या काकाने विषय काढलाच. मी पूर्णपणे नकार दिला आणि संतापाच्या भरात त्यांची चांगलीच कानऊघडणी केली. वरपक्षाचा अपमान, आणि तेही वधूच्या आईकडून!! झाले ...
" हे लग्न मोडले आहे, इतःपर आपले संबंध संपले !!" असे सांगून मंडळींनी बैठक मोडली.
त्या रात्री मेधा आमच्या खोलीत आली. मी डोळे मिटून पडले होते. फटकन् दिवा लागल्याने मी डोळे उघडले. समोर मेधा उभी होती. तिचा थंड आणि करारी चेहरा पाहून मी क्षणभर चमकले .पण क्षणभरच !! मी शांतपणे विचारले,
" काय ग मेधा ,झोपली नाहीस ?"
" झोप येईल कशी ? खुद्द आईच मुलीच्या आयुष्यावर उठल्यावर मुलीला शांत झोप लागेलच कशी ?"
" मेधा ..... " मी भान हरपून ओरडले.
" ओरडू नकोस आई ,खरं म्हणजे तुला आई म्हणायला देखील मला लाज वाटते. आई आपल्या अपत्यासाठी काय वाट्टेल ते करायला तयार होते ,असं ऐकलं होतं. हं !! बरोबरच आहे म्हणा! मी जर तुझी खरी मुलगी असते ,तर मात्र तू वाट्टेल तितका हुंडा दिला असतास. पण मी पडले परकी !! तुला मूल झाले नाही म्हणूनच तू इतकी निर्दय आहेस. स्वतःला समाजसेविका समजून तू ताठ्यात वागतेस. चार फुटकळ लेख लिहिले म्हणजे काही तू समाजसेविका झाली नाहीस ! संदीपने बिझनेस साठी थोडे पैसे मागितले तर तेवढेही देणं तुला परवडत नाही. बरोबर आहे, लोक काय म्हणतील ही काळजी आहे ना तुला !! हुंड्या विरुद्ध लिहिणाऱ्या बाईनेच मुलीसाठी हुंडा दिला, म्हणून आपली छी-थू होईल अशी तुला भीती वाटते. हुंडा न देता माझे लग्न लावून तुला जगाकडून वाहवा मिळवायची आहे ना ... मग तू कशी हुंडा देशील ? स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी माझ्या प्रेमाचा आणि आयुष्याचा बळी देण्याइतकी तू निर्दय झाली आहेस. मी संदीप शिवाय एक क्षणभरही जगू शकणार नाही.मी जीव देईन. माझ्याशी आणि माझ्या प्रेमाशी असा खेळ खेळण्यापेक्षा मला सांभाळायला घेतले नसतेस तर जास्त चांगले झाले असते. हे देवा... या जगात माझ्यासारख्या दुर्दैवी मुलींना अशी आई देण्यापेक्षा तू त्यांचा गळा घोटत नाहीस ?"
" मेधा ... " फाडकन कानफाडीत दिल्याचा आवाज झाला. बाहेरून मेधाचं वक्तव्य ऐकणाऱ्या जयदीपला अखेर असह्य झालं असावं .... मुसमुसत मेधा निघून गेली. सुन्न होऊन मी नुसतीच जयदीप कडे बघत राहिले.... आणि मग त्याच्या खांद्यावर डोके ठेवून मुक्तपणे रडले ... आयुष्यात इतका अपमान आणि दुःख मी कधीच सहन केले नव्हते. रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता. मेधाने शब्दांच्या हत्यारांनी केलेल्या खोल जखमा रात्रभर अश्रु बनून वाहत होत्या.
त्यानंतर आठवड्यात मेधा चे लग्न झाले. तिच्या नावावरचे सर्व पैसे घेऊन ती सासरी निघाली. मला मिठीत घेवुन रली. पण मला विशेष काहीच वाटले नाही. त्या रात्री तिने केलेल्या शाब्दिक जखमा कधीच बऱ्या झाल्या नाहीत. या पुढेही होतील की नाही ते सांगता येत नाही. त्यानंतर मात्र मी लेखणी हातात घेतली नाही. माझ्या कल्पनाशक्तीवर .....मनाला झालेल्या जखमांतून पाझरलेल्या दुःखाचा चिकट थर पसरला. माझी विचारशक्ती कुंठित झाली.
तुम्ही म्हणाल, आता साठी आली. संसार पाश ढिले झालेले, विचार आणि लेखन पक्व झालेले, म्हणजे लेखणी दुप्पट वेगाने चालत असणार ...... पण मला मात्र काहीच सुचत नाही. काहीच लिहावसं वाटत नाही ......
समाप्त
वरील कथा श्री. मिलिंद अष्टपुत्रे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.