तुम अगर साथ हो ... भाग पाच
काही मिनिटांत गाडी एका बंगल्यासमोर येवून थांबली. कंपाऊंड वॉलवरील सर्व दिवे लावलेले होते. त्या प्रकाशात ती दुमजली शुभ्र वास्तू उठून दिसत होती. उघड्या गेटमधून गगनने गाडी आत नेली. छोटेसे लॉन पार केल्यावर घरासमोर असलेल्या शेडमध्ये पार्क केली.
गाडीचा आवाज येताच आतून एक रैनाच्या वयाची मुलगी धावत बाहेर आली आणि तिने गगनला मिठी मारली.
“दादा किती उशीर, मी कधीची वाट बघतेय तुझी. आणि माझं गिफ्ट आणलंस ?”
तेवढ्यात गाडीमधून उतरुन बाजूला उभ्या राहिलेल्या रैनाकडे तिचे लक्ष गेले.
“ओहो, तो यें बात हैं। तू माझ्यासाठी गिफ्ट आणलं की नाही ते माहीत नाही, पण स्वतःसाठी मात्र एकदम छान बक्षिस आणलंस हां तू!”
हसतच ती म्हणाली.
"अहो भूमी मॅडम, तुमचा गैरसमज झाला आहे. तुम्ही समजता तसं काही नाही आहे. ही रैना, चांदोरीला राहते. आपल्या घरी जात होती बसने, रस्त्यात बस बंद पडली म्हणून मी तिला लिफ्ट दिली. बस इतकंच, तू सुतावरून स्वर्ग गाठू नकोस. बावळट कुठली. आणि रैना, हिच्या दादागिरीवरुन तू हिला ओळखले असेल, ही माझी बहीण भूमी.” तिला टपली मारत तो म्हणाला.
“अच्छा, ठीक आहे. मग नीट सांगायचे ना, बावळट का म्हणतो? चल गं, आपण जावू आत. तुझं सामान हा गडी घेऊन येईल.” गगनकडे बोट दाखवत चिडून भूमी म्हणाली.
तिने आपल्याला नोकर बनवले हे गगनच्या थोडं उशिराच लक्षात आले. तो काही म्हणणार तोपर्यंत भूमी रैनाला घेऊन घरात शिरली होती. हसून खांदे उडवत त्याने रैनाची आणि स्वतःची बॅग हाती घेतली.
दिवाणखान्यात एक पोक्त वयीन स्त्री आणि पुरूष टीव्ही बघत बसले होते.. कदाचित ते गगनचे आई वडील असावे. भूमीबरोबर एका अनोळखी मुलीला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले.
“मम्मी पप्पा, तुम्ही काही विचारायच्या आधी मीच तुम्हाला सांगून टाकते. ही रैना आहे. चांदोरीला राहते. घरी जाताना तिची बस बंद पडली म्हणून दादाने तिला लिफ्ट दिली आहे.”
एका दमात पढवलेल्या पोपटाप्रमाणे भूमी बोलून मोकळी झाली.
“अगं, हळू. श्वास तर घे.” मम्मी हसून भूमीला म्हणाल्या. सोफ्यावरून उठून त्या रैनाकडे आला आणि तिच्याकडे पाहत पुढे बोलल्या,
“रैना नाव आहे का तुझे, किती सुंदर आहे, नाव आणि तूही... भिजलेली दिसतेस.भूमीच्या खोलीत जावून कपडे बदल. मी तोपर्यंत गरम चहा बनवायला सांगते. आलं घातलेलं चालेल ना तुला चहात? भूमी बाळा, तिला तुझी खोली दाखव.”
“हो पण..”
रैना चाचरत बोलू लागली.
“गगन म्हणाले होते, की ते मला घरी सोडायची व्यवस्था करतील. घरी आई वाट पाहत असेल माझी.”
"हो जाशील घरी पण आधी तू कोरडे कपडे घाल. चहा वगैरे घे. चांदोरी काही फारसं दूर नाही इथून. फार तर अर्ध्या तासाचा रस्ता." स्वयंपाकघराकडे वळत त्या म्हणाल्या. रैना निमूटपणे भूमीच्या मागोमाग गेली.
भूमीची खोली चांगलीच प्रशस्त होती. आतील सजावट पाहून ती एका तरुण मुलीची खोली आहे हे सहजच जाणवत होते. भिंतीला दिलेला हलका गुलाबी रंग, बेडवर असलेली फुलाफुलांचे बेडशीट, भले मोठे टेडी बिअर, भिंतीवर लावलेले फिल्म स्टार्सचे पोस्टर...
आपल्या बॅगेतून टॉवेल आणि सलवार कमीज घेऊन रैना भूमीने दाखवलेल्या बाथरुममध्ये जाऊन फ्रेश होवून आली. ओले कपडे बदलल्याने तिला चांगले ऊबदार वाटत होते. तिचे लांब केस तिने पुसून मोकळे सोडले होते.
आवरून झाल्यावर ती परत दिवाणखान्यात आली. तोपर्यंत स्वयंपाकाच्या मावशींनी चहा आणि कोथिंबिरीच्या वड्या आणून टिपॉयवर ठेवले होते. भूमी, गगन आणि त्यांचे आई वडील गप्पा मारत चहा घेत होते.
"ये ग रैना, चहा घे." तिला पाहून मम्मी म्हणाल्या.
चहा पिवून आणि खावून झाल्यावर रैनाने पुन्हा गगनला विचारले, "मला घरी सोडायला जमेल का तुम्हाला?"
गगन काही बोलण्याआधी त्याचे पप्पा बोलले,
“हे बघ बेटा, आता रात्र झाली आहे. त्यातून तुझ्या गावाचा रस्ता पण खूप खराब आहे. तू आजची रात्र इथेच रहा. उद्या आम्ही काही कामासाठी चांदोरीलाच चाललो आहोत. तेव्हा तुला तुझ्या घरी सोडू. तू घरी फोन करून सांग तसं.”
त्यांच्या बोलण्यात तथ्य होते त्यामुळे "ठीक आहे, फक्त काही तासांचा तरी प्रश्न आहे." म्हणत रैना तयार झाली.
‘पण घरी कसे कळवणार, फोन तर बंद पडला आहे, कुणाचा नंबरही पाठ नाही. जावू दे, मी तर काय करू. कुठे तरी राहिले असे वाटेल त्यांना. पण चूक आईची आहे. असं कुणी तडकाफडकी बोलावतं का?’ आईवरची नाराजी परत उसळून वर आली.
थोड्याच वेळात ती सगळ्यांसोबत अशी मिसळून गेली जणू ती तिथे आधीपासूनच तिथे राहत असावी. भूमी तिच्या कॉलेजमधील गमती जमती सांगत होती. अधून मधून मम्मी पप्पा रैनाला तिच्याबद्दल विचारत होते. गगन ही काही अनुभव सांगत होता. पाहुणे आल्यावर बसते तशी गप्पांची मैफिल सुरु होती. कुणाचे लक्ष नसल्याचे पाहून गगन चोरुन रैनाला पाहत होता. तिने घातलेला हिरवा सलवार कमीज तिचे गोरे रूप खुलवत होता. ओले मोकळे केस तिने एका खांद्यावरून पुढे घेतले होते. कानातील डूलाचा सोन्याचा मुका घुंगरू तिच्या बोलण्या, हसण्यागणीक हलत होता. हसताना गालावर पडणारी खळी तर अगदी वेडवणारी. गगन तर सोडा मम्मीची नजर सुध्दा अधूनमधून या देखण्या मुलीकडे वळत होती.
'दिसायला लाखात एक, बोलायला चांगली, वागण्यातून संस्कारी वाटतेय शिवाय अभ्यासात हुशार आहे म्हणे. पण हल्ली कुणाचं काय सांगता येतं! चांगल्या चांगल्या म्हणवणाऱ्या मुली लोकांना चुना लावून निघून जातात. हिला तर आपण ओळखत ही नाही.'
मम्मी विचार करत होत्या. स्वयंपाकाच्या मावशी जेवण तयार असल्याचे सांगायला आल्या. सगळे डायनिंग रूममध्ये आले. लुसलुशीत पोळ्या, वालाचे बिरडे, टोमॅटोचे सार आणि सुगंधी भात. गोडामध्ये मावशींनी भरपूर साय, सुकामेवा, केशर घातलेली शेवयांची खीर केली होती. तोंडी लावायला दोन तीन प्रकारची लोणची टेबलवर ठेवली होती.
' वाह किती छान आहे जेवणाचा बेत... हे लोक नेहमीच असे तब्बेतीत जेवतात की आज मी आले आहे म्हणून?' रैनाच्या मनात प्रश्न उभा राहिला.
"गगन बाबा, तुम्ही येणार हे माहीत नसल्याने आज जास्त काही विशेष बनवलं नाही. उद्या तुमच्या आवडीचा बेत करेन." मावशी कीचनच्या दरवाज्यात उभ्या राहून म्हणाल्या.
"अहो मावशी जे बनवलय ते खूपच स्वादिष्ट आहे. हा बेत सुध्दा परफेक्ट आहे. तुमच्या हाताला अमृताची चव आहे. मी तर म्हणतो, तुम्ही माझ्याबरोबर चला ना. खरं सांगतो, मी सगळ्यात जास्त तुम्हाला मिस करतो. बोला येताय का?" बोट चाटत गगन म्हणाला.
"ए मिस करतो च्या बच्चा, तू मावशींना घेऊन गेल्यावर आम्ही काय उपाशी मरायच का? तू लग्न करून घेईन ये स्वतःसाठी पर्सनल कूक. आम्हाला राहू दे आमची मावशी." त्याच्या दंडावर चापट मारत भूमी म्हणाली. सगळ्यांच्या हसण्याच्या आवाजाने खोली भरुन गेली.
क्रमशः
लेखिका - सविता किरनाळे
ही कथा आम्ही लेखिकेच्या लिखीत परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. कथा, कथेचा कोणताही भाग इतर वेबसाइट्स, यूट्यूब चॅनेलवर नावासकट किंवा निनावी वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची खात्री बाळगावी.