तुम अगर साथ हो ... भाग सहा

तुम अगर साथ हो ... भाग सहा 




इकडे रैनाच्या घरी मात्र चिंतेचे वातावरण पसरले होते. संध्याकाळी येईल अशी अपेक्षा असलेली रैना रात्र झाली तरी अजून पोहोचली नव्हती. वाट पाहून दिनकर आणि पद्मा दोघे अस्वस्थ झाले होते.


मन चिंती ते न वैरी चिंती...


रात्र वाढत चालली होती. तरीही तरूण मुलगी अजून घरी आली नव्हती.


"अहो मी काय म्हणते, एकदा बस स्टँडवर जाऊन चौकशी करून याल का? बस अजून आली की नाही ते तरी समजेल." 


किती तरी वेळा आत बाहेर चकरा मारुन थकलेल्या पद्माने भित भित नवऱ्याला सुचवले. तिने कधीचा तांब्या उंबऱ्यावर पालथा घातला होता. दिनकर अस्वस्थ झाले होते पण तसे दाखवत नव्हते. बायकोच्या सांगण्यावरून दिनकर बस स्टॅंडवर आले. तिथे चौकशी केल्यावर त्यांना समजले, की ती बस रस्त्यात बंद पडल्याने आज आलीच नाही.


"अहो साहेब पण बस बंद पडली तर दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात येते ना. बसमधील प्रवासी कुठे आणि कसे गेले मग?" रागाने त्यांनी कंट्रोलरला विचारले.


"हो बरोबर आहे पण या बसमध्ये जास्त प्रवासी नव्हतेच. जेवढे होते तेवढे लगेचच मिळेल त्या वाहनाने निघून गेले त्यामुळे दुसरी बस पाठवण्याची गरज नसल्याचे ड्रायव्हरने कळवले. मग कशी पाठवणार दुसरी बस?" सपाट आवाजात त्याने उत्तर दिले. त्याच्यासाठी असे वाद घालणारे लोक रोजचे होते. त्यामुळे तो शांत होता.


"अहो माझी तरूण मुलगी होती त्या बसमध्ये. अजून घरी आली नाही." 


"काळजी नका करू साहेब. आत्तापर्यंत आली असेल घरी. किंवा ती त्या बसमध्ये बसलीच नसेल. असं ही होऊ शकते की ती कुणा मैत्रिणीकडे राहिली असेल." दिनकरला धीर देत कंट्रोलर म्हणाला. 


निराश होऊ ते घरी आले. स्टँडवरील बोलणे त्यांनी पद्माच्या कानावर घातले.


"तू तिला परत फोन करून पाहिलंस का?"


"हो, स्वीच ऑफ दाखवतोय."


"मग तिच्या एखाद्या मैत्रिणीला फोन करून विचार ही निघाली आहे का. कदाचित रैना निघालीच नसेल." त्यांनी सुचवून पाहिले.


पद्माने नंबर शोधून हंसिकाला कॉल केला.

"अजून पोहोचली नाही का? काकू ती घाईत होती म्हणून मी स्वतः तिला हॉस्टेलवर सोडलं होतं. तुम्ही हॉस्टेलला कॉल करून बघा ना. रेक्टर मॅडमना माहीत असेल." हंसिकाने तिला होती तेवढी माहिती पुरवली.


"अहो दुपारीच निघालीय रैना... अजून कशी पोहोचली नाही.... हो खूप घाईत होती, आईने बोलावलंय म्हणत होती. मी अर्ज लिहून घेतला आणि पाठवून दिली. छत्री सुध्दा घ्यायला वेळ नव्हता तिच्याकडे मग मी माझी छत्री दिली. पाऊस खूप असल्याने वाटेत कुणाकडे थांबली तर नसेल? पण इथून मात्र वेळेवर निघाली होती." रेक्टर मॅडमला वेगळीच शंका येऊ लागली. जर रैना घरी नाही गेली तर कुठे गेली? दुर्दैवाने काही वाईट प्रकार घडला असता तर हॉस्टेलचे आणि पर्यायाने त्यांचे ही नाव खराब झाले असते.


जास्त काही न बोलता पद्माने फोन ठेवून दिला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. झाल्या प्रकाराला आपणच जबाबदार आहोत असे तिच्या मनाने घेतले. 


'चूक तर माझी आहे. मी जर तिला असे गडबडीने बोलावले नसते तर ती ती अशी वादळ वाऱ्याची निघाली नसती. इमोशनल ब्लॅकमेल करून बोलावलं आणि वरुन गुलाबजामचे आमिष दाखवले. कुठे असेल माझी पोर, कशी असेल. कुठल्याशा स्थळासाठी पोरीची सुरक्षा पणाला लावली मी.'


पद्माचे मन तिला खात होते. तिरीमिरीत उठून तिने मुलीच्या काळजीपोटी देव पाण्यात ठेवले.


“देवा परमेश्वरा, माझं लेकरू सुखरूप घरी येवू दे. तुझ्या दाराला अकरा नारळाचे तोरण बांधीन.”


त्या माऊलीने नवस बोलून टाकला.



रैनाच्या बाबांनी कुणाचा तरी सल्ला घ्यावा म्हणून त्यांच्या एका मित्राला फोन करून ही घटना सांगितली.


“हे बघ दिनकर, आजची रात्र जावू दे. कदाचित रैना कुणा मैत्रिणीकडे राहिली असेल. तिच्या फोनची बॅटरी उतरली असावी. इतक्यात कुठल्याही निष्कर्षावर यायची घाई नको करायला. आपण पोलिसातही जावू शकत नाही, कारण त्यासाठी ती व्यक्ती गायब होवून २४ तास व्हावे लागतात. आपण उद्या दुपारपर्यंत वाट पाहू. मग ठरवू काय करायचं ते. परमेश्वरावर विश्वास ठेव.”


जड अंत:करणाने त्यांनी फोन ठेवला. आता फक्त वाट पाहणेच हातात होते.


  गगनच्या घरी रैना हास्यविनोदात रमली होती. तिच्या तिथे असण्याने घराला एक निराळीच शोभा आली होती.


गगनच्या मम्मीचे सगळीकडे बारीक लक्ष होते. गगनकडे तर थोडे जास्तच. आल्यापासून त्याचे चोरून रैनाकडे पाहणे त्यांच्या नजरेतून सुटले नव्हते. रैनाची वागणूक तशी सामान्य वाटत होती. बहुतेक तिच्या मनात तसा काही विचार नसावा किंवा असला तरी तिला तो लपवता येत असावे. चिरंजीव मात्र काहीसे बेचैन झाल्याचे त्यांनी ओळखले होते. 


लोण्याजवळ विस्तव ठेवला काय विस्तवाजवळ लोणी ठेवले परिणाम तर लोण्याच्या वितळण्यातच होणार. त्यात विस्तवाचा किंवा लोण्याचा दोष नसतो. दोघे आपापल्या गुणधर्माप्रमाणे वागणार. भान तर लोण्याच्या मालकाने ठेवायचे असते. जर त्याला लोणी वितळू द्यायचे नसेल तर ते विस्तवापासून दूर केलेच पाहिजे. 


वास्तविक त्यांनी गगनला मुलगी पाहायला जायला बोलावले होते. अट्ठावीस वर्षाचा गगन लग्नाचे मनावर घेत नव्हता. प्रत्येकवेळी तो काही तरी बहाणा सांगून बघायला जायचे टाळायचा. आल्या आल्या मित्रांकडे पळायचा किंवा ऑनलाईन कॉन्फरन्स अटेंड करत बसायचा. यावेळेस मात्र ही एक गंमतच झाली होती. घरी येवून तीन तासावर होवूनही त्याने अजून कशाला बोलावले याची साधी चौकशीही केली नव्हती.


‘आश्चर्यच म्हणायचे हे! किती रमला आहे बोलण्यात. पण झोपायला पाठवले पाहिजे त्याला. उद्या जायचे आहे मुलगी बघायला, फ्रेश वाटला पाहिजे ना तो.’ आईचे मन स्वतःशी संवाद साधत होते. 



“गगन, भूमी चला उठा, झोपायला जा. उद्या जरा लवकर उठायचे आहे. गगन, पप्पांचे काही काम आहे. त्यासाठी आपण तिघे उद्या चांदोरीला जायचे आहे.” 


पप्पांचे काम म्हटल्यावर गगन अचानक भानावर आला. 'ओह नो, इतका कसा मी वाहवत गेलो. अजून मम्मीला विचारलंच नाही, नेमकं कशासाठी तिने असं तडकाफडकी बोलावून घेतलंय! एखादी मुलगी दाखवायचा तर घाट नाही ना घातला यांनी?' 


"मम्मी काय काम आहे आणि मला का बोलावलं ते नाही सांगितलं तू अजून. आताच सांगतोय जर एखादी मुलगी वगैरे..." 


गगन पुढे काही बोलणार तेवढ्यात त्याचे बोलणे तोडत मम्मी म्हणाल्या, "अरे पप्पाचे खूप जवळचे असे एक खास मित्र आहेत. ते गेल्या किती तरी महिन्यांपासून बोलवत आहेत. या ना त्या कारणाने आमचं राहूनच जातंय. म्हणून उद्या जाऊन भेटून येऊ. त्यांची खूप छान शेती आहे. ती बघायला आग्रहाने बोलवत होते. तुला आवडतं ना शेती बघायला म्हणून बोलावलं." 


सगळे उठून आपापल्या खोलीकडे वळले. रैना भूमीच्या खोलीत झोपणार होती.


गगन पलंगावर पडला तर होता पण झोप त्याच्या डोळ्यापासून कोसो दूर होती. राहून राहून त्याच्या नजरेसमोर रैनाची मुर्ती तरळत होती. तिच्या मोहक सुगंधाने त्याला धुंद केले होते. तिच्या ओझरत्या स्पर्शाच्या आठवणीने अजूनही अंगावर रोमांच फुलत होते. कितीतरी वेळाने त्याला झोप लागली. पण तीही स्वप्नांनीच उचलून नेली.


क्रमशः


धन्यवाद


Post a Comment (0)
Previous Post Next Post