तुम अगर साथ हो... भाग सात
जागा बदलल्याने रैनाला रात्री उशिरा झोप लागली. तरीही सवयीने सकाळी साडे सहा वाजता जाग आली. आधी तर समोरचे अनोळखी दृश्य पाहून तिला गोंधळायला झाले. पण आपण गगनच्या घरी आहोत हे आठवल्यावर ती गडबडीने उठून बसली. बाजूला भूमी टेडी बिअर कुशीत घेऊन गाढ झोपेत होती. सुटलेले अस्तावस्त झालेले केस गुंडाळून अंबाडा बांधून ती बाथरुममध्ये शिरली.
सगळी अन्हिक आवरून रैना खोलीबाहेर आली. बंगल्यात शांतता होती. एक नोकर लादी पुसत होता तर दुसरा फर्निचर. स्वयंपाकघरातून नाश्ताच्या खमंग सुवास येत होता. डायनिंग रुमच्या बाजूला असलेल्या एका छोट्याशा खोलीतून अगरबत्ती, धूपाचा मंद दरवळ येत होता. बहुतेक ते देवघर असावे. आत जावे की नाही अशा विचारात रैना दरवाज्यापाशी घुटमळत होती. काही लोकांना त्यांच्या घरच्या देवघरात परक्याने प्रवेश केलेला आवडत नसल्याचे तिला माहीत होते. तिला दारात पाहून आतून पप्पांनी हाक मारली.
"ये ना बेटा आत."
रैनाने देवघरात प्रवेश केला. एका आसनावर बसून मम्मी जपमाळ ओढत होत्या. पप्पा बहुतेक पोथी वाचत असावेत. त्यांच्यासमोर उघडी पोथी दिसत होती. देव्हाऱ्याजवळ जाऊन रैनाने मनोभावे नमस्कार केला आणि पंचपाळातील कुंकवाचे बोट कपाळावर टेकवले. देवांची हार फुले वाहून पूजा झाल्याने छान प्रसन्न वाटत होते. तोवर जप संपवून मम्मी उठल्या.
"काय ग, लवकर उठलीस. झोप लागली का रात्री?"
"हो काकू, मला लवकर उठायची सवय आहे. नवीन जागा असल्याने थोडी उशीरा लागली झोप."
"हम्म, लवकर उठायची सवय असणाऱ्यांना आपोआप जाग येतेच. आम्ही दोघे ही रोज सकाळी सहा वाजता उठतो. मग अंघोळ, पूजाअर्चा व्यवस्थित होते." तिच्या हातावर तीर्थ ठेवत पप्पा म्हणाले.
सगळे बाहेर आले. त्यांना पाहून मावशींनी चहा आणून मांडला.
"चल चहा घेऊन थोडं बाहेर बागेत बसू. तेवढंच व्हिटॅमिन डी मिळेल शरीराला." पप्पा मम्मीकडे वळून म्हणाले.
"हो, तुम्ही हिला घेऊन व्हा पुढे. मी जरा मावशींना आजच्या स्वयंपाकाचं सांगून येते." मम्मी स्वयंपाकघरात जात म्हणाल्या.
पप्पा रैनाला घेऊन बाहेर आले. रात्रीच्या वेळेस न जाणवलेले बंगल्याचे सौंदर्य दिवसाच्या उजेडात दिसत होते. तो एक दुमजली बंगला होता. बंगल्याच्या समोर हिरवळ होती. कंपाऊंड वॉलच्या भोवती छोटी छोटी फुलझाडे, क्रोटोन सारखी शोभेची झुडुपे होती. पेरू, चिकू, अंजीर, चाफा अशी लहान झाडं शिवाय चार नारळाची उंच झाडं होती. गेटवर बोगनवेल आणि मधुमळतीची वेल डोलत होती. सगळ्या झाडं झुडपांची आणि हिरवळीची व्यवस्थित निगा राखली जात असल्याचे दिसत होते.
"काका, बागेची काळजी तुम्ही स्वतः घेता की माळी आहे?"
"माळी आहे जो एक दिवसाआड येतो. तो झाडांची छाटणी, लॉन कापणे, झाडांना आळे करणे वगैरे करतो. बाकी रोज सगळ्या झाडांना पाणी घालणं, कधी खत घालणं वगैरे छोटी छोटी काम मी आणि तुझी काकू मिळून करतो. मागच्या बाजूला ही एक छोटी परसबाग आहे. हवं तर जाऊन पाहून ये."
रैना चटचट चालत बंगल्याला वळसा घालून मागच्या बाजूला आली. पाहते तर तिथे पुढच्या पेक्षा छान तरारलेली बाग होती. वेगवेगळ्या वाफ्यात लावलेल्या भाज्या, फळभाज्यांच्या वेली, गावठी गुलाब, मोगरा, जाई, जुई, पारिजातक अगदी सदाफुली, अबोली, कोरंटी, कण्हेर सारखी फुलझाडे... पायाशी हिरवळ नव्हती तर नैसर्गिक काळी जमीन होती. किचनच्या सिंकमधून येणाऱ्या पाईपला दुसरा रबरी पाइप जोडला होता. तो झाडांच्या मुळाशी सोडला होता. त्या पाइपला मुद्दाम पाडलेल्या छिद्रांतून झाडांना पाणी मिळत होते.
इतकी सुंदर बाग पाहून रैना अक्षरशः वेडावली होती. एखाद्या सुंदर फुलपाखराप्रमाणे झाडावरील फुलं हुंगत नुसती भिरभिरत होती. पण तिचे लक्ष जर वरच्या मजल्यावर गेले असते तर वेगळेच दृश्य नजरेस पडले असते.
वरच्या मजल्यावर परस बागेकडे तोंड करून असलेल्या खोलीच्या बाल्कनीत गगन व्यायाम करत होता. तिथे त्याने एक लहानशी जिम बनवली होती. फायबर ग्लासच्या भिंती असलेल्या बाल्कनीमधून खालील संपूर्ण बाग दिसत होती. रैनाला तिथे पाहून ट्रेडमिलवर धावणाऱ्या गगनचे पाय अडखळले. झटक्यात ट्रेडमिलचे रॉड धरत त्याने तोल सावरला नाहीतर नक्कीच दुर्घटना घडली असती. वेग कमी करत मिलवर चालता चालता त्याने नजर खाली खिळवली.
'या मुलीने आयुष्यात कधी बाग पाहिली नाही का? कशी लहान मुलीसारखी इकडे तिकडे फिरतेय!' स्वतःशीच तो उद्गारला.
'पण किती गोड दिसतेय. रैना यार तू तर वेड लावलंय मला... अठ्ठावीस वर्षांचा आहे मी. प्रोफेशनल लाईफमध्ये कितीतरी सुंदर स्त्रियांशी रोजच संबंध येतो. तरीही तुला पाहून एक वेगळीच फिलिंग येतेय. तुला नुसतं पाहत राहावंसं वाटतंय. हेच प्रेम असावं बहुतेक. मी मम्मीला सांगू का या फिलिंगबद्दल... की भूमीला सांगू?... नको मम्मीला सांगतो. तशीही ती लग्नासाठी हात धुवून माझ्या मागे लागलीय. तिला सांगतो, मला रैनाशी लग्न करायचं आहे म्हणून... पण तुझ्या मनात काय आहे ते कसं समजेल. जर तुझं आधीच कुठे जमलं असेल तर... तर माझं काय होईल... देवा, ही पहिली मुलगी आहे जिच्यासोबत मला माझं आयुष्य घालवावं वाटतंय. प्लिज मला मदत कर.'
निरनिराळ्या विचारांच्या वावटळीत गगनचे मन हेलकावे घेत होते. तर खाली रैना आपल्याच धुंदीत होती. किचनचे दार उघडून मावशी बागेत डोकवल्या. रैनाला पाहून त्यांनी हाक मारली, "मॅडम नाश्ता करायला या. दादा वहिनी वाट बघत आहेत."
त्यांच्या आवाजाने रैना भानावर आली.
"अहो मावशी, मॅडम काय म्हणता. तुमच्या मुलीच्या वयाची असेन मी. मला फक्त रैना म्हणा." एका नाजूकशा गुलाबी गुलाबावर हात फिरवत ती आत निघून गेली.
वरुन सर्व पाहणारा गगनही व्यायाम संपवून आत गेला. त्यालाही पटकन आवरून खाली जायचे होते. काल मम्मीने सांगितल्याप्रमाणे रैनाच्या गावी जे जायचे होते.
मम्मीला रैनाबद्दल कधी सांगावे या विचारातच त्याने अंघोळ वगैरे आटोपली. पांढऱ्या रंगाचा टी शर्ट, आणि गडद निळ्या रंगाची जीन्स घालून त्याने आरशात पाहिले. आवडीचा परफ्यूम अंगावर फवारून, टेबलवरील गॉगल शर्टाच्या खिशाला अडकवून नाश्त्यासाठी तो खाली आला.
तोपर्यंत मम्मी, पप्पा नाश्ता करून तयार व्हायला खोलीत गेले होते. रैना मावशींना डायनिंग टेबल आवरायला मदत करत होती. त्याला जिना उतरून येताना पाहून मावशींनी त्याच्यासाठी ताट लावले. काम झाल्याने रैना आपली बॅग घेण्यासाठी भूमीच्या खोलीकडे निघाली. जाताना तिने गगनकडे हसून पाहत गुड मॉर्निंग म्हटले. तो प्रत्युत्तर देईपर्यंत ती दोन पावले पुढे गेली होती.
क्रमशः
धन्यवाद
Next episode
ReplyDelete