तुम अगर साथ हो ... भाग आठ
रैना तिची बॅग घेऊन बाहेर पोर्चमध्ये उभी होती. गगनने तिची बॅग कारच्या डिकीत ठेवली. तो पर्यंत मम्मी पप्पा ही आले. मम्मीच्या हाती एक पिशवी होती.
"बाळा ही पिशवी पण ठेवून दे डिकीत."
"मम्मी, काय आहे ग यात?"
"काही नाही, थोडं सामान आहे तिथे लागणारं."
"मम्मा मी पण येते ना ग, मला पण बघायची आहे काकांची शेती." आतापर्यंत उठलेली भूमी म्हणाली.
"ए झिपरे आधी तोंड धुवून ये, म्हणे मी पण येते. आणि तुला ग काय कळतं शेतीमधील. काय बघणार आहेस तिथे, आँ?" तिला वेडावत गगन म्हणाला तसा भूमीचा पारा चढला.
"ए कावळ्या मला जर काही समजत नसेल तर तुला तर काय समजतं रे, ढेकळं? उगीच उठल्या उठल्या माझं डोकं खराब करू नकोस. सतत बघेल तेव्हा माझ्या मागे हात धुवून पडलेला असतो."
"अरे अरे का भांडताय तुम्ही दोघं. गगन उगाच का तिला डिवचतो? आणि भूमी मोठा भाऊ आहे तो तुझा. चेष्टा थोडी स्पोर्टिंगली घ्यायला शिक. उठ की सूठ चिडक्या बिब्ब्यासारख चवताळून उठणे कमी कर. वेळ काळ, आजूबाजूची माणसं बघत जा जरा दोघंही."
रैनाकडे डोळ्यांनी इशारा करत पप्पा थोडे रागानेच म्हणाले तसे दोघे गोरेमोरे झाले. कालपासून मी भूमीला सारखा चिडवतोय, रैनाच्या मनात आपली काय इमेज बनली असेल या विचाराने गगन अस्वस्थ झाला. तर शरमिंदी झालेली भूमी गगनकडे जाऊन त्याला सॉरी म्हणाली. तो ही खाल मानेने सॉरी असं पुटपुटत ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. पप्पा घुश्यात पुढे त्याच्या बाजूच्या सीट वर बसले. मागच्या सीटवर गगनच्या मागे रैना तर तिच्या बाजूला मम्मी.
थोडा वेळ शांततेत गेला. मम्मी मोबाइलमध्ये काही वाचत होत्या तर पप्पा समोरच्या रस्त्यावर नजर खिळवून होते. गगनने समोरचा आरसा थोडा ॲडजस्ट केला. आता त्यात त्याला रैनाच दिसू लागली. अधून मधून तो हळूच तिच्याकडे पाहत होता. कुणालाच त्याची ही चलाखी लक्षात नाही आली.
रैनाच्या घरी मात्र सुतकी वातावरण होते. पद्मा आणि दिनकर काळजी पोटी रात्रभर झोपले नव्हते. अशी घटना पहिल्यांदाच घडली होती. उजाडताच उठून दोघे न बोलता कामाला लागले. पद्माने घर आवरले. पाहुण्यांच्या पाहुणचाराची तयारी केली. देव मात्र अजूनही पारोसे पाण्यातच होते!
“अहो, शुभांगीचा कॉल आला होता, ते लोक निघालेत म्हणे.” व्हरांड्यात बसलेल्या दिनकरजवळ येऊन पद्मा म्हणाली.
“तू त्यांना काही सांगितले नाही ना, घडलेल्या घटनेबद्दल? सांगितले तर आपलीच नाचक्की होईल. मुलगी पाहायला तर बोलावले आणि मुलगीच नाही म्हणून. कुठे गेली असेल ही... पण सांगावं तर लागेलच ना. येवू दे त्यांना, मी काही तरी विचार करतो.”
दिनकर हताशेने म्हणाले.
सकाळी येणारी बस अजून आली नव्हती. तशी चौकशी करायला ते डिपोत जाऊन आले होते. त्या बसने मुलगी येईल ही आशा कुठेतरी मनात होती.
खिडकीच्या काचेला डोकं टेकून रैना बाहेरचे दृश्य पाहत होती. काल संध्याकाळपासूनचे प्रसंग तिच्या मनात रूंजी घालत होते. बंद पडलेली बस, लिफ्ट घेण्याच्या निमित्ताने गगनची झालेली भेट, त्याचे तिला घरी घेऊन जाणे, अनपेक्षित पाहुणीचे त्याच्या घरच्या लोकांनी केलेले आदरतिथ्य, भूमीचे तिला सहजतेने स्वीकारणे... जगात चांगुलपणा आहे यावर तिचा विश्वास बळकट होत होता. आपण एका वेगळ्याच जगात वावरत असल्याचे तिला वाटत होते. कॉलेज, सध्या चालू असलेलं युथ फेस्टिवल, तिचा ग्रूप यातलं काहीही याक्षणी आठवत नव्हतं.
अचानक तिचे लक्ष समोर गेले. गगनला तिच्याकडे पाहताना तिने पाहिले. त्याची नजर पाहून तिचे गाल आरक्त झाले. लाजून तिने पुन्हा नजर खिडकीच्या बाहेर वळवली. तिने रंगेहाथ पकडलेले पाहून तो ही लाजला.
'याला किती वेळा माझ्याकडे पाहताना मी पाहिलंय. काय आहे याच्या मनात? पण मला का आवडतंय त्याचं असं बघणं? एक गोड हुरहुर लागलीय... त्याची नजर पाहून पोटात अगदी खड्डा पडतोय... नजरेला नजर द्यायची हिंमत होतच नाही आहे. पण इतका देखणा, श्रीमंत मुलगा माझ्यासारख्या सामान्य मुलीला का भाव देईल? हा नुसता टाईमपास करतोय का आपल्यावर... रैना बेबी, सांभाळ स्वतःला. या मोठ्या माणसांना त्यांच्या पेक्षा कमी असलेले लोकं बाजूला आवडतात पण फक्त भाट म्हणून, वेळ घालवण्याचे एक साधन म्हणून. तू उगाच नसता विचार करून अपेक्षा वाढवून घेऊ नकोस.'
रैनाला तिच्या भावना नक्की समजत नव्हत्या.
अर्धे अंतर कापल्यावर मम्मीने पप्पांना विचारले,
“अहो सुनील भावोजींना कॉल केला का?”
“हो, निघण्याआधी केला होता. चांदोरीला पोहोचल्यावर परत कॉल करायला सांगितले आहे. आपण एक काम करू, आधी रैनाला तिच्या घरी सोडू. कालपासून पोर बाहेर आहे. शिवाय घरी निरोप ही कळवला नाही. घरचे किती काळजीत असतील. त्यानंतर सुनीलला आल्याचे कळवू." पप्पा म्हणाले.
"काय ग, थोडं पुढे झुक ना काहीतरी सांगायचं आहे... तू एक गोष्ट नोटीस केलीस का, कारमध्ये बसल्यापासून आपले युवराज काहीच बोलले नाहीत. सवयीने गाडी चालवतोय पण आजूबाजूला फारसे लक्ष नाही त्याचं." मम्मीच्या कानात पप्पा हळूच म्हणाले.
"हो ना, मी पण तोच विचार करतेय. नाहीतर एरवी हा ड्रायव्हिंग करताना किती बोलतो, गाणी गातो. आज तर एफएमचा आवाज बंद आहे हे सुध्दा लक्षात नाही आले त्याच्या."
गगन आपल्याच नादात होता. त्याच्या मनात आईला कसे आणि कधी सांगायचे हे विचार घोळत होते. शिवाय त्याने थोडंसं धाडस करून रैना साठी एक वस्तू आणली होती. ती तिला द्यावी की नाही याचाही विचार करत होता. आई वडिलांचे कुजबुजने आणि मग हसणे ऐकून त्याने त्यांच्याकडे पाहिले.
"काय झालं, का हसताय?" तिरप्या नजरेने त्यांच्याकडे पाहत त्याने प्रश्न केला.
"कुठे काय, आम्ही तर एफएम वरील गाणं ऐकून हसलो." साळसूदपणे पप्पा म्हणाले आणि दोघे परत हसायला लागले. दोघांचा खेळकर मूड परत आला होता. अचानक गगनच्या लक्षात आले, अरे आपण तर रेडिओचा आवाज वाढवलाच नाही. तो ओशाळला. काही न बोलता त्याने हात पुढे करून रेडिओचा आवाज वाढवला आणि गाणे ऐकू येऊ लागले,
कह दूँ तुम्हें या चुप रहूँ?
दिल में मेरे आज क्या है
जो बोलो तो जानूँ, गुरु तुमको मानूँ
चलो ये भी वादा है
अच्छा???
कह दूँ तुम्हें या चुप रहूँ?
दिल में मेरे आज क्या है
जो बोलो तो जानूँ, गुरु तुमको मानूँ
चलो ये भी वादा है
त्याला वाटले, किशोर कुमार जणू त्याच्याच भावना गाऊन दाखवतोय.
तोपर्यंत गाडी चांदोरीत येवून पोहोचली.
क्रमशः