तुम अगर साथ हो तो ... भाग नऊ
गाडी गावी पोहोचल्यावर रैना गगनला तिच्या घरच्या रस्त्याबाबत मार्गदर्शन करू लागली.
एका छान एक मजली घरासमोर तिने त्याला थांबायला सांगितले. दारासमोर कार थांबताच त्या आवाजाने पद्मा, दिनकर बाहेर आले. कारमधून उतरणाऱ्या रैनाला पाहून दोघांच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. पद्माच्या तर डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. कालपासून तिची काय अवस्था झाली होती याचे वर्णन करणे शक्य नव्हते. ती पटकन पायऱ्या उतरून अंगणात आली.
दिनकररावही सावरले. माणसं अनोळखी होती पण सोबत त्यांची मुलगी होती म्हणून त्यांनी पुढे येऊन हात जोडून सगळ्यांचे स्वागत केले.
"या, या ना आत तुम्ही."
“नको असू दे दादा, आम्हाला दुसरे एक महत्वाचे काम आहे, उशीर होईल. तुमची अमानत आम्ही सही सलामत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आलो आहोत. ” मम्मी म्हणाल्या.
“ताई, दादा म्हणतेस. मग भावाच्या घरी निदान कपभर चहा तरी घेवून जा." दिनकररावांनी परत आग्रह केला.
मम्मीने पप्पांकडे पाहिले. त्यांनी मानेनेच होकार दिला. गगन अजूनही कारमध्ये बसून होता. प्रवास संपला, बहुतेक आपले स्वप्न ही इथेच संपले या विचाराने त्याच्या हृदयात कालवाकालव होत होती. त्याने तिच्याकडे पाहिले. तिने ही हसून त्याच्याकडे पाहिले. तिच्या नजरेत आपल्याला हवे तसे भाव आहेत का याची तो चाचपणी करत होता. तिने नजर वळवली आणि बॅग घेऊन घराकडे चालू लागली. निराश होऊन तो तसाच बसून होता. पप्पांच्या ते लक्षात आले. मागे वळून त्यांनी हाक मारली, "गगन येतो आहेस ना?"
"हो पप्पा," म्हणत तो खाली उतरला. कार लॉक करत पायऱ्या चढून घरात गेला. आत गेल्यावर रैनाने सगळ्यांची ओळख करून दिली. नमस्कार चमत्कार झडले. मग तिने काल काय घडले ते सविस्तर सांगितले.
"सगळे प्रवासी निघून गेले. मी तुम्हाला फोन लावायला गेले तर मोबाइल डबक्यात पडून बंद पडला. म्हणून काही कळवू शकले नाही."
"आमचं नशीब थोर म्हणूनच रैनाला तुम्हाला लिफ्ट मागायची बुध्दी झाली. अन्यथा रोज पेपरमध्ये किती वाईट घटना ऐकायला मिळतात. आमच्या काळजाचा तर ठाव सुटला होता. काय करावं कसं करावं काहीच सुचत नव्हतं. तुमचे कसे आभार मानावे ते कळत नाही." पद्माने डोळ्याला पदर लावला.
"अहो, अहो वहिनी रडू नका अशा. तुमची मनस्थिती मी चांगलीच समजू शकते. तुमच्या जागी मी असते तर असंच काहीसं वाटलं असतं. मला ही एक मुलगी आहे." मम्मीने दिलासा द्यायचा प्रयत्न केला.
वातावरण थोडंसं भावनिक झाले होते. इतका वेळ गगन फक्त घर बघत बसला होता. ते बसले होते ती खोली बैठकीची असावी. साधी, स्वच्छ, नीटनेटकी होती. खोलीत जास्त फर्निचर नव्हते. एक दिवाण भिंतीला टेकून ठेवला होता तर बाकी दोन भिंतीला गाद्या, लोड तक्के टाकून भारतीय बैठक मांडली होती. मोठमोठ्या खिडक्यांना जुन्या साडीचे सुबक पडदे लावले होते. भिंतीवर असलेल्या भरतकाम आणि पेंटिंगच्या फ्रेम्स गृहिणीच्या हस्तकौशल्याचे प्रदर्शन करत होत्या. छान सकारात्मक वाटत होते तिथे.
"अंत भला तो सब भला. चला या निमित्ताने तुमची ओळख झाली. ही चांगलीच गोष्ट म्हणायची. बरं आम्ही थोडं घाईत आहोत तर..."
"अग्ग बाई, मी ही आनंदाच्या भरात विसरूनच गेले. थोडं थांबा आलेच मी." पदर सावरत पद्मा उठली. उठताना तिने रैनाला आत येण्याची खूण केली. दोघी मायलेकी लगबगीने स्वयंपाकघरात गेल्या.
रैनाने माठातील गार पाण्याचे ग्लास भरुन ट्रे मध्ये ठेवले. तेवढ्यात पद्माने साखरेची वाटी आणि चमचा त्यात ठेवला. तो ट्रे घेऊन रैना बैठकीत आली. सगळ्यांना चमचा भर साखर आणि मग पाण्याचे ग्लास दिले.
"मम्मी साखर का दिली हिने आपल्याला?" गगन कुजबुजला.
"बाहेरून आलेल्या माणसाला पाण्याच्या आधी गुळाचा खडा किंवा साखर द्यावी अशी प्रथा आहे. आधीच्या काळी लोक उन्हातान्हातून चालत किंवा बैलगाडीने यायचे. उन्हं बाधू नये म्हणून असं करायचे." मम्मीने उत्तर दिले.
"आई तू बाहेर काकूंसोबत बोलत बस. मी बनवते पोहे." आईच्या हातून कांदा काढून घेत रैनाने तिला बाहेर पाठवले. पाहुणीला पुरुषांमध्ये एकटं वाटू नये म्हणून पद्मा बाहेर गेली.
रैनाने पटकन कांदा, मिरची चिरुन पोह्यांना फोडणी दिली. प्लेटमध्ये पिवळे लुसलुशीत पोहे, त्यावर खोवलेले खोबरे, हिरव्यागार कोथिंबिरीची सजावट, लिंबाची फोड, दुसऱ्या वाटीत ताजे गुलाबजाम असा जामजिमा घेवून ती बाहेर आली.
आधी मोठ्यांना तिने प्लेट दिल्या. गगनला देत असताना त्याने अभावितपणे वर पाहिले. त्याच्या बोटांना चुकून स्पर्श होताच तिच्या अंगाला सूक्ष्म थरथर सुटली. मनात लाज दाटून आली. मान खाली घालून ती तिथून सटकली. स्वयंपाकघरात येऊन तिने धडधडत्या हृदयावर हात ठेवला. दीर्घ श्वास घेऊन नॉर्मल होण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात बाहेरून हाक आली, "रैना..."
स्वतःला सावरून रैना बाहेर आली.
"हे पोहे कुणी केले?" गगन विचारत होता.
"रैनाने केले. सगळा स्वयंपाक येतो तिला." आई कौतुकाने म्हणाली.
"छान झालेत." पप्पांनी मान डोलावली.
दिनकर आणि पद्माचे मन मोडवेना म्हणून नुसतं चहा घेण्यासाठी म्हणून आलेले लोक छान गप्पा मारत पोहे, गुलाबजामचा आस्वाद घेत होते. तासभर होऊन गेला होता पण त्यांच्या लक्षात नाही आले.
पप्पांना फोन वाजला. त्यावरील नाव पाहून त्यांनी बोलायला सुरुवात केली.
“हॅलो अरे सुनील, तुलाच कॉल करणार होतो. थोड्या वेळापूर्वी चांदोरीला पोहोचलो. थोडं महत्वाचे काम होतं रे. म्हटलं ते उरकून तुला कॉल करावा. बरं आता आम्ही इथले नवे स्नेही दिनकरराव देशमुख यांच्या घरी आहोत."
पप्पा पुढे बोलत होते तोच समोरून आवाज आला,
“काय! दिनकर देशमुखच्या घरी आहेस? आणि तिथे कशाला गेला आहात?"
"ती एक मोठी मजेशीर कहाणी आहे. भेटल्यावर सांगतो. गगन आणि वैजयंती ही आहेत सोबत. आता नाश्ता करतोय, दहा मिनीटात निघू इथून. मला जरा लोकेशन पाठव."
"अरे गृहस्था, मला थोडं बोलू दे. ऐक लोकेशन वगैरे काही नको, तू आहेस तिथेच थांब. नको निघूस. मीच येतो पाच मिनिटात.” म्हणत सुनीलने कॉल कट केला.
क्रमशः