तुम अगर साथ हो तो ... भाग अकरा

 तुम अगर साथ हो तो ... भाग अकरा 




रैना आपल्या खोलीत आली. तिला तर हे सगळं स्वप्नवत वाटत होतं. तिच्या आवडत्या खिडकीत बसून ती विचारात बुडाली.


'फक्त चोवीस तासात किती घटना घडल्या. आईचा फोन आला म्हणून चिडक्या मूडमध्ये मी निघाले, ते गगनच्या घरी पोहोचले.


किती हॅंडसम आहे तो आणि मर्यादाशील ही. केवढ्या सहजतेने त्याने त्याच्यासोबत जाणे सुरक्षित असल्याचे पटवून दिले. त्याच्या घरचेही तसेच, संस्कारी, प्रेमळ. आपल्या मुलाने ही कोण मुलगी आणली असा त्रागा कुणाच्या चेहऱ्यावर दिसला नाही. उलट किती आपुलकी दाखवली. भूमी थोडी अल्लड आहे, पण किती गोड आहे. तिने कसला गैरसमज करून घेतला मला पाहून. आणि मला पण ते चक्क आवडलंसुध्दा. न आवडण्यासारखं काय आहे त्यात, कुणालाही आवडेलच.'


मनामध्ये नव्याने उठलेल्या या उर्मीला मान्य करताना रैनाची तारांबळ उडाली होती.


‘काय बाई सांगू, कशी गं सांगू 


मलाच माझी वाटे लाज, काहीतरी होवून गेलंय आज...’


न राहवून तिने हातांच्या तळव्यात आपला चेहरा लपवला.


इकडे गगनचे कुटूंब आपल्या घरी येवून पोहोचले. त्यांना आलेले पाहताच भूमी धावतच सामोरी गेली.


“मम्मी, तुम्ही कुठे गेला होतात. विचारलं तर काही सांगितले ही नाही. आणि दादा इतका का खूश दिसतो आहे? सकाळी तर तोंड पाडून गेला होता?”


तिने प्रश्नांची झोड उठवली.


“अगं आम्ही एका चांगल्या कामासाठी गेली होतो. ते मस्त पार पडलं. तुझा दादा का खूश आहे ते तू त्यालाच विचार.”


मम्मी मजेने म्हणाल्या. आणि भूमीचं चिटकं भूत गगनला जावून चिटकलं.


“ऐ दादा सांग ना रे.”


“सांगतो बस इथे. भूमी ती रैना कशी वाटली तुला?”


“रैना, खूपच मस्त आहे ती. काही गोष्टी काकूबाई टाईप बोलते. पण ओवरऑल फोर अँड हाफ स्टार्स आउट ऑफ फाईव. पण तू हे का विचारतो आहेस?”


“कारण ती आता तुझी वहिनी होणार आहे.” तिचा प्रेमाने गालगुच्चा घेत गगन म्हणाला.


“अरेचा, हे कधी झाले? ओहो, मीन्स काल मी म्हणाले ते बरोबर होतं तर. तू आणि रैना.... आणि तू मला हे कधी सांगितलं नाहीस, हो ना?” भूमी संशयाने डोळे बारीक करत म्हणाली.


“नाही गं माझी आई, तसं काही नाही आहे. मी  याआधी तिला कधी पाहिलं ही नव्हतं. फक्त योगायोग होता तो. पाहिजे तर तू मम्मीला जावून विचार. ” म्हणत गगनला भूमीला हात धरून उठवले आणि दाराच्या बाहेर काढून दार बंद केले.


भूमीचे भूत मम्मीला झपाटायला निघून गेलं आणि गगन बेडवर पहुडला. 


गगन आतुरतेने रैनाच्या प्रतिसादाची वाट पाहत होता. पण आता रात्र झाली होती तरी अजून तिचा कॉल वा मेसेज आला नव्हता.


‘का नाही मेसेज केला हिने अजून, की हे आवडणं फक्त माझ्या बाजूनेच आहे. पण निदान तसे सांगायला तरी तिने मेसेज करावा ना? तसं स्पष्ट शब्दात सांगितलं होतं मी तिला.’



रैना हातात ते कार्ड धरून द्विधा मन:स्थितीत बसली होती. तिला गगन आवडला नाही असे नव्हते, पण तिला इतक्यात लग्न करायचे नव्हते. निदान बीई पुर्ण होईपर्यंत तरी नाही. आई बाबांचे मन वळवून तिने आपले शिक्षण जारी ठेवले होते. तिने नेहमीच शिक्षणाला प्राधान्य दिले होते. होस्टेलवर राहणाऱ्या, नवीन स्वातंत्र्य मिळालेल्या काही मुलींसारखे उछृलंख वर्तन नव्हते तिचे. अर्जुनाला जसा फक्त पक्षाचा डोळा दिसत होता तसा रैनाला दिसायचा, फक्त अभ्यास आणि आपले भविष्य. लग्नानंतर आपले भविष्य, स्वप्न यांचे काय होईल याची तिला सध्यातरी काही कल्पना नव्हती. त्यामुळे काय निर्णय घ्यावा समजत नव्हते. आई बाबा तर तिचा होकार गृहीत धरून पुढच्या तयारीला लागले सुध्दा होते. 


'गगनसोबत बोलून हे सांगून टाकावे, की खूप घाई होईल ही? बोलून तर पाहू, त्याचे, त्याच्या घरच्या माणसांच्या याबाबतीत काय म्हणणे आहे ते तरी समजेल. उगीच काहीही गृहीत धरण्यात काय अर्थ आहे...'



अखेर तिने कार्डवरून त्याचा नंबर सेव केला आणि हेलो असा मेसेज पाठवला. आणि मोबाइल हातात धरून ती वाट पाहत बसली. दहा मिनिटांनी दोन ब्लू टिक दिसल्या.


‘हेलो, मला वाटले तू मेसेज नाही करणार.’


गगनचा रिप्लाय आला.


‘ओह, करायला नको होता का?’


‘अगं, ॲक्चुअली मी वाट बघत होतो तुझ्या मेसेजची... मीन्स माझ्याकडे तुझा नंबर नाही ना आणि इतर कुणाला मागणे बरोबर वाटत नाही म्हणून. आता सेव करेन.’ 


‘अच्छा, ठीक आहे.’ 


रैनाला पुढे काय बोलावे सुचत नव्हते. विषय कसा काढावा ते समजत नव्हते. तर गगन तिच्या बोलण्याची वाट पाहत होता. न राहवून त्यानेच मेसेज केला.


‘परत कधी जाणार आहेस?’


‘उद्या, कॉलेज आहे ना. सुट्टी घेणे परवडणार नाही. नंतर सगळं कंप्लीट करत बसावं लागतं.'


‘हां ते ही खरंय. बरं मी पण उद्याच जातोय परत तर जाता जाता तुला सोडू का होस्टेलवर?’ 


रैनाने दोन मिनीट विचार केला. त्याच्यासोबतचा पहिला प्रवास आठवून ती रोमांचित झाली. पण स्वतःला सावरून तिने उत्तर दिले,


‘थैंक्स, पण बाबा येणार आहेत सोबत. त्यांचे काही काम आहे म्हणे.'


हे वाचून गगनचा हिरेमोड झाला. एक छानशी लॉंग ड्राइव झाली असती आणि अनायसे तिला समजून घेण्याची संधी मिळाली असती.


पण इट्स ओके, मिस्टर गगन. चलता हैं, ऐसे मौक़े तो और कई आएँगे...


त्याने मनाची समजूत काढली आणि तिला बरं ठीक आहे लिहून पाठवले. 


दोन दिवसांत हॉस्टेल, कॉलेज, फ्रेंडसर्कल याची तिला आठवण ही झाली नव्हती. गगनच्या प्रश्नाने तिला अचानक आठवले की ग्रुपच्या कोणत्याच मेसेजला तिने रिप्लाय दिला नाही. 


'अरे देवा, उद्या गेल्यावर सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना तोंडाला फेस येईल. यांना जर गगनबद्दल, लग्नाबद्दल समजले तर चिडवून माझं जगणं कठीण करतील हे लोक. त्यांना काही सांगू नये हेच बरं. समजेल तेव्हा समजेल.' 


आईने सोबत न्यायला दिलेली गुलाबजामचा डबा काळजीपूर्वक बॅगेत ठेवत रैना विचार करत होती. तिने घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य हे येणारा काळच ठरवणार होता. पण या एका निर्णयामुळे काही जणांच्या भल्या-बुऱ्या मनसुब्यांवर पाणी फिरणार होते एवढे मात्र नक्की.


क्रमशः 

Post a Comment (0)
Previous Post Next Post