तुम अगर साथ हो तो ... भाग दहा

 तुम अगर साथ हो तो ... भाग दहा 




“अहो, काय म्हणाले भावोजी?” पप्पांचा चेहरा पाहून मम्मीने विचारले.


“इथेच थांब म्हणाला. काही समजले नाही असं का म्हणाला.” पप्पा गोंधळून गेले होते.


दहा मिनीटात सुनील हजर झाले. सोबत शुभांगीही होती.


"शुभा वन्स आणि सुनील भाऊ! या ना." पद्मा चकीत झाली. 


"तुम्ही यांना ओळखता?" दिनकररावांनी सुनीलना विचारले.


"म्हणजे काय! अहो दाजी ओळखतो नाही खूप चांगला ओळखतो." 


गगनच्या पप्पांकडे वळून सुनीलनी विचारले,

“माधव, तुला दिनकरचा पत्ता कुणी दिला?”


“यांची मुलगी, रैनाने.”


“घ्या... याला म्हणतात योगायोग. अहो वहिनी, रैनालाच पाहायला तर मी तुम्हाला बोलावले होते.” खो खो हसत सुनील म्हणाले.


“म्हणजे???” सगळे बुचकळ्यात पडले. 


“वाघाचे पंजे”, म्हणत मम्मी हसल्या. त्यांना सगळ्या प्रकाराचा उलगडा झाला होता.


"माधव आणि वैजयंती वहिनी, हे दिनकर देशमुख माझे मेव्हणे, शुभांगीचे बंधू. जरी सख्खं नातं नसले तरी सख्ख्यापेक्षा जास्त जवळचे. दाजी आणि ताई, हे माधव मोहिते आणि त्यांचे कुटुंब. हा माझा घनिष्ट मित्र आहे. यांच्या चिरंजीवांसाठी मी रैनाचे नाव सुचवले होते." सुनीलने औपचारिक ओळख करून दिली. 


"आता मला सांग माधव, रैना तुला कुठे भेटली?" 


माधव म्हणजे गगनच्या पप्पांनी सुनील आणि शुभांगी यांना परत एकदा रैना आणि गगनची भेट, त्याचे तिला घरी आणणे, रात्रीचा तिचा त्यांच्या घरी मुक्काम वगैरे घटना सविस्तर सांगितल्या. 


"या ऋणानुबंधाच्या गाठी असतात. आपण काही केले नाही केले तरी भेटणारे भेटतातच." सगळ्यांकडे पाहत शुभांगी हसत म्हणाली.


इतका वेळ मोकळेपणाने वावरणारी रैना लाजून केव्हाच स्वयंपाकघरात पळाली होती...


आणि गगन?


त्याला तर नेमकं कसं रिॲक्ट व्हावं तेही समजत नव्हते. पहिल्या भेटीत तो रैनाच्या प्रेमात पडला होता. मनातील भावनांना मूर्त स्वरूप द्यायच्या आधीच तिच्या कायमच्या विरहाच्या कल्पनेने त्याला व्याकूळ केले होते. पण आता प्रसंगाला अशी कलाटणी मिळाली होती की त्याचे प्रेम कायमचे त्याचे होण्याची शक्यता निर्माण झाली होती. 


आपल्याला मनापासून हवी असलेली व्यक्ती आपली होणे यासारखा  कुठलाच आनंद नाही. तो अक्षरशः स्वर्गात विहार करत होता. जगातील सगळ्या देवांचे आधीच आभार मानून झाले होते. 


रैनाच्या सहवासात गगनचे मंतरलेपण त्याच्या पालकांनी पाहिले होते. गेल्या काही तासांत रैनाला त्यांनी चांगले पारखले होते. ती गगनसाठी योग्य वधू आहे असा त्यांना विश्वास होता.


"चला मी स्वयंपाकाला लागते. सगळे जेऊनच जा," पद्माने शुभांगीला मदतीला घेऊन स्वयंपाकाला सुरुवात केली. बघायला येणारे पाहुणे हेच हे माहीत नसले तरी तिने कालपासून जुजबी तयारी केली होतीच. दोघींनी मिळून तासाभरात उत्तम बेत तयार ठेवला. 


नेहमी आईला स्वयंपाकात मदत करणारी रैना मात्र आज तिकडे फिरकली नव्हती. ती चक्क मागील दारी जाऊन कडूलिंबाच्या पारावर बसून होती. गेले काही वर्षे एकटी मोठ्या शहरात राहत होती. अनेक लोकांमध्ये तिचा वावर होता. एक प्रकारचा आत्मविश्वास तिच्यात आला होता. पण आज तेथील लोकांना सामोरे जाण्याची तिला अनोखी लाज वाटत होती. पण तशी कितीवेळ बसून राहणार. शेवटी आईने तिला हाक मारली.


"चल जेवायला वाढायचे आहे मंडळींना." तिच्या हातात लावलेले ताट देत ती म्हणाली.


बैठकीच्या खोलीत सतरंजीच्या पट्टया घातल्या होत्या. प्रत्येकासमोर एक एक पाट ही ठेवला होता. अगरबत्ती ही लावून ठेवली होती. गगनचे कुटुंब, दिनकरराव आणि सुनील सतरंजीवर बसले होते.

'इतकी तयारी कधी आणि कुणी केली. मी इतका वेळ बाहेर बसले होते का!' आत्याने आणून दिलेले ताट प्रत्येकासमोरील पाटावर मांडत रैना विचार करत होती. 


साम्रसंगीत जेवण उरकले. मम्मीने डिकीत ठेवलेली पिशवी आणवून रैनाच्या हाती दिली. त्यात पेढ्याचा पुडा आणि हळदी कुंकू होते. 

"मुलगी बघायला जाताना हे घेऊन जातात. आता कळलं काय होते त्या पिशवीत?" गगन हसला. 


"मग माधव, काय म्हणतो पसंत आहे का आमची मुलगी तुम्हाला?" सुनीलने औपचारिकपणे विचारले.


"अरे मी काय सांगणार जे लग्न करणार त्यांना विचार की." ते हसत म्हणाले. 


"रैना, गगनला तुमचे घर दाखवून आणते का?" मम्मीने विचारले.


रैनाच्या पोटात गोळा आला. "काकू तुम्ही पण चला ना. तुम्ही ही नाही पाहिले ना आमचे घर." ती उत्तरली. तिचा निरागसपणा पाहून सगळ्यांनी डोक्यावर हात मारून घेतला. 


"अगं मी बघेन नंतर, तू याला दाखवून आण." हसू आवरत त्या म्हणाल्या. 


नाईलाज झाल्यासारखी ती उठली. गगन चुपचाप तिच्या मागोमाग गेला. 


"कसं व्हायचं हीचं!" तो मनातच पुटपुटला. 


स्वयंपाकघर, माजघर, मागचे अंगण दाखवत रैना त्याला गच्चीवर घेऊन गेली. समोरासमोर दोन बेडरूम आणि मध्ये मोकळी जागा अशी रचना होती. 


"मध्यभागी ही इतकी मोकळी जागा का सोडली?"


"उन्हाळ्यात वाळवणं करायला, धान्य वगैरे वाळविण्यासाठी... ही माझी बेडरूम आणि ती आई बाबांची." खोल्यांकडे बोट दाखवत ती म्हणाली.


"आतून दाखवणार नाहीस का?"


"अम्म, तुमच्या घरातील बेडरूमसारखी मॉडर्न नाही आहे. साधी खोली आहे त्यात काय बघण्यासारखं?" रैनाने आत न्यायचे टाळले.


"ओके, मला तुला काही तरी सांगायचे आहे. कदाचित आतापर्यंत तुझ्या ते लक्षात आले असेल ही." कठड्याला रेलून गगनने बोलायला सुरुवात केली. "आय लाईक यू. आय वूड लाईक टू स्पेंड माय एंटायर लाईफ विथ यू. पण तुलाही तसेच वाटले पाहिजे असा माझा हट्ट नाही. हां तशी इच्छा जरुर आहे पण तुझा नकार असला तरी हरकत नाही. कारण तुझी निवड दुसरी असू शकते. समज असं असेल तर मला तुझा मित्र समजू शकतेस. हे माझं बिझनेस कार्ड, त्यावर माझा नंबर आहे. होकार किंवा नकार काहीही पण मला ते डायरेक्ट तुझ्याकडून ऐकायचं आहे." तिच्या हाती विजिटिंग कार्ड देत तो म्हणाला. 


ती तशीच उभी होती. काही क्षण शांततेत गेले. अचानक त्याला काहीतरी आठवले आणि खिशातून गुलाब काढून त्याने तिच्यासमोर धरला. न बोलता तिने तो घेतला. हा तोच गुलाब होता ज्यावरून ती सकाळी हात फिरवत होती. 


क्रमशः 

Post a Comment (0)
Previous Post Next Post