तुम अगर साथ हो तो ... भाग बारा
दुसऱ्या दिवशी सकाळच्या बसने दिनकररावांनी रैनाला होस्टेलवर पोहचवले. रेक्टर मॅडमला जातीने भेटून त्यांनी झालेला गोंधळ, गैरसमज सांगितला. त्यामुळे त्यांनी रैनाला काही विचारले नाही.
"साहेब तुम्ही स्वतः येऊन माझ्या कानावर घातलं हे बरं झालं. नाहीतर माझ्या मनात कित्येक प्रश्न होते. रैना तशी चांगली मुलगी आहे हो. आपल्या मुलीचा आपण भरवसा देऊ शकतो पण लोकांच्या मनातलं कुठं सांगू शकतो. असू दे, तुम्ही काही काळजी करू नका." मॅडमने त्यांना निरोप दिला.
'हॅलो, मी परत आलेय.' रैनाने गृपवर मेसेज केला. मेसेज पाहता क्षणी सगळे तिच्यावर तुटून पडले. मिहीका, हंसिकाने तर अक्षरशः शिव्यांचा भडीमार केला.
"एक जवळचे नातेवाईक आजारी होते म्हणून असं अर्जंट जावे लागले. मी पाहिले तुमचे मेसेजेस पण वेळ नव्हता रिप्लाय द्यायला. शिवाय ते बरं ही वाटलं नसतं ना म्हणून." मनातल्या मनात सगळ्या नातेवाइकांची माफी मागून रैनाचे ठोकून दिले.
फेस्ट संपला होता. आता सगळी पोरं झडझडून अभ्यासाला लागली. नोट्सची देवाण घेवाण होऊ लागली. ज्यांची हजेरी कमी भरली होती ती मुलं नेमाने हजेरी लावू लागले. सबमिशनचा धुराळा उडाला. कट्टे, कॅन्टीन सगळीकडे अभ्यासाचे वारे वाहत होते.
रैना आधीपासूनच नेमाने अभ्यास करत होती त्यामुळे तिला इतका ताण जाणवत नव्हता. हंसिका, मिहीका, वैदेही, रैना, हर्षल, कार्तिक, श्रेयस, अनिकेत आणि झुबेर असा त्यांचा छानसा गृप होता. रैना, हर्षल आणि वैदेही अभ्यासात हुशार होते. बाकीचे ठीकठाक होते. एकमेकांना अभ्यासात, सबमिशनसाठी मदत करायचे.
कॉलेज सुरू झाल्यापासून हंसिका रैनाच्या सोबत होती. ती तिची कॉलेजमधील पहिली मैत्रीण होती. रैनाला ही गुबगुबीत, गोरी गोजरी गुजराती मैत्रीण आवडायची. तसे तिचे सगळ्यांबरोबर सूर जुळायचे पण हंसिकाबद्दल मनात एक सॉफ्ट कॉर्नर होता. त्याचे कारण ही तसेच होते.
हंसिकाला चित्रकार व्हायचे होते. तिला इंजिनिअरिंगमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता पण आईवडिलांच्या दबावाखाली येऊन तिने ही साईड घेतली होती. कामापुरता अभ्यास करून ती दरवर्षी पास तर व्हायची. पण आता हे शेवटचे वर्ष होते. चांगले मार्क मिळवणे आवश्यक होते. नाहीतर तिची आई वरसंशोधनाला लागली सुध्दा होती.
"रैना, मला हे डेरिवेशन समजव ना, किती वेळा केलं पण डोक्यात जातच नाही."
रैनाने तिला समजावले आणि स्वतःच्या पुस्तकात डोकं घातले. काही वेळाने तिने पाहिले तर तोंडात पेन घालून हंसिका शून्यात नजर लावून बसली होती.
"हंसिका अगं काय झालं, समजलं नाही का, परत एकदा एक्स्पलेन करू का?"
"अं... नको... म्हणजे तशी गरज नाही."
"काही प्रॉब्लेम आहे का? तू नेहमीसारखी वाटत नाहीस आज."
दोघी रैनाच्या हॉस्टेलवरील रुममध्ये अभ्यास करत होत्या. हंसिकाचे गप्प गप्प राहणे रैनाच्या लक्षात आल्याशिवाय कसे राहील!
अचानक हंसिकाचे डोळे भरून आले.
"रैना काल आई मला तिच्या एका मैत्रिणीच्या घरी घेऊन गेली होती. मैत्रिणीचा मुलगा जो अब्रॉडला राहतो त्याला भेटवायला. अनऑफिशियेली मॅच मेकिंग करत होत्या या दोघी आमचं." हंसिका आता चक्क रडायला लागली.
"अगं अगं शांत हो. नुसतं भेटलं बोललं म्हणजे लगेचच लग्न थोडी होतं. तुम्ही फक्त भेटलात यात इतकं अपसेट होण्यासारखं काय आहे?" तिला याबद्दल इतक्या अधिकारवाणीने सांगताना रैनाच्या नजरेसमोर गगनचा चेहरा चमकून गेला आणि तिच्या गालावर लाली पसरली. तिने झटक्यात सावरून हंसिकाकडे पाहिले पण तिचे लक्ष नव्हते.
"आम्ही भेटलो यात अपसेट होण्यासारखे काही नव्हते पण त्याने मला जे सांगितले ते ऐकलं तर कदाचित तुझी ही अशीच अवस्था होईल.
"असं काय म्हणाला तो?" डोळे बारीक करत रैनाने विचारले.
उत्तरादाखल हंसिकाने जे सांगितले ते ऐकून तिला खरंच धक्का बसला.
"अशी ही नीच माणसं असतात का जगात. बाळा तू अशा लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. सध्या तू फक्त आणि फक्त अभ्यासाकडे लक्ष दे. तुला जर कमी पर्सेंटेज मिळाले तर काकूंना अजून एक कारण मिळेल तुझ्या मागे लागण्याचे." थोडं थांबून रैना पुढे म्हणाली.
"असा प्रस्ताव तुझ्यासमोर ठेवायची त्याची हिंमत कशी झाली तेच मला समजत नाही."
"तो म्हणाला माझ्यासारख्या जाड मुलीसोबत लग्न करायला आमच्या कम्युनिटीमधील कुठलाच मुलगा तयार होणार नाही. त्यामुळे मी हा प्रस्ताव स्वीकारावा. यात आमच्या दोघांचा फायदा होईल. कुणाला काही कळणार नाही. हे सगळं मॉममुळे होतंय. ती खूप जास्त काळजी करते माझी आणि हे ते सगळ्यांना सांगत फिरते. मग अशा लोकांना आयती संधी मिळते.... पण म्हणून मी इतकी चीप आहे की त्याने असा घाणेरडा प्रस्ताव मांडावा?" रैनाच्या कुशीत शिरून हंसिका रडत होती.
"शांत हो, तुझे वजन कमी करण्यासाठी ही आपण प्रयत्न करू. तू नक्की फिट होशील, फिजिकली, मेंटली. त्याचा नक्की फायदा होईल तुला. आणि तू काकूंवर चिडून राहू नकोस. एका आईचे मन आपण नाही ओळखू शकत. त्या तुझी काळजी करतात ग. काहीही असो एक लक्षात ठेव, मी यात कायम तुझ्याबरोबर आहे. चल तोंड धुवून घे आपण मस्त आइसक्रीम खाऊन येऊ."
आइसक्रीमचे नाव घेताच हंसिकाने डोळे पुसले. पटकन उठून चेहरा धुवायला ती बेसिनकडे पळाली. रैनाने पुस्तक मिटून ठेवले आणि कपडे नीट करत रूमचे कुलूप हातात घेतले.
आईसक्रीम पाहून हंसिकाचा मूड परत आला होता. दोघी मस्त गप्पा मारत खात होत्या, रैनाच्या मोबाईलचा नोटिफिकेशन टोन वाजला. तिने उचलून पाहिले तर गगनचा मेसेज होता,
"हॅलो, इफ यू डोन्ट माईंड, एक आठवण करून देईन म्हणतो.
.
.
.
.
.
.
तू अजूनही ऑफिशियेली हो की नाही सांगितलेलं नाहीस. वाट बघतोय उत्तराची."
मेसेज वाचल्यावर तिच्या लक्षात आले, अरेच्चा खरंच की आपण त्याला काहीच सांगितलं नाही. तिने फक्त हसण्याचा ईमोजी पाठवला. आतुरतेने वाट पाहणाऱ्या गगनने डोक्याला हात लावला.
"असू दे हरकत नाही, पण हा नकार तर नक्कीच नाही." स्वतःशी बोलत त्याने पुढच्या पेशंटला बोलवायला बेल वाजवली.
क्रमशः