वाढदिवस

 वाढदिवस 

✍️ योगेश साळवी 

    'मुझे यार ना मिले तो मर जावा...' ची रिंगटोन फोनवर वारंवार वाजू लागली आणि साक्षीला शेवटी फोन घ्यावाच लागला.

    " साक्षी बेटा., वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा " तिच्या बाबांचे मित्र दांडेकर काका फोनवर होते.

      " थँक्यू काका..." काकांशी थोडा वेळ बोलून तिने फोन ठेवला. लहानपणापासून काका तिला ओळखत होते. आज पंचवीशीत ... जवळजवळ लग्नाच्या वयाला आलेली साक्षी त्यांच्यासाठी लहानच होती.  दांडेकर काका तिच्या घराशेजारीच राहायचे.

        साक्षीच्या आई-बाबांचा कालच फोन आलेला. काल म्हणजे मध्यरात्री... आज बारा वाजून गेल्यावर.. आजचा दिवस सुरू झाल्यावर. घरापासून लांब राहून दूरच्या मावशीकडे पेइंगेस्ट म्हणून मुंबईला नोकरी करणारी मुलगी म्हणून बाबांना तिचे विशेष कौतुक होतं. खरं तर तिच्या कंपनीने ह्युमन रिसोर्सेस ( एचआर ) साठी तिची नेमणूक झाल्याचे तिला कळवलं तेव्हा मुंबईला एकटी राहून ही नोकरी कशी करणार म्हणून बाबा काळजीत पडले होते. पण हा प्रश्न त्यांच्या लाडक्या लेकीने सोडवला. तिच्या आईची एक दूरची बहीण माटुंग्याला एकटीच राहायची. तिने मान्य केलं साक्षीला पेइंग गेस्ट म्हणून तिच्या टू रूम  किचनमध्ये स्वतः बरोबर ठेवायचं. अशा रीतीने राहायची आणि जेवणाची सोय झाली आणि साक्षी मुंबईला आली. या गोष्टीला जवळजवळ सहा वर्षे उलटून गेली.

      आज वीस जून. साक्षी चा वाढदिवस. काल रात्री बारा वाजल्यापासूनच साक्षीच्या फोनवर वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फोन येऊ लागले होते. आई बाबांचा फोन झाल्यावर

दोन-तीन खास मैत्रिणींचे... दोन-तीन अशाच नातेवाईकांचे फोन झाले.. आणि मग साक्षी ज्याची आतुरतेने वाट पाहत होती तो फोन आला.

      फोन होता मिलिंद चा. मिलिंद.. तिचा होणारा नवरा.

मिलिंद स्थळ तिच्या आईने आणलेलं. मिलिंद जेंव्हा तिला बघायला आला... तेव्हाच खरं तर तिला आवडलेला. बाकी सर्व मग औपचारिकताच उरली होती. एका बहुराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामावर असलेल्या मिलिंद घरच्यांना पण पसंत आलेलाच. येत्या सहा महिन्यातच दोघांचा साखरपुडा होणार होता.

      दोन-तीन दिवसापूर्वीच मिलिंद कंपनीच्या कामासाठी टूर वर जाणार होता... म्हणून मग आधीच नजीकच्या झालेल्या भेटीत मिलिंदने साक्षीला सोन्याचा एक नाजूक कडा भेट दिला होता. वाढदिवसाला तो नसणार त्याकरता वाढदिवसाचे स्पेशल गिफ्ट आधीच म्हणून. मस्त कलाकुसर होती त्यावर... नामांकित सोने सराफा कडून घेतला होता तो. किंमत विचारली साक्षीने तर तो म्हणाला...

' तुझ्यासारख्या अनमोल व्यक्तीसाठी हा कडा फारच स्वस्त आहे...'.

       साक्षीने पाठीत बुक्का मारलेला त्याच्या... उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवतो म्हणून...

        " लग्नानंतर बघते ना... किती गिफ्ट देतोस मला ते.. सगळेच नवरे लग्नाआधी असं मस्का लावायची काम बरोबर करतात..."  मनगटावर मिलिंद ने चढवलेला कडा कसा दिसतोय ते निरखत साक्षी लटक्या रागाने म्हणाली होती.

        आज रविवार. वाढदिवस नेमका सुट्टीच्या दिवशी असल्याने साक्षी निवांत होती. दहा सव्वादहा ला तिच्या खास मित्र-मैत्रिणींचा ग्रुप येणार होता... तिचा वाढदिवस साजरा करायला. साक्षीने भराभरा सर्व आवरले आणि ती त्यांची वाट पाहत तयार होऊन बसली.

       नेमक्या वेळेवर सर्व मंडळी आली. केक आणला होताच त्यांनी... मग कल्ला करत केक कटिंग पार पडलं.. कोणीतरी मग टूम काढली.. मोमोज् खायला जाऊ म्हणून. मग त्यांचा सारा कंपू माटुंग्याच्या  प्रसिद्ध साशाज् मोमोज रेस्टॉरंट मध्ये मोमोज् वर ताव मारायला गेला. मस्त गरमागरम मोमोज् ची पार्टी झाली. जेवणाची स्वतंत्र गरजच राहिली नाही.  'बस्किन रॉबिन्स ' मध्ये आईस्क्रीम चोपून सर्व मंडळी आपापल्या घरी परतली.

        घरी परतल्यावर मोमोज् चं एक मोठं पार्सल मावशीकडे सोपल्यावर फ्रेश व्हायला साक्षी बाथरूम मध्ये गेली. चेहऱ्यावर पाण्याचा हबका मारणार इतक्यात तिचं लक्ष मनगटावर गेलं आणि तिच्या काळजाचा जणू ठोका चुकला.

       तिच्या मनगटावर मिलिंद नुकताच गिफ्ट म्हणून दिलेलं सोन्याचे कडं... ते ब्रेसलेट नव्हतं.

        साक्षी क्षणभर संभ्रमित झाली. आज बाहेर जाताना घातलं होतं का ते आपण ?? का उगाचच घाबरतोय..??

        साक्षीने कपाट उघडून ज्वेलरी बॉक्समध्ये पाहिलं. नव्हतं तिथे ते कडं.... 

      सुकन्या.. तिची मैत्रीण रेस्टॉरंट मध्ये त्या कड्याचे कौतुक करत म्हणालेली की सोने फार छान चमकतय प्रकाशात म्हणून... ते तिला आता आठवलं.

      मिलिंद रात्री फोन करील... वाढदिवस कसा साजरा झाला ते विचारायला. कसं सांगूया त्याला की त्याने गिफ्ट दिलेलं हरवलं म्हणून... आपल्या वेंधळेपणाला हसेल की रागावेल तो?? छे.... अगदीच मूर्खपणा झाला. आज घालून गेलो नसतो तर हरवलंच नसतं ते. पण ते घातल्यावर मिलिंद बरोबर असल्याची जाणीव व्हायची म्हणून तर घातलेले आपण ते. चांगलं शेकलं की हे प्रकरण आपल्यावरच. दहा-पंधरा ग्रॅमचे तरी सोनं असणार त्यात. आजकालची सोन्याची किंमत पाहता साठ- सत्तर हजार तरी कुठे गेले नाही. साक्षी चा वाढदिवसाचा आनंद कुठल्या कुठे पळून गेला.

        आपण लग्न नवीन घरी जाऊ सहा..सात महिन्यात तेव्हा सासरच्यांना माहित होईलच हे. काय विचार करतील आपल्याबद्दल? साक्षीच्या डोक्यात नवीन नवीन प्रश्न उपस्थित होत होते.

        " मावशी मी आले ग.. जरा जाऊन " साक्षीने मावशीला सांगितलं.

        " अगं आत्ताच तर आलीस ना ....गरम गरम जेवून जा कुठे जायचं ते...." मावशीला सुद्धा काय झालं तरी आपल्या तुमच्या भाचीची काळजी होतीच.

         "नको मावशी जेवण... आम्ही पोटभर खाऊन आलोय आणि आता तर नकोच ....परतल्यावर खाईन काहीतरी " साक्षी घाई घाईने म्हणाली.

          साक्षीने तिची जुपिटर स्कूटी काढली आणि मोमोज् रेस्टॉरंट कडे वेगाने निघाली. रेस्टॉरंटच्या बाहेर स्कुटी उभी करून ती जमिनीकडे पाहत पाहतच आत शिरली... हो.. न जाणो जमिनीवर पडलेले मिळायचे एखाद्या वेळेस म्हणून.

         आत चौकशी केली असता रेस्टॉरंटच्या स्टाफ कडून नम्रपणे नकार आला. अशी ग्राहकांची काही वस्तू मिळाली तर आम्ही आवर्जून बाजूला ठेवतो असं सांगितलं सुद्धा गेलं.

       मग  दीड तासापूर्वीच भेट दिलेलं 'बस्किन रॉबिन्स 'आईस्क्रीमचे शॉप तिने लगोलग पालथं घातलं. झालंच तर जिथे सर्व मित्र-मैत्रिणी गप्पांसाठी रेंगाळल्या होत्या ती जागाही नीट नजरे खालून घातली.

      आता मात्र साक्षीचा धीर सुटत चालला होता. थोड्याच वेळापूर्वी गोड झालेल्या तोंडाला कडूशार चव येऊ लागली.

विमनस्कता ,उदासी... खिन्नता सगळी एकदमच आली.

घरी येऊन तिने आपल्या खोलीचे दार लावून घेतलं आणि धाडकन पलंगावर अंग लोटून दिलं. उशीमध्ये आपला चेहरा 

खूपसून ती मूकपणे हुंदके देऊ लागली.

         मध्ये रेश्मा चा फोन येऊन गेला तेव्हा ब्रेसलेट हरवल्याची कथा तिच्या तोंडून निघून गेली... मग सगळ्यांचेच फोन आले... सगळेच आता ब्रेसलेटच्या चिंतेत होते. वाढदिवस बाजूलाच राहिला. माटुंगा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवायचा विचार पण पुढे आला.

        पलंगावर पडल्या पडल्या कधीतरी मग साक्षीचा डोळा लागला. असा तास दीड तास उलटून गेला असेल...'यार ना मिले तो मर जावा....' ची कॉलर ट्यून जोरात वाजू लागली आणि त्या आवाजाने तिला जाग आली. शाल्मलीचा कॉल होता. आता ही पकवणार आपल्याला... ब्रेसलेट कडा मिळाला का विचारणार... आपण कसा वेंधळेपणा केला यावर आपलं बौद्धिक घेणार... वाढदिवसाच्या दिवशी असा चर्चेचा विषय व्हायला नको होता.

        शामू चा फोन घ्यावा की न घ्यावा असा विचार करत शेवटी साक्षीने न राहून तो घेतलाच.

        " हा... बोल शामू...." साक्षी निरुत्साह दाटलेल्या आवाजात म्हणाली.

         " आता संध्याकाळी कुठे जायचं पार्टीला.... सकाळच्या मोमोज् ने पोट नाही भरलं माझं..." शाल्मली म्हणाली.

        ' अरे हिला काही लाज... काय वेड बीड लागले की काय या पोरीला... मूर्ख कुठली..' साक्षीच्या डोक्यात आलं.

इथं आपला कडा हरवलाय.. सगळे चिंतेत आहेत... आपली समजूत काढताहेत आणि ही चक्रम पार्टी कसली मागते... खरंच आहे... ज्याचं दुःख त्यालाच कळतं दुसऱ्याला त्याच्याशी काही देणंघेणं नसतं. ही बया विसरली पण असेल आपला सोन्याचा कडा... तो पण मिलिंदने दिलेला हरवलाय ते.

        पण शाल्मली मात्र जोरात होती..." अगं कसला विचार करतेस....? देतेस ना पार्टी... तुझा कडा मिळाला बरं... मी शोधला.. आता पार्टी नाही दिली तर मारेनच तुला."

       साक्षीचा स्वतःच्या कानावर विश्वासच बसेना. विश्वास बसण्यासारखी गोष्ट नव्हती ती. आश्चर्याचा सुखद धक्काच होता तो तिला. धीर करून शेवटी विचारलं तिने शामूला...

        "अगं पण कसं झालं हे आणि तुलाच बरं सापडलं..?"

      "मी आईबरोबर चार च्या सुमारास स्वामी समर्थांच्या मठात चालले होते... तर रविवारी मी आईबरोबर तिथे जाऊन स्वामींची पूजा करते. कदाचित ते पुण्य पदरी पडले असावं." शाल्मली सांगत होती.

       " तर... 'बस्किन रॉबिन्स 'च्या पुढे एक फुलवाल्याचे दुकान दिसलं. तिथे थांबलेले फुले घेण्यासाठी. जवळच्या झाडाखाली सावलीत काहीतरी चमकले म्हणून सहज जवळ जाऊन नीट पाहिलं तर तुझं कडे.. लगेच उचललं आणि पहिला फोन तुला केला." शाल्मलीचे स्पष्टीकरण देऊन झालं.

        खरंच दादर माटुंग्यासारख्या मुंबईतल्या रविवारच्या गदारोळात प्रचंड गजबज असलेल्या ठिकाणी हरवलेली पडलेली वस्तू जैसे थे जागच्या जागी परत सापडणे हा चमत्कारच होता.

          " श्री स्वामी समर्थांची कृपा. थांब मी आले लगेचच. दोघी मिळूनच मठात जावू आज आणि दर्शन घेवू. दर्शन झाल्यावर माझ्याकडून तुला अर्थातच एक दमदार... शानदार पार्टी...." साक्षी म्हणाली आणि मग उत्साहानं तयारी ला लागली.

योगेश साळवी.

      वरील कथा योगेश साळवी यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.


आणि डॉ. काशिनाथ

Post a Comment (0)
Previous Post Next Post