आणि डॉ. काशीनाथ

 आणि डॉ. काशीनाथ.....

✍️ जयश्री दाणी

             कानात हेडफोन घातलेले ,चेहरा आळसून गेलेला. तरी सान्वी सेल्फी काढायला हात धुवून मागे लागलेली.सोळा तासांचा प्रवास आता संपत आलेला.

"घे काढ पण कुठे असे पिक टाकू नको "

"मी टाकणार, लँडींग सून इन इंडीया " तेव्हढ्याच मिस्किलपणे ती म्हणाली. 

             तोही हसला. खूपशा आठवणीने, आठवणींच्या गलक्याने.आज जवळजवळ पाच वर्षांनी तो सहकुटुंब त्याच्या घरी ,भारतात येत होता. खिडकीतून दिसणारे नभाचे पुंजके त्याला खूप आपले वाटायला लागले.सौन्धी सौन्धी खुशबू यायला लागली. लांब श्वास घेऊन तो मनात विचार करू लागला यावेळी पूर्ण वेळ घरात द्यायचा ; काही डागडुजी ,बारीकचिरीक काम असेल तर ती आपणच निपटवायची. आई आप्पांना फ्लोरिडाला कायमचं यायला मनवायचय.आईला श्रीगिरीबालाजीच दर्शन घ्यायच आहे ते करवून आणायचं.आप्पा फारशा इच्छा व्यक्त करत नाहीत.पण भोपाळला त्यांच्या बालमित्राकडे जायचं त्यांच्या मनात आहे. तेव्हढं यावेळेस घेऊन जायचंच. 

            तो सीटला मागे टेकला. यावेळी हातात रगगड पैसा होता. महिनाभराचा वेळ होता. आईआप्पांचे मनोरथ पूर्ण करून समाधानाने यूएसला परत जाता येणार होते. त्याने बाजूच्या सीटवरच्या नेत्राला पाहिले. तिचे चमकदार डोळे अधिकच चमकत होते. तिला उतरल्या उतरल्या तिच्या आईवडिलांकडे जायचे होते.ते मुंबईलाच रहात होते.त्याला त्याच्या घरी तिच्यासकट जायची तीव्र इच्छा होती ,त्यावरून दोघांमध्ये भणभणही झाली होती. शेवटी विविध युक्तिवादानंतर आधी तिने सासरी यायचे कबूल केले. 

            सान्वीसहीत त्यांना दारात पाहून आईला आंनदाचे भरते आले.आप्पाही दुडूदुडू धावत आले.बरेच रोड दिसत होते दोघे. हिवाळा ; भरपूर कोथिंबीर मिळते म्हणून पाटोडीसहित अनेक पदार्थ आईने केले होते. खाताखाता तारंबळ उडत होती.आईच्या मनात खूप बोलायचे होते, त्याला कळत होते परंतू लांब प्रवासाने  थकल्याने तो ही खोलीत जाऊन आडवा झाला. उद्या पासून पूर्ण दिवस त्यांना द्यायचा असे त्याने मनाशी पक्के केले.

          दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्याबरोबर तो मागच्या अंगणात गेला. त्याने मुद्यामच हातावर मंजन घेतलं आणि बकुळीच्या झाडाजवळच्या नालीजवळ दात घासू लागला. खूप आठवणी त्याच्या या झाडाशी निगडीत होत्या.त्यातली एक अगदी ठळक होती. सकाळी शिकवणी वर्गाला उशीर झाला म्हणून तो आल्यानंतर दहा वाजता दात घासू लागला त्यावेळी आप्पा फार बोलले होते.त्यांनी त्याला सतत शिस्त,अचूकता शिकवायचा प्रयत्न केला.नोकरी लागल्यानंतर त्याने भारतातच रहावे असे त्यांच्या मनात होते.तो अमेरिकेला जायला निघाला त्यावेळी काहीही ओले ,अडवणारे न बोलता ते नुसते बकुळीला पाणी देत राहिले.

            तिथे गेल्यावर जीव तिथे रमला म्हणण्यापेक्षा एकएक जबाबदारीत,स्वप्नात तो अडकत गेला.मुळाशी मुळं हुळहुळत असताना तिथे त्याच प्रशस्त घर झालं, मित्रपरिवार जमला. वाऱ्याच्या प्रत्येक झोतानिशी आई वडिलांची,घराची,देशाची खूप आठवण यायची.मागे सुटून गेलेल्या मागच्या गल्लीत जुन्या सवंगड्यांसह जावेसे वाटे.तिथल्या पिवळ्या फुलांच्या झाडाखाली त्यांचा खास अड्डा जमे.मनातल्या या अनेकविध तरंगाना वर्तमान भानावर आणी. आता तिथले मित्र तरी तिथे कुठे आहेत?नोकरी धंद्यानिमित्त सगळे इतस्त विखुरलेले.गेले ते दिन गेले हेच खरे.

         "शी हाताने काय घासतो आहेस? ब्रश कुठे आहे तुझा?" त्याला पाहून नेत्रा करवदली. आपल्या आठवणींशी हिला काहीच कसं सोयरसुतूक नाही या आशयाने त्याने पाहिले.पण त्याचा आशयबिशय सारा गुंडाळत ती म्हणाली,"मधू येतोय ,त्याच्या शेतात जाऊया सारे." चहा नाश्ता होतपर्यत मधू दोन गाड्या घेऊन धडकलाही.गाड्या आधीच इतक्या पॅक होत्या की ते तिघं आणि आप्पा बसतपर्यंत हलायला सुध्दा जागा उरली नाही."अरे जा की तुम्ही ,मी थांबते घरी "आई असे म्हणत मागे सरली पण त्याला माहित होतं असं शेतात,हिरव्या जागी जायला आईला फार आवडतं.हुरडा,तुरीच्या शेंगा ,भरताची वांगी स्वतःच्या हाताने तोडायची तिला फार हौस.पिकांच्या हिरव्या ओळींतून ती फुलपाखरासारखी भिरभिरली असती.

            आईला घेता न आल्याने त्याच मन अतिशय खट्टू झालं."आई आम्ही लवकर येतो ग ,रात्री आपण राममंदिरात जाऊ" वचन दिल्यासारखा तो ओरडला.जिव्हाळ्याच्या अनेक ठिकाणांपैकी राममंदिर एक होतं. दिवसभर त्याचं लक्ष अर्धवट शेतात आणि अर्धवट राममंदिरात होतं. पूर्वीपासूनच समयींनी उजळलेला गाभारा त्याला आश्वासक वाटे.मनातली भीती,शंका तिथे निघून जाई.अमेरिकेला जायच्या आधीही तो बराच वेळ तिथे येऊन बसला होता.आईआप्पांना सांभाळ असे त्याने रामाला कळकळीने विनवले होते.परतायच्या आधी आईच्या हातून रामाला चांदीचा मुकुट द्यायचेही त्याने ठरवले.

            घराची डागडुजी ,भेटीला येणारे जाणारे यातच पंधरा दिवस निघून गेलेत.पुढचे दहा दिवस नेत्राच्या माहेरी जायचे होते.तू एकटीच जा असे त्याने तिला सुचवून पाहिले पण तिचेही प्लांनिंग भक्कम होते.तिची नाराजी,धुसफूस पाहून आईनेही त्याला जायला सांगितले.तिच्या आईवडिलांनी काश्मीर टूरचा घाट घातला होता.फुलांच्या राशीत,शिकाऱ्यात,बर्फाच्या पहाडात गळ्यात कॅमेरा लटकवून भटकंती करताना नाही म्हंटल तरी तो पूर्ण फ्रेश झाला.आईआप्पानीही कधीतरी अस करावं की नेत्राच्या पालकांसारखं त्याच्या मनात येऊन गेलं.तिचे हायफाय कुटुंब,हॉटेलिंग, फिरणं,महागड्या भेटवस्तू त्याला रुचत होतं ,तितक्याच प्रकर्षाने हा वेळ आईआप्पाना द्यायला हवा म्हणून मन हुरहूरत होतं.माहेरी त्याला वेगळीच प्रेयसीसारखी नेत्रा अनुभवायला मिळाली. अमेरिकेत आक्रसून एककल्ली झालेली नेत्रा इथे बार्बी डॉलसारखी चहकत होती.

            गावात परत आल्यावर त्याने आईला आधी विचारलं," तुझ्या मनात कुठे जायचं आहे का ? "

"हो " खुपशा आनंदाने आई उसळली.मिळालेला वेळ पकडायचा तिचा उत्साह पाहून तो चकितच झाला आणि येऊन पंचविस दिवस झालेत तरी तिला आपण पुरेसा वेळ देऊ शकलो नाही म्हणून त्याला जरा अपराधीही वाटले."श्रीबालाजीला जाऊया, आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर सिनेमा बघूया रे".बस इतकंच, हे तर दोन दिवसातच करता येईल.आईने अजून काही मागायचे नाही का?लक्ष्मीहार करून द्यावा का तिला?आपल्या लग्नात तिची इच्छा होती.त्यावेळी नेत्राला नव्या डिझाईनचा नेकलेस घेऊन देत तिने ती बाजूला सारली. 

              त्याने आईकडे निक्षून पाहिले ;सुरकुत्यांची जाळी चांगलीच ठसठसली होती.त्याच्याच शिक्षणासाठी विकलेल्या पिवळ्या जर्द सोन्याच्या पाटल्याएव्हजी हातात बिलोरी काचेचे सहा कंकण होते.तो गहिवरला तरी लाल कुंकू आणि हिरवे कंकण हे कॉम्बिनेशन त्याला आवडलं. दुपारी बैतुलसाठी निघायचाच बेत असताना सान्वी तापाने फणफणल्याचे लक्षात आले.तिला तसे सोडून जायचे आईआप्पाचेही मन होईना.दुसऱ्या दिवशी अंग अधिकच तापल्याचे ध्यानात आल्यावर त्याने बळेच गाडी करून आई आप्पांना बैतुलला पाठवले.तरी तुला न्यायचं होतं रे असे जेव्हा आई घोकायलाच लागली तेव्हा त्याचा पारा चढला.    

          सान्वीच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवताना आईसोबत सिनेमा बघायचं त्याने निश्चित केलं.सात दिवसांचा टायफाईड ओसरू लागल्यावर सगळ्यांच्या जिवात जीव आला.दिवस भररकन उडून गेले होते.दुसऱ्या दिवशी मुंबईसाठी निघायचे होते, तिथून मग फ्लोरिडाचं प्लेन.त्याच्या आवडत्या मटारच्या दाण्याच्या कचोऱ्या खाऊन तो सुस्तावला होता.आईच्या मांडीवर डोक ठेवून लोटला असताना त्याने विचारले,"आई मी यावेळी जरा राहिल्यासारखो वाटलं ना ग तुला? "

"हो रे मनीष ,आता अजून सुट्ट्याच नाही म्हणतोस ना ?"

  "हो ग ,तरी भरपूर मिळाल्यात या खेपेला. सहा महिन्यात तुमचं तिकीट पाठवतो, या दोघेही , आणि आप्पाना मनव,  वर्षभरात कायमचंच येऊन जा  "

"बर. आधी चार महिन्यांसाठी येतो मग वर्ष दोन वर्षात पाहू पुढचं "

"तुझ्या मनात काही करायचं राहील का अजून ?"

"तसे काही विशेष नाही पण तुझ्या आणि नेत्रासोबत 'आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर ' बघायचा होता. "

आईचा आवाज खूप आतून आला होता.तो ताडकन उठुनच बसला.या आजारपणात त्याच्या डोक्यातून सिनेमाचा विषय निघूनच गेला होता पार. 

"चल आत्ता चल लगेच "

"बाळ आत्ता रात्रीचे अकरा वाजले आहेत ,आत्ता कुठला सिनेमा अन् कसचं काय, झोप निवांत.तू विचारलस म्हणून बोलले."

           बिछान्यावर पडल्यावर त्याला काही केल्या झोप येईना. मुलासोबत पिक्चर बघायचं किती तिच्या मनात होतं.सगळ्यांनी जन्मभर जोराजोरात आपल्या सर्व इच्छा बोलून दाखवल्यावरही ती लाख विचारल्यावर मनातलं संकोचून कधीतरी सांगे. संगीत नाटकांची आवड, जुने सिनेमे बघायची तिला हौस होती. तिच्या तरूणकाळात गावात टॉकीज नव्हते. काशीनाथ घाणेकर तिचा आवडता नट.

"सुलोचनाबाईंचा जावई बरं का काशीनाथ घाणेकर, सोनाली कुळकर्णीने चांगलं काम केलंय म्हणे सुलोचनाबाईंचं " 

"आई खरेच सॉरी ग डोक्यातन् निघूनच गेलं. तू उद्या किंवा परवा वीणाकाकूंसोबत नक्की जाऊन ये बरं ,आणि मला कळव सिनेमा पाहिल्याचं त्याशिवाय मला बर वाटणार नाही सांगून ठेवतो."

          जातानांही तो पुन्हापुन्हा आईला तेच सांगत होता. गावात  टॉकीज सुरू झाल्यावर तो कितीदातरी आईला कार्टूनचे सिनेमे, हिंदी सिनेमे हट्टाने बघायला घेऊन गेला होता. तिने एखाद्यावेळी "मोलकरीण किंवा वहिनीच्या बांगड्या " बघायला चल म्हंटल्यावर हसत हसत पसार व्हायचा. संगीत नाटकात तर ते आ आ ऊ ऊ नको म्हणून त्याने साफ हात वर केले होते.आता त्या नाटकांची, जुन्या सिनेमांची गोडी त्यालाही उमगत होती पण पुरेसा वेळ नव्हता. 

"......अरे पण तुझ्यासोबत बघायचा होता ना आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर....."

विमानाचे पाते गरगरले तरी आईचा लाघट आवाज त्याच्या कानात घुमत होता....

****
वरील कथा जयश्री दाणी यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.
 प्रतिभा

Post a Comment (0)
Previous Post Next Post