प्रतिभा भाग एक

 प्रतिभा भाग एक

✍️अपर्णा देशपांडे

( कथेतील सगळ्या कवितांच्या ओळी माझ्या स्वतःच्या आहेत)

    

   " तुम्ही फक्त प्रेम कथाच छापता का?" आकाशने भाबडेपणाने विचारले.

" नाही,जे खपतं ,वाचकांना आवडतं ते छापतो."

" माझा कविता संग्रह छापाल? "

" कविता कुणी वाचत नाही आता"

" बरं, मग प्रवास वर्णन आहे, छापाल?"

" कुठला प्रवास आहे हा?"

" बोरगाव ते मुंबई , पण खूप इंटरेस्टींग आहे.

वेगळाच अनुभव आहे  मासिकात छापू शकता".

" हो ? सकाळपासून कुणीच भेटलं नाही का ? मीच सापडलो? 

या आता !!  ""

  हे आता नेहमीचेच झाले होते . प्रत्येक वेळी त्याला निराशाच पदरी पडायची.

आकाश काहीतरी लिहायचा, गावातील लोकं ते वाचायचे , त्यांना ते खूप आवडायचं . आकाशच्या लेखणीत जादू होती. पण धुळीत पडलेल्या हिऱ्याकडे कुणाचीच नजर जात नाही तसे झाले होते. त्याच्या कवितामध्ये भाषेचं वजन होतं, आशय खूप छान होता, पण कुण्या जोहरीची नजर पडली नव्हती ह्या हिऱ्यावर .

  पुन्हा एकदा निराश होऊन तो गावी वापस आला .

" आलास ?" आईनी विचारलं.

"आकी , अरे सोड हा छपाईचा नाद बाबा, आपल्यासारख्याचं काम नाही हे. शाळेत नोकरी धर. ते काळे सर म्हणतात तसा बी .एड का काय ते होऊन जा बाबा.

" ते करावंच लागेल आई, म्हणूनच एम .ए  केलं, पण माझं मन रमत नाही ह्याच्यात. असं वाटतं की मोठ्ठा कागद घ्यावा आकाशाएवढा , ओंजळ भरून शब्द घ्यावेत आणि असे उधळावेत जशी मोगऱ्याची फुलं... "

" चल जेवायला! तिथं नाही खाता येत तुझी ही मोगऱ्याची फुलं , तिथं अन्नच लागतं पोटात ढकलायला..."

" आणि ते कमवाव लागतं s "

आईचं वाक्य पूर्ण केलं आकाशने.

" आई,आज जिजी पाहिजे होत्या "

" त्यानी काय झालं असतं ?"

" जिजीला कळायची ग माझी

कळकळ "....

......आकाश  आठवीत असतांना शाळेत तालुकास्तरीय निबंध स्पर्धा होती. विषय होता 'आई ' .

इतर मुलांनी आई त्यांच्यासाठी काय काय करते, स्वयंपाक करते, काळजी घेते.. असं लिहिलं होतं. आकाशने आपल्या आईची तुलना थोर व्यक्तींच्या आईशी केली होती.आईच दुःख वाटून घेण्याबाबत त्याने लिहिलं होतं ...


        स्मित हास्य हे ओठी तुझ्या

        खुपतो खंजीर उरात माझ्या

        लपलेले हे अश्रू तुझे ग

         शोधायाला आलो आई ..


स्पर्धेच्या जज होत्या निर्मलताई, ज्यांना सगळे जिजी म्हणायचे. जिजी स्वतः उत्तम लेखिका होत्या. शिवाय दैनिक प्रहारच्या संपादिका. त्यांना आकाशचे वेगळेपण लगेच लक्षात आले होते. सगळ्या मुलांसमोर त्यांनी खास बक्षीस दिले त्याला. तेव्हापासून काहीही लिहिलं, की आकाश  त्यांना नेऊन दाखवी. उन्हाळ्याच्या सुटीत मुलांसाठी पेपरमध्ये छापायला गोष्टी आणि गाणी लिहून घेतली त्यांनी आकाशकडून . पण त्याचं नशीब... अल्पशा आजारात त्यांचं निधन झालं होतं.


"  आकी , किशनराव आलेत. तुझ्याकडे काम आहे"

" नमस्कार किशन भाऊ"

" अरे आकाश , ते आपले पाटील साहेब उभे आहेत इलेकशनला..  त्यांना एक फर्मास गाणं लिहून दे ना. तुझ्या त्या अवघड भाषेत नको बरं!  'नवीन पोपट हा  मीठू

मीठू बोलायला' च्या चालीवर लिही. ते रेकॉर्ड करणार आहेत.

आकाशला वाटले, पायातली चप्पल काढून... ह्याला.. पण आई समोर होती त्यांनी आधीच तिला सांगितले होते दोन हजार देऊ , म्हणून आकाश नाईलाजानं  असलं टुकार लिहायला तयार झाला .

        आकाशचं गाव कोकणातलं , हिरवाईने नटलेलं , समुद्र किनाऱ्यालगत , डोंगराच्या रांगामध्ये, लाल मातीची किनार असलेलं. अगदी चित्रमय. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांची नेहेमी नजर असे गावावर.

अशीच एक टीम त्याच्या गावात आली होती. मोठ्या मोठ्या गाड्या, कॅमेरे, कनाती, सेट आणि प्रशस्त तंबू.  जशी काही जत्राच भरली होती. निम्मं गाव तिथे गोळा झालं होतं. डायरेक्टरला पण एका सिनमध्ये जमाव दाखवायचा असल्याने त्याने आक्षेप घेतला नाही.

  आकाश  एका खडकावर बसून सगळं बघत होता. त्याच्या उजव्या बाजूला एक व्हॅन उभी होती. त्यात एक मुलगी निवांत पुस्तक वाचत बसली होती. आकाश  आपल्याच नादात गुणगुणत कागदावर काहीतरी लिहीत होता इतक्यात गणाने हाक मारली

"आकी s "

त्याने कागदावर एक छोटासा दगड ठेवला आणि हाकेच्या दिशेने गेला. जोरात हवा आली आणि तो कागद उडाला तो सरळ व्हॅनच्या खिडकीवरच ... तिचं लक्ष गेलं... खाली उतरून तिने तो कागद अलगद हातात घेतला आणि वाचू लागली...

...... तुझ्या पाऊलांचे ठसे

     ह्या लाटांनी नाही मिटवले

      ते तर समुद्र घेऊन गेला,

     आपल्या हृदयाशी कवटाळून

       मी म्हणालो ,ते ठसे माझ्या...


तिने अधीरतेने कागद पलटून बघितले लिखाण अर्धवट होते.

" माझा कागद तुमच्याकडे .."

ती दचकली

 " ओह ! हे तुम्ही लिहिलंय? खूप सुंदर.. पुढे काय लिहिणार?"

" ते नाही सांगता येणार "

"  बाय  द वे , मी ओवी . तिने हात पुढे केला. त्यानेही प्रतिसाद दिला " मी आकाश." आता त्याने तिच्याकडे नीट बघितले . नितळ गोरी कांती, लक्ष्मीसारखा प्रसन्न  चेहेरा आणि अतिशय उंची कपडे ... चित्रातल्यासारखी .

" आणखी काही लिहिलंय?"

" अं ? हे s आणि ही वही ..आणि बरच आहे घरी "

तिने वही घेतली अन तिथेच दगडावर वाचत बसली . तिचा विश्वास बसेना. इतकं अस्सल, तरल भावपूर्ण , लगेच काळजाला साद घालणारं... आकाशची चलबिचल झाली. 

 "मॅडम, मला जावं लागेल. तुम्ही इथे शूटिंगच्या टीम बरोबर का? "

" ह्या चित्रपटाचे डायरेक्टर राजन चित्रेंची मी मुलगी. मला मॅडम नको ओवीच म्हण.  उद्या येशील पुन्हा?"

" बघतो " म्हणून त्याने त्याचे सगळे कागद ताब्यात घेतले आणि दगडावरून उड्या मारत गेला.ओवी अस्वस्थ झाली होती. भाषेशी कुठलीही बांधिलकी  न बाळगणारे चोर लोकं आपल्या  लेखन व्यवसायात पोटल्या भरताएत  आणि हे अस्सल साहित्य इथे इतकं दुर्लक्षित?

दुसऱ्या दिवशी सकाळीच दार वाजलं. आकाश  कसरत करत होता . दार उघडतो तर .... ओवी ... सकाळचं कोवळं ऊन असतं नं , तशी वाटली ती ..

आकाश तोकड्या कपड्यात होता. त्याची तारांबळ उडाली.. तिला हसू आले. मी बाहेर थांबते, तू तुझा वेळ घे...

" नमस्कार काकू, मी ओवी. आकाशचं लिखाण बघायचंय सगळं"

आकाश उत्साहात सगळं बाड घेऊन आला.

आईनी कपाळावर हात मारुन घेतला . एक वेडा कमी होता काय तर दुसरा आला. तिला आकाशचं व्यवहाराशी फारकत घेणारं हे वेड नको वाटायचं.

ती सुजाण होती, तिला आपल्या मुलाची प्रतिभा ठाऊक होती, पण प्रतिभेतून प्रपंच चालतोच असे नाही ह्याची जाणीवही होती.

    ओवी एक एक पान वाचू लागली.

         अनवाणी मी रानोमाळ

          हिंडत गेलो ,

          न जाणो कधी

         परिस स्पर्श लाभे...

    एक एक ओळ ,वाक्य तिच्या मनाला भिडणारी.... तिचं मन म्हणालं ..

आकाश हे सोनं आहे, ह्याला परिस स्पर्शाची गरजच नको पडायला....


"आकाश , हे  ,परिस म्हणजे ... तुझ्या... "

आकाशने फक्त खांदे उडवले.

त्या गठ्ठ्यात लेख, कविता, ललित असा खजिना होता. सगळे  एकदम वाचणे शक्य नव्हते.

" आकाश, मी उद्या पुन्हा आलं तर चालेल?" आम्ही आठ दिवस आहोत इथे. पप्पांना मी असिस्ट करतेय. ह्या फिल्म ची स्टोरी पण मीच लिहिलिये"

" अरे वाह ! "

" तू ये न . तुझी पप्पांशी ओळख करून देते.  खरं तर मी इथे काही वर्षांपूर्वी आले होते . नंतर बोर्डिंग स्कुलमध्ये होते,  आणि आयुष्य बदलूनच गेलं." 

पुढे काही दिवसात ओवी रोज आकाशला भेटायला येत होती. आकाश तिला कविता ऐकवायचा आणि ती नुसती त्याच्याकडे बघत बसायची. त्यानेही तिच्या चित्रपटाची कथा ऐकली, काही बदल सुचवले . तिने त्याचं सगळं लिखाण पुन्हा पुन्हा वाचून काढलं. काही कागदांचे फोटो  ही घेतले.

काय करणार आहे ओवी त्या फोटोंचे? ओवी आणि आकाशची मैत्री कुठंवर जाईल, वाचा पुढील भागात.

क्रमशः


✍️ अपर्णा देशपांडे

भाग दोन

वरील कथा अपर्णा देशपांडे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.


Post a Comment (0)
Previous Post Next Post