प्रतिभा भाग दोन

प्रतिभा भाग दोन

लेखिका- अपर्णा देशपांडे

भाग एक

 निघायच्या आधल्या दिवशी ती समुद्राच्या किनाऱ्यावर त्याची वाट बघत होती. तिच्या डोळ्यांसमोर आकाशची मूर्ती... रांगडी.... रुंद खांदे... पिळदार शरीर.... उन्हाने तांबूस झालेली काया.. आणि स्वप्नाळू डोळे...

" ओवी.." आकाशने हळूच हाक मारली आणि तिला लाजल्या सारखं झालं.

" कसला विचार करतेस?"

" आकाश, मला ह्या गावानी, इथल्या माणसांनी आणि तुझ्या लेखणीनी भुरळ पाडलीय. इथून गेल्यावर मला अजिबात करमणार नाही.. तुला? "

" माझं काय मी B. ED चा फॉर्म भरणार. जवळच्या एखाद्या मोठ्या शाळेत शिक्षकाची नोकरी करणार. मुलांना निदान मराठी विषय मनापासून शिकवणार ."

" पण मी काय विचारतेय, तुला आठवण येईल का माझी?"

" येईल ना ओवी. आठवणी दाट गच्च भरलेल्या आभाळ सारख्या असतात. थोडा विसावा मिळाला की कोसळणाऱ्या."

" तुला कळत नाहीये का मला काय म्हणायचं आहे ते?" तिचा स्वर चढला...

" कळतंय ना.. पण काय ना ओवी.....तू उंच बुरुजावरची राजकन्या, मी पंख छाटलेला गरुड "

" गरुडाला नवे पंख मिळाले तर?"

" निघतो मी "

" आकाश, आका s s श "

त्याने वळून बघितले नाही.

.....

" आलास आकी? किती गोड आहे रे ही ओवी? इतकी मोठी डायरेक्टर असून किती..."

आईला थांबवत तो म्हणाला,

" जेवायला वाढतेस ? "

" आकी, आपल्या प्रतिभेला योग्य सन्मान नाही मिळाला तर माणूस कडवट बनतो. तुझी लेखणी कडवट नको बनायला. मला सांग तू का लिहितोस? पैसे मिळावेत म्हणून की आतून उर्मी येते, आनंद मिळतो म्हणून? नोकरी कर,पण लिहिणे सोडू नकोस "

घास हातात तसाच ठेऊन आकाश म्हणाला, " तू पण किती सुंदर बोलतेस ग! उगाच नाही माझ्यात हे गुण आले ".

    " ए आकाश, अरे ते शूटिंग वाले चालले रे s s " गणा ओरडत आला.

आकाश नि ओवीला फोन लावला.

  " हॅलो ओवी, तुम्ही निघालात का?  तुम्ही तर उद्या जाणार होता न? "

" आम्ही सध्या एक मोठ्या अडचणीत सापडलोय आकाश, आत्ता निघालोय . मी तुला मुंबईला पोहोचल्यावर कॉल करते .  बाय " 


    अचानक काय झालं असेल? फक्त ओवीच नाही, आख्ख्या टीमलाच जावे लागले.. आकाश विचारात पडला.

  " काय रे आकी, सारख्या चकरा  काय मारतोएस इकडून तिकडे ? नवीन काही  सुचतंय का? "

" आई झोप तू मला उशीर होणार

आज . " कागदावर उमटले,

    सांग त्या धरेला

     घे  आता गती

      अधीर झाले मन

        नाही काळ हाती

त्याचेच त्याला आश्चर्य वाटले. आपण ह्या आधी कधीच असे उतावीळ नव्हतो झालो ... रिंग वाजली..

" आकाश, अजून जागाच?"

" ते जाऊदे ग, कांय झालं अचानक ते सांग."

" मला मिस केलंस?"

" अग मुद्द्याच बोल न आधी "

" आमच्या प्रोड्युसरचं डोकं फिरलंय. शूटिंग इथे गावात नाही, सिंगापूरला करायच म्हणे. तिथे कोकणात केवढं शूट झालंय. दोन गाणी पण झालीयेत . आता अचानक सगळं पॅक अप करून सिंगापूर म्हणे!!"

"  ओह!!! घाबरलो होतो मी.. अग पण कथा खास भारतीय वळणाची आहे न? मग.."

" तेच न.. पप्पा खुप चिडलेत.. पण त्यांचं म्हणजे प्रोड्युसरचं म्हणणं की प्रेक्षकांना आकर्षित करायला असंच  काहीतरी पाहिजे......"

" आकाश तू ये न इथे. तुझी एक कथा  खूप आवडलीये मला. पपांना वाचायला देते, माझ्या मनात खूप काय काय  आयडिया आहेत "  ......

" बोल न आकाश ,येतोस इथे ? "

" ओवी सगळं जग तुझ्यासारखा विचार नाही करत ग. तुमच्या जगात मी म्हणजे परग्रहावरचा प्राणी वाटेल "

" तू प्रकाशकांकडे काय कोट टाय मध्ये जातोस का? उगाच नखरे नको करुस "

आकाशला तिच्या युक्तीवादाचं हसू आलं ........... " आकी ,  मुंबईला जतोएस

बी. एडच्या ऍडमिशनपर्यंत वापस येशील न?"


" मोगऱ्याची फुलं खाता येत नाहीत न आई, तिथे अन्नच लागतं.."


" माझंच मला ऐकवतो,मोठा चतुर आहेस "

" आकी,प्रसिद्धीच्या हव्यासापायी लाचारी नसावी बरं.."

" काळजी करू नकोस आई. हात गगनाला भिडवायचेत,जमीन न सोडता."


.........आकाश पत्ता शोधत बरोबर 'प्रसाद ' बंगल्यासमोर येऊन थांबला. काय ते वैभव,मुंबई मध्ये बंगला?" आकाशला आश्चर्य वाटले.

" हा s य ! मी तुझी वाटच बघत होते. " त्याला  पाहून ओवीला अतिशय आनंद झाला. वर पासून खालपर्यंत पाहिले त्याला... आत्मविश्वासाचं तेज काही वेगळंच असतं असं वाटलं तिला.

" कसा झाला प्रवास ?"

" त्यात काय,कोकण आणि मुंबईचं फार जुनं नातं आहे. बऱ्याचदा आलोय मी मुंबईत ह्यापूर्वी "

" सांग ना आकाश, मला मिस केलं ?"

ओवी पासून थोडं दूर होऊन तो म्हणाला " ओवी, तू ह्या प्रश्नांकरता मला इथे बोलावलस ?"

" too mean !! " पप्पा येणारेत दुपारी. त्यांना तुझी कथा वाचायला देणार ना , म्हणून."

" त्या सिनेमाचं काय झालं? "

" काय होणार..सिंगापूरला जावं लागेल ."

" असं कसं ? आपल्या मातीतील कथा तिथे कशी शूट होणार? अशा तडजोडी का करता तुम्ही?"

" ही इंडस्ट्री फार निष्ठुर आहे आकाश. इथे काम मिळायला अशा  तडजोडी कराव्याच लागतात. .. चल तुला घर दाखवते... .. हा  हॉल , ही लागून हिरवळ , आणि ही बघ इकडून वर गेलं की माझी रूम. ... ये न! असा बुजू नको रे!..." 

ओवी उत्साहात सगळं दाखवत होती आणि त्याचं लक्ष भिंतीवर गेलं...…

" जिजी ? इथे जिजींचा फोटो?"

" तू ओळखतोस? रिअली ? ही माझी आई..."

त्याचे डोळे डबडबले... "म्हणजे .. म्हणजे तू जिजींची मुलगी आहेस? ओ.... देवा !!

ओवी.. तुला.. कसं सांगू? आज मी जे काही लिहितो ते जिजीमुळे ... जिजी तुझ्या आई.?.. खरं. ..आई पण किती खुश होईल  हे ऐकून "

"  अरे मी नाही का म्हणाले की मी इथे आले होते लहानपणी... नंतर बोर्डिंगमध्ये गेले.. तोपर्यंत आई न पप्पा.. वेगळे ..."

" ओह !! म्हणूनच त्या एकट्या होत्या ... ओवी तुला नाही कळणार ग . माझ्या कोवळ्या वयात जिजी मुळेच मी भरकटलो नाही  .  वडील गेलेले, साहित्याची आवड असलेलं कोमल मन, त्यांनी फार आधार दिला मला . अशा विद्वान स्त्रीशी कसं पटलं नाही तुझ्या पापांचं ? "

" ही प्रतिभेची शोकांतिका असावी बहुतेक . खूप प्रतिभावान लोकं वैयक्तिक आयुष्यात सुखी होत नाहीत असं असावं काहीसं..."

"प्रतिभा म्हणजे फक्त कला, साहित्यात, क्रीडा क्षेत्रात कामगिरी करणं इतकंच नाही ओवी, आपल्या माणसांशी जुळवून घेता

येण ही पण प्रतिभाच न ग? "

ओवी नुसतीच त्याच्याकडे बघत होती.

" कुठे शिकलास आकाश ? कोणत्या मातीचा आहेस तू? आकाश...

दुःखी होती का रे आई शेवटी?"

" मी फार लहान होतो ग हे समजायला. दुःखी नाही,पण  फार एकट्या होत्या खरं  . कवी ग्रेस त्यांचे आवडते कवी. मला चटकन कळायचा नाही अर्थ, पण जिजी त्यांच्या कविता मला वाचून दाखवायच्या, कधी गर्भितार्थ सांगायच्या "....म्हणायच्या , आकाश  चांगली कलाकृती बनायला संवेदना जागृत हवी  रे . तू संवेदनशील आहेस, तू लिहू शकतोस."

.....जेवण करून निवांत गप्पा मारत बसले दोघ  बागेतल्या बंगई वर.

" हाय रायटर!! " राजन चित्रे आले होते.

" लवकर दाखव तुझी कथा, पाहू काय करायचं  ते . ओवी तर फार तारीफ करत होती.."

ते कथा वाचत होते, तसतसे त्यांच्या चेऱ्यावरचे भाव बदलत होते.... त्यांनी सारांश वाचला. 

" एक्सलंट !! ग्रेट !! हिट स्टोरी आहे ही . सिनेमा काढला तर सुपर हिट !!"

आकाशने मनातच हात जोडले. ...  ईश्वरा, कुठेतरी प्रकाश दाखवलास . आधी जिजी आणि आता त्याचीच मुलगी...

"मी सोम पटेल आणि कपूरला ऐकवतो. ते नक्कीच फंड करतील. ओवी, गेट रेडी ही फिल्म तू करायची!! मी आलोच "

"आकाश, आई मला म्हणायची, तू देखील मोठेपणी मोठ्ठी डायरेक्टर होणार. मी येईन तुझ्या प्रमोशनला. पपा एक चांगले दिग्दर्शक आहेत हे तिला माहीत होतंच न. ही फिल्म आपण बनवू आकी. लेखक ..आकाश.. दिग्दर्शिका ..ओवी ...अहाहा .!!.."

" मलाही कुठेतरी जिजीच ऋण फेडल्यासारखं वाटेल "

फोन वाजला...

"ओवी, पटेल नाचतोय नुसता कथा ऐकून . कपूर पण खुश आहे .तयारीला  लागा .. आकाशला म्हणावं सिनेमाच्या दृष्टीने स्क्रिप्ट लिही लवकर. त्यांना  युरोप ला जायचं , त्या आधी मुहूर्त करायचाय. मी कास्ट फिक्स करतो लवकर."

" 'पपा, ते सिंगापूरच... "

" ते मी बघतो ग , तू ह्या फिल्मचं बघ "

" हो पप्पा, थँक्स पप्पा , आय लव यु !!"

" आका s sश !! यु डिड इट !! " ओवी त्याच्या गळ्यात हात घालून म्हणाली .

" अग हो, किती एक्साईट होतेस" तिचे हात अलगद दूर करत तो म्हणाला.काय होईल पुढे, होईल का आकाश - ओवीचे स्वप्न पूर्ण वाचा पुढील भागात.

क्रमशः


लेखिका अपर्णा देशपांडे


वरील कथा अपर्णा देशपांडे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

1 Comments

  1. प्रतिभा भाग २ येत नाही, पुन्हा पुन्हा भाग १ च येत आहे

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post