प्रतिभा भाग अंतिम

प्रतिभा भाग अंतिम

✍️ अपर्णा देशपांडे 

भाग दोन

...... संध्याकाळी चित्रे घरी आले. सोबत कपूर, पटेल होते.

आकाशशी त्यांची ओळख करून झाली.

" राजन, एक प्रॉब्लेम हाय. म्हंजी.. हे ष्टोरी एक नंबर हाय , पण ते रायटरचं नाव हे नको. आमचा रजत कपूर हाय ना त्याचा नावाने ष्टोरी टाकू." पटेल मोडक्या मराठीत बोलला.

" म्हणजे? " ओवी म्हणाली .

"असं कसं अंकल, नाव तर आकाशचच पाहिजे ना"

" नाय नाय . ते नवीन माणसाचे नाव चालत नसतं ने . ष्टोरी तर रजतचेच नावने येईल. फेमस रायटरचे नाव पाहिजे बेटा."

ओवीचा संताप झाला तिला वाटलं म्हणावं,  निघा इथून. व्यापार करताय प्रतिभेचा?

"तुम्हाला काय वाटलं , तुम्ही पैसे नाही लावले तर काय...."


" थांब ओवी!! " तिला मधेच थांबवून आकाश म्हणाला,"   तिला माफ करा साहेब नुसतं नावच दुसऱ्याच न? ठीक आहे !! ही कथा कुणाच्याही नावावर जाऊ दे ओवी, तुझं स्वप्न पूर्ण होईल आणि माझी जिजीला श्रद्धांजली!! "

तो ओवीला म्हणाला,

" मी एकच काय अशा अनेक कथा लिहीन . ह्यानंतर पुढचे प्रोजेक्ट्स आपणच करू.  एका फिल्मचं काय घेऊन बसलीस? ते फक्त लेखकाचं  नाव बदलत आहेत . माझी प्रतिभा  तर नाही बदलू शकत न?"

" सर तुम्ही पाहिजे ते नाव टाका पडद्यावर  लेखकाचं . हा चित्रपट होणार ."

ओवी प्रचंड कौतुक आणि समाधानाने  आकाशकडे बघत होती....

........

राजन म्हणाले,  "आकाश, माझा हात दगडाखाली आहे रे. पण एक लक्षात घे की चित्रपट हे कथा सांगण्याचं माध्यम आहे. इतर चकचकीत गोष्टींनी नाही तर जबरदस्त कथेमुळे सिनेमा हिट होतो. एकदा हा चित्रपट होऊ दे, तो जबरदस्त हिट होणार शंकाच नाही. मग ह्या लोकांच्या कुबड्यांची गरज नाही पडणार आपल्याला ."

आठ दिवस झाले,  राजन आणि ओवीनी कास्टिंगवर काम सुरू केलं,

स्क्रिप्ट वाचन चालू झालं. चित्रेंनी खास कॅमेरामन बुक केला ओवीच्या हाताखाली.  फिल्म स्टुडिओच्या तारखा घेतल्या...

पण .... पटेल, कपूरचा पत्ता नव्हता. ओवी हवालदिल झाली होती... राजन यांचा जीव तळमळत होता.... इतके दर्जेदार कथाबीज ... असेच वाया नको जायला...

" हॅलो, विश्वनाथजी? " ...

चित्रे हळूच म्हणाले... "आकाश, पटेलच्या  सेक्रेटरीचा फोन आलाय..." आकाश आणि ओवी कान  देऊन ऐकू लागले...

" हा बोला जी...काय? .. अरे !! .. कसं काय ?......."

ओवी, ते लोकं गेले युरोपला. पैसे नाही लावणारेत आपल्या फिल्मसाठी . ओवी धपकन खालीच बसली. ... आता कस करायचं ... स्क्रिप्ट तयार आहे..  छोटे मोठे आर्टिस्ट बुक झालेत, स्टुडिओचे , ड्रेपरीचे पैसे,   बापरे....आता ........


    लगेच सावरली ओवी.

"नाही पपा, फिल्म तर बनणार.  पप्पा, आईचे सगळे दागिने विकुया, माझे सगळे शेअर्स पण..."

" अग त्याचे कितीक होणार? आकाश कुठाय ?"


आकाश आईशी फोनवर बोलत होता ...

" आकी, स्वप्न खरं करण्याची वेळ आलीय. तुझ्या लेखणीत हृदय जिंकण्याची ताकद आहे रे, कर आभाळाचा कागद. आणि लिही मनसोक्त. आपली शेतजमीन सुपीक आहे.  तुझ्या लेखणीसारखी . अर्धी जमीन विकुया पण हा चित्रपट तू कर

आकी.  आणि आता येशील तेव्हा ओवीला घेऊन ये हा ! " आईशी बोलून आकाशला आणखी उर्मी आली.


"सगळं मनासारख होतंय, आपण एक अतिशय दर्जेदार निर्मिती करणार आकी .." ओवीनी समाधानाने आकाशचा हात  हातात घेतला.....

.......स्टुडिओच्या एका शांत खोलीत आकाश स्क्रिप्टमध्ये एडिटिंग करत होता. त्याने खिडकीतून बघितले, गेटमधून एक महागडी कार आत आली. त्यातून अतिशय देखणी तरुणी उतरली. ' ही कोण आली असेल? चित्रे सरांनी हिला लीड रोल दे असं सांगितलंय का ओवीला?'

" गुड मॉर्निंग!! मी लारा . सेट डिझायनर आणि stylist." स्टायलिस्ट असणारच. तिच्या लुकवरून कुणीही म्हणाले असते.…

" मॉर्निंग!! मी आकाश ."


" ओह, मी तुलाच भेटायला आलेय. कथेप्रमाणे सेट desings च्या इमेजेस दाखवते, मग फायनल करूया. मला स्टोरीचा सुरुवातीचा भाग दाखव, "

लारा एक टिपिकल मॉडेलसारखी दिसणारी, हळुवार बोलणारी , कुणालाही आवडावी अशी होती.

आकाशला नेमके काय अपेक्षित आहे ह्यावर त्यांची चर्चा झाली. लाराला भरपूर अनुभव होता, आकाशची पहिलीच फिल्म होती.

" आकाश, ह्या कथेत थोडं ग्लॅमर आणायला पाहिजे, किंवा एखादं फडकतं गाणं, अरे हा s गीत तूच लिहितोएस? "

" हो "

"  ग्रेट!! दाखव ना एखादं. कॉस्च्युमस्  ठरवावे लागतील."

" ओवी सांगेल त्या लोकेशनला करावं लागेल शूट"

" गीत बघू  न आकाश, "

" नायिका भेटल्यावर नायकाची दृष्टी कशी बदलते हे दाखवणारं गीत.."

आकाशने फाइल काढली.....


........ रोज चमकती तारे नभी

         कधी न वाटे आगळे

         आजच का भासती ते

        टपोर मोगऱ्याचे मळे ।

         आकाशीचा चंद्र

        आज नवा वाटला........

वाचता वाचता लारा गुंग झाली. तिला ओवी आली हे पण कळाले नाही.  ती फार एक्साईट झाली..

असं वाटतंय की तुला जोरात...  तेवढ्यात.. ओवी ओरडली...


"आकाश, ए आका s श  लक्ष कुठे तुझं? किती फोन केले? .. हाय लारा!!"

ओवीला आश्चर्य वाटले."

" अग, फोन सायलंटवर आहे "


लारा म्हणाली , "बरं झालं ओवी तू आलीस. माझ्याकडे काही सेट designs तयार आहेत तुम्ही दोघे पाहून घ्या. बाकी स्टोरी लाईन भन्नाट आहे हं!! मजा येईल काम करायला.

बाय येते मी.... आणि ओवी, एक मिनीट बाहेर ये ना. ... मस्त आहे ग हा रायटर , टॅलेंटेड आणि  हॅन्डसम "  लारा डोळा मारून म्हणाली. ..

ओवी मात्र अस्वस्थ झाली होती.


मग तुफान वेगाने काम सुरू झाले. गावाची दहा एकर जमीन विकुन आकाशची आई तिथेच मुंबईला राहायला आली होती.

स्टुडियोत भव्य सेट उभा राहिला होता. आकाश रात्रंदिवस  सेटवरच असायचा हवे तसे काम करून घ्यायला. ओवी डबा आणायची . ती कॅमेरा हँडल करतांना देखील  तिची नजर आकाशकडे असायची. तो लाराशी जरा जास्तच बोलतो असे तिला वाटायचे.

.....ओवी डबा घेऊन आली, आणि आकाशची वाट पाहु लागली. आकाश  तर आला नाही, पण लारा आली.

" ओवी, असं आकाशची बायको असल्यासारखं नको करुस. डबा

आणणं , वाट पाहणं त्यांनी प्रपोज केलाय का तुला? "

आधीच ओवी खूप संभ्रमात होती.हे ऐकून तर ती धावत स्टुडिओच्या मागच्या अंगणात गेली. तिथे पिंपळाचा पार होता. त्यावर बसून ती विचार करू लागली ' आपण चुकतोय का? आकाश लाराला.. तर....

" ओ मॅडम, इथे का बसलात ? " आकाश मागून बोलत होता. तिने मानही वर केली नाही. मागून आवाज आला...


" काळ्या मिट्ट अंधारात

    चाचपडत होतो राती ,

  तू आलीस इवलीशी

   पणती घेऊन हाती ।

    म्हणालीस अंधाराच्या

      डोळ्यात पाहून

    दूर हो कायमचा

आता मी आहे सांगाती ।।


ओवीचे डोळे पाझरत होते. काहीही न बोलता आकाशने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या . आकाश पुढे आला, त्याने फक्त तिच्या डोळ्यात  बघितले आणि ती त्याच्या मिठीत झेपावली.

" वेडाबाई, प्रत्येक गोष्ट बोलून दाखवावी लागते का?  काय डायरेक्टर मॅडम? कसं कोकरू झालंय बाबा "


स s s र,  मॅड s s म , आ s s ग !! स्पॉटबॉय जोर जोरात ओरडत होता. सेट  भयानक आगीत जळत होता.

ओवी ,आकाश जीव घेऊन धावले . त्यांच्या डोळ्यादेखत सगळे धडाधडा पेटले होते. एकाच धांदल उडाली होती. आर्टिस्ट सैरावैरा धावत होते...

अग्निशामक दल आलं होतं, आग विझवण्याचे प्रयत्न चालले होते.

आकाश न घाबरता सूचना देत होता.

जेवढे जमेल तेवढे सामान वाचवायचा प्रयत्न करत होता. ओवी शॉकमध्ये नुसती बसली होती.  थोड्या वेळात अग्निशामक दलाने सगळं आटोक्यात आणलं . आकाश तिच्या जवळ आला. म्हणाला, "अग, तू पणती घेऊन आलीस असं म्हणालो मी कवितेत, तू तर  आगच घेऊन आलीस "

"तुला थट्टा सुचतीये? सगळं नाहीस झालं, संपलं सगळं!!!"

" काहीही संपलेलं नाही. एक पुठ्ठ्याच्या सेट फक्त जळालाय . तुझी  आणि माझी 'प्रतिभा' नाही . "

ओवी अतिशय विश्वासाने  आणि समाधानाने त्याच्या खांद्यावर विसावली. 

(समाप्त)

© अपर्णा देशपांडे


वरील कथा अपर्णा देशपांडे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखीकेकडे सुरक्षित आहेत.


Post a Comment (0)
Previous Post Next Post