जगदंबा

जगदंबा

✍️ बीना बाचल

"अरे ,माझी इथे ठेवलेली फाइल्स ,पुस्तकं कुठे गेली?कोणी हिम्मत केली त्यांना हात लावायची? माझ्या गोष्टीना हात लावणारे तुम्ही कोण?एकजात मूर्ख लोक आहेत घरात!" माधवरावांचा पारा नेहमीप्रमाणे च चढलेला होता, निमित्त काय तर साफसफाई करताना त्यांच्या सुनेनं ; शलाका ने त्यांची रिटायरमेंट होऊनही उगाच काहीही उपयोग नसणारी दहा दहा वर्षे जपलेली वाळवी लागू लागलेली पुस्तकं, फाइल्स घरातून काढून टाकली होती.

पण माधवराव ऐकतील तर शपथ! बड्या कंपनीतून आणि मोठ्या हुद्द्यावरून  retire झालेले माधवराव ऑफिस संपलं तरी मनाने अजून तिथेच होते आणि आपण सोडून बाकी जग मूर्ख, तुच्छ ही भावना त्यांनी रिटायरमेंट नंतरही अगदी प्राणपणाने जपली होती. हल्ली घरी बसून काहीच काम हाताशी नसल्याने त्यांची चिडचिड अजूनच वाढली होती,इतकी की घरातल्या सर्वांना 'हे ऑफिस ला जायचे तेच बरं होतं असं वाटू लागलं होतं'.

            ऑफिस मध्ये ही सगळे त्यांच्या ह्या स्वभावाने त्यांना टाळायचे पण साहेब आहेत तेव्हा कुठे वाकड्यात जा, आपली नोकरी जपायची असेल तर ह्यांचं मन जपायला च हवं ह्या भीतीपोटी सगळे त्यांचा शब्द झेलायचे.

  रिटायरमेंट नंतर तरी ते आता आपलं मन दुसरीकडे रमवतील ह्या घरच्यांच्या अपेक्षेला ही त्यांनी पार छेद दिला होता.रोज रिकामा वेळ मिळाला की उगाच सर्वांना सूचना दे, स्वयंपाक घरात लुडबूड, फ्रिज मध्ये expiry date होत असलेल्या वस्तू शोध,सतत फक्त आणि फक्त चूक कुठे सापडते का ह्यावरच त्यांचं लक्ष! 

माधवरावांची बायको, सरोज ताई इतक्या वर्षांच्या त्यांच्या ह्या स्वभावाला सरावल्या होत्या पण शलाका मात्र नवीन असल्याने तिला ह्या सर्व गोष्टींचा प्रचंड त्रास व्हायचा, सतत ताण असायचा तिच्या मनावर , पण उपाय मात्र सापडत नव्हता.  सरोज ताई रोज देवा पुढे हात जोडायच्या," आई जगदंबे ,धावून ये बाई, तूच सद्बुद्धी दे ह्यांना, माझं निभावले पण आता ही शिक्षा इतरांना नको"

      शलाकाच्या नवऱ्याने अर्थात शाम ने तर हात वर केले की आपण बाबांच्या बाबतीत काहीही करू शकत नाही, ते पहिल्या पासून असेच आहेत,आपल्याला च ऍडजस्ट करावे लागेल! ह्या शाम च्या उत्तराने शलाका उदास व्हायची.

        अशातच शलाका ला दिवस राहिले .माधवराव सोडून बाकी सर्वांच्या आनंदाला उधाण आले होतं, प्रत्येक जण तिची काळजी घेत होता अगदी शेजारी पाजारी देखील!पण माधवरावांना आता घरात अजूनच गडबड गोंधळ वाढणार,कदाचित आपल्या कडे सर्वांचे दुर्लक्ष होणार ह्या विचाराने अजूनच अस्वस्थ व्हायला लागलं होतं.पण नाईलाजाने ते गप्प बसले.यथावकाश शलाकाने एका गोड मुलीला;सानिका ला जन्म दिला.

सानिका; एवढासा  निष्पाप जीव  पण माधवरावांना तिच्याबद्दल ही फारसं कौतुक नव्हतं च उलट ती घरात आल्याने घराचं time table कसं बिघडलय हे सांगण्यातच त्यांना जास्त रस वाटे!

             एक दिवस दुपारी सानिका शांत झोपली आहे असे पाहून शलाका सासू बाईंना सांगून काही कामा निमित्त बाहेर पडली. थोड्या वेळाने सरोज ताईंना ही शेजारी कोणी बोलावले म्हणून त्याही शेजारी जाऊन आलेच तोवर सानिका वर लक्ष ठेवा सांगून शेजारी गेल्या.


दहा पंधरा मिनिटं शांततेत गेली पण कशी कोण जाणे सानिका ला जाग आली. झालं!! माधवरावांच्या कपाळावर आठ्या पडल्या, सुरुवातीला त्यांनी जरा दुर्लक्ष च केलं पण जसा सानिका चा आवाज वाढला तसे ते आतल्या खोलीत तिला पाहायला गेले.

        आता कधीही तिला जवळ न घेतल्याने म्हणा किंवा अजून काही, पण माधवरावांना नेमकं कशाने ती रडतेय हे समजेना , वैतागून त्यांनी तिला जरा हाताने थोपटवल पण तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तिचं दुपट, अंगावरच अंगड ओलं झालंय. आता आली का पंचाईत !! माधवरावांनी चिडचिड करत कपाटात हुडकून तिचा एक फ्रॉक ,डायपर वगरे शोधलं आणि कसेबसे  तिचे कपडे बदलले. आणि ह्या सगळ्या गोंधळात त्यांना सानिका ला उचलून घ्यावेच लागले.

एवढासा तो निष्पाप जीव, अंगाची ऊब मिळताच शांत झाला आणि सानिका त्यांच्या कडे पाहून खुदकन हसली!!

माधवरावांकडे पाहून खुदकन हसणारी संपूर्ण जगात बहुदा ती पहिलीच व्यक्ती होती पण त्याचा परिणाम असा झाला की ह्या दगडासारख्या कठोर मनाला ही पाझर फुटला!

ती खुदकन हसली आणि मग माधवराव ही तिच्याकडे पाहून छान हसले. कित्येक वर्षांत कोणालाही न जमलेली ही अशक्य गोष्ट त्या इवल्याशा पिल्लांन करून दाखवली होती.

आणि बघता बघता कडक,कुचकट माधवरावांचा चक्क एक 'आजोबा' झाला होता. हातात आपोआप च खुळखुळा आला आणि सानिका त्या आवाजानं अजूनच खुदूखुदु हसू लागली आणि तिच्या सोबत तिचे हे 'आजोबा' ही रंगून गेले.

किती वेळ गेला कोणास ठाऊक पण बाहेरून घाबऱ्या घुबऱ्या होऊन आलेल्या सरोज ताई आणि बाहेरचं काम संपवून आलेली शलाका दारातच थबकल्या.

आपल्या घरातून आज 'तार स्वर' ऐकू येण्या ऐवजी चक्क आजोबांचा हसण्याचा आवाज येत होता! दोघीही आतल्या खोलीकडे धावल्या तो आत ' आजोबा आणि नातीचा' अभूतपूर्व  प्रेमाचा सोहळा पाहून दोघी भरून पावल्या!

आजवर कोणालाही न जमलेली गोष्ट ह्या इवल्याशा जीवाने साधली होती.

सरोज ताईंच्या मदतीला खरंच 'जगदंबा' धावून आली होती!!

सौ बीना समीर बाचल©®

वरील कथा बीना बाचल यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

सत्यमेव जयते

Post a Comment (0)
Previous Post Next Post