सत्यमेव जयते

 सत्यमेव जयते

✍️ संभाजी बबन गायके

लष्करातून सेवानिवृत्त झालो आणि पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाकडे सुपरवायझर म्हणून नोकरी पत्करली. एके दिवशी सकाळी लवकरच काही कामनिमित्त मोटरसायकलवरून एके ठिकाणी निघालो होतो. रस्त्यावर अगदी तुरळक वाहतूक असली तरी माझ्या शिस्तबद्ध जीवनशैलीनुसार मोटरसायकलचा वेग एकदम योग्य प्रमाणात होता. 


अगदी अनपेक्षितपणे आणि अचानक एक सात-आठ वर्षांची मुलगी एका गल्लीतून सायकलवरून वेगाने बाहेर रस्त्यावर आली आणि मला धडकून रस्त्यावर पडली. मी ही तोल गेल्याने पडलो, माझ्या उजव्या पायावर गाडीचा भार पडल्याने मुका मार लागला. ती मुलगी तिचे डोके डांबरी सडकेवर जोरात आदळल्याने गंभीर जखमी झाली. हा अपघात पाहणारे रस्त्यावर तसे कुणीच नव्हते. मी तशाही स्थितीत पटकन उठलो आणि त्या मुलीजवळ गेलो. 

तेवढ्यात त्या मुलीचे वडील धावत आले. बहुदा ते तिला सायकल चालवायला शिकवत असावेत. त्यांनी मागचा-पुढचा विचार न करता खाडकन माझ्या मुस्कटात थप्पड मारली. ते गृहस्थ सेवानिवृत्त लष्करी अधिकारी असल्याचे त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्त्वामुळे माझ्या ध्यानात आले. तोपर्यंत आठ-दहा माणसे जमा झाली होती. मी त्यांना माझ्या लष्करी प्रशिक्षणानुसार दोन्ही पाय जुळवून,आणि पायांच्या दोन्ही चवड्यांवर उभे राहत, दोन्ही हात मागे नेत स्टॅन्डींग सल्यूट केला. “साहब, हम बच्ची को पहले अस्पताल ले के चलते है,मुझे आप बतायें नजदीक का अस्पताल किधर है!” असे म्हणत मी माझ्याच मोटरसायकलवर त्यांना मागे बसायला सांगून मुलीला मध्ये बसवून जवळच्या दवाखान्याकडे सुसाट निघालो. मुलीची आई व इतर लोक नंतर इस्पितळात मागाहून पोहोचले. त्या इस्पितळातील डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण लेकराच्या मेंदूला जबर मार बसलेला असल्याने ती वाचू शकली नाही. तिच्या पालकांइतकेच दु:ख मलाही झाले. 


लष्करी जीवनात शत्रूच्या मृत्यूला मी कितीदा तरी कारणीभूत झालेलो होतो, पण आपल्याच देशाच्या नागरीकाच्या मृत्यूला आपण दुरान्व्याने का असेना कारणीभूत झालेलो असल्याने माझे मलाच खूप अपराधीपणाचे वाटत होते. अपघातात सामील असलेल्यापैकी जो मोठा, किंवा जे वाहन मोठे त्याला जबाबदार धरण्याची आपल्याकडे पद्धत आहे. त्यामुळे मीच त्या मुलीला उडवले असा लोकांनी समज करून घेतला. पुढे कायद्यातील तरतुदीनुसार मला अ‍टक करण्यात आली. 


ही घटना सुमारे बावीस वर्षांपूर्वीची आहे. मी मा.न्यायमूर्तींसमोर उपस्थित झालो. माननीय न्यायमूर्तीसाहेबांना कडक सल्यूट केला आणि सावधान स्थितीत उभा राहिलो ते त्यादिवशीची न्यायालयाची कारवाई पूर्ण होईपर्यंत म्हणजे सुमारे तीन तास. त्या अपघातात माझ्याही पायाला दुखापत झालेली असल्याने पाय ठणकत होताच. सैन्य प्रशिक्षणात एकाच जागी एकाच स्थितीत प्रदीर्घ काळ उभे राहण्याची सवय झाली होती. ओल्ड हॅबीट्स डाय हार्ड असे म्हणतात! पुढे प्रत्येक तारखेला प्रत्येक सुनावणीच्या वेळी माझा न्यायमूर्ती साहेबांना सल्यूट करणे आणि न्यायालयीन कारवाई पूर्ण होईपर्यंत सावधान स्थितीत उभे राहण्याचा क्रम सुरूच होता आणि त्यात कोणताही दिखाऊपणा किंवा खोटेपणा नव्हता. सैन्यात सैनिकांच्या अंगी शिस्त,वरिष्ठांचा आदर करणे ह्या बाबी बाणवल्या जातात. ही बाब मा.न्यायाधीशसाहेबांच्या नजरेतून सुटली नसावी. 

माझी काहीही चूक नसताना त्या दुर्दैवी मयत मुलीच्या नातेवाईकांनी इतर लोकांचे ऐकून केवळ नुकसानभरपाई मिळावी या हेतूने माझ्याविरूद्ध दोन खोटे साक्षीदार उभे केले. ती मुलगी सायकल चालवत रस्त्याच्या बाजूने जात असताना मी बेदरकारपणे मोटारसायकल चालवत असताना तिला पाठीमागून टक्कर मारली, असे हे दोन साक्षीदार बिनदिक्कतपणे शपथेवर सांगत होते. मी अपराधी नव्हतोच तर माझ्या बाजूने वकील तरी कशाला द्यावा, म्हणून मी कुणी वकीलही नेमले नव्हते. त्या तथाकथित ‘प्रत्यक्षदर्शी’ साक्षीदारांनी साक्ष दिल्यानंतर “तुम्हांला यावर काही म्हणायचे आहे काय? असे मा.न्यायमूर्तींनी मला विचारले. 


सिविल लोकांमधील हा खोटारडेपणा माझ्यासारख्या फौजी साठी एकदमच धक्कादायक होता. मी नि:शब्द झालेलो पाहून मा.न्यायमूर्तींनीच माझ्यावतीने त्या साक्षीदारांना प्रतिप्रश्न केले. पहिला साक्षीदार एक किराणा दुकानदार होता. तो सकाळी दुकान उघडत असताना त्याने मी केलेला तथाकथित अपघात पाहिला होता, असे त्याचे म्हणणे होते.

 मा.न्यायमूर्तींनी त्याला विचारले.”तुमच्या दुकानाचा दरवाजा कसा आहे? म्हणजे लाकडी फळ्यांचा आहे की लोखंडी शटरचा आहे.?’ तो म्हणाला,” खाली ओढून घेण्याच्या लोखंडी शटरचा दरवाजा आहे!’ साहेब म्हणाले,”तुम्ही शटरचे कुलुप उघडताना शटरकडे तोंड करून बसता की पाठ करून”.

 तो म्हणाला,”साहेब,तोंड शटर कडे करून बसल्याशिवाय कुलुप उघडताच येत नाही”!

 यावर मा.न्यायमूर्तींनी विचारले,”तुम्ही शटरकडे तोंड करून दुकानाचे कुलुप उघडत असताना या दुचाकीस्वाराने त्या मुलीला मागून येऊन टक्कर मारली, हे तुम्हांला कसे दिसू शकले?” दुकानदार निरूत्तर झाला. साहेबांनी त्याला ताबडतोब हाकलून लावले.

  दुसरी साक्षीदार होती एक सफाई कर्मचारी महिला. स्थानिक महानगरपालिकेची ती सफाई कर्मचारी आहे असे तिने साक्ष देताना शपथेवर सांगितले होते. मा.न्यायमूर्तींनी तिच्याकडे महानगरपालिकेची कर्मचारी असल्याचे ओळखपत्र किंवा अन्य कागदपत्र आहे का अशी विचारणा केली. बाई गप्प झाल्या. वास्तविक त्या ताई दुस-या एका कायम सफाई कर्मचारी महिलेच्या जागी काम करीत होत्या. म्हणजे कायम नोकरीत असलेली महिला घरी बसणार, ह्या ताई त्यांच्या हद्दीत काम करणार, कायम नोकरीत असलेल्या ताई महापालिकेचा पूर्ण पगार घेणार आणि त्यातील काही रक्कम ह्या ताईंना मोबदला म्हणून देणार! असे प्रकार अनेक ठिकाणी घडत असतात,असे मला नंतर समजले! धादांत खोटे सांगणा-या त्या ताईंची साक्ष गृहीत धरता येणार नाही, खोटे सांगितल्याबद्द्ल कडक कारवाई करतो, तिला परस्पर कामावर ठेवणा-या महिलेवरही कायदेशीर कारवाई करतो असा दम देताच या ताई चळचळा कापू लागल्या व हात जोडून,क्षमा मागून मा.न्यायाधीशांच्या परवानगीने त्यांनी न्यायालयातून काढता पाय घेतला. 

एवढे सगळे घडत असताना मी मानसिक आणि शारीरिक सावधान स्थिती जराही बिघडू दिली नाही. त्यादिवशीची न्यायालयाची कारवाई समाप्त झाली. दुसरा दिवस बुधवार होता, शुक्रवारी दिवाळी सुरू होणार होती म्हणून न्यायालयास शुक्रवार पासून दिवाळीची सुट्टी लागणार होती. मला गुरूवारी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले. त्या मुलीचे वडील अणि इतर नातेवाईकही न्यायालयात उपस्थित होते. मा.न्यायमूर्तीं न्यायालयात येण्याआधीच ती मंडळी आलेली होती. मी त्या साहेबांनाही सल्यूट केला. केवळ इतर लोकांनी भरीस घातल्यानेच त्या साहेबांनी माझ्याविरूध्द आरोप केले होते. आणि त्यांच्या डोळ्यांत मला ते स्पष्ट दिसतही होते. पण माझ्या प्रामाणिकपणावर आणि कायद्यावर माझा विश्वास कायम होता. मा.न्यायमूर्ती आले, मी त्यांना शिरस्त्यानुसार अदबीने सल्यूट बजावला. ते न्यायासनावर बसले आणि त्यांनी ‘पुराव्याअभावी निर्दोष’ म्हणून माझी सुटका झाल्याचे जाहीर केले! मी फक्त मान थोडीशी खाली वर करून केवळ कृतीनेच त्यांचे आभार मानले. अर्थातच मा.न्यायमूर्ती तेथून त्यांच्या चेंबर मध्ये जातानाही मी सावधान मध्ये उभाच होतो आणि त्यांना सल्यूटही केला होताच. मी सरळ जाऊन त्या मुलीच्या आई-वडीलांना भेटलो आणि माझ्या संवेदना व्यक्त केल्या. 

तेवढ्यात शिपायाने येऊन मला त्यांच्या चेंबरमध्ये बोलावल्याचा निरोप दिला. मी त्यानुसार त्यांच्या चेंबर मध्ये गेलो व अभिवादन करून पुन्हा अदबीने उभा राहिलो. मा.न्यायमूर्ती हसून म्हणाले ‘अ‍ॅट ईझ,जंटलमॅन!” मी विश्राम स्थितीत उभा राहिलो. साहेबांनी त्यांच्या ड्रावरमधून एक मिठाईचा बॉक्स काढून मला देऊ केला आणि त्यांच्या आग्रहाखातर मी तो स्विकारला. “जा,यापुढे काळजी घ्या!” साहेब म्हणाले. मी आता शेवटचा पण अगदी मन:पूर्वक सल्यूट ठोकला आणि गर्रकन ‘पिछे मूड’करून बाहेर पडलो.

  न्यायालयाबाहेरच्या रस्त्यावरील चौकातल्या सिग्नलला माझ्यासोबत झालेल्या अपघातात बळी पडलेल्या मुलीसारखीच एक सात-आठ वर्षांची मुलगी भीक मागत उभी होती. माझे डोळे अश्रूंनी डबडबले होते...मी त्या मुलीच्या हातात तो मिठाईचा बॉक्स ठेवला आणि म्हणालो,”टेक केअर बेटा!” आणि तडक तिथून निघालो....मागून आवाज आला....”हॅपी दिवाली साब!” 

(लेखन:-संभाजी गायके.)


वरील कथा संभाजी गायके यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

बाप उभा अंगणात

3 Comments

Post a Comment
Previous Post Next Post