बाप उभा अंगणात

 बाप उभा अंगणात...!

✍️ संभाजी बबन गायके


“हे वारक-यांचं घर आहे,दादा! नशापाणी केलेला माणूस ह्या घराच्या ओसरीवर पाय ठेवायची हिंमत करीत नाही! मी तुमच्या पाया पडते...निघून जा इथून!” डोळ्यांतील पाणी मह्त्प्रयासाने थोपवून धरीत,डोक्यावरील पदर सावरीत अलका अंगणातून ओसरीवर आणि तेथून माजघरात आली.

ओसरीवर तिचे सासरे विठ्ठलराव गोड चालीत माऊली ज्ञानोबारायांचा हरीपाठ गात बसले होते. त्यांच्यापुढे अलकाचे यजमान तुकारामराव,सासुबाई,मधवे दीर,धाकटे दीर मांडी घालून बसलेले होते. सर्वांच्या हातात पितळेचे टाळ होते आणि त्या टाळांतून ‘हरिमुखे म्हणा... हरिमुखे म्हणा.. पुण्याची गणना कोण करी’ असे शब्द जणू जिवंत होऊन अवतरत होते. देवळीत तेलाचे दिवे तर बैठकीवर कंदीलातील वात लवलवत होती. एकादशी आजची! अलका ज्या घरात सून म्हणून आली ते सर्व घर सांप्रदायिक चालीचे. या घरातल्या प्रत्येकाला त्याच्या वयाच्या पाचव्या दिवशीच तुळशीची माळ घातली जायची. त्यामुळे हाड बाटणे हा प्रकार नव्हताच. वारकरी संप्रादायात जन्मापासून मांसाहार केलेला नसणे म्हणजेच ‘हाड बाटलेले’ नसणे असा शब्दप्रयोग प्रचलित आहे.


अलकाचे माहेर म्हणजे याच्या अगदी उलट. वडीलांची वेळोवेळी विकून उरलेली तुटपुंजी शेती, भावकीच्या वादातून गाव सोडून शेतातल्या पत्र्याच्या घरात मांडलेला मोडका संसार, त्यातून आलेले नैराश्य आणि वडीलांच्या मनाच्या माळरानातल्या विहीराला लागलेले व्यसनाचे बारमाही जिवंत झरे! शरीराला रोगाचे ग्रहण असल्याने भाकरीचा चंद्र पौर्णिमा कधीच पहात नसे. टोपल्यात भाकरीची अर्धी-चतकोर चंद्रकोर उगवायची कशीबशी. एकटा भाऊ कमावता,थोरल्या दोन्ही बहिणी कशाबशा उजवलेल्या. आता अलका ही शेवटची उपवर मुलगी.


पंचक्रोशीतील शेतकरी आणि वारकरी कुटुंबातील तुकारामरावांची पहिली अत्यंत सुशील पत्नी दोन लहान मुली मागे ठेऊन सहा महिन्यांपूर्वी अचानक देवाघरी गेलेली. तिच्या घरच्यांनी दोन्ही मुली त्यांच्याकडे सांभाळायला नेल्या होत्या. तुकारामरावांचे मन तसे विरक्तीकडे झुकलेले, पण व्यवहार आ वासून उभा... त्याला उत्तर काय देणार? बायको नको पण त्या लहान लेकरांचा प्रेमाने सांभाळ करणारी हक्काची आई पाहिजे! तुकारामराव म्हणूनच केवळ या लग्नाला तयार झाले होते. या लग्नातून त्यांना अन्य काहीही नको होते. एका लग्नात तुकारामरावांच्या बहिणीने अलकाला पाहिले आणि तिच्या वडीलांकडे विचारणा केली. अलकाचे लग्न तर करून द्यायचेच होते. कष्टकरी परंतू खाऊन-पिऊन सुखी घरातील स्थळ चालून आल्याने नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. तुकारामराव शासकीय सेवेत शिवाय सदाचरणी, चार चांगल्या माणसांत उठणे-बसणे असलेले. त्यामुळे आर्थिक परिस्थिती, दोघांच्या वयातील अंतर हा विषय मागे ठेवून अलकाला या घरात देण्यात आले. तुकारामरावांनी अलकाच्या गळ्यात वरमाला आणि तुळशीची मालाही घातली. अलकाचा जणू पुनर्जन्म झाला होता. अलकानेही त्या दोन लहानग्या मुलींना आईची माया दिली आणि त्यामुळेच पहिल्या पत्नीच्या माहेरच्यांनी अलकाला त्यांच्या लेकीचाच दर्जा दिला. अलकाला आता आणखीन एक माहेर मिळाले होते. लग्नानंतर अलका पहिल्यांदा आपल्या मूळच्या माहेरी न जाता या नव्या माहेरी गेली!


आणि दोन महिन्यांनी नामदेवराव लेकीच्या घरी कुणालाही न सांगता सवरता आले... ते सुद्धा रात्रीच्या आठ वाजता. ओसरीवर हरिपाठात सर्व दंग असताना अलका स्वयंपाकघरात उपवासाची खिचडी तयार करण्याच्या खटपटीत होती. मुली दूध पिऊन झोपी गेलेल्या होत्या. तिची नजर कशी कुणास ठाऊक अंगणाकडे गेली. अंधारात एक आकृती उभी होती. मळका सदरा,विरलेले धोतर, हातात तशीच एक लहान पिशवी. अलका लगबगीने अंगणात आली. “दादा, तुम्ही? असे अचानक आणि एवढ्या उशीराने? अलकाने एका दमात दोन्ही प्रश्न विचारले आणि नामदेवरावांनी तोंड उघडले. “आलो...म्हटलं बघावं लेकीला!” या वाक्यासोबत हातभट्टीच्या दारूचा अत्यंत उग्र दर्प अलकाच्या श्वासांत शिरला. तसा हा दर्प तिच्या ओळखीचाच होता. पण आता या वासाला ह्या अंगणात जागा नाही. 


अलकाने नामदेवरावांच्या हाताला धरून त्यांना आणखी अंधारात नेले आणि सांगितले... “हे वारक-यांचं घर आहे,दादा! नशापाणी केलेला माणूस ह्या घराच्या ओसरीवर पाय ठेवायची हिंमत करीत नाही! मी तुमच्या पाया पडते... निघून जा इथून!” आणि अलका ओसरीवरून स्वयंपाकघरात पोहोचली. हरिपाठ संपल्यावर तुकारामरावांनी विचारले,”कोण होतं अंगणात?” अलका म्हणाली,”शेजारच्या पडाळीवरचा कुणी पाहुणा होता वाटतं. चुकून आपल्या अंगणात आला अंधाराचा. मी वाट दाखवली त्याला!” असं म्हणून अलकाने चुलीतल्या गोव-या मागे-पुढे केल्या...त्या धुरात अलकाचे अश्रू गडप झाले!


नामदेवराव त्या गावातल्या आपल्या एका पाहुण्याच्या वस्तीवर मुकाम्माला गेले. तोंडाचा वास दारूचाच असला तरी डोक्यातील नशा आता खाडकन उतरली होती. सकाळी चहाही न घेता नामदेवराव घरी परतले. आंघोळ उरकली आणि तडक गावातलं विठ्ठल्रखुमाईचे राऊळ गाठलं. काकड आरती नुकतीच संपली होती. सखारामतात्या अजून देवळातच होते. “तात्या,माळ आहे का एखादी? मला घालायचीये” नामदेवरावांनी विचारले. तात्या एकदम चमकले. “रात्रीची नीट उतरली आहे ना? पांडुरंगाची माळ घातली तर टिकवावी सुद्धा लागते... चेष्टा नाही ही, नीट विचार कर!”


  नामदेवरावांच्या डोळ्यांतले पाणी पाहून तात्यांनी पुढे काही विचारले नाही. देवळातल्या कपाटातली तुळशीमाळ काढली, देवाच्या चरणी लावली, नामदेवरावांच्या कपाळी अबीर लावला, मध्ये अष्टगंधाचं बोट टेकवलं, ‘पुंडलीकवरदा हरी विठ्ठल’ म्हणत नामदेवरावांच्या गळ्यात ती माळ घातली. नामदेवरावांनी खिशातली नवीकोरी टोपी डोईवर घातली. विठ्ठल-रखुमाईच्या,तात्यांच्या पायांवर डोई ठेवली आणि अलकाच्या घरची वाट धरली. 


कालचा दिवस वेगळा आणि आजचा दिवस वेगळा. कालची एकादशीची रात्र आणि आजची द्वादशीची रात्र! पुन्हा तेच अंगण... कालची वस्त्रे मळलेली,आजची शुभ्र.. अंधारतही उठून दिसणारी! आताही अलका घाई-घाईत अंगणात आली.. दुसरे कुणी यायच्या आत. बापाच्या कपाळावरील अबीराचा काळा ठिपका पाहून तिच्या काळजात दिवा लागला. त्यांच्या गळ्यातून तुळशीमाला बाहेर डोकावत होती. “दादा...!” म्हणत अलकाने नामदेवरावांना घट्ट मिठी मारली. “कोण आहे गं, अलका?’ तुकारामरावांनी आतूनच विचारले. “सासरे आलेत तुमचे” अलका म्हणाली. “या,मामा” म्हणत तुकारामराव बाहेर आले, त्यांना हाताला धरून ओसरीवर घेऊन गेले. अलकाचे सासरे गाथा वाचत बसलेले होते. नामदेवराव आता त्यांच्या शेजारी मानाने बसू शकत होते... दोन्ही व्याही आता एका पातळीवर आले होते... अलकाच्या गालांवरून अश्रू ओघळून चालले होते...आज आसवांना सुगंध मिळाला होता! बघणा-यांना वाटले, सासुरवाशीन लेकीला बाप भेटल्याचे अश्रू असतील... अलकाच्या डोळ्यांनाच खरे कारण उमगलेले होते!

(सामान्य माणसांच्या आयुष्यात घडलेल्या असामान्य घटना या सदरातील हा आणखी एक खराखुरा लेख. संभाजी बबन गायके. )


वरील कथा संभाजी बबन गायके यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.


ही कथा वाचून पहा.

संध्याछाया

Post a Comment (0)
Previous Post Next Post