संध्याछाया

 संध्याछाया....

✍️ योगेश साळवी 

    मंदा आरशासमोर बसली होती.... स्वतःची आरशातली छबी न्याहाळत.. फाटलेल्या भांगातून गेलेली पांढरी रेघ आता जास्त स्पष्ट होत चालली होती. डोळ्याखालील सुरकुत्यांचाही तसेच झालेलं. गळ्याखाली मानेवरच्या त्वचेवरती पण सुरकुत्या पडू लागलेल्या होत्या... चला पासष्टी आली वयाची.. आता या अँटी एजिंग क्रीम्स ,कॉम्पॅक्ट पावडर, मॉइश्चरायझर... या सर्वांना फक्त एक उपचार म्हणून चेहऱ्यावर लावायचं झालं... मंदाच्या मनात विचार आला.

      राजीव शी तिचा घटस्फोट वयाच्या चाळीस का पंचेचाळीशी असताना झालेला होता. राजीव चा 

बाहेरख्यालीपणा प्रमाणावर वाढत चालला होता. कंपनीत मोठ्या पदावर होता राजीव. आपल्या पदाचा गैरवापर करून हाताखालच्या नवीन लागलेल्या, वयाने बऱ्याच वर्षांनी लहान मुलींबरोबर त्याची प्रेम प्रकरणे तिच्या कानावर येत होती. त्यातील एक मुलगी तर राजीव बरोबर लग्नाच्या बायको सारखी हिंडू फिरू लागल्याचं... राजरोसपणे रात्री- अपरात्री त्याच्याबरोबर राहू लागल्याचे पाहताच मंदाला एक दिवस असह्य झालं.. आणि मग दोघेही रीतसर विभक्त व्हायला वेळ लागला नाही.

      केतनचं त्यांच्या एकुलत्या एका मुलाचं लग्न नवीनच झालेले त्या काळात... म्हणजे राजीव आणि मंदाचा घटस्फोट झाल्यानंतर तीन चार वर्षात.. केतनचा पाठिंबा अर्थात आईलाच मिळाला.. म्हणजे वडिलांना एका शब्दाने बोलला नाही तो.. पण त्याची सहानुभूती अर्थातच मंदालाच मिळाली. मंदा पण त्यावेळी धीराने उभी राहिली. कोणावर अवलंबून न राहता तिने आपली शाळेतील शिक्षिकेची नोकरी नेटाने चालू ठेवली आणि निवृत्त होण्याचे वय झालं तशी रीतसर निवृत्त झाली.

        केतन चे लग्न तिनेच पुढाकार घेऊन व्यवस्थित स्थळे वगैरे पाहून जमवलं होतं. अर्थात केतन चे रुबाबदार देखणे व्यक्तिमत्व आणि त्याने स्वकष्टाने मिळवलेली बँकेतील नोकरी या त्याबाबतीत जमेच्या बाजू होत्याच.. पण राजीव असताना म्हणजे त्यांचे लग्न अजून टिकून राहिलं असतं तर

जो भक्कम आर्थिक पाठिंबा त्यांच्या कुटुंबाला.. मंदाला मिळाला असता तो आता राहिला नव्हता.

     केतन आणि त्याची बायको कमवायची ,पण ते त्यांच्या कुटुंबाला नाही का लागणार?? शिवाय त्यांच्या एकुलत्या एका मुलाचा खर्च.. शिक्षण.. कपडेलत्ते इतर कौटुंबिक गरजा याही असतातच की... परवा बिल्डिंग मधल्या देसाई वहिनी भेटलेल्या रस्त्यात.. त्या म्हणत होत्या की आता या वयात म्हणजे साठी नंतर आपल्या गाठीशी आपल्यापुरता पैसा प्रत्येक व्यक्तीने ठेवायलाच हवा. म्हणजे वेळी अवेळी कामाला येईल असा.. तशी आपली मुलं असतातच आपली काळजी घ्यायला. नव्हे करतातच ती.. पण माणसाच्या मनाचा थांगपत्ता कुणालाही लागत नाही. पुढच्या गोष्टींचा काय भरोसा... आणि मंदा सारख्या पती शिवाय राहणाऱ्या बाईने तर काळजी घ्यायला हवीच. केतन आणि त्याची बायको करतायेत तोपर्यंत ठीक आहे... हवे नको ते पाहतात

पण... आजकाल वर्तमानपत्रात काय काय वाचायला मिळतं... कानावर चार बाजू कडून चार गोष्टी ऐकायला मिळतात. अशावेळी पैसा गाठीशी असलेला बरा.

        परवाच वर्तमानपत्रात वाचलेली बातमी मंदाला आठवली. बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्याने वृद्ध बाईचा मृत्यू झाला तिच्या राहत्या घरात... एकटीच राहायची म्हणे तिच्या घरात... चार-पाच दिवसांनी शेजाऱ्यांना... आजूबाजूच्या  लोकांना वास यायला लागला तेव्हा म्हणे कळलं. वृद्धाश्रमात किंवा केअरटेकरच्या स्वाधीन करतात म्हणे आजकालची मुलं आपल्याच आई-वडिलांना... का तर म्हणे त्यांच्या धावपळीत करायला वेळ नसतो त्यांचं. अजून एक अशीच वाचनात आलेली त्या कोण्या नामांकित नटीची बातमी.. एकेकाळी चित्रपट सृष्टी गाजवलेली, खूप हिट चित्रपट दिलेली ती नटी वृद्धापकाळात आर्थिक 

विपन्नावस्था येऊन अगदी हालअपेष्टा भोगत शेवटी गेलीच म्हणे. मंदाला नाही म्हटलं तरी थोडे  असुरक्षित वाटायला लागलं. असे विचार आले की मग विष्णुसहस्रनाम किंवा कसलीशी पोथी वाचत बसायची ती.

      मंदाच्या बँक अकाउंट मध्ये बचत खात्यात तिचे पैसे जमा केलेले होते. दोन मुदत ठेवी होत्या. हाताशी असाव्यात म्हणून. त्यातील एक ज्येष्ठ नागरिकांसाठी खास होती. व्याजदर जास्त देईल अशी. शिवाय प्रत्येक महिन्याला नियमित निवृत्तीवेतन मिळत असे. तेही मंदा निगुतीने नियमित बँकेत जमा करीत असे.

      मंदाचे स्त्रीधन म्हणून बाजूला ठेवलेलं एक सोन्याचं थोड्याशा जुन्या बांधणीचं पाच तोळ्याचे मंगळसूत्र होतं. झालास तर आठ तोळ्याच्या पाटल्या होत्या. त्या मात्र तिने घरातच कपाटात ठेवलेल्या राजीव शी फारकत झाल्यापासून मंगळसूत्र घालायचं बंद केलेलं तिने... आणि पाटल्याही अशाच पडून होत्या कपाटाच्या खणात.. अगदी काळजीपूर्वक ठेवलेल्या.

      काल परवा पर्यंत निवृत्तीनंतरही किरकोळ खरेदी, सकाळची चालण्याची फेरी, बँकेतील कामे यासाठी घरावर करायची मंदाची सवय होती. मात्र या दोन-चार दिवसात तिला कळलेलं की आताशा शरीर तितकेसे साथ देत नाहीये. सांधे लगेच कुरकुर करून तक्रार सुरू करू लागलेत. पाठीत उसण भरते उठताना ..बसताना. डॉक्टरांकडून काढलेले तपासणीचे रिपोर्ट रक्तदाब आणि मधुमेहात वाढ झाल्याचे दाखवत होते.      

      देव न करो..आपल्याला काही झालं... तर आपल्या आजारावरचा खर्च मुलाला.. सुनेला का म्हणून करायला लावायचा... त्यांना त्यांचे कमी का व्याप असतील? निदान आर्थिक बाबतीत तरी कोणावर विसंबता कामा नये आपण.

 मंदाच्या डोक्यात अगदी सकाळपासूनच विचार येत होते.

      " आजी विश मी.. मला सीईटी मध्ये चांगले पर्सेंटाइल आले..."अक्षय जवळजवळ ओरडतच तिच्या खोलीत शिरला.

      अक्षय मंदाचा नातू.... केतन चा मुलगा.. एकुलता एक.

यंदा बारावी चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन पुढे चांगल्या कॉलेजमधील प्रवेशासाठी सीईटी, आयआयटी या स्पर्धात्मक परीक्षा दिल्या त्याने. आजीच्या खोलीवर म्हणजे मंदा झोपायच्या खोलीत... वेळी अवेळी कधीही येऊन मालकी हक्क गाजवणारी एकमेव व्यक्ती म्हणजे अक्षय होती.

      अक्षय कधीही आला तरी मंदाच्या मनात आनंदाचे थुई थुई उडणारे कारंजे उडवत असे.

       "अरे वा.... अक्षु मला वाटलंच... अरे नातू कोणाचा आहे शेवटी... अभिनंदन बाळा." मंदाने स्वतःच्या डोळ्यावरचा चष्मा काढून डोळे पुसत म्हटले.

       "अक्षु ही काय सांगायची रीत झाली का तुझी..?? आजीच्या पाया पड बघू आधी." अक्षय ची आई म्हणजेच मंदाची सून अक्षय वर डाफरली.

       "अगं असू दे प्रिया. अग आजी आणि नातवात कसल्या त्या फॉरर्मॅलिटीज पाळायच्या... माझा फ्रेंड आहे तो हो ना रे अक्षू..?"आईच्या आग्रहाखातर पायावर झुकलेल्या अक्षय ला त्या म्हणाल्या.

        मंदा आता पुन्हा तिच्या नेहमीच्या मूडमध्ये आली. मघाशी मनावर आलेल्या निराशेचे सावट दूर झालं होतं. सकाळपासून वेडावाकडा हेलकावे घेत असलेला मनाचा लोलक आता कुठं स्थिर होऊ लागला होता.

        "मग आता कुठे प्रवेश घेणार आहेस..?"अक्षयला मंदाने विचारलं.

       " आजी पुण्यामध्ये सिंम्बायोसिस म्हणून इंजिनिअरिंग चे प्रसिद्ध कॉलेज आहे. फी जास्त आहे त्याची.. पण तिथे रोबोटिक्स चा अभ्यासक्रम आहे. मला तिथे प्रवेश घ्यायचा आहे." अक्षय शांत स्वरात म्हणाला.

          अक्षयच्या आवाजातला उत्साह थोडा कमी झाल्याचे लक्षात येताच मंदा म्हणाली. "अरे मग घोडे कुठे अडले?"

       "आजी आई बाबा मुंबईला कुठल्यातरी कॉलेज मध्ये ऍडमिशन घ्यायला लावताहेत मला... होस्टेलची आणि कॉलेजची फी परवडणार नाही म्हणून... मुंबईला प्रवेश तर मिळेल.. पण मला जो अभ्यासक्रम हवा आहे तो नाही ना मिळणार...." अक्षय म्हणाला.

       मंदाने डोळे मिटले.. पण क्षणभरच.. लगेच ती म्हणाली.. अक्षयच्या आईला उद्देशून..

        " हे बघ प्रिया... माझ्याकडे पाच तोळ्याचे मंगळसूत्र आणि आठ तोळ्याच्या पाटल्या आहेत. आता या उतार वयात मला पाटल्या घालायची हौस नाही आणि मंगळसूत्र ज्याच्यासाठी घातलेले त्याला मी कधी सोडचिठ्ठी दिली आहे."

        "तर या दागिन्यांचा उपयोग माझ्या नातवाच्या शिक्षणासाठी झाला तर मला त्या सारखं दुसरं सुख नाही.

तर पैशासाठी तरी त्याला जे शिक्षण घ्यायचे ते अडता कामा नये. पाहिजे तर माझा हा हट्ट आहे असं समजा तुम्ही दोघं. अक्षयला जिथे ऍडमिशन हवी आहे तिथेच घेतली पाहिजे."

        मंदाचे हे बोलणं केतन आतल्या खोलीतून ऐकत होता

बाहेर आला तो त्याच्या खोलीतून... त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते. डोळे पुसतच तो म्हणाला...

      " तुझे दागिने विकायची काही गरज नाही आई... तू केलंस एवढं भरपूर केलयस आमच्यासाठी."

       "मी अक्षयला मुद्दामच हे म्हणालो होतो... त्याला परिस्थितीची जाणीव असावी म्हणून... पण आजच मी माझ्या साहेबांशी बोललो. माझ्या बँकेतूनच अक्षयचं पुढील शिक्षणासाठी  कर्ज मंजूर झालं आहे.... सो  अक्षय, आई... आणि प्रिया रिलॅक्स ..... आणि अक्षय तू लगेच निघ... कैलास लस्सी वाल्याकडून कुल्फी घेऊन ये चार-पाच... चांगल्या भारीतल्या... आपण तुझं एज्युकेशन लोन मंजूर झाल्याचा आनंद साजरा करू."

        वायफळ खर्च कधी न करणारे बाबा अचानक उदार झालेले पाहून अक्षयचा हात केतन समोर धरत असलेली नोट घेण्यासाठी चपळाईने पुढे झाला.

योगेश साळवी

वरील कथा योगेश साळवी यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post