जमिनीवर…!!
✍️ चित्रा नानिवडेकर
प्रतापरावांनी मोबाईल मधला जानकी चा "तो"मेसेज परत वाचला. जानकी ची शेवटची इच्छा म्हणून आपण आता लग्न बंधनात अडकणार? जी जानकी आयुष्यात आपल्या समोर कधी बोलू धजली नाही. तिने जाताना अशी आपली कोंडी करावी? जन्माचा सूड घेतला तिने.आपल्याला काय हवं ह्याचा जराही विचार तिच्या मनात आला नसेल?
नकळत त्यांच्या डोळ्यासमोर स्वतः च्या आयुष्याचा पट उलगडला…'श्रीमंतीतला जन्म स्वभावात बडेजाव आणि उपजत गुर्मी. उच्च शिक्षण घेऊन वकिलीत जम बसवला. घरादारात दरारा. राजबिंड्या रुपाला साजेल अशी नाजूक देखणी जानकी मिळाली. हुशार आणि बोलघेवडी.मध्यम वर्गात वाढलेली... तिच्या माहेरी आपण जास्त कधी मिसळलो नाही. आपल्या कोषा बाहेर च्या सर्कल मध्ये मिसळणं आपल्याला जमत नाही.पण ती माणसांची लोभी.आपल्या घरच्या सगळयांना कोणत्याही कार्यक्रमात जानकी पाहिजे असे. तिने कधी कुरुबूर केली नाही. तिच्या माहेरी तिच्या भावाला जेंव्हा तिच्या भावाला मल्टी नॅशनल कंपनी ने जर्मनीला पाठवलं त्या वेळेस आपण जरा त्यांना जवळ केलं. बाकी पूर्ण आयुष्य आपण धाकात ठेवलं तिला.परिणामी ती मिटत गेली.अबोल होत गेली... आपण लक्ष दिलं नाही.
रुचिर आपला एकुलता मुलगा जानकी चा बहिश्चर प्राण.त्याला क्षणभर सुद्धा ती नजरेआड करत नसे.पण त्याला शिस्त लागावी ,म्हणून बोर्डिंग मध्ये ठेवलं.खूप रडली त्या रात्री पण आपल्यावर काही परिणाम झाला नाही.उपजत हुशारी वर त्याने शिक्षण पूर्ण करून परदेश गाठला. तेंव्हा रडून जानकी ने म्हटलं होतं "नका एवढे निष्ठुर होऊ… आपल्या पोटच्या मुलाला असं नजरेआड नका करू.''पणआपल्या लेखी तिला काय कळतं पण ती हृदयाने विचार करत असे. आपण मात्र तिच्याकडे दुर्लक्ष केलं.हया प्रसंगा नंतर ती अधिकच आत्ममग्न झाली. त्यानंतर तिला एक एक आजाराने ग्रासलं.
आत्ता प्रकर्षाने जाणवतं. आपण कसल्या मस्तीत जगत होतो. सगळ्यांना नेहमी पायाच्या टाचेखाली ठेवलं..हळूहळू आपला तो छन्द होत गेला.नोकर माणसं, आला गेला आपण सहन करू शकत नव्हतो... परकं कोणी घरी आला तर जानकी ला सतत घालुनपाडून बोलणं, चार लोकांसमोर तीला अपमानित करणं. ती कशी धान्दरट आहे,किती बावळट आहे हे दाखवायची एकही संधी सोडत नसू.. कायम तिची हेटाळणी केली. आपण म्हणू तेच तिने ल्यावं, तेच खावं. आपण नेऊ तेंव्हाच बाहेर जावं. हळूहळू खच्चीकरण करून तिचा आत्मविश्वास संपवला.तिच्या माहेरच्या लोकांशी कधी संबंध ठेवला नाही.तिची स्पेस तिला दिलीच नाही.
अशा जानकीने जाताना आपल्यासाठी हा दुसऱ्या लग्नाचा घाट घातला ते सुद्धा शालन सारख्या मुलीशी? ह्यात आपलं भलं करण्यापेक्षा तिचं कोटकल्याण करायचा डाव होता बहुतेक तिचा.
जानकी मधुमेह रुग्ण झाली तेंव्हा आपण फक्त तिला डॉ.काणे कडे नेण्या पलीकडे काही केले नाही. रोजच्या दुखण्याखुपण्या कडे आपण लक्ष देत नव्हतो,किंबहुना आपल्याला तिचा रागच येत असे की काय रोज एकेक तक्रारी सांगते.त्याच सुमारास बहुतेक ती शालनकडे मन मोकळं करीत असावी.शालन तिची शाळेतली मैत्रीण. ती डॉक्टर काणे ह्यांच्या हाताखाली काम करत होती बहुधा. माझा मित्र होता तरी आम्ही क्लब मध्ये भेटत असू. मी जानकी बद्दल चकार शब्द बोलत नसे.
कामा पलीकडे क्लिनिकमध्ये सुद्धा मी जास्त रेंगाळत नसे. त्यातून हया शालन सारख्या तर माझ्या खिसगणित सुद्धा नसत.
एकदा बार रूम मध्ये बसलो असताना डॉ. काणेचा फोन आला. जानकी ची शुगर खूप कमी झाली आणि तीला सिस्टर शालन ने कशीबशी हॉस्पिटल मध्ये येऊन भरती केलं . तू ताबडतोब असशील तसा निघून ये.’खरं तर आपण त्याक्षणी हादरलो. जानकी शिवाय आपलं घर ही कल्पना आपल्याला आतून हलवून गेली. आपण वेगाने गाडी काढून हॉस्पिटल ला पोहचलो. कधी एकदा जानकीला पहातो असं झालं. आय. सी. यू. च्या काचेच्या दरवाजातून तोळामासा झालेली जानकी बघताच आपल्यला प्रकर्षाने जाणवले की आपण काय करून ठेवलं हिचं. देवाला तर आपण मानतच नाही... तरीही मनात म्हणालो ‘मी कधी तुझ्यापुढे गुडघे टेकले नाही पण हया बाईने तुझी व्रतवेईकलंय केलीत निदान त्या साठी तरी तिला हया त्रासातून बाहेर काढ.’
बाहेर एक सिस्टर... कदाचित तीच शालन असेल मला वेळोवेळी तिची कंडिशन सांगत असे. तिच्या मधुमेहाचा बऱयाच अवयवांवर परिणाम झाला असं स्पेशालिस्ट सांगून गेले. कधी एकदम हुशारीत असायची तर कधी मलूल राहायची.10 दिवस झुंज दिली. आणि अखेर आपला हात हातात घट्ट पकडून डोळ्यातून प्राण सोडला तिने. आपलं अवघे अवसान गळाले. रुचिर ने आपल्याला कसबसं त्यातून सावरलं. परवा तेरावं झालं.
त्या रात्री रुचिर आपल्या खोलीत आला आणि प्रथम त्याने आपल्या गळ्यात पडून मोकळं रडून घेतलं... मग जानकी ने त्याला कोण्या एका आजारपणा च्या दिवशी शुद्धीत असताना मेसेज केला होता.
“रुच्या.... माझ्या पिल्ला माझ्या नंतर तू डॅड ना संभाळशील ह्याची खात्री आहे मला. पण आता तूला सुद्धा तूझं आयुष्य आहे... म्हणून मी काय सांगते ते लक्षपूर्वक ऐक. माझी बाल मैत्रीण शालन जोगळेकर... हयाच हॉस्पिटल मध्ये सिस्टर आहे. अविवाहित आहे. तिचं हया जगात कोणीच नाही... माझी खूप काळजी घेतली तिने. त्यासाठी म्हणून नाही पण मला खात्री आहे की माझ्या माघारी डॅड ला माझ्या मागे जर कोणी सावरू शकेल तर ती शालन... तेंव्हा तू हे लग्न लावूनच परत जा. तूझ्या डॅड ना पण मी असा मेसेज पाठवला आहे. शालन ला शप्पथ घातली आहे. डॅड नी किंचित जरी माझ्यावर प्रेम केलं असेल तर नक्कीच माझी शेवटची इच्छा पूर्ण करतील.... तुझी आई.
जेंव्हा जानकी चा शेवटचा मॅसेज वाचला आणि तशाच अर्थाचा मेसेज जानकी ने डॉ. काणे, रुचिर आणि खुद्द शालन ला केला. म्हणून आपला नाईलाज झाला आणि त्याची परिणीती आज आमच्या लग्नात झाली.'
दुपारी हॉल मध्ये घरच्या मंडळींच्या गरड्यात शालन अवघडून बसली होती.. ठीक आहे म्हणा रूपाने. जानकी मधला खानदानी नाजूकपणा बिलकुल नाहीये.बोलताना, हसताना मोकळा स्वर वाटला. प्रतापरावानां बिलकुल आवडत नसे स्त्रियांनी असं सातमजली हास्य करून बोलणं.नापासंतीची एक आठी उमटलीच कपाळावर.
त्यांना हे जबरदस्ती चं नातं निभावण जीवावर आलं होतं . मनात काही एक ठरवून ते बेडरूम मध्ये गेले.पण तिथे त्यांना वेगळंच दृश्य दिसलं.
शालन,सुटसुटीत ड्रेस बदलून आपली गादी जमिनीवर घालून आरामात भिंती ला टेकून बसली होती. ते येताच उठली.म्हणाली
"सर.. मला ठाऊक आहे. तुम्हाला माझ्याशी लग्न करण्यात काडीचा रस नाही. हया 46व्या वर्षी मला सुद्धा खरं म्हणजे संसारात पडायचं नव्हतं.. पण जानू.. आय मीन तुमची जानकी हट्टालाच पेटली. तिचं काळीज माझ्या साठी तुटत होतं. म्हणायची "अख्ख आयुष्य कसं ग वैराण करून ठेवलंस. भावा बहिणींना चांगली नांदती ठेवून स्वतः अशी बैराग्यासारखी राहिलीस."आणि मरताना वचन घेतलं तुमच्याशी लग्न करण्याच. मी तुम्हाला सांगणारच नव्हते पण तिने सगळ्यांना कधी मेसेज केला कळलंच नाही. माझी तुमच्यकडून कसलीच अपेक्षा नाही. होता होईल तो मी तुमच्या मध्ये येणार नाही."
"हं…ह्यात तिनं मला का अडकवावं पण. कोणी एखादा गरजू बघून तूला…आय मीन तुम्हाला उजवायचं होतं "कपाळावर मूठ आपटत ते म्हणाले.
"अच्छा म्हणजे तुमच्याशी मोकळेपणाने बोललीच नाही का ती? अहो तिचा जीव शेवटपर्यंत तुमच्यात अडकला होता. सारखं म्हणायची ह्यांना हाताने साधं पाणी सुद्धा घेता येत नाही, ह्यांच्या सगळ्या गोष्टींची काळजी मी घेते म्हणून वेळेवर कोर्टात जातात.. आपल्या नंतर ह्यांचं कसं होणार वगैरे बोलत असे "
अचानक प्रतापरावांचे डोळे भरून आले. पण हया परक्या बाई समोर तसं दाखवणं त्यांना प्रशस्त वाटलं नाही. ते उठून बाथरूम मध्ये गेले. परत आले तेंव्हा शाल पांघरून शालन जमिनीवर झोपली होती. त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि स्वतः बेडवर झोपले.
प्रतापराव जागे झाले तेंव्हा स्वयंपाक घरातून घंटा किणकीण आवाजात श्लोक म्हणत शालन गॅस वर काही करत होती. त्यांची चाहूल लागताच मागे वळून प्रसन्न हसत म्हणाली
"गुडमॉर्निंग.. "
ते चकित झाले "अहो हे कशाला करता आमच्या बाई येतात 9पर्यंत "
हसून म्हणाली "सर माझी आठ ची ड्यटी "
आणखीन एक आठी त्यांच्या कपाळावर चढली.' म्हणजे ही आता नोकरी सुरूच ठेवणार. त्या फडतूस हॉस्पिटल मध्ये रोगी माणसांना अटेंड करून आपल्या हया सुंदर घरात येणार. नो वे"
आठच दिवसांत शालन ने घरावर आपली छाप
पाडली अगदी बाई, ड्रायवर, रुचिर सगळ्यांना बोलतं केलं. प्रत्येकाला आवर्जून फोन करायची. जानकी बरेच दिवस आजारी म्हणून घराला अवकळा आली होती. पण शालन नें सगळी रचना बदलून टाकली घराला नवं चैतन्य आलं. परंतू आपली जागा जमिनीवर आहे हे मात्र कधीच विसरली नाही.प्रतापराव सुद्धा आपणहून हे अंतर कमी करायचा प्रयत्न करीत नव्हते. त्यांचा ताठा तसाच होता. जेवढ्यासतेवढं बोलत असत.
त्या दिवशी प्रतापराव आले तेच मुळी खोकला, ताप घेऊन. घशात खूप खिचखिच होत होती. पण जराही जाणवू न देता स्वतः च्या स्टडी मध्ये जाऊन वाचत बसले. रात्री ती झोपल्यावर हळूच किचन मध्ये जाऊन दूध गरम करण्यासाठी सामान शोधत असताना शालन ला जाग आली तिने पाहिलं तर त्यांना जबरदस्त खोकला झाला होता. तिला काही ही लक्षणें ठीक दिसली नाहीत.त्यांना बेडरूम मध्ये पाठवून तिने सगळी सूत्र हातात घेतली.
अख्खा देश कोरोना च्या महामारीत झुंजत होता.
आपण इतके गाफिल राहिलो की कोरोना चा संसर्ग आपल्याला झाला,हे कबूल केलंच नाही.
लॉक डाऊन झालं.रुचिर कोसो दूर. कित्ती डॉ.मित्रांना फोन लावले पण कोणीच रिस्क घ्यायला तयार नाही.
एका रात्री इतकं जास्त झालं की शालन ने मागचापुढचा विचार न करता सरळ आपल्याला ऍम्ब्युलन्स मध्ये घालून पालिकेच्या कोरोना सेंटर वर नेलं. सत्रा ठिकाणी फोन लावले.ह्याच्या त्याच्याशी बोलून आपल्याला योग्य ट्रीटमेंट मिळवून देऊनच शांत बसली. केवळ मास्क बांधून वावरत होती.
त्या सहा बाय आठ च्या बाराकीत पडल्यावर आपलं अवसान गळालं. अक्षरशः मनातून फाटत होतो. काय कमावलं मी?जानकी ला हाडतूड करत हुकूमत गाजवत होतो. तिने मात्र आपल्याला जाताना हा शालन नावाचा हिरा पदरात बांधला. तिला सुद्धा आपण तिचं स्थान द्यायला कचरलो. जणू काही तिला आपली गरज आहे असेच समजत होतो.
ज्या शालन ला इतकं दुय्यम मानलं तिने जीवाची बाजी लावून आपल्याला माणसात आणलं.
घरी आलो.त्या रात्री शालन जवळ जमिनीवर बसून तिचे हात हातात घेऊन म्हणालो
"कोणत्या शब्दात तुझे आभार मानू? अख्ख जग कोरोनानं मरतंय पण केवळ तू होतीस म्हणून मी आज जिवंत आहे. आजपासून माझं आयुष्य तूझ्या नावावर…खरंच जानकीने माझ्यासाठी हिरा शोधला. तो असा जमिनीवर राहण्यासाठी नाही. मला माफ कर शालन "आपली सगळी मस्ती, ताठा पाण्यासारखा गळून पडला.
समाप्त
फोटोवर क्लिक करून पाहा एक नवी कथा
वरील कथा चित्रा नानिवडेकर यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.