देवाजीच्या मना

 देवाजीच्या मनात

✍️ जयश्री दाणी

          नरहरी राहून राहून आपले डोळे पुसत होता. खूप उत्साहात फुगे विकणाऱ्या शिव-शंभुची त्याच्याकडे पाठ असल्याने त्यांना त्याचे अश्रू दिसत नव्हते. 

          मुक्तपणे वाहू देत होता नरहरी आज आपली आसवे. न जाणो नंतर कधी रडायला मिळेल न मिळेल. जीव राहील न राहील. 

अं? 

नरहरी अचानक दचकला.

मरून जाऊ आपण? त्याच्या मनात भाबडेपणाने प्रश्न उमटला. 

तो भाबडा, त्याचं मन भाबडं खरं पण दुष्ट नियती इतकी साधीभोळी व दयाळू असते का? असती तर तिने करुणाला अशा भरल्या संसारातून ओढत नेले असते का? 

करुणा, त्याची बायको.

बायडी.

लाडाने बायडी म्हणायचा तो तिला. सुरंगीचा गजरा माळून नाजूक सोनपावलांनी ती त्याच्या जीवनात आली आणि प्रत्येक दिवस रात्रीला अननुभूत गंध सुटू लागला. 

              कलाकार, चित्रकार माणूस तो. करुणेच्या साथीने चित्रकलेला असा बहर आला की काय सांगावे. त्याची दहा बाय बाराची झोपडी रंग, कुंचला आणि त्यातून झरणाऱ्या सुंदर, सुंदर पेंटिंग्जने भरून गेली. त्याच्या त्या रंगधुंद पसाऱ्यात पाय ठेवायला जागा नसायची पण तरीही शब्दानेही कुरबुर न करता करुणा त्यात अलगद वावरायची. गोटाचांदीचे पैंजण घालून छमछम नाचायची. आपल्या सावळ्या हातांचा लडिवाळ विळखा त्याच्या गळ्यात घालत त्याला श्रीमंत, श्रीमंत करून टाकायची. 

म्हणूनच तो आताही अन् तेव्हाही भरात येऊन गुणगुणायचा -

तुमसे मिला था प्यार

अच्छे नसीब थे

हम ऊन दिनों अमीर थे

जब तुम करीब थे

पण आत्ताचा भर वेगळा होता मात्र.

फार वेगळा.

***

              एक दिवस करुणाची छम छम जरा मंदावली. तो रंगवत होता त्यावेळी पहाड दऱ्यांतून वाहणारी अवखळ नदी. निळ्या आकाशाचं नितळ प्रतिबिंब पडलेली. स्वच्छ. तळ दिसणारी. बदके विहरणारी. कमळ फुललेली. अहाsss. त्याच्या प्रतिभेला विलक्षण धुमारे फुटत होते. एकातून एक कल्पना हातात हात घेऊन समोरच्या ड्रॉईंग शिटवर फुदकत होती. चित्र पूर्ण व्हायला आलं तरी आज पाठीमागून करुणाच्या चांदणी हातांचा स्पर्श त्याला लाभला नव्हता. असे का? तो जरा काळजीत पडला. विचारात पडला. आपण कधी दोन पैशाचा गजरा सुद्धा आपल्या फुलवेड्या करुणाला आणू शकत नाही म्हणून नाराजली की काय आपली बायडी? चित्रकार माणूस तो. चित्रातून जितकं बोलायचा तितकं प्रत्यक्षात बोलणं जमत नसे. कधीच नाही. 

          जत्रेत हरवलेल्या मुलासारखा तो दिवसभर मनातल्या आवर्तनात घुमत राहिला. करुणाही काही बोलली नाही, त्यालाही विचारणे जमले नाही. संपूर्ण दिवसभर अस्वस्थ, अस्वस्थ असणारी करुणा रात्री, मध्यरात्री, उत्तररात्री कधीतरी अचानक त्याच्या कुशीत झेपावल्या बरोबरच त्याला जाणवले आजची मिठी काही वेगळी आहे. पोक्त आहे. समंजस आहे. गंभीर आहे. रात्रीच्या अंधारातही त्याने तिच्याकडे निक्षून पाहिले. करुणाच्या पाणीदार डोळ्यांना विलक्षण चमक आली होती. चेहरा चंद्रासारखा उजळून निघाला होता. ओठ सलज्ज थरथरत होते नि काया नव्या आनंदाने कापत होती.

शब्द मौन झाले. 

खरोखर गोड लाजले. 

नऊ महिन्यात श्यामल रंगाच्या नटखट शिवची कोवळी सुरावट झोपडीत सरसरू लागली. वेलीवर फुल उमलले होते. गावावरून सारे जातभाई येऊन बारशाचं गोडधोड खाऊन गेले. जिंदगी गुलजार, गुलजार झाली.

दोनच वर्षात शंभू झाला. राम लक्ष्मणाची जोडी जणू. मिळून खाणे-पिणे, खेळणे, हुंदडणे. रात्रभर चित्र काढणाऱ्या बापाला टुकूटुकू पहात रहायचे. सकाळी उदरनिर्वाहासाठी तेच पेंटींग्ज विकणाऱ्या नरहरी सोबत आठवडी बाजारात किंवा फुटपाथवर बसायला जायचे. थकलेल्या बापाने झोपेची आहुती देत काढलेले चित्र विकायला शिव शंभुचे मन राजी नसे. पैसे देऊन चित्र घेऊन जाताना कुणी दिसले की ते 'आमचे'  'आमचे' म्हणत हे मोठ्याने भोकाड पसरवत की नरहरीला त्यांना आवरणे जमतच नसे. ऐन धंद्याच्या टाईमला खोडा नको म्हणून मुलांना घरी पाठवावे तर करुणा चार घरी स्वयंपाकाला गेलेली असे. दोन वाढत्या लेकरांचं करायचं म्हणजे तिलाही कामं करावी लागे. जवळच्याच पॉश फ्लॅटस्कीममध्ये तिला पोळ्यांचे काम मिळाले होते. पैसेही व्यवस्थित होते. मग कशाला सोडायचे? तिचंही बरोबर होतं. म्हणून मनात नसतानाही नरहरी तिला कामावर जाऊ द्यायचा. चित्रविक्रीतून हवा तसा पैसा मिळत नव्हता. नरहरी निराश व्हायचा पण कलेवरची श्रद्धा ढळू द्यायचा नाही. हेही दिवस जातील, हेही दिवस जातील. कधीतरी यश मिळेल, आपण नावाजलेला चित्रकार होऊ ही आशा त्याच्या मनात रहायची. त्याच्या आशेला मऊ हसत करुणा खतपाणी घालायची.

पण अचानकच प्रारब्धाने उलटे फासे फेकले. दिसामाजी करुणा खंगू लागली. चालढकल, चालढकल, होईल ठीक करत करुणा टाळायची पण त्याने जबरीनेच नेले तिला डॉक्टरकडे. आवाक्यात नव्हत्या तरी पैसा पैसा जमवून डॉक्टरांनी सांगितलेल्या चार दोन चाचण्या केल्या. रिपोर्ट पाहताच मनाला भयंकर शॉकच बसला. एड्स.

करुणाला एड्स झाला होता. कधी, कसा, काय या प्रश्नाला आता अर्थच नव्हता, त्या जीवघेण्या रोगाने कपटाने तिच्या शरीरात प्रवेश करून तिचा जीवनरस गिळंकृत करायला सुरुवात केली होती. धरणीकंप व्हावा तसे दोघेही नवराबायको हादरले. डॉक्टरांनी संशयाने नरहरीकडे पाहिले पण नाही हो किती ठाम विश्वासाने करुणा डॉक्टरांना म्हणाली. 

"हे तसलं काहीच करू शकत नाही. निर्मळ पुरुष आहे हा. माझ्याशिवाय कुणाकडे मान वर करूनसुद्धा बघत नाही. यांच्याकडून मला संसर्ग शक्यच नाही." 

नरहरीचे अंतःकरण गलबलून आले. 

मग साहजिकच नरहरीच्याही टेस्ट झाल्यात. त्यालाही बाधा झाली होती पण सौम्य. औषधाने काबूत आली असती. करुणाच्या शरीरात मात्र रोग सर्वदूर फैलला होता.

"असे कसे झाले जी?" तो दडपल्या छातीने सतत डॉक्टरांना विचारायचा. कदाचित बाळंतपणाच्या वेळी सरकारी दवाखान्यात काही हयगय वगैरे झाली असेल, आता काय नेमके कारण सांगावे, रोग झाला हे खरे, डॉक्टर त्याला म्हणायचे. त्याने खूप आटापिटा केला करुणाच्या इलाजासाठी. जिथून पैसे जमवता येईल तिथून खेचू लागला. एकच ध्यास बायडी ठीक व्हायला हवी. 

पुन्हा घरादारात भिरभिरायला हवी. त्यापायी लहानग्या लेकरांना कामाला लावतोय असे त्याचेच मन त्याला हजारो दूषणे देत असतानाही त्याने पोरांना फुगे, बबल उडवायच्या नळकांड्या विकायच्या कामाला लावले. त्यातूनही थोडाफार पैसा यायचा. तेव्हढाच करुणाच्या औषधपाण्याला, तिला फळंबिळ खाऊ घालायला हातभार. 

         करुणा तोंड फिरवायची. खायला काही नको म्हणायची. तो चिंतेत पडायचा. पोटात अन्नच नाहीतर शक्ती येणार कुठून. 

करुणाने काळ ओळखला असावा. 

धो धो पाऊस कोसळणाऱ्या ढगाळी आभाळी तिने नरहरीचा हात हातात घेतला. काही सांगायचे असावे. मोलाचे. पण सांगता आले नाही तिला. गळा भरून आला होता.

"तू रडू नको गं तू रडू नको गं, सगळं ठीक होईल" नरहरी तिला कुरवाळत समजवतच होता की यमदूताने अतिशय निर्घृणपणे तिला भरल्या संसारातून फरफटून नेले. तुफान पावसात दोन मुलांना छातीशी धरून गडबडा लोळत धाय मोकलून रडला नरहरी पण मृत्यूला पाझर फुटला नाही.

करुणा गेली ती गेलीच.

वापस आली नाही.

सण्णकण नरहरीच्या काळजात क्रूर साशंकतेची कळ उठली. आपल्यालाही तर एड्स झालाय. एव्हाना आपलेही शरीर त्याने पोखरले असणारच. आपणही गेलो तर या दोन अश्राप जीवांचं करणार कोण? शिव जेमतेम तेरा वर्षाचा. शंभू अकराचा. धड शिक्षण पूर्ण नाही की वय प्रगल्भ नाही त्यात प्रेमळ मायाळू आई गेल्याचा धक्का दोन्ही मुलांना खोलवर बसलेला. मुलं अचानक मूक झालेले. 

मुलं हसरी खेळती, आनंदी रहायला हवी. शिकून सवरून मोठी व्हायला हवी. कामधंद्याला लागायला हवी. तितके संस्कार करायला आपण टिकू का? 

आतवर उठलेल्या या प्रश्नाचे उत्तर शोधायला नरहरी वर आकाशाकडे पहायचा. पण त्या निळी छत्रीवाल्याने नजर फिरवून घेतली होती. सारी विपदा, सारा संताप, सारा मनस्ताप, सारा आजार, सारी कसोटी नरहरीकडे पाठवली होती. आपणही अल्प काळाचेच धनी आहोत हे नरहरीलाही कळून चुकले होते. दोन लेकरांची काळजी त्याच्या उरात शिंपल्यासारखी रुतली होती.

काय करावे? मुलांना कुणा हाती सोपवावे म्हणजे त्यांचे आयुष्य उज्वल होईल? सुखकर होईल? प्रश्नाला उत्तर मिळत नव्हते. गावी भाऊ अठराविश्व दारिद्र्यात होता. त्याच्या घरी खाणारी पाच तोंडे. शेतीच्या रुमालाएव्हढ्या तुकड्यावर कसेबसे तग धरून रहात होते. 

आयुष्य म्हणजे फक्त गुंताच काय? सुटता सुटत नाही.

सोडवायला तर हवा. आणि आता लवकर. करुणासारखा तडक आपलाही प्राण गेला तर मुलं एकाकी पडतील. कुठे भटकतील? भरकटतील? 

त्याचा थरकाप उडायचा. 

एकच आस मुलांचे जीवन चांगले मार्गी लागावे. तो चोवीस तास विचार करायचा. मेंदू कुरेदायचा. वरची पापणी वरती आणि खालची पापणी खालती बांधल्यासारखे डोळे टक्क जागे असताना त्याला एक अफलातून कल्पना सुचली. कदाचित कधीतरी लहानपणी पाहिलेल्या पिक्चरमधलीही असावी पण याक्षणी त्याच्या मनात आली खरी. त्याने त्या कल्पनेला मूर्त रूप देण्याचे ठरविले. 

ते नाही का त्या सिनेमात ती छोटी मुलगी फुग्यासोबत एक चिठ्ठी सोडते रोज आणि मग ती चिठ्ठी वाचून तिला तिचा पिता मिळतो, असे तो हातवारे करत एकांतात स्वतःला स्वतःच्या दयनीय कृतीच्या समर्थनार्थ समजवून सांगायचा. त्याच त्याच तंद्रीत भिन्न रहायचा. काही शाळामास्तर मित्रांकडून चांगल्यातल्या चांगल्या परिणामकारक भाषेत, शुद्ध मराठीत , काळजातली तळमळ ओतत पत्र लिहून घ्यायचा.

पत्राचा आशय एकच - सुस्थितीतील कुटुंबात मुलांना दत्तक देणे.

आsss तोच केव्हढयाने ओरडायचा या कल्पनेने. पोरं आपल्यापासन दूर जातानाची स्वप्न दिसून दचकून दचकून उठायचा. 

हृदयातले हे दोन हिरे देऊन टाकायचे लोकांना? त्याच्या मनातून प्रश्न उठायचा.

मग काय करणार बाबा देव जगू नको म्हणतो ना? त्याचे दुसरे मन उत्तरादाखल प्रतिप्रश्न करायचे. मुलांच्या ओढीने तो हवालदिल व्हायचा. ढसाढसा रडायचा. करुणाच्या फोटोकडे एकटक बघत बसायचा. सुधबुध विसरायचा. 

***

          हळूहळू त्याने मन घट्ट केले. अश्रू डोळ्यांत सुकवून टाकले. सैरभैर भाव वितळवून मरणाची नांदी स्वीकारत रोज एक चिठ्ठी तयार केली. फुगे फुगवताना मुलांच्या नकळत फुग्यात टाकली. एरव्ही तो फुगे विकत रस्त्यावर उभे असणाऱ्या मुलांच्या मागे बसून चिंच, गोळ्या, त्याची चित्र विकायचा पण एखादा चांगला गिऱ्हाईक आला की टम्म भरलेला तो विशिष्ट चिठ्ठीवाला रंगीत फुगा स्वतःच्या हाताने त्या व्यक्तीला द्यायचा. बाई असो की माणूस त्या व्यक्तीचे निरीक्षण करायचा. यांना मूल नसेल का, वांझ असेल का? मुलाची आस असेल का? अकरा तेरा वर्षाच्या मुलांना दत्तक घेईल का की तान्हे मुलंच लागेल? आपली मुलं यांच्या घरात रुळतील का? मुलांना नीट वागवतील का? बापरे बाप सहस्त्र प्रश्न मधमाश्यांचे मोहोळ तुटून मधमाशा डसाव्या तसे त्याच्या मनाला त्रस्त करत. बाई माणसाजवळ मूल दिसले तर मग आशाच संपली. ज्यांना ऑलरेडी मूल आहे ते कशाला दत्तक घेतील? 

          प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या गाडीकडे तो खुळेपणाने पहायचा. आपली मुलंही टापटीप कपडे घालून आईस्क्रीमची कँडी चोखत डोळ्यासमोर गाडीतून भुर्रर्र झाली आणि आपण आणि करुणा ते आकाशातून पाहतोय अशी ओली हळवी स्वप्न तो रंगवायचा. त्याला अशी हळुवार पत्र लिहून देणाऱ्या त्याच्या शाळामास्तर मित्रांचे डोळे डबडबायचे. तो निग्रहाने आवंढा गिळायचा. चिकणमातीसारख्या मनाला अधिक लेचेपेचे न होऊ देता पक्के धरून ठेवायचा.

          अखेर त्याच्या या बालिश प्रयत्नाला यश आले. कालच लहान भावाच्या वाढदिवसासाठी डझनभर फुगे घेऊन गेलेली सोळा सतरा वर्षाची एक युवती दुसऱ्या दिवशी वडिलांसोबत त्याच्याकडे आली. वडील बड्या पदावर कार्यरत होते. वाढदिवसाचा मोठा फुगा लहान मुलाने उदबत्ती लावून फोडताच त्यांना त्यातील रंगीत रंगीत चमकीसोबत  'ती' चिठ्ठीही मिळाली होती. 

मुलं दत्तक द्यायचे आहेत.

किती चमकले होते तेही कुटुंब त्या वेळी. त्वरित त्याला हुडकत तिथवर आले. त्याच्याशी बातचीत केली. पूर्ण कहाणी जाणून घेतली आणि ठोस प्रयत्न करण्याचे आश्वासन देऊनच निरोप घेतला. त्यावेळी दुपारची सामसूम वेळ होती. वर्दळ कमी म्हणून मुले हातात फुगे धरून फुटपाथवरच अभ्यासाला बसली होती. सरळमार्गी निरागस मुलांना बघून त्या कुटुंबाचेही डोळे पाणावले.

             त्या कुटुंबप्रमुखाने प्रयत्नांची शिकस्त करत समाजसेवी संस्थेच्या मदतीने नरहरीला चांगल्या इस्पितळात भरती केले. परंतु फार तर फार चार सहा महिने असे डॉक्टरांनी सांगताच त्यांनी दत्तकविधीसाठी मुलांचे नाव नोंदवले.

*****

          आज त्याच मान्यताप्राप्त संस्थेतून  दोन जबाबदार ऑफिसर नरहरीला भेटायला आले. नरहरी मुद्दामच बागेच्या कोपऱ्यावर जाऊन त्यांना भेटला. मुलांना कानोकान खबर नको नाहीतर मुलं त्याला सोडायचीच नाहीत. मुलांचाही केव्हढा जीव होता बापावर. 

              त्या अधिकाऱ्यांनी जे सांगितले ते ऐकून हृदयात कालवाकालवच झाली नरहरीच्या. मुलांना उत्तम घरी दत्तक देण्यासाठी चांगले कुटुंब मिळाले होते पण दोन वेगवेगळे. आत्तापर्यंत एकत्र राहणारी मुलं विभागल्या जाणार होती. नरहरीच्या दृष्टीने त्यातली दुसरी भयानक गोष्ट म्हणजे त्यातले एक कुटुंब कायमचे अमेरिकेत रवाना होणार होते. पण दोन्ही फॅमिली अतिशय सज्जन, सदवर्तनी, खात्रीच्या होत्या.

नरहरी मटकन खालीच बसला. त्याने डोक्यालाच हात लावला. 

आधी पोरांची आई गेली.

बापाचेही जाणे निश्चित. अशावेळी मुलं एकाच कुटुंबात सोबत रहावी ही त्याची  आतड्यातून इच्छा पण इथेही घणाघाती दैव आडवं आलं. मुलांनाही एकमेकांपासून नशीब दूर करणार असं उरफाटं चक्र दिसू लागलं.

"काय करावं जी?" त्याची मती चालेना. त्याने त्या अधिकाऱ्यांनाच विचारले. अधिकाऱ्यांनाही कठीण होते उत्तर देणे पण मुलांच्या भविष्यासाठी छातीवर दगड ठेवणे भाग होते. कारण वयाने मोठी ही दोन मुलं एका घरी दत्तक जायची शक्यता फारच कमी होती.

"शिव अन् शंभुचा अर्थ एकच ना गं बायडे", नरहरीने कधीतरी करुणाला विचारले होते.

"हो मग, माझे दोन्ही मुलं एकरूपच ना फक्त शरीर वेगळे म्हणून त्यांचे नावही एकाच अर्थाचे शिव शंभू, सदा सोबत सोबत राहणारे, कधी दूर न जाणारे" करुणा ठासून प्रेमाने म्हणाली होती. 

करुणाच्या त्याच एकजीव मुलांना काळ वेगळं करणार होता. 

करुणा असती तर तिने असे करू दिले असते?

"पण आता करुणा नाही ना?" अधिकाऱ्यांनी हलकेच त्याला थोपटत कठोर वास्तवाची जाणीव करून दिली. त्याबरोबर तो भानावर आला.

"बरोबर" त्याने मान डोलावली.

"देऊन द्या नरहरी मुलांना दत्तक, दोन्ही फॅमिली खरेच चांगल्या आहेत, आमचे आयुष्यभर लक्ष राहीलच." अधिकारी म्हणाले.

नरहरीने गुमान मान डोलावली.

एक अमेरिकेत एक भारतात? पुन्हा मुलांची तरी भेट होईल की नाही एकमेकांशी? त्याचे मन घोंगावयाला लागले. निर्णय तर घ्यावाच लागणार होता. तरी त्याने विचार करायला दोनचार दिवस मागून घेतले.

मुलांना कसे सांगावे हा यक्षप्रश्न.

पण सांगावे तर लागणारच. सारे सारे. जे आजवर कधीच सांगितले नाही तेही.

तो भावना गोळा करत निर्णयाकडे वळू लागला. वळणे अपरिहार्यच होते. नियती सगळे पट खेळत होती. त्याच्या हातात काहीच नव्हते. फक्त एक विचारपूर्वक निर्णय हयातीत घ्यायचा होता. 

नरहरीने स्वतःचीच पुडी बांधली. 

मुलांना दत्तक द्यायचे निश्चित केले.

त्याला विस्मरणात गेलेले त्याच्या आईचे गुणगुणने ऐकू येऊ लागले, 

"मनात वाटे हत्ती घोडे पालखीत बसावे

देवाजीच्या मनात याला पायी चालवावे"

त्याची आई येताजाता या ओळी म्हणायची. 

"म्हणजे काय गं आई?" तो अबोधपणे आईला विचारायचा. 

"अरे हत्ती घोड्यांच्या पालखीत बसवावेसे वाटते रे बाबा तुला पण देव काय की पायीच चाल म्हणतो", आई घरच्या गरिबीला कंटाळून देवघरातील देवांकडे पाहून त्रागा करत सांगायची.  त्या ओळींचा लख्ख अर्थ आता त्याला उलगडला. तोही मुलांकडे पाहून तसाच गुणगूणू लागला....

"मनात वाटे हत्ती घोडे पालखीत बसावे..."

पण दुसरी ओळ उच्चारण्याचे त्याने कटाक्षाने टाळले. फुगे विकणाऱ्या मुलांच्या पाठीवर आपली कनवाळू नजर कायमची चिकटवत तो आकाशाकडे बघून गुढगर्भ हसला.

©जयश्री दाणी

वरील कथा जयश्री दाणी यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.



Post a Comment (0)
Previous Post Next Post