घरटं

            *घरटं*

  ✍️ सौ.स्मिता मुंगळे.

       कितीतरी वेळ राधा बेडवरचं पडून होती. ना धड जागी ना झोपेत,अशी काहीतरी अवस्था झाली होती तिची. खूप दमल्यामुळे गाढ झोप लागली होती तिला. झोपेतही स्वप्नांची अखंड मालिका सुरू होती. तिच्या मनात आलं,आपण बहुधा आयुष्यभर फक्त स्वप्नच बघत राहणार असं दिसतंय. स्वप्न म्हणजे तरी काय... "मनी असे ते स्वप्नी दिसे" या उक्तीला जागणारीच.

      दुपारभर ती मुलां नातवंडांसोबतीची स्वप्न पहात होती. जाग आली तेव्हा तिला नक्की कळेचना की आपण दुपारी झोपून उठतोय की सकाळी. गेला महिनाभर तिला खूप दगदग झाली होती. तिचा लाडका लेक,ऋत्विक... जवळजवळ पाच वर्षांनी भारतात, घरी येणार होता. लग्न होवून गेल्यानंतर तर पहिल्यांदाच आणि म्हणूनच ती मुलगा आणि सुनेच्या येण्यासाठी खूप उत्सुक होती. आपला धाकटा भाऊ आणि वहिनी एवढ्या दिवसांनी येणार म्हणून तिची लेक ऋचा आणि जावई देखील त्यांच्या तीन वर्षांच्या पिल्लाला घेऊन खास दिवाळीसाठी दिल्लीहून येणार होते.

          ऋचा... राधाची लेक, शिकायला म्हणून आय आय एम,बेंगलोरला गेली आणि तिथेच तिला पंजाबचा रोहन कॉलेजमध्ये भेटला. दोन वर्षात एकमेकांना जाणून घेत त्यांनी आपण लग्न करत असल्याचे जाहीर केले. सुरुवातीला राधासाठी हा धक्काच होता पण तिचा तिच्या लेकीवर आणि तिच्या पसंतीवर विश्वास होता. त्यामुळे तिने हळूहळू वस्तुस्थिती स्वीकारली आणि उत्साहाने तिने लेकीचं लग्न धुमधडाक्यात लावून दिले. लग्न होऊन ऋचा आणि रोहन दिल्लीला नोकरीसाठी गेले. त्याचवेळी ऋत्विक, राधाचं शेंडेफळ... उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत निघून गेले.

        गेली चार पाच वर्षांपासून मुलं शिक्षणासाठी घरापासून लांब असण्याची खरंतर राधाला सवय होती. पण तेव्हा सलग सुट्टी मिळली की अथवा सणावाराला,काही कार्यक्रम असल्यास दोघेही घरी येत. पण आता मात्र ऋचा लग्न होऊन आणि ऋत्विक सातासमुद्रापार गेल्यामुळे राधाला खूपच एकाकी वाटू लागले.

      रमेश,राधाचे पती... त्यांनी स्वतःला अनेक गोष्टींमध्ये गुंतवून घेतले होते. सहा महिन्यांपूर्वी निवृत्त झाल्यानंतर मॉर्निंग वॉक, वाचन, बागकाम यात ते रमून जात.संध्याकाळी मित्रांबरोबर बागेत त्यांचा गप्पांचा अड्डा जमत असे. त्यामुळे ते व्यस्त असत आणि राधा घरात एकटी राहून मुलांच्या आठवणीत झुरत बसे.

     आताशा तर तिच्या मनात येई, आपली मुलं लहान असताना आपण सासूबाई, आजे सासरे, आला गेला आणि घरातील कुलधर्म कुलाचार या व्यापात एवढे गुंतलो होतो की इच्छा असूनही कधी मुलांसाठी फारसा वेळ देता आला नाही आणि आता आपल्याकडे रिकामा वेळ भरपूर आहे तर मुलं लांब निघून गेली. जबाबदाऱ्या पार पाडता पाडता आपलं तरुणपण आणि मुलांचं बालपण निसटून गेलं एवढं नक्की. आजही या विचाराने देखील तिचं मन खट्टू झालं.

        ती लग्न होऊन आली तेव्हा नुकतेच सासरे निवर्तले होते. त्यांच्या अकाली जाण्याने सासूबाईंनी अंथरून धरले तर रमेशच्या आजोबांना मुलाच्या अकाली निधनाचा एवढा धक्का बसला की त्यांना स्मृतिभ्रंश झाला. त्यामुळे लग्नानंतर लगेचच राधाला सगळी जबाबदारी घ्यावी लागली. त्यावेळी आर्थिक परिस्थिती सुद्धा म्हणावी तेवढी चांगली नव्हती. आजारपण,दवाखाना याचे खर्चही मोठे होते. पाठोपाठ दोन्ही मुलांचे जन्म,शिक्षण यात आपली पन्नाशी कधी आली हे तिला कळालेच नाही.

      यथावकाश आधी आजेसासरे आणि नंतर सासूबाई अनंताच्या प्रवासाला निघून गेले. तोपर्यंत मुलंही मोठी झाली होती. आधी ऋचा आणि त्यानंतर ऋत्विक देखील शिक्षणासाठी बाहेर पडले. राधाला वाटे, काहीतरी जादू व्हावी आणि मुलांचं बालपण मला पुन्हा एकदा नव्याने अनुभवता यावं. या बालिश विचारासरशी तिचं तिलाच हसू येत असे.

        रमेशने आणि राधाने हौसेने बांधलेल्या त्या घराट्यात आता शांतता नांदत होती. 

  पण अचानक दोन महिन्यांपूर्वी ऋत्विकने तो आणि सुनबाई, रीमा दिवाळीत भारतात येत असल्याचे सांगितले आणि  राधाच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिला काय करू आणि काय नको असे झाले होते. दिवाळीपूर्वी महिनाभर ती तयारीला लागली. कित्येक दिवसांनी दोन्ही मुलं, जावई, सून आणि नातू एकत्र येणार होते. तिने साफसफाई साठी मदतीला तिच्या कामाच्या मावशींना आणि त्यांच्या नवऱ्याला हाताशी घेतले. चार पाच दिवस फक्त साफसफाई. घराचा कानाकोपरा चकचकीत झाला होता. बागेत स्वच्छता करून कुंड्या रंगवल्या. काही नवीन झाडं आणून लावली. रमेशराव बाहेर निघाले की राधा त्यांच्या हातात काहींना काही आणण्यासाठी यादी अगदी आठवणीने देत असे.

      तिने घरातले पडदे बदलले. नवीन बेडशीट, सोफा कव्हर्स,अगदी पायपुसणी सुद्धा नवीन आली. मुलांच्या स्वागतासाठी घर सजले होते आणि त्या सजलेल्या घरात राधा अतिशय उत्साहाने वावरत होती. मुलं येणार म्हणून जरा लवकरच तिने दारात मोठा आकाशकंदील, गॅलरीमध्ये रंगीबेरंगी छोटे आकाशकंदील, लाईटच्या माळा असे सगळे लावून घेतले. छोट्या नातवासाठी रमेशरावाना तयार किल्ला आणि सैनिक आणायला सांगितले.

      त्यानंतर मात्र ती दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांच्या तयारीला लागली. मधली काही वर्षे तिने मुलांना फराळ कुरिअर केला होता. पण यावेळी मुलं तिने बनवलेले पदार्थ तिच्या समोर खाणार होती, याचा आनंद तिला जास्त होता. त्याचबरोबर रोजच्या जेवणात कोणते नवनवीन पदार्थ करायचे, गोड काय... असे एक ना अनेक प्लॅन तिच्या मनात सुरु होते. तिची ती धावपळ, तयारी बघताना रमेशरावाना गंमत वाटत होती. तिच्यातला उत्साह त्यांना सुखावत होता.

      दिवाळीच्या आदल्या दिवशी सगळे हजर झाले. गप्पा,चेष्टा मस्करी याने घर दणाणून गेले. रमेशरावदेखील नातवासोबत फटाके उडवण्याचा आनंद लुटत होते. खाणे,खरेदी यात वेळ कसा जात होता हे लक्षात येत नव्हते. राधा जणू आनंदाच्या झुल्यावर झुलत होती. "सुख म्हणजे आणखी काय असतं" याची प्रचिती तिला येत होती.

      दिवाळीचे चार दिवस संपले आणि सूनबाईंना तिच्या माहेरी जाण्याचे वेध लागले. ती गडबड करू लागली तशी राधा म्हणाली,"अग, किती वर्षांनी आला आहात, चार दिवस तर दिवाळीच्या गडबडीत गेले. आठ दिवस रहा ना निवांत."

"अहो आई,माझे पण आई बाबा तिकडे वाट बघतायेत आणि माझ्या दादाने गेट टूगेदर प्लॅन केलंय आम्हा चुलत, मावस अश्या सगळ्या बहीण भावंडांचं. बाकी सगळे भेटतात हो वरचेवर पण मी आणि ऋत्विक नसतो ना. त्यामुळे आम्हाला जावंच लागेल."

    सूनबाईंच्या या बोलण्यावर राधाला काय बोलावं हे कळेना . म्हणजे फक्त तीच नाही तर आपले चिरंजीव पण लगेच सासुरवाडीला जाणार आहेत याचा तिला अंदाज आला. पण मनातील नाराजी चेहऱ्यावर न दाखवता ती मनात स्वतःचीच समजूत घालू लागली... जावू दे आपली लेक आणि जावई तरी राहतील चार दिवस. तेवढाच नातवाचा सहवास मिळेल या विचाराने ती मनोमन सुखावली. पण तिची ही इच्छा देखील पूर्ण होणार नव्हती.

      सकाळी उठल्या उठल्या ऋचाने ती उद्याच सासरी जात असल्याचे जाहीर करून टाकले. "अग, रहा ना चार दिवस. हल्ली तुम्हा मुलींच्या या करिअरमुळे माहेरपणाला येणं होतच नाही. आता किती दिवसांनी आली आहेस तर रहा ग.पिल्लू पण छान रमलय इथे", राधाने असे म्हणताक्षणी "आई,अग आम्ही नोकरीमुळे कायम दिल्लीलाच असतो. रोहनच्या मम्मी पपाना पण वाटतं ना नातवासोबत राहावं असं.  त्याने कालपासून हट्ट धरलाय तिकडे जायचा". ऋचा अशी म्हणल्यावर 'जावयाचे पोर अन हरामखोर' ही म्हण राधाला आठवली आणि तिचे तिलाच हसू आले. आपण काय कमी लाड करतो का त्याचे तरी त्याला ओढ तिकडचीच. नकळत तिला मुलं लहान असताना ती माहेरी गेली की कशी परत लगेच घरी येण्यासाठी त्रास द्यायची ते आठवले. रमेशरावांनी तिला खुणेनेच 'शांत रहा' असा इशारा केला.

      रात्रीची जेवणं पार पडली ती थोडी शांततेतच. राधा गप्पगप्प होती. मुलांच्या हे लक्षात आले होते पण ती तरी काय करणार. रमेशराव काहीतरी विनोद करून वातावरणातला ताण कमी करण्याचा प्रयत्न करत होते. रात्री उशिरापर्यंत राधा मुलांबरोबर देण्यासाठीच्या पदार्थांचे पॅकिंग करत बसली होती. 

"ज्यासाठी गेले महिनाभर मी धावपळ करतीये ते सुख फक्त चार दिवसांत संपुष्टात आलं?", मनातल्या मनात ती स्वतःलाच हा प्रश्न विचारत राहिली. रात्री सगळे झोपले तरी ती टक्क जागीच होती. उगाच एक दोन वेळा उठून बेडरूमच्या बाहेर चक्कर टाकून आली पण तिला काही केल्या झोप काही येईना. सगळी रात्र अस्वस्थतेत गेली.

      सकाळी सगळी मंडळी पाठोपाठ निघाली. खरं तर राधाचं मन आणि डोळे सारखे भरून येत होते. पण मुलांना हसत हसत निरोप द्यायचा आहे, असं रमेशरावांनी तिला रात्रीच बजावून ठेवलं होतं. त्यांचा आदेश पाळण्याचा ती आटोकाट प्रयत्न करत होती तरी काही चुकार अश्रू डोळ्यावाटे ओघळलेच. लेकीला आणि नातवाला घट्ट मिठीत घेतल्यावर मात्र तिला भावनांना बांध घालणं अशक्य झाले.

"आई, कधीही आठवण आली की ये ग माझ्याकडे",असं लेकीने म्हंटल्यावर राधाला वाटले,आता हिला कसे सांगू की तुझी आई फक्त सदैव तुमच्या आठवणीतच असते.

        मुलांना निरोप देऊन दोघे घरात आले आणि त्या घरातील शांतता राधाच्या जणू अंगावर आली. चार दिवस हास्याच्या कारंज्यानी, गप्पांच्या आवाजाने सजलेले घर आज दमून झोपलेल्या लहान मुलासारखे वाटले राधाला. "चला उठा,मला भूक लागलीये", असं रमेशराव म्हणाले खरे पण ते राधाचा मूड बदलण्यासाठी हे तिला पक्के ठावूक होते. तिला उठून काही करावे असे वाटतच नव्हते. नाईलाजाने उठून तिने साधासा स्वयंपाक केला. जेवण झाल्यावर रमेशरावांनी जबरदस्तीने तिला विश्रांती घ्यायला सांगितले.

      महिनाभराची दगदग,जागरणे यामुळे पडताक्षणी तिला गाढ झोप लागली. 

"राधा,उठ.... चहा तयार आहे." रमेशराव म्हणाले तसे ती गडबडीने उठली तर संध्याकाळचे पाच वाजले होते. उन्हे उतरली होती. "चल,चहा घेऊन मस्त फिरून येऊ", असे रमेशरावानी म्हंटल्याबरोबर ती आळस आणि निराशा झटकत पटकन छान तयार झाली. तिला असे फ्रेश बघून रमेशरावदेखील खुश झाले. दोघे चालत तळ्यावर फिरायला गेले. थंड हवेने तिच्या मनावरची मरगळ कमी झाली. येताना भेळ,पाणीपुरी यावर दोघांनी मनसोक्त ताव मारला, कुल्फी खाल्ली. येईपर्यंत अंधार गडद झाला होता. गप्पा मारत मारत घरापर्यंत दोघे आले तर तिला लांबूनच आकाशकंदील आणि दिव्याच्या रोषणाईने उजळलेले तिचे घरटे दिसले. तशी ती म्हणाली, "चार दिवस गडबडीत असे सजलेले आणि उजळलेलेले घर बघायला देखील वेळ मिळाला नाही. मुलांनी काढलेल्या फोटोतच मी हे पाहिले होते. आज प्रत्यक्ष शांतपणे माझंच घर मला नजरेत साठवून घेऊ दे." त्या दिमाखात उभे असणाऱ्या, रोषणाईने उजळलेल्या घराकडे बघून तिला वाटले, नक्की माझी पिल्लं या घरट्याच्या ओढीने वरचेवर येतं राहणार. ती किती दिवस राहतात यापेक्षा ती या घरट्याच्या ओढीने येतात हेच किती महत्वाचे आहे ना?

      या विचारासरशी तिच्या मनावरचं मळभ दूर झालं आणि आता उद्या हा कंदील, लाईटच्या माळा, किल्ला मावशींना उचलून, नीट पॅक करून ठेवायला सांगूंया असा विचार करत ती शांतपणे झोपायला निघाली.

    काल रात्रीच्या अस्वस्थतेचा कोणताही मागमूस आज तिच्या मनात नव्हता.

✍️स्मिता मुंगळे

वरील कथा स्मिता मुंगळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.
            

       

    

       

     

Post a Comment (0)
Previous Post Next Post