ऋण

 *ऋण*

✍️ मुक्ता कुलकर्णी 

    अंगदनं यादीवरून शेवटची नजर फिरवली. "केतकर सर, मराठे सर, गारे सर... हम्म आपले आवडते शिक्षक. कोरांटे सर...काटे सर, पंडीत मॅडम, लोहार मॅडम आणि कावळे मॅडम..आहेत. काटकर सर , बारवे सर तुम्हाला फुली...तुम्ही या मेळाव्यात यायचं नाही!!!"

अजित आणि प्रशांत त्याच्याकडं पहात होते. त्याच्या डोळ्यातला खुनशीपणा चमकत होता.

   " अंग्या.." अजित म्हणाला," आपण आपल्या बॅचचा स्नेहमेळावा करतो आहोत. काटकर सर आणि बारवे सरांना तू मुद्दाम वगळलं आहेस हे त्यांना समजणार नाही असं वाटतं तुला?"

अंगद कुत्सितपणे हसला," अजा, त्यांना हे कळावंच...हीच माझी इच्छा आहे. म्हणूनच जाणीवपूर्वक मी त्या दोघांना वगळलं आहे. बाबुदादा आणि काजवे शिपाई सुध्दा येणार आहेत. पण काटकर सर आणि बारवे सर डिच् आहेत.त्यांनाही कळू दे अपमान काय असतो…."

        "अंग्या, शाळेत असताना सर रागावतात, शिक्षा करतात पण ते आपल्या चांगल्यासाठीच असतं. तू त्याचा राग धरला आहेस?" प्रशांतनं विचारलं.

      " पशा, येडा झाला आहे का तू? मी स्वतः क्लासेस चालवतो मला समजत नसेल का हे? तो राग मनात असता तर केतकर सरांना बोलावलं असतं का? पट्टी तुटेतो एकदा मारलं होतं त्यांनी मला. माझी चूक मला समजली होती. सरांबद्दलचा आदर दुणावला. त्यादिवशी त्यांनी मारलं नसतं तर आज मी जो आहे तो झालो नसतो. पण काटकरला काय बोलवायचं...माती खाल्ली आहे त्यानं..नी आपल्या शाळेची सुध्दा माती केली आहे. शंभर नंबरी सोनं होती शाळा. त्यानं  तिथं राजकारणाचा आखाडा केला आहे. काटकरचा मी तिरस्कार करावा इतकीही लायकी नाही त्याची.आणि स्नेहमेळाव्याला बोलावून त्याचा सत्कार करावा? हाड!!!" एका दमात अंगद बोलून गेला. 

       अजित आणि प्रशांत बघतच राहीले.  शाळेत असताना अंगद हूड होता. त्यापायी कितीदा त्याला शिक्षा केल्या होत्या सरांनी. सगळ्या शिक्षकांना त्यानं हैराण केलं होतं.  वेळोवेळी त्यासाठी साम आणि दंड हे दोन नुस्खे त्याच्यावर सगळ्या सरांनी  वापरले होते. तो अंगद त्या सगळ्या शिक्षकांना बोलावणार होता पण काटकर सरांना मात्र नाही. बारणेंनी त्याचं काय बिघडवलं होतं? ते तर क्लार्क होते.. 

        शाळा संपून २५ वर्षं उलटली होती.  अजित आणि प्रशांत दोघंही पुण्यात स्थायिक झाले होते. गावाशी संबंध कमी झाला होता. याउलट अंगद गावातच रहीला. कोचिंग क्लासेस चालवायचा. फार फेमस होते त्याचे क्लासेस. सतत पोरा पोरींची रीघ लागलेली. आणि त्याच्याबद्दल फार चांगलं बोलायची पोरं..त्याचं शिकवणं, वागणं या सर्वांमुळे अंगद चांगला पाॅप्युलर होता. सगळ्या शाळांतील विद्यार्थी त्याच्याकडं येत. पोरांच्या नाड्या त्याला बरोबर सापडल्या होत्या. 

          " आपण शाळेत असताना जे वातावरण होतं, जो शिक्षकांबद्दल आदर होता, शाळेबद्दल जे प्रेम, जिव्हाळा होता तो या पिढीत नाही रे अंगद" 

        " त्याला काही शिक्षकही तितकेच जबाबदार आहेत." शांतपणे अंगद म्हणाला. त्याला आठवलं, आपली शाळा...आजही अभिमान वाटावा अशी होती. विनाअनुदानित असल्यामुळं सगळ्या शिक्षकांनी फार परिश्रम घेत ती नांवा रुपाला आणली होती. केतकर, मराठे, गारे,कोरांटे, काटे, म्हात्रे या डिव्होटेड लोकांनी मुलं घडवली होती..शाळा घडवली होती. २५%अनुदानाचा प्रवास १००% अनुदानित पाशी येऊन थांबला. पण तोवर या सर्वांनी फार मेहनतीने शाळेच्या पायाभरणीचं काम केलं. अतिशय साधारण घरातील, गरीब घरातील मुलं-मुली शाळेत आणून वेळप्रसंगी पदरमोड करुन त्यांना वह्या पुस्तके दिली होती. कधीकधी फॉर्म फीचे पैसे नाहीत म्हणून शिकायला नाही म्हणणारी पोरं त्यांच्या नकळत फाॅर्म भरुन रांकेला लावली होती. पोरांचे गाईड असलेले म्हात्रे सर मात्र आज हयात नाहीत.. त्यांनी एकदा अंगदवर हात उचलला होता..


मुलींसमोर झालेल्या अपमानाने अंगद इतका दुखावला की त्याने म्हात्रे सरांशी बोलणंच टाकलं. शेवटपर्यंत तो त्यांच्याशी बोलला नाही.आज त्यांची कमी फार जाणवली त्याला.आज ते असते तर तो त्यांची क्षमा मागणार होता. पण चार महिन्यांपूर्वी म्हात्रे सरांनी आत्महत्या केली होती. काटकर सरांनी इतका इतका त्रास दिला होता त्यांना.. त्यांचं सचोटीचं वागणं, विद्यार्थ्यांना त्यांच्याविषयी वाटणारी ओढ, त्यांची विद्यार्थ्यांमधली लोकप्रियता हे सारं काटकर सरांना डाचत होतं. बारवे सरांना हाताशी धरुन त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या म्हात्रे सरांना पेन्शन सुध्दा वेळेत मिळू दिली नव्हती. आजारपणाचं ढीगभर कर्ज, मुलांच्या शिक्षणासाठी पैशाचा तुटवडा आणि सतत बारवे आणि काटकरनी चालवलेल्या अडवणूक आणि अपमानास्पद वागणुकीमुळे हताश होऊन म्हात्रे सरांनी विष पिऊन आत्महत्या केली होती.  अंगद उडालाच. म्हात्रे सरांसारखा दिलखुलास माणूस सहजासहजी जीव देणार नाही. क्लासमध्ये त्या शाळेच्या मुलांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू होती ती अंगदनं ऐकली होती. 

        दुसऱ्या दिवशी बाबूदादा भेटले. बाबूदादा सर्वात जुने शिपाई. ही पोरं शाळेला जायची तेंव्हा बाबूदादा अगदी तरुण होते. त्यामुळं यांच्या बॅचनं त्यांना बाबूदादा हे नांव दिलं ते आजही सगळी मुलं-मुली त्यांना बाबूदादा म्हणत होती. " बाबूदादा.. चला चहा घेऊया…" म्हणत अंगदनं त्यांना सोबत घेतलं.

     चहाच्या टपरीवर चहा घेताना अंगदनं म्हात्रे सरांचा विषय काढला.  बाबूदादाचे डोळे भरुन आले. " अंगद, फार वाईट केलं रे त्यांनी सरांचं. केतकर सरांच्या रिटायरमेंट नंतर म्हात्रे सरांचं हेडमास्तर म्हणून सिनीयाॅरीटीनं नांव होतं.ते हेडमास्तर झाले खरे.. तर काटकर ज्यूनिअर असूनही मुद्दाम त्यांना त्रास कसा होईल हे बघायचे. सगळ्या नव्या लोकांना हाताशी धरुन फार त्रास दिला त्यांनी म्हात्रे सरांना. बिचाऱ्या सरांना हे आवरेनात तेंव्हा त्यांनी हेडमास्तर पद सोडलं. काटकरांचा त्यावरच डोळा होता. काटे सरांनी तर हेडमास्तर व्हायला नकार दिला. मग अगं अगं म्हशी..म्हणत काटकर सरांनी हेडमास्तरकी घेतली."

        " काय सांगता बाबूदादा? हा त्या लायकीचा तरी आहे का?"

       " अंगद, संस्थाचालकांचा नातेवाईक हे किती मोठं सर्टिफिकेट आहे त्यांच्याकडं.दर आठवड्याला सर पेन्शनसाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी यायचे तर बारणे दरवेळी नवीन खेकटं काढायचे. काटकर सर दरवेळी नवीन निमित्त पुढं करुन सही द्यायला टाळाटाळ करायचे. कधी शाळेतून गायब व्हायचे. आजारी माणसाला किमान समजून तरी घ्यायचं रे..फार फार बेकार आहेत हे दोघं.  जितकं जमेल तितकं त्यांना अपमानास्पद वागवलं रे..शेवटी हे सारं असह्य होऊन म्हात्रे सरांनी विष घेतलं !!!!" बाबूदादा गदगदून रडू लागले. 

        " आपल्या विद्यार्थिनींबद्दल सुध्दा अचकट विचकट बोलणारा हा माणूस चाबकाने फोडायच्या लायकीचा आहे रे.." बाबूदादा म्हणाले. अंगद ते ऐकून फार नाराज झाला." कितीतरी गरीब घरातील पोरांना फी नाही म्हणून परीक्षेच्या वेळी हाकलून देतात. इतकं राजकारण चालतं शाळेत... नोकरी करणं गरजेचं आहे म्हणून करतो.. नाहीतर तिथं काम करावं असं आता काही राहीलं नाही बघ"

        यावर काही उपाय नाही हे सुद्धा अंगदला माहीत होतं. फक्त सरांसाठी, त्यांच्या मुलांसाठी काही करता येईल का ते पहायचं होतं. त्यानं आपल्या बॅचचा स्नेहमेळावा घ्यायचं ठरवलं. केतकर सरांना सांगून आपल्या बॅचची यादी, फोन नंबर घेतले. जाणीवपूर्वक कार्यक्रम एका हाॅलमध्ये ठरवला. शाळेत ठेवला तर काटकर सरांना बोलवावं लागेल म्हणून शाळेकडं जायचंही टाळलं त्यानं. एव्हाना सगळ्या बॅचमेट्सना हे सारं समजलं. त्यावेळी सर्वसामान्य घरातील असलेली मुलं आता चांगल्या पोझिशनला होती. त्या सर्वांनी मदत गोळा करुन केतकर सरांना दिली आणि म्हात्रे सरांच्या कुटुंबियांना द्यायला सांगितली. 

        इतक्या वर्षांनी भेटलेले शाळा सोबती त्याच जिव्हाळ्यानं, प्रेमानं बोलत होते. बाबूदादा,काजवे शिपाई, त्यांच्या वेळी असलेला स्टाफ यांना ते सारं सद्गदीत करुन गेलं. कार्यक्रम उत्तम रीतीने साजरा झाला. भारावलेले शिक्षक आणि विद्यार्थी भारावलेल्या अवस्थेत बाहेर पडले. 

           अंगदला कोपऱ्यावरच काटकर सर भेटले.

" अंगद, बॅचचं गेट टुगेदर केलं म्हणे तुम्ही.."

"होय.."

" बाकी सगळ्यांना बोलावलं होतंस, शाळेच्या हेडमास्तरना नाही बोलावलंस मी पण शिकवत होतो तुम्हाला. "

"शिकवत नव्हता वाचून दाखवत होता...आणि ते गेट टुगेदर सन्माननीय शिक्षकांसाठी होतं. तुमच्यासाठी नव्हतं. शाळेच्या मुलींना आपली लेक समजणाऱ्या शिक्षकांचं होतं.. सहकाऱ्यांना सहकार्य करणाऱ्या लोकांचं होतं.  जीवघेणं राजकारण  खेळणाऱ्या लोकांचं नव्हतं.. दुसऱ्यांच्या सन्मानाला जपणाऱ्या लोकांचं होतं. आम्हाला उत्तम माणूस बनवणाऱ्या, संस्कार देणाऱ्या लोकांच्या ऋणाचं होतं. तुम्ही या कशातही दूर दूरपर्यंत नाही आहात. म्हणूनच तुम्हाला बोलावलं नाही."


 © मुक्ता कुलकर्णी


वरील कथा मुक्ता कुलकर्णी यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.


ही कथा वाचून पहा.

घरटं

Post a Comment (0)
Previous Post Next Post