मला बोलायचं नाही
प्रांजली लेले
सायली आणि संजय एकमेकांना अगदी अनुरूप असे जोडपे होते..दोघेही एकाच ऑफिसमध्ये काम करत असताना संजयची सायलीशी ओळख झाली होती..आणि ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले... तिचा शांत , मृदू स्वभाव त्याला खूप आवडायचा. त्याने मग एकेदिवशी तिला लग्नाची मागणीच घातली.
घरच्यांनाही संजय मनापासून आवडला होता.. कामात हुशार, कर्तबगार असा संजय जावई म्हणून मिळाल्याने ते पण खूप खुश होते. लवकरच मोठ्या थाटात त्याचे लग्न झाले. आणि त्यांचा राजा राणीचा संसार सुरू झाला.
दिवस अगदी सुखात जात होते. आणि बघता बघता त्यांच्या संसार वेली वर एक गोड फुल उमलले. सायली ने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आता तर दोघांच्या आनंदाला सीमा राहिली नव्हती. त्यांचे सारे विश्व म्हणजे त्यांचे बाळ होते. आपल्या लाडक्या बाळाचे नाव त्यांनी सार्थक ठेवले. खरोखरच त्याच्या जन्मामुळे त्यांच्या जीवनाला सार्थकता लाभली होती.
दिवसागणिक सार्थक मोठा होऊ लागला. त्याचे बोबडे बोल ऐकताना त्यांना खूप आनंद व्हायचा..त्याचे ते गोड बोलणे ऐकुन सगळे त्याचे खूप कौतुक करायचे.
सार्थक साधारण साडेतीन वर्षांचा झाला तेव्हा त्याला सायलीने जवळच्याच एका छोट्या शाळेत घातले. एव्हाना तो आता बराच बोलायला लागला होता..परंतु बोलताना तो बऱ्याचदा अडखळत असे..अजून लहानच आहे..होतच अश्या वयात असा विचार करून तिने त्याकडे कानाडोळा केला. परंतु काही महिन्यानंतर ही त्याचे ते बोलताना अडखळणे , शब्द रिपिट करणे हे वाढलेले बघून सायलीला भलतीच शंका आली.. बोलताना त्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव आणि त्याची होणारी स्ट्रगल बघून तिला जरा टेंशन आले.. सार्थक तोतरा तर नाही ना होणार अशी तिला भीती वाटायला लागली..
सायली ने संजय जवळ तिची चिंता व्यक्त केली....तसा तो तिला समजावत म्हणाला, अग लहानपणी काही काही मुलांच होतं अस बोलताना..जसा तो मोठा होईल तसा मग बोलेल की तो नीट..संजय चे ते बोलणे ऐकून तिने पण त्याकडे थोडे दुर्लक्ष केले...हळूहळू तो मोठा होऊ लागला..
बघता बघता सार्थक पहिल्या वर्गात गेला. पण अजूनही त्याच्या बोलण्यातला बोबडेपणा कमी झाला नव्हता..
आता मात्र सायलीच्या लक्षात यायला लागले की इतर मुलांच्या मनाने आपल्या सार्थकचे बोलणे जरा वेगळे जाणवते..बोलताना तो अजूनही अडखळतो..तिने लगेच त्याला स्पीच थेरपिस्टकडे नेण्याचा निर्णय घेतला.
क्लिनिक ला गेल्यावर डॉक्टरांनी सार्थकशी खूप गप्पा मारल्या..आणि तेव्हाच त्यांना कळून चुकले की त्याला बोलण्याचा प्रॉब्लेम आहे.. त्यांनी सायलीला सांगितले की हा खरतर न्युरोलोजीकल प्रॉब्लेम आहे..जो पूर्णपणे बरा होऊ शकत नाही पण योग्य उपचाराने तो कंट्रोल मध्ये नक्कीच ठेवता येतो..स्पीच थेरपी आणि समुपदेशन ने तो कमी होतो. आणि हळूहळू सार्थक ची स्पीच थेरपी चालू झाली.
एके दिवशी सार्थक शाळेतून घरी आला तो मुळी रडतच..आल्या आल्या त्याने शाळेची बॅग भिरकावली आणि सोफ्यावर जाऊन बसला..स्वारी फार रागात होती..सायली ने त्याचे रडणे जरा कमी झाल्यावर त्याला प्रेमाने विचारले...तसे तो म्हणाला, आई ऑटोरिक्षा मधले दादा मी काही बोलायला लागलो की हसतात आणि मला तोतरा म्हणून चिडवतात. मला नाही बोलायचे त्यांच्याशी.. तशी त्याला समजावत ती म्हणाली, बर! मी सांगेन बर का त्यांना.. मग नाही चिडवणार ते तुला...सार्थक म्हणाला, आई पण मीच का अडखळतो बोलताना..माझे मित्र तर नीट बोलतात..तशी सायली त्याला कुशीत घेत म्हणाली, अरे कुणाकुणाला होतं असं ..आपण नाही का डॉक्टर कडे जात त्यासाठी..हळूहळू होईल ते ठीक..
सार्थक ला तर कसेबसे समजावले पण तिला मात्र मनातून फार वाईट वाटले.
सायली ला आता सतत सार्थक ची काळजी वाटत असे. कुणी त्याला शाळेत चिडवत तर नसेल ना या विचाराने तिचे कशातच मन लागत नसे..सारखं त्याच्याबद्दल काळजी मुळे ती उदास राहू लागली..आपल्या बाळाला ही शिक्षा का मिळावी याच विचाराने ती फार दुःखी होई..
डॉक्टर कडे गेले की मात्र ते सार्थक बरोबरच तिलाही दिलासा देत..आणि तिला मग बर वाटे… मुलांबरोबरच पालक ही अश्या समस्यांमुळे खचतात याची डॉक्टरांना पूर्ण कल्पना होती त्यामुळे ते पालकांचे पण समुपदेशन करत.
डॉक्टरांनी तिला निक्षून सांगितले की त्याला फार ताण येईल असे वागू नका.. त्याने मुले आपला आत्मविश्र्वास गमावतात आणि मग अधिक तणावाखाली येतात आणि मग हा तोतरेपणा बळावतो. त्यांनी शांत आणि आनंदी राहायला हवे. आणि शांतपणे आणि संयमाने बोलल्याने ते योग्य प्रकारे न अडखळता आपले बोलणे मांडू शकतात. आणि ही प्रॅक्टिस नियमित सराव केल्यानेच जमेल.
बऱ्याचदा सार्थक शाळेतून कुणा ना कुणाच्या तक्रारी घेऊन येत.. आज याने मला चिडवल..आता मी याच्याशी नाही बोलणार इत्यादी..ते ऐकून ती मग एक दिवस त्याच्या टीचर ला जाऊन भेटली आणि तिने सार्थक चा बोलण्याचा प्रॉब्लेम तिच्याशी डिस्कस केला..त्याच्या स्पीच थेरपी बद्दल पण सांगितले.. आणि डॉक्टरांनी दिलेला सल्ला पण सांगितला.. तशी टीचर म्हणाली, हल्ली खर तर सार्थक शाळेत फार कमी बोलायला लागलाय.. कदाचित इतर मुलांच्या चीडवण्यामुळे तणावाखाली येतोय..मी त्याच्याकडे यापुढे विशेष लक्ष देईन आणि सर्वांचे त्याला प्रोत्साहन मिळेल याकडे माझा कल असेल..तुम्ही काही काळजी करू नका..ते ऐकून ती निश्चिंत झाली.
आज संध्याकाळी पार्कमध्ये तो खेळताना तिने कुणा एका मुलाला सार्थकला चिडवताना ऐकले..आणि तिचा पारा चढला..तिने त्या मुलाला खूप रागावले आणि तशीच सार्थकला घेऊन घरी आली...माझ्याच मुलाच्या नशिबी का यावे हे व्यंग? ती अगदी हमसून हमसून रडली..अजून तरी तो लहान आहे पण मग कळायला लागल्यावर त्याच्या मनावर किती आघात होईल लोकांच्या असल्या प्रतिक्रियेचा..तिच्याच विचारात ती वाहवत चालली होती तेवढ्यात संजय आला आणि ती त्या तंद्रीतून बाहेर पडली.
संजयला तिने आजचा घडलेला प्रसंग सांगितला. तसा संजय तिला म्हणाला, बघ सायली, आपल्या सार्थक च्या जे नशिबी आले ते काही आपल्या हातात नव्हते..पण आपण जे उपाय करतोय ते तर नक्कीच आपल्या हातात आहे..आपण वेळीच त्याची ट्रीटमेंट सुरू केल्याने त्याला नक्कीच उपयोग होईल..आणि तुला माहितीये का की, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डार्विन आणि ब्रिटन चे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांना देखील या समस्येला सामोरे जावे लागले होते..पण त्यांनी हार मानली नाही. सतत प्रयासाने त्यांनी आपल्या व्यंगावर मात केली...त्यांना एखादे भाषण करायचे असेल किंवा मुलाखत द्यायची असेल त्यापूर्वी आपण सहज आणि सलग बोलत आहोत याची कल्पना ते वारंवार करत त्यामुळे त्यांचे भाषण कीवां प्रत्यक्ष बोलणे अधिक सहजतेने होत असे. आणि ते तंत्र त्यांनी अथक प्रयत्नाने अवगत केलेले होते. आणि म्हणूनच ते यशस्वीरित्या जीवन जगू शकले.
अश्यांचाच आदर्श आपण सार्थक समोर ठेवूया..मग बघ आपल्या सार्थक चे देखील त्यांच्या सारखेच व्यक्तिमत्व घडेल. संजय ने दिलेल्या हिमतीने तिच्या मनाला नवी उभारी दिली. यापुढे न डगमगता अगदी जिद्दीने आणि आत्मविश्र्वासाने ती सार्थकचे उज्ज्वल भविष्य संजयच्या खंबीर आधाराने घडावयला सज्ज झाली.
✍️प्रांजली लेले
अनेक पालकांना मुलांच्या असल्या समस्या ना सामोरे जावे लागते. त्यावेळी त्यांनी खचून न जाता आपल्या मुलांना योग्य उपचार वेळीच द्यायला हवे जेणेकरून मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांच्या व्यक्तिमतत्वाचा विकास होईल. आपला समाज देखील तोतरेपणा चा हशा उडवितात आणि अश्या व्यक्तीवर विनोद करतात. हे चुकीचे आहे..ही समाजाची भावना बदलायला हवी.
वरील कथा प्रांजली लेले यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.