माझ्या जाऊबाई


माझ्या जाऊबाई!! 

✍️ स्वाती शेंबेकर 

गर्भरेशमी साडी, जरीचा लफ्फेदार पदर, टपटपित मोत्यांची ऩथ, त्याला साजेशा बुगड्या, हातात मोत्यांचे तोडे आणि गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र !  त्या सगळ्यातून डोकावणारा नाजूक मोत्यांचा एकसर. आमच्या वहिनींना गळ्यात मात्र एखादा  नाजूक दागिना लागेच.


पण, मंगळसूत्र कसं ठसठशीतपणे दिसलं पाहिजे.  

अगदि त्या काळातसुद्धा , आमच्या वहिनींनी मंगळसूत्र करताना  जमलं तर  थोडं जास्तं सोनं घालून भरभक्कमच करावं , असा आमच्या भावोजींना निरोप धाडला होता!!


कधी आम्ही माजघरात एकत्र जमलो की तो विषय मात्र हमखास निघेच.


त्या काळात असं चिठ्ठी धाडणं म्हणजे धाडसाच. आमच्या वहिंनीना इतक्या वर्षांपूर्वी ते कसं जमल ..?


असं विचारलं की त्या," इश्श्य", म्हणून अश्या काही लाजायच्या.


मग हळूच सांगायच्या, "तो मी गंपूदादांबरोबर  एक खलिताच पाठवला यांना, आणि माझ्या मनातल्या खूप गोष्टी लिहील्या होत्या त्यात."


आमचे भावोजी म्हणजे अगदी  साधा माणूस !! नाकासमोर चालणारा..त्यांची आई म्हणेल ते प्रमाण!!


म्हणजे आमच्या चुलत सासुबाई हो. त्या माधव भावजींच्या आई असल्या तरी ते त्यांना अक्काच म्हणत. 

त्या घरात मोठ्ठ्या . सर्व काही त्यांच्या देखरेखीखाली होतं असे.   त्यात लहानपणापासून त्यांच वर्चस्व होतं घरावर. पंधराव्या वर्षी लग्न झालं म्हणे,  चुलत सासुबाईंच.


मग काय सगळं त्यांच्या अखत्यारीतच येणार. 

पण आमचे भावोजी आईच्या,  अतिच आहारी गेलेला माणूस होता.  आमच्या वहिनींनी कसा संसार केला असेल सासुबाईंचा  तालेवारपणा सांभाळत?  ते त्याच जाणोत.  त्याबद्दल वहिनींनी कधीच तक्रार केली नाही .


आज वहिनींनी इतकं सजायच पण कारण तसच होतं,


आमच्या भावोजींचा सहस्रचंद्रदर्शन सोहोळा होता.


वहिनींच अगदी जातिने सगळीकडे लक्ष होतं. माधव भावोजींच्या आवडीचे खास पदार्थ तर त्यांनी कालच करून ठेवले होते.


ओल्या नारळाच्या करंज्या अन त्यांना घातलेली मुरड.  त्यांचा एकसारखा  आकार!


लाजबाब, अप्रतिम!! 

गुलाबजामला पण खास गायीच्या दूधाचा खवा , त्यात झिरो साईज रवा घालून एकसारखे तयार केलेले  गोळे.  गुलाबजामात वहिनींनी खडीसाखर भरली होती.. मुद्दाम.


आत बाहेर गुलाबजाम कसा गोड लागला पाहिजे.


जसे संसारात मुरलेले माधव- मधू... म्हणजे आमचे माधव भाऊजी अन माधुरी वहिनी!!


गुलाबजामांचा रंग पण कसा एक सारखाच तांबूस झाला होता. 

नारळाच्या वड्या , रव्याच्या  तिरंगी वड्या, अन रबडी हे पदार्थ कालच आमच्या वहिनींनी करून ठेवले होते.


बाकी जेवणाचं मात्र बाहेर कंत्राट दिलं होत.


आजचा कार्यक्रम मात्र घरीच होता. 

जुन्या वाड्याचं  कलात्मक पद्धतीने बदललेलं आधुनिक घर.  यात बरचसं कौशल्य , सूचना , वेगळा विचार वहिंनींचाच होता.  माजघराचं रूपांतर आता  Hall मधे झालं होत.  पुढच्या अंगणात डाव्या कोपर्यात छोटी बाग होती.  तिथे तुळस , मोगरा, कुंद अन कुंपणात रातराणी डवरली होती.  बाहेरच्या मुख्य फाटकावर मधुमालती चढली होती.  मागच्या अंगणात तुळशीचं देखण वृंदावन!!  मागे प्राजक्तही होताच.  पेरू, seedless   लिंबू,  कढिपत्ता , चहापात, वाळा यांनी मागचं अंगण सजलं होत. एका कोपर्यात हिरव्या  दूर्वांनी गच्च  भरलेली कुंडी होती . 

कुंपणात मधूनच लावलेली मेंदी,  जास्वंद, अनंत होतेच . अंगणात, परसदारी  मागे- पुढे दोन्हीकडे वेताचे झोपाळे. मागचा एका माणसाचा . पुढचा मात्र ऐसपैस! 

या झोपाळ्यावर किती डोहाळजेवणं झाली.


माझंपण डोहाळजेवण वहिनींनी अगदी हौसेनं केल होतं.


मला दिवस राहिले तेव्हा वहिनींचा फार आधार वाटायचा.


त्यांनी तेव्हा खूप लाड पुरवले माझे. मी तर कित्येकदा वहिंनींकडे यायचे. त्यामुळे माझं हे हक्काच घर.


मी त्यांची धाकटी जाऊ. म्हटलं तर चुलत‌ नातं. पण आमच्यात सख्ख चुलत असं काही नव्हतच. 

अगदी लग्नानंतर मी पहिल्यांदा या घरी आले तेव्हा वहिनींनी मला सांगून टाकलं," ए, रेवा  तू मला धाकट्या बहिणीसारखीच, उगाच मी मोठेपणा गाजवणार नाही ग.आणि हे तुझं माहेरच समज बरं का!" 

तेव्हा टचकन माझ्या डोळ्यात पाणी आलं होत.


मला वहिनींचा  नेहमीच फार आधार वाटायचा.


त्यांचा सतत हसरा चेहरा अन , सुबक मांडणीचं  नीटनेटकं ठेवलेलं स्वयंपाकघर ... 

त्यामुळे वहिनींकडे  जाताच मन प्रसन्न व्हायचं.


बाईच सगळं  कौशल्य  स्वयंपाकात अन स्वयंपाकघरात दिसलं पाहिजे , अस आमच्या वहिनींच म्हणणं.


आत्ताही वहिनींनी कार्यक्रम ठरवला आणि त्यांनी मलाच पहिला फोन केला. तो फोन आल्याबरोबर, माझंही मन सुखावलं. अजूनही त्यांच्या मनातलं माझं स्थान तितकंच महत्त्वाचं आहे.  हे जाणवलं.  

वहिनींचे दोन्ही मुलगे,  आजच्या परंपरेत म्हणाव तर जवळ म्हणाव तर लांब . पण त्याबद्दलही कधी तक्रारीचा सूर नाही.  सुनांनी आपल्या मताने सर्व करावं , आणि मजेत रहावं. उगाच आपली लुडबूड नकोच.


आपण  सूचना केल्यावर मनात जरी राग असला, तरी वरवरचं हसू नको. 


आज माधव भावजींना काय द्यायचं हा मोठा प्रश्नच होता.  दोघंही समाधानी होते. 

ऩाहीतर आम्हाला काही नको म्हणत,  आपल्यामागे gossip करणारी मंडळीपण असतात या जगात.  वरवर काही नको म्हणायचं, पण मनातून तर हवं असत.


पण वहिनी अन भाऊजी समाधानी होते. 

त्यांच्याकडे, काही नाही असं नव्हतच. आता दोघांना  एकमेकांच्या स्वभावाचे कंगोरेही पूर्ण माहित झाले होते. 


मला नेहमी एक प्रश्न पडायचा वहिंनीच्या वागण्याचा??


या इतक्या प्रसन्न कशा राहू शकतात? इतक्या खमक्या सासूबाई?? आणि यांना कसला राग नाही??


एकीकडे त्या म्हणणार ,"माधुरी तुच सांभाळ गो सगळं, घर नी माझ्या माधवालापण." 

पण बाकी अगदी बारीक लक्ष.  काय उरलं, पुरलं, फुकट गेलं, आपली सून माहेरी काय नेते?? आणि काय खाते??

एकदा मी सहज आले होते, त्यांना  भेटायला. तेव्हा मी वहिनींना विचारलंही, तर त्या म्हणाल्या ,"अग, रेवा  घरोघरी तेच असतं बघ.  आणि कुठल्याही स्त्रीला आपली सत्ता अधिकार गमावायचा नसतो. प्रत्येक माणूस दुसर्यावर कुरघोडी करायच्या प्रयत्नात असतो.   तू तुझ्या संपर्कात येणार्या माणसांच निरीक्षण कर.   मलाही या सगळ्याचा त्रास होतोच की....माणसाचं मन फार चंचल असतच.


त्यात माझ्या सासुबाईंसारख्या अनेकींना फक्त घरातच सत्ता गाजवता आली.  पण या सगळ्याला छेद देता आला पाहिजे.  त्यासाठी आपल्या मनाला तजेला देणारा, या कुपमंडूक  वृत्तीतून बाहेर पडण्याचा,  मार्ग शोधता आला पाहिजे. " 

"असा मार्ग सापडलाय का वहिनी??"  अस मी विचारल्यावर माधुरी वहिनी म्हणाल्या, " अग या मनाची खूप घालमेल व्हायची. अगदी एकाकी वाटण्याचे प्रसंग आलेच की, पण तो माझ्या मनातला  कृष्ण , त्याला मी साद घालायचे.   अग मग तो बरच काही सुचवायचा बघ. कधी एखादं मोगर्याच बागेतलं फूल मला म्हणायचं , बघ मी किती सुवास देतोय तुला, घे ना हा आनंद. पण त्यापूर्वी मनातला तो आठवणींचा कुवास मात्र झटकून टाक बघू. अग, कित्येकदा तुझे भाऊजी कामानिमीत्त बाहेर असतात , तेव्हा ती रातराणी मला छान सोबत करते.  मला आवडणारी गाणी,  माझी आवडती पुस्तकं, या सगळ्यातून मला  नवं काही सापडत रहातं.  ते माझं त्या नकोशा आठवणींवर, प्रसंगावर मात करत स्वत:ला boost करणं असत.  कारण मग हे कटू पडसाद नवरा बायकोच्या नात्यावर पडतातच न!!" 

मला मात्र वाटायचं की, हे त्या सासुबाई उर्फ माधव भाऊजींच्या आईला कस कळत नाही??


ते दिवसही कधीच  मागे पडले. 

वहिनी कधीतरी म्हणायच्या," अग रेवा कोणी बोललेलं अधिक उणं तेवढ सलत रहातं बघ.  तू लहान आहेस ग." मग मला हसूच यायचं . मी आणि लहान ?


हं.. त्यांनी अस म्हटलं की मन सुखावत, हे खरं.  मला नसतच जमलं अस वागायला , आमच्या वहिनींसारखं. एक गोष्ट मात्र खरी आहे.  मला  boost करायला त्या आहेतच. आताशा त्यांच वय दिसू लागलयं.


"देवा! या माझ्या जाऊबाईंना असच मजेत ठेव."


असं मनोमन म्हणत.  मी आजच्या समारंभात ," दोघांना उदंड आयुष्य लाभो. " 


हेच मागणं देवाकडे मागितलं. 


स्वाती शेंबेकर

वरील कथा स्वाती शेंबेकर यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.


ही कथा वाचून पहा.

घरटं

Post a Comment (0)
Previous Post Next Post