तजवीज

 

तजवीज

✍️ संभाजी बबन गायके 

“आम्हांला खरं म्हणजे असाच ग्राऊंडफ्लोरचा फ्लॅट पाहिजे होता...म्हणजे पाहिजे आहे. मिस्टर बघताहेत कुठं जवळपास मिळतोया का ते. पण या एरियाची सवय झाली. दुसरीकडे कुठं जायचं जीवावर आलंय. वरचा विकून दुसरा घ्यायचा विचार आहे ह्यांचा गावाकडच्या प्रॉपर्टीमधला वाटा मिळाल्यावर.वयोमानानं चौथ्या मजल्यावरून खाली-वर चढणं-उतरणं होत नाही हल्ली” माझ्या घरी दुपारी वेळ घालवण्यासाठी येणारी प्रतिक्षा म्हणाली तेंव्हा मी नुसतंच तिच्याकडे पाहून “हो,ना!” असं म्हणाले. माझ्याशी बोलताना प्रतिक्षाची नजर माझ्या सोन्यासारख्या फ्लॅटवरून भिरभिरत होती. 

माझा फ्लॅट म्हणजे तरी काय, इनमिन आतबाहेर अशा दोन खोल्या. पण आम्हांला अगदी पुरून उरायच्या! ह्यांनी अगदी पै-पै जमवून हो छोटासा फ्लॅट घेतला तेंव्हा आग्रहाने तळमजला मागून घेतला बिल्डरकडून, त्यासाठी जादाचे पैसेही मोजले. यापेक्षा छोटा फ्लॅट असता तर तोही घेतला असता. घरात आम्ही दोघंच,अगदी एक खोली असती तरी चालले असते. माझा पुतण्या म्हणजे ह्यांच्या भावाचा मुलगा काही इथं येऊन राहणार नाही, त्याचा संसार सोडून. आणि माझ्या भावाच्या मुलाचा स्वत:चा मोठा फ्लॅट होता सिटीत. त्याला इथं येण्यात काही इंटररेस्ट असणार? ही मुलं आम्हांला त्यांच्यासोबत किंवा त्यांच्याच शेजारच्या इमारतीत रहा म्हणत पण आम्हीच नको म्हणालो. कुणाला आपला त्रास नको, असे हे म्हणायचे. आम्हां दोघांनाही म्हातारपणातल्या आजारांनी अगदी खिंडीत गाठलं. आणि हे अडुसष्टाव्या वर्षी देवाघरी गेले. तोवर मी ही चांगली त्रेसष्ट-चौसष्ट वर्षांची झालेली होते. माझे हे मोठे धोरणी. म्हातारपणी काळजी घ्यायला कुणी असेलच असं नाही .वाढत्या वयाबरोबर चार जिने चढवायचे नाहीत माझ्याच्यानं, हे त्यांनी लक्षात घेऊनच एवढ्या दूरवरचा (म्हणजे त्यावेळी दूर वाटणा-या पण आता प्राईम लोकेशन की काय म्हणतात तिथे आलेला) फ्लॅट घेतला होता. यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पोस्टाच्या नोकरीतील पेन्शन मला लवकरच सुरू झाली. हे रिटायर्ड झाले त्यावेळी मिळालेला ग्रॅच्युटी-फंड काही फार नव्हता मिळाला, जो मिळाला तो पोस्टातच गुंतवून टाकला होता...सेफ साईड म्हणून. आजारपणाला पैसा काय कितीही असला तरी पुरतो होय? सकाळच्या उन्हात आम्ही उभयता सोसायटीच्या बागेमधल्या बाकावर बसलेलो असायचो तेंव्हा हे मला म्हणायचे, “हे ऊन असे चढत-चढत जाऊन शेवटी मावळून जाईलच आणि अंधार पडेल. उजेडाची तजवीज केली पाहिजे.”

 “तुम्ही आहात की माझ्यासाठी माझी सांजवात” मी म्हणायची. मग त्यावर ते म्हणायचे,”कोणता दिवा आधी विझेल हे का कुणास सांगता येतं?” 

त्यांनी मला न सांगताच त्यांच्या एका वकील स्नेह्यांकडून सविस्तर मृत्यूपत्र करून आणले. दोघांपैकी जो मागे राहील त्याच्या नावे जे काही किडुक-मिडुक असेल ते राहील. आणि मागे राहिलेल्याने तो त्याच मार्गावर जाण्याआधी कुणाच्याही नावे काहीही करायचे नाही! ह्या त्यातल्या मुख्य तरतुदी होत्या. पण हे मृत्यूपत्राचं फक्त ह्यांच्या त्या वकील-स्नेह्यालाच ठाऊक होतं! आमच्या मागे त्यानेच सर्व व्यवस्था लावून द्यायचे ठरले होते. 

माझा पुतण्या काय किंवा भाचा काय, दोघेही आमच्या जाण्याची वाट बघत बसणारतली मुले नव्हती. उलट ते खूप काळजी करायचे आमची. आमच्या दोघांच्या माघारी आमच्या मालमत्तेचे तीन हिस्से होतील.त्या दोघांना एक-एक आणि तिसरा हिस्सा कोकणातल्या आमच्या ग्रामदेवतेच्या भंडा-यासाठी देण्यावर आमचे म्हातारा-म्हातारीचं एकमत झालं. तसं ते आयुष्यभर होतच आलं होतं. देवानं पदरात मूल टाकलं नाही, ते यांनी मोठ्या मनानं स्विकारलं. सासूबाईंनी लावलेला वंशाला दिवा पाहिजे, नातू पाहिजे असा धोशा ह्यांनी कसोशीने कानामागे टाकला होता. सासरे,म्हणजे ह्यांचे वडील हे लहान असतानाच निवर्तले होते. यांच्या धाकट्या भावाला एक मुलगा होताच. घराण्याचं नाव पुढे चालवायला एक पुरे की! असे हे निग्रहाने म्हणायचे. कुस उजवण्याची वाट पाहता-पाहता वय बरेच पुढे निघून गेल्याने दत्तक घेण्याचा विचार करता आला नाही. सासूबाईंच्या संगे ‘नातू पाहिजे’ हा त्यांचा आग्रहही आकाशात विरून गेला. 

एकटीच मागे उरले तशी घरातील काही कामेही एकटीवर पडली. दवाखान्यात जाणे,औषधे आणणे,गॅस,वाणसामान मागवणे,महिन्याची पेन्शन घेऊन येणे ही कामे तर आपली आपल्याच करावी लागतात,म्हणजे जो पर्यंत हातपाय चालतात,तो पर्यंत तरी आपली आपण केलेलीच उत्तम! पोळ्या,भाजी माझी मी करू शकायची. स्वत:च्या हातची चव जिभेवर स्वार झालेली, तिच्यावर इतरांनी मांड ठोकलेली तिला कसं बरं चालणार? बाकी धुणे,भांडी,झाडलोट,लादी यासाठी मोलकरीण हवीच. मोलकरीण मात्र अगदी चांगली मिळाली हो! इकडची गोष्ट तिकडे सांगण्याची तिची वृत्ती नव्हती. तिच्या अनुपस्थितीत एकदा तिने दुसरी एक तरूण मोलकरीण बदली म्हणून पाठवली होती. त्या बयेनं माझा इत्यंभूत बायोडेटा माहित करून घेऊन तिच्या संपर्कात असलेल्या लोकांत प्रसृतही करून टाकला.... आज्जी एकट्याच राहतात,मूलबाळ नाही,पुतणा-भाचा आहेत म्हणे... नंतर त्यांनाच सर्व देणार आहेत अशा एक ना अनेक गोष्टी.

सोसायटीतील माणसं तशी खूप को-ऑपरेटीव. अन्यथा इतर ठिकाणी सोसायटीच्या फक्त नावातच को‌-ऑपरेशन! जाता-येता आणि सहज दिसते म्हणूनही हे सखे आणि सख्खे शेजारी जाळीच्या दरवाजातून डोकावून जात. (शेजारी म्हणजे वरच्या तिन्ही मजल्यांवरचे,शेजारी एकच वन-बीएचके होता. आणि समोर दोन बि-हाडं! ती मंडळी दिवसभर बाहेर जाणारी) विशेषत: सकाळी दार उघडायला थोडा उशीर झाला की,दारावरची बेल वाजायचीच. किंवा घरातील टेलीफोनवर रिंग तरी दिली जायचीच. वयोमानाने मी काहीशी कानातून गेले होते! ही आपल्या पुलंची कोटी बरं!. दुपारच्या सिरीयल्स टीव्हीचा आवाज मोठ्ठा करून बघण्याच्या बाबतीत मी पुढे बरीच सिरीअस झाले,आपला टाईमपास, दुसरे काय? 

पण सर्वकाळ सर्व सुरळीत काही चालत नाही. कधी टी.व्ही.नादुरूस्त,कधी केबल बंद,कधी गॅसच नाही आला,तर कधी बॅंकेत जायला रिक्षाच मिळेना,असे व्हायचेच. मग कुणाची तरी मदत घ्यावीच लागायची, आणि मंडळी यासाठी सदैव तत्पर असत! पण कुणाची मदत घेणं म्हणजे इकडे आड अन तिकडे विहीर! एखाद्याची जरा जास्त मदत घेऊ लागले तर इतरांना ती जवळीक खुपायची. आज्जींचा कुणी गैरफायदा तर घेत नाही ना, ही त्यामागची तळमळ! जगात भल्या माणसांना वानवा नाही,फक्त ती आपल्या वाट्याला मात्र आली पाहिजेत! 

तर मी काय सांगत होते....हां...ती चौथ्या मजल्यावरची प्रतिक्षा! “तुम्ही हा फ्लॅट मला विकता का?” असं कसं तोंडावर विचारणार? म्हणून तिने “आम्हांला असलाच फ्लॅट घ्यायचा आहे” अशी वाक्यरचना साधली होती. “बाई गं! तुला हा फ्लॅट विकून मी कुठं जाऊ ह्या वयात?” असं वाक्य माझ्या अगदी ओठांवर आलं होतं,पण मौनं सर्वार्थ साधनम. या श्लोकाचा ‘मौनामुळे इतरांना स्वार्थ साधायची संधी मिळत नाही!’ असा माझा मी मजेने अर्थ लावून घेतला होता! 

पुतण्या आणि भाचा सहकुटुंब अधून-मधून येऊन जात असत, मला त्यांच्या घरी चार-दोन दिवस घेऊन जात, तेवढ्यापुरता विरंगुळा मिळायचा, पण मी काही त्यात फारशी गुंतून राहिले नाही. शेवटी आपलं घर ते आपलं घर! कुणी मला हट्टी,दुराग्रही म्हणतही असतील. पण नव-याने दिलेले हक्काचं छत सोडून कशाला कुणाकडे रहायचे? पुढे फारच काही झालं तर आहेतच की वृद्धाश्रम! देवादिकांचे ग्रंथ वाचण्याचा छंद होताच, तो आणखी वाढवला... दिवस आणि वर्षे पुढे पुढे जात होती, आता मी अठ्ठ्याहत्तरची झाले. शेजारच्या कुटुंबातील मुलं एव्हाना मोठी झाली. त्यांना काही तो फ्लॅट पुरेनासा झाला. माझ्या घरातलं आधी जेमतेम असलेलं त्यांचं येणं-जाणं नंतर नंतर ब-यापैकी वाढलं. बोलण्यात प्रतिक्षा सारखाच सूर असायचा. मला ऐकू कमी येतं याचा (गैर)फायदा घेऊन मी त्याकडे काना-डोळा करायचे, बोलता-बोलता टीव्हीचा आवाज वाढवायचे...तो विषय वाढण्याआधी. 

पुढे प्रकृतीने एक्सपायरी डेट जवळ आल्याचा मेसेज वारंवार द्यायला सुरूवात केली...डीटीएच कंपनीचा जसा ‘बॅलन्स वॅलीड अप टू..युवर अकाऊंट विल गेट डिअ‍ॅक्टीवेटेड... .’ असा मेसेज बरेच दिवस आधी येतो तसा मनाला संदेश येऊ लागला. डॉक्टरांकडच्या फे-या वाढल्या. एकेदिवशी शेजारचे काळजीवाहू गृहस्थ त्यांच्या सिटीत राहणा-या थोरल्या भावाला घेऊन मला भेटायला माझ्या फ्लॅट मध्ये आले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्यांनीच दरवाजा थोडा पुढे ढकलला आणि दोघा भावांनी मिळून त्यांची योजना ऐकवायला सुरूवात केली. ज्येष्ठ बंधूरायाकडे बरीच वर्षे त्यांचे आई-वडील रहात असत. आता ह्या धाकट्या बंधूराजांना पुढच्या एखाद-दोन वर्षात मातृ-पितृसेवेची संधी प्रदान करण्याचा त्याचा मानस होता. आई-वडील इकडेच येणार म्हणजे आता जागा मोठी पाहिजे. मग? शेजारी आज्जींचा फ्लॅट आहेच की. नुसती मधली भिंत पाडली की झाला थ्री-बीएचके! 

पण आज्जी आपल्याला त्यांचा फ्लॅट विकतील का? 

का नाही? वय झालंय, थोड्याच दिवसांचा तर प्रश्न आहे! नाहीतरी पुतण्या-भाचा आज्जींच्या पश्चात थोडेच इथे रहायला येणार आहेत? फार तर हा फ्लॅट ते भाड्याने देतील किंवा इतर कुणाला विकतील. पण आज्जींनी हा फ्लॅट आपल्याला विकला तर त्या कुठं जातील? 

त्यांना कुठं आपण दुसरीकडे कुठं जायला सांगतोय? राहू देत की त्यांना त्यांच्या घरात शेवटपर्यंत!....वाटल्यास भाडंही नका देऊ म्हणावं! 

मी म्हणाले,”कृपया प्रतिक्षा करा.....!” आणि त्यांना हात जोडून निरोप दिला! 

(ते आणि प्रतिक्षा हल्ली माझ्याकडे फिरकत नाहीत!) 

माझ्या ह्यांची एक हसरी तसबीर भिंतीवर टांगून ठेवलेली आहे. तसबीरीतील ह्यांच्याकडे माझे लक्ष गेले. या संधीसाधु,रूक्ष,व्यवहारीक जगातील वनरूमकिचन सोडून परमेश्वराच्या प्रशस्त दुनियेत कायमचे वास्तव्यास गेलेले माझे हे माझ्याकडे पाहून मिश्किलपणे हसत आहेत, असा मला भास झाला! 

(स्वलेखन:-संभाजी गायके.)

देवाजीच्या मना

वरील कथा संभाजी गायके यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

1 Comments

  1. तजवीज ही katha खूप वास्तववादी आहे...आपल्या समाजात असे अनुभव येतात...वृद्धांना खूप काळजी घेणे गरजेचे होते...विशेषतः एकटे असताना...😌

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post