तडजोड
✍️ योगेश साळवी
मूर्ती आतुरतेने वाट पाहत होता. सकाळी साडेदहा चे पंचिंग असायचं ऑफिसचं. मूर्ती जरी बॉस असला तरी साडेनऊ पावणे दहापर्यंत ऑफिसात यायचाच. तसा गेल्या कित्येक वर्षांचा शिरस्ता होता त्याचा.
दहा सव्वा दहा झाले तरी प्रेरणा अजून ऑफिसला आली नव्हती. जवळजवळ एक वर्षांपूर्वीच प्रेग्नेंसी लिव्ह वर गेलेली प्रेरणा आज जॉईन होते म्हणून कालच फोनवर त्याला बोलली होती. बरेच महिने आधी तिने त्याला फोन केला होता... एका गोंडस मुलाला जन्म दिल्याचा आनंद तिच्या बोलण्यात डोकावत होता. प्रेरणा त्याची टेलिफोन ऑपरेटर.. कम रिसेप्शनिस्ट... कम सेक्रेटरी. सहा वर्षांपूर्वी त्याने तिची मुलाखत घेतलेली तेव्हा अगदी लाजरी बुजरी होती. नवीनच लग्न झालेले तेव्हा तिचं. मूर्ती ने रेज्युमे नजरे खालून घातला तेव्हा जन्मतारीख सात ऑगस्ट १९८५ दाखवत होती. म्हणजे तिचं वय मूर्तीच्या वयापेक्षा जवळजवळ दोन वर्षांनी जास्तच होतं. मूर्तीने जेव्हा तिला जॉब का हवाय म्हणून विचारलं तेव्हा तिने फारसे आढेवेढे न घेता किंवा फिरवा फिरवीचे काही उत्तर न देता बेधडक सांगितलेलं की घराला, संसाराला आर्थिक मदत व्हावी म्हणून.
मूर्तीला तिचे ते बेधडक उत्तर आवडलं होतं. खरे तर प्रेरणाचे व्यक्तिमत्व त्याला बघताक्षणी आवडलं होतं. त्याने तिचा पगार नक्की केला त्यालाही ती फार शंका कुशंका न घेता लगेच तयार झाली. अर्थातच तिला कामाची गरज होती हे उघडच होतं.
मूर्तीच्या मनात हे सगळं येत असताना त्याला एकदम वाटून गेलं की एका विवाहित स्त्रीबद्दल त्यातूनही आता एका मुलाची आई असलेल्या एका त्रयस्त स्त्री बद्दल आपण असा विचार करणे योग्य आहे का. पण मग कसं वाटलं की त्यात चूक तरी काय आहे? प्रेरणा कामावर येऊ लागल्यापासून एका वर्षातच त्यांच्यात एक वेगळच नाते तयार झालं होतं. ते नाते मालक कर्मचारी या नात्यापेक्षा नक्कीच वेगळं होतं. मूर्ती दक्षिणेकडचा ... त्याचे आई-बाबा फार वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्त मुंबईला आले होते. मूर्तीच्या बाबांची ही कंपनी तेंव्हापासून ची होती. मूर्तीचे शिक्षण मुंबईचं ...इथेच त्याने एमबीए केलेलं.. स्वतःच्या बाबांचा व्यवसाय त्याने सांभाळायला घेतलेला. आपला मुलगा आपल्या व्यवसायाची धुरा यशस्वीपणे वाहतोय हे पाहून मूर्तीच्या बाबांनी हळूहळू व्यवसायाची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर सोपवली. आता ते शिवाजी पार्क च्या आपल्या बंगल्यातून अगदी आवश्यक असेल तेव्हा व्यवसाय संबंधी निर्णय घेऊ लागले. गेल्या सात-आठ वर्षात तर दिवाळी दसऱ्याची सणासुदीची एखाद दुसरी वेळ सोडली तर ते ऑफिसात फिरकले देखील नव्हते.
प्रेरणाला या सगळ्या गोष्टी मूर्ती ने च सांगितल्या होत्या. मूर्तीच्या तरण्याबांड, होतकरू व्यक्तिमत्वाकडे एखादी स्त्री आकर्षिली गेली नसती तरच नवल होतं. प्रेरणा ही कधीकधी आपल्या नवऱ्याची अविनाश ची तुलना मूर्तीशी करायची. अवि तसा साधासुधा.. आपण बरं.. आपलं काम बरं अशी विचारधारा असलेला... नाकासमोर पाहून चालणारा, गंभीर प्रकृतीचा इसम होता. छानछोकी करण्यापेक्षा अंथरूण पाहून पाय पसरावे असं म्हणायचा तो. भांडुपला टू रूम किचनच्या घरात अविनाश आणि त्याच्या भावाचे कुटुंब सामायिक रित्या राहायचं. पाणी बाहेरच भरायला लागायचं. ते सुद्धा लवकर सकाळी उठून पाच साडेपाचच्या सुमारास. कॉमन संडास ची सोय वगैरे सगळं बाहेरच. त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे अविनाश ची सरकारी नोकरी. पण कायमस्वरूपी नोकरी असली तरी पगार तुटपुंजा होता. त्यामुळेच तर प्रेरणा ने सासूला पद्धतशीरपणे विचारून नोकरी करायला घेतलेली.
नंतर तिचा पगार म्हणजे उत्पन्नाचे एक मजबूत साधन झालेलं.
गेल्या दोन-तीन वर्षापासून सासरच्यांनी मुल.. नातवंड हवे असा धोशा लावला आणि मग यथावकाश प्रेरणाला एक वर्षांपूर्वी बाळंतपणाच्या रजेवर जावं लागलं. अगदी शेवटपर्यंत प्रेरणाला कामावर यायचं असायचं. पण डॉक्टरांनी नंतर सक्तीची बेड रेस्ट सांगितल्यावर तिचाही नाईलाज झाला.
प्रेरणाला कामावर याला उद्युक्त करणारा मूर्तीचे व्यक्तिमत्व हा एक घटक होताच. प्रेरणा लखलखित गोरी तर मूर्ती गव्हाळ रंगा चा होता. प्रेरणाला तर तो नेहमीच घरंदाज, मर्यादा शील आणि त्यामुळेच हवाहवासा वाटायचा. तसा तो फार बोलका , बडबड्या वगैरे नव्हता उलट काहीसा अबोलच होता. पण तो जे काही बोलायचं विचारायचा त्यात आपुलकी असायची. त्याच्या चेहऱ्याचा गोडवा आणि प्रसन्न स्मितहास्य भर घालायचं. स्वर सौम्य, वृत्ती नम्र ... समोरच्याला बरोबरीने वागवण्याचे सौजन्य आणि मनापासून चा सद्गभाव प्रेरणाला आकर्षित करून घेई.
प्रेरणा कामावर रुजू होताच काही दिवसातच मूर्तीच्या लक्षात आलं की ही गोड मुलगी आनंदी वाटत नाहीये. काहीतरी बिनसलं आहे ही चे खासच. नाहीतर एरवी नवीन लग्न झालेली मुलगी...तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह चमक वेगळीच असते. खरंच ते दिवस वेगळीच बहार आणतात
विवाहितांच्या जीवनात. मग प्रेरणा अशी हिरमुसलेली ,कोणात फारशी न मिसळणारी, खाली मान घालून वावरणारी का असेल बरं? स्वतःच्या कामात तर प्रेरणा परिपूर्ण होती. त्यात तिचा दोष काढायला अजिबातच वाव नव्हता. वरिष्ठ या नात्याने तिला आपल्याकडून होईल ती मदत करावी हेतूने त्याने तिला एकदा केबिनमध्ये बोलवलं.
आणि त्याला जास्त प्रयत्न करावा लागलाच नाही. गॅसवर ठेवलेले आधण जसं वरील झाकण दूर करताच आतली वाफ जोमाने बाहेर येते तशी प्रेरणा दोन-तीन प्रश्न विचारताच भराभर बोलू लागली. मनात खदखदत असलेल्या या गोष्टी तिला कोणाला तरी सांगायच्या असाव्यात बहुदा. त्यातून मूर्तीने आपुलकीने, जिव्हाळ्याने आणि काळजीने विचारलेले प्रश्न तिच्या मनाला स्पर्शून गेले असावे. पती-पत्नीच्या अगदी वैयक्तिक बाबी असतात त्या सोडून बऱ्याच बाबी तिने मूर्तीपाशी मोकळ्या मनाने सांगितल्या.
तेव्हापासून त्या दोघातले मालक कर्मचारी हे द्वैत संपून मित्र मैत्रिणीचे लोभस नाते तयार झाले. पण मूर्ती आपल्या मर्यादा जाणून होता. त्याने आपल्याला माहित झालेल्या गोष्टींचा गैरफायदा न घेता उलट अविनाश सारख्या स्वतःच्याच कोशात राहणाऱ्या व्यक्तीला आपलेसे कसे करावे याचे धडे दिले. आणि हे सुद्धा तो अगदी खेळीमेळी ने बोलता-बोलता द्यायचा हे विशेष. प्रेरणाला सुद्धा त्याच्या उपस्थितीत जगातील दुःखांचा ,तणावाचा विसर पडे. खरंच आपली आवडती व्यक्ती आजूबाजूला असेल तर किती फरक पडतो माणसाच्या आयुष्यात... आणि हा फरक त्याच्या किंवा तिच्या कुटुंबावर पण नाही म्हटलं तरी पडतोच.
पावणेअकरा झाले तशी घामाघुम झालेली प्रेरणा ऑफिसमध्ये प्रवेश करती झाली. बायोमेट्रिक पंचिंग करून ती पहिल्यांदा वॉशरूम मध्ये शिरली. थोड्यावेळाने कामाचा चार्ज घेण्याआधी मूर्तीच्या केबिनच्या दरवाज्यावर तिने बोटाने टकटक केलं.
मूर्तीचे लक्ष प्रेरणाकडे गेलं. प्रेरणा अंगाने चांगलीच भरली होती. बाळंतपण आटपल्यावर मुला ला जन्म दिल्यावर बऱ्याच स्त्रिया गुटगुटीत होतात तशी. तिचे आधी पासूनचे गोबरे असलेले गाल टमाट्या सारखे वर आलेले तांबूस दिसत होते. तिच्या अंगावरील पंजाबी ड्रेस जणू ओरडून सांगत होता की त्याला अल्टर करण्याची गरज आहे किंवा मग नवीन सुट सुटीत ड्रेसची तरी गरज आहे. प्रेरणा जरी प्रवासाने दमलेली दिसत होती तरी एक वेगळेच तेज, समाधान...आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. तिला तिच्या खांद्यावरून घसरलेली ओढणी जरा नीट व्यवस्थित घ्यायला सांगावं असं मूर्तीला तिच्या काळजीपोटी वाटून गेले पण प्रत्यक्षात असं बोलायचं त्याने टाळलं.
आपल्याला पाहताच त्याच्या डोळ्यातला आनंद प्रेरणाने टिपला. बऱ्याच काळाने आपल्या जिवलगाला भेटल्यावर चेहऱ्यावरचे आपसूकच भाव येतात तसे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. प्रेरणाला पण त्याला भेटून आनंद झाला होताच.
" वेलकम प्रेरणा.... अभिनंदन तुझं. कशी आहेस?" प्रेरणाची मूर्तीने चौकशी केली.
" सॉरी सर आज जरा यायला उशीर झाला. ते बाळू चे सगळं आटपता आटपता कामावरचा पहिलाच दिवस असल्याने गोंधळ झाला." प्रेरणा अपराधी सुरात म्हणाली.
मूर्ती वेळेच्या बाबतीत किती काटेकोर आहे हे ऑफिसमधल्या सर्वांनाच माहीत होतं. मूर्तीची कितीही मैत्री असली आणि एकटे असताना जरी आपण त्याला अरे तुरे संबोधत असू... तरी चारचौघात, सहकाऱ्यांसमोर ती मूर्ती सर म्हणूनच त्याला बोलत असे.
"प्रेरणा मी एका शब्दाने तुला काय म्हणालो का...? बरं फ्रेश हो... आणि मी शुभमला सांगून कृष्णा मधून रवा डोसा आणि सांबार मागवले आहे... तो देईल तुला.. खाऊन घे"
मूर्तीच्या बोलण्यातून त्याचा प्रेरणावरचा विश्वास दिसत होता.
प्रेमाच्या डोळ्यात टचकन पाणी आले. अशी कोणी कधी काळजी घेतली की हल्ली असंच व्हायचं तिचं. बाळंतपणानंतर स्त्रिया जास्त हळव्या होतात का... तिच्या मनात येऊन गेलं. खरोखर मुर्ती सारखा बॉस आपल्याला मिळाला आहे आपलं भाग्यच म्हणायचं... असाच आपला नवरा अविनाश असता तर..
कालचीच गोष्ट... डब्यात खारट भाजी आल्याने घरी आल्यावर वैतागलेला अविनाश तिच्या डोळ्यासमोर आला. तिला काही बडबडला नाही तो... पण मग सासू ने सांगितलं की भाजी त्याला अजिबात आवडली नव्हती. टिफिन तसाच घरी घेऊन आला होता. आपल्या मनाविरुद्ध काही घडलं की आतल्या आत धुमसत राहायची त्याची सवय नव्याने प्रेरणाच्या लक्षात येऊ लागली होती. त्यांचं लग्न पद्धतशीर मुलगी वगैरे पाहून वैदिक पद्धतीने झाले होते. दिसायला बरा आणि सरकारी नोकरी असल्या कारणाने प्रेरणानेही होकार दिला होता. पुढे मधुचंद्राला जायचा विषय निघाला दोघांमध्ये... त्यावेळी प्रेरणांने त्याला बेंगलोर, म्हैसूर, उटीला जाऊया म्हणून सांगितलं होतं.
" बेंगलोर ,म्हैसूर बजेट फार होईल... लग्नामध्ये बराच खर्च झालाय... इथे जवळच जाऊया महाबळेश्वरला..." अवि तोडून बोलला होता तिला... तेव्हा नाही म्हटलं तरी खटकलं होतं त्याचं बोलणं.
मग पुढे बरेचदा त्याच्या अशा अनेक गोष्टी मनात खटकू लागल्या. प्रेरणा ने किती चांगलं जेवण केलं तरी हा काही कौतुक करायचा नाही. नवी साडी, नवीन ड्रेस घातला तरी कौतुकाचे म्हणून बोलणे नाही. नेहमी आपलं बरं आणि आपलं काम बरं... यावृत्तीमुळे फारसा चार चौघात मिसळायचा नाही. सारखा चिंता करण्याचा स्वभाव... छोट्या छोट्या गोष्टीवरून नाराज होऊन आतल्या आत कुढत बसणे... वगैरे त्याच्या गोष्टी प्रेरणाला आवडत नसत. ऑफिसात एखादेवेळी साहेबांची पाठीवर थाप मिळाली किंवा साप्ताहिक मीटिंगमध्ये अविनाश चे कौतुक झालं तर त्याला आनंद होई... नाही असं नाही... पण मग असे प्रसंग अगदीच हाताच्या बोटावर मोजण्या इतके असत.
अविनाश ची ही अंथरूण पाहून पाय पसरणं, बिकट वाट वहिवाट न करणं ,ठेविले अनंते तैसेची रहावे वृत्ती प्रेरणाला बैचन करत असे. पुरुष कसा धाडसी हवा... थोडासा परिणामांची चिंता न करणारा... धाडसाने परिस्थितीला सामोरे जाणारा... उत्कट... बेफाम प्रेम करणारा.... दिवसभर घरची काम करून रात्री अविनाश ची वाट पाहण्याचा उबग प्रेरणाला येऊ लागला. तिने एकाएकी स्वतःच नोकरी करण्याचा निर्णय घेतला. वृत्तपत्रात टेलिफोन ऑपरेटर च्या रिक्त जागेसाठी मुलाखती होत्या...'अय्यर अँड सन्स ' कंपनीची जाहिरात आली होती. प्रेरणाचा लग्नापूर्वी केलेल्या कामांचा अनुभव कामी आला आणि लवकरच मूर्तीची तिच्याशी ओळख झाली.
मूर्तीची मैत्रीचं नातं निर्माण झालं आणि मग एकमेकांच्या सहवासात दोघही रमू लागली. एकमेकांच्या डब्यातले खाद्यपदार्थ वाटून घेणे, कधी शॉपिंग साठी मूर्तीला मदत करणं... मूर्तीला त्याच्या लग्न करण्याविषयी चिडवणं... इतपत दोघांमधली जवळीक झाली. मूर्तीचा आणि प्रेरणाचा दोघांचाही एकमेकांवर किती ही विश्वास असला आणि मैत्रीचं निखळ नातं जपण्याचा दोघांकडूनही आपापल्या परीने प्रयत्न केला गेला असला.... तरी निसर्ग नियमानुसार दोघे एकमेकांकडे आकर्षिले गेले होतेच. मूर्तीला तर बरेचदा मनात वाटायचं की प्रेरणा चं लग्न झालं नसतं तर तिला मागणी घालून तिच्याशी फेरे घेतले असते आपण. पण त्याच्यावर लहानपणापासून झालेले संस्कार,त्याचे शिक्षण यामुळे हा विचार मनात येताच त्याला अपराधी वाटायचं. पण प्रेरणा शिवाय त्याला बैचेन वाटायचं हे ही तितकच खरं होतं.
आज प्रेरणा परत कामावर रुजू होतात या जगात आपले इतकं आनंदी कोणीच नाही असं त्याला वाटत होतं.
रवीला... त्याच्या ऑफिस बॉय ला बोलावून एक परिपत्रक त्याने ऑफिस च्या नोटीस बोर्डवर लावण्यास सांगितलं.
'आपल्या कंपनीतील कर्मचारी सौ. प्रेरणा मेहेंदळे या आजपासून कामावर रुजू झाल्या आहेत. याशिवाय आता त्यांच्याकडे गोड बातमी देखील आहे.
त्यांचा हा आनंद आपण एक छोटेखानी समारंभ करून दुपारी चार वाजल्या सुमारास साजरा करत आहोत.
तरी सर्वांनी आपली महत्त्वाची कामे त्या आधी आटपून या वेळेला आपल्या कॉन्फरन्स रूममध्ये यावे.'
आपला शुभेच्छुक,
मूर्ती अय्यर
असा मजकूर त्या परिपत्रकात होता. प्रेरणाला हे कळताच ती मूर्तीच्या केबिनमध्ये आली.
"मूर्ती सर एवढं कशाला आणि ते पण तुम्ही स्वतः खर्च करून...??" तिने विचारले.
" नाही प्रेरणा... हा कर्मचारी वेल्फेअर फंडाचा खर्च आहे. तुमच्या हक्काचे पैसे आहेत हे. आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक मालकांना नाही करायचं तर कोण करणार..? "
मूर्ती म्हणाला.
प्रेरणा निरुत्तर झाली. तू काय ऐकणार आहेस... अशा अर्थाची नजर तिने मूर्ती कडे टाकली. पण त्या नजरेत कृतज्ञता होती. प्रेरणा आपल्या जागेवर परतली इतक्यात तिच्या जागेवर चा फोन वाजला.
" हॅलो... अय्यर अँड सन्स..." तिने तिच्या नेहमीच्या स्वरात विचारलं.
" कोण? प्रेरणा बोलतेस का...?" पलीकडून तिची सासू विचारत होती.
प्रेरणा तिच्या या नंबर वर लगेच उपलब्ध असते तिच्या घरच्यांना ठाऊक होतं. टेलिफोन ऑपरेटर ची नोकरी असल्याने प्रेरणा आणि तिच्या घरच्यां ची बोलणी मागेही बरेचदा या आधी या नंबर वर झाली होतीच.
"हो आई... बोला ना....काय झालं ??" करून अचानक फोन आल्यानंतर प्रेरणाही भांबावली होतीच.
"अग बाई ...काय सांगू तू कामावर गेल्यावर एक दीड तास झाले नाही तर सोन्याला जाग आली. त्याने रडून रडून घर डोक्यावर घेतले. दुधाची बाटली देऊन झाली ...सगळं काऊ चिऊ दाखवून झालं राहतच नाही कोणाजवळ... तुझ्याशिवाय कोणाजवळ राहील असं वाटतच नाही..." सासूने एका दमात सगळं सांगितलं.
प्रेरणाला वाटलच होतं. एवढ्या लवकर आपला बाबू आपल्या शिवाय कसा राहील म्हणून.....
"मी निघतेय... लगेच... ओला टॅक्सी करूनच येते." प्रेरणाच्या तोंडातून निघून गेलं.
प्रेरणा ने मूर्तीच्या केबिनमध्ये जाऊन त्याला कल्पना दिली. मूर्ती समंजस होता .त्याने लगेच तिला परवानगी दिली तसेच बरोबर कोणी हवे आहे का याची विचारणा केली. प्रेरणा अर्थातच नको म्हणाली.
" मूर्ती सर...उद्यापासून मी कामावर येऊ शकणार नाही..." प्रेरणा शेवटी म्हणून गेलीच.
" मला हे माहीतच होतं.... पण माझं मन कोणास ठाऊक... मला तसं विचार करू नको असं म्हणत होतं.. तुझा छोट्या आता तुला कामाला सोडेल असं वाटत नाही... त्याची गरजच आहे तशी... हरकत नाही ...काही काळजी करू नको. कसलाही ताण घेऊ नको. आणि एक लक्षात ठेव तुला काही गरज लागली तरी मी आहे.... अगदी एका फोनच्या अंतरावर...." मूर्ती म्हणाला.
शेवटी दोघांच्या संबंधातील कोंडी प्रेरणाच्या छोट्या बाळाने तिच्या बाबू ने सोडवली होती. खरंच... प्रेरणाला आपल्या विश्वासाची गरज होती.... आपल्या स्पर्शाची ती कधीच भुकेली नव्हती. आपणच जरा विचलित झालो होतो..... मूर्तीच्या मनात आलं.
कालच मूर्तीच्या आईने आणलेल्या एका दक्षिणात्य स्थळाचे विचार मूर्तीच्या मनात घोळू लागले.
मोबाईलवर आईला फोन लावून तो म्हणाला...
" आई ...ती ऑफिस नंतर माझी मीटिंग होणार होती ती कॅन्सल झाली आज... मी लवकर येईन घरी... ते मिस्टर नायर आणि मिसेस नायर यांना फोन करून आजच बोलव."
त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचे निर्व्याज हास्य होते.
~योगेश
वरील कथा योगेश साळवी यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.