सवय

 सवय

✍️ संभाजी बबन गायके

आज शनिवार म्हणजे सकाळची शाळा! भारी कंटाळा येतो लवकर उठायचा. पण उण्यापु-या २९ वर्षांच्या सर्विस मध्ये मला उशीर म्हणून कधी झाला नाही. सुपरवायझर झाल्यापासून तर मी नेहमीपेक्षा वीस-पंचवीस मिनिटे आधीच पोहोचायची शाळेत. घरच्यांनाही आता माझ्या या शनिवारच्या रूटीनची सवय होऊन गेली होती. मी शाळेत जायला घराबाहेर पडेपर्यंत कुणीही उठून माझ्या मध्ये मध्ये करत नसे. मी आपली आवरून निघताना दरवाजा ओढून घेऊन निघून जायची. सूनबाई नुकत्याच आई झालेल्या होत्या, त्यांनाही डिस्टर्ब नको म्हणून दरवाजाही हळूवारच ओढून घ्यावा लागे. मिस्टरांना त्यांच्या रिटायरमेंटची चांगलीच सवय होऊन गेल्याने, तेही निवांतच असायचे. 

आजही मी पावणे पाचलाच उठले आणि आन्हिकं आवरली. दोन पोळ्या लाटल्या, बटाट्याच्या काच-या वाफावल्या आणि गरमगरम डबा भरला. माझ्या हातची ही बटाटा भाजी स्टाफरूम मधल्या जुन्या मेंबर्सना आवडायची म्हणून थोडी जास्तीचीच भाजी भरली डब्यात. पूर्वी साहाय्यक शिक्षिका असताना एकत्रित डबा खाणे व्हायचं, आता प्रमोशनचा अ‍ॅप्रन अंगावर चढल्यानं हा आनंद मिळणे दुरापास्त झालेले होते. 

एवढं सगळं करूनही घड्याळात बघते तर सहाच वाजताहेत.थंडीचे दिवस होते, त्यामुळे अजून अंधारच होता बाहेर. पर्स खांद्यावर अडकवली, रिक्षाला सुट्टे पैसे आहेत का ते तपासून पाहिले आणि पायांत बूट घालून (मी गंमतीने बूटात पाय घातले असे म्हटले की माझ्या विद्यार्थीनी खूप हसत हे उगाचच आठवले!) चोरपावलांनी बाहेर पडले. हो! कुणाच्या झोपा नको मोडायला! 

गल्लीच्या कॉर्नरवरचा नेहमीचा रिक्षावाला आज नव्हता. अंगावर शाल पांघरून अंगाचे मुटकुळे करून मागच्या सीटवर झोपलेल्या रिक्षावाल्या दादाला उठवले, म्हणाले “शाळेत येणार?” त्याने घड्याळात पाहिले आणि लांब जांभई देऊन त्याने दांडके ओढले. त्याला शाळा म्हणजे कोणती शाळा हे सांगावे लागले नाही. मोजून तेरा मिनिटांत दादांनी रिक्षा शाळेच्या गेटवर पोहोचवली. शिपाईकाका शाळेचे प्रांगण झाडण्यात मग्न होते. माझ्या केबिनमधला दिवाही अजून लागलेला नव्हता. शाळा शनिवारी सात पाचला भरे. मुलेही निवांत येत आणि एरव्हीच्या पाच दिवशी दुपारी बारा वाजता शाळेत येणारा स्टाफ शनिवारी मुलांच्या आगेमागे धावतपळत पोहोचे मस्टर गाठायला. चला, आजही बाईंचा पहिला नंबर म्हणजे! मी स्वत:वर खुश झाले लहानपणी वर्गात पहिला नंबर आल्यावर व्हायची तशी! त्याचवेळी बाई व्हायचं ठरवलं होतं. बाईच उत्तम शिक्षिका होऊ शकते असे मला वाटायचे! तेंव्हा पासून शाळेतच रमले. बालवाडी ते बी.एड,एम.एड. पर्यंत कॅटलॉगमध्ये नाव असायचे, शिक्षिका झाल्याने इतरांची नावे कॅटलॉग मध्ये लिहिण्याची संधी मिळाली. 

लग्नानंतर आडनावात बदल झाला तरी स्टाफ आणि विद्यार्थी जुन्याच नावाने ओळखत असत. 

मला केबिनमध्ये जाताना पाहून सेवक हरीभाऊ माझ्याकडे थांबून पहात राहिले. आज हरिभाऊ असे का बघताहेत आपल्याकडे ते काही लक्षात आले नाही. बहुदा त्यांना आज हाफ डे रजा पाहिजे असणार! मी दिवा लावला आणि मस्टर उघडले. वर पासून खालपर्यंत माझ्या नावाचा पत्त्ताच नाही! असं कसं? माझं नावच गायब! बाईंचं नावच नाही मस्टर मध्ये? दोन-दोनदा मस्टर चाळून पाहिले. मागच्या महिन्यात तर होते नाव तिस-या नंबरवर. म्हणजे मुख्याध्यापिका आणि उपमुख्याध्यापिका यांच्या खालोखाल! मलाही मुख्याध्यापिका होण्याचा चान्स मिळू शकला असता, पण सिनिऑरिटी मध्ये नाही बसले! पण शाळेसाठी जणू ही आपलीच जबाबदारी म्हणून अथक काम केले. शाळा नावारूपाला आणण्यासाठी इतरांच्या बरोबरीने कष्ट केले हो! आणि अशा या माझे मस्टरमध्ये नाव लिहायला क्लर्क विसरले कसे? 

तेवढयात शाळेत नव्यानेच म्हणजे चार-दोन वर्षांपूर्वी रूजू झालेल्या दोघी शिक्षिका केबिन मध्ये आल्या. लांबून यायच्या त्या म्हणून लवकर पोहोचायच्या शाळेत. त्या माझ्याकडे बघत राहिल्या. “बाई, तुम्ही?” असा त्यांच्या नजरेतील प्रश्न मला लगेच समजला. इतकी वर्षे प्रश्नांशी, उत्तरांशी,परीक्षांशी, वेळापत्रकांशी, पुरवण्यांशी आणि निकालाशी अगदी जीवाभावाचे नाते जडलेल्या माझ्या मनाला “बाई,तुम्ही इथं कशा?” हा प्रश्न समजणे काही कठीण गेले नाही. पण एकाच झटक्यात डोक्यात आलेल्या उत्तराने मात्र मी मटकन खुर्चीवर बसले! मी मागच्याच आठवड्यात तर सेवानिवृत्त झाले होते! याच शाळेच्या प्रांगणात भरगच्च गर्दी केलेल्या विद्यार्थ्यांनी आणि स्टाफने माझा निरोप समारंभ आयोजित केला होता, चेअरमन साहेबांनी खास स्मृतिचिन्ह देऊन माझा केवढा सत्कार केला होता! विद्यार्थ्यांनी स्वत: बनवलेल्या ग्रीटींग कार्डसने माझे टेबल भरून गेलेले होते. सत्कारास उत्तर देताना हुंदके आवरत नव्हते. माझे पती,मुलगा,सून माझ्याविषयी छान बोलले कार्यक्रमात. जड पावलांनी घरी आले होते सहका-यांचा आणि विशेषत: माझ्या विद्यार्थ्यांचा निरोप घेऊन. घरी आणलेल्या पुष्पगुच्छांमधली फुले अजून बरीच ताजीच दिसत होती पण माझ्या मनावरचे शाळेचे गारूड अजून उतरलेले नव्हते! मी रिटायर्ड होऊनही सवयीनुसार शाळेत आले होते! 

तेवढ्यात माझ्याकडूनच सुपरवायझरपदाचा चार्ज घेतलेल्या शामलताई शाळेत आल्या आणि मला त्यांच्या खुर्चीत बसलेले पाहून आश्चर्यचकीत झाल्या. मी घाईघाईत उठू लागले तशा त्या म्हणाल्या, “अहो, बसा, बसा मॅडम! तुम्ही म्हणजे ह्या खुर्चीची शान होतात.” मी खूपच खजील झाले होते. काहीही न बोलता पर्स उचलली आणि केबिनच्या बाहेर पडले. शाळेत आलेल्या काही मुलींनी मला पाहिले आणि त्या धावतच माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या,”बाई, तुम्ही पुन्हा येणार आम्हांला शिकवायला?” “नाही गं चिमण्यांनो, आता मी रिटायर्ड झालेय!” 

शाळेच्या गेटवर माझा मुलगा बाईक घेऊन उभा होता. आई सकाळी सकाळी कुठे गायब झाली म्हणून शोधायला बाहेर पडला होता. आणि आधी शाळेत आला होता. आईचं आता कठीण आहे अशा चेह-यानं तो म्हणाला “आई, चल घरी. अगं तु रिटायर्ड झालीयेस!” 

मी मुकाट त्याच्या बाईकवर बसले, शाळा दृष्टीआड होईतोवर मागे वळून पाहत होते आणि डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागलेल्या!

(संभाजी गायके.)


वरील कथा संभाजी गायके यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post