सुखाचं ताट

 'सुखाचं ताट'

✍️ सचिन देशपांडे

साठ्यांनी नविन बेडशिट घातली पलंगावर. पिलो कव्हर्स बदलले. डोक्याशी स्टूल आणून ठेवलं. पाणी भरुन तांब्या - फुलपात्र ठेवलं त्यावर. पलंगाला लागूनच असलेल्या खिडकीच्या, काचा उघडल्या त्यांनी. कठड्यावर फ्लाॅवरपाॅट ठेवला... आणि त्यात त्यांनी कालच आणलेल्या, नी रात्रभर पाण्यात बुडवून ठेवलेल्या वेगवेगळ्या रंगांच्या गुलाबांचा गुच्छ करुन ठेवला. पलंगामागे असलेल्या खिडकीचाही पडदा उघडला त्यांनी, आणि स्वच्छ सुर्यप्रकाश येऊ दिला आत. क्षणभर थांबून, आपण केलेल्या ह्या नेपथ्य - प्रकाशयोजनेकडे बघून... मनोमन सुखावत त्यांनी, भिंतीवरील घड्याळाकडे पाहिलं.

"अकरा वाजलेत... आता वेळ झालीचेय हिची घरी यायची". 

असं स्वतःशीच बोलत त्यांनी... हाॅलमध्ये येत मेन डोअर आणि सेफ्टी डोअर, दोन्ही सताड उघडून ठेवलं. हाॅल ते बेडरुम ह्या पॅसेजमध्ये, कुठलाही अडसर नाहीये ना ह्याची खातरजमा केली त्यांनी. पॅसेजमधलं बेसिनशेजारी असलेलं वाॅशिंगमशिन, त्यांनी आणिक आत ढकललं. आणि पुन्हा एकदा जागीच उभं राहून त्यांनी, चौफेर नजर फिरवली. आपल्या एकंदर तयारीवर, खूष झाले होते साठे. तयारी?... कसली तयारी? 

आज दोन आठवड्यांनी साठेबाई, घरी येणार होत्या. दोन्ही पायांची knee replacement ची सर्जरी, यशस्वीरीत्या पार पडली होती. खरंतर वयाच्या सत्तराव्या वर्षी, हे आॅॅपरेशन कितपत लाभदायक ठरेल हा प्रश्नच होता. उलटपक्षी ते आणिकच त्रासदायक ठरण्याचीही शक्यता होती. पण डाॅक्टरच असलेल्या एकुलत्या एक लेकीने, आणि डाॅक्टर जावयाने... प्रचंड धिर दिला होता साठेबाईंना, भले अमेरिकेहून. आणि व्हर्च्युअल ब्रेनवाॅश करत, साठेबाईंना त्यांनी तयार केलं होतं. खरंतर साठेबाईंना आपलं आॅपरेशन कसं व्हायचं... यापेक्षाही काळजी होती, आपण नसतांना ह्यांचं कसं व्हायचं याची. कारण जवळपास पंचेचाळीसहून अधिक वर्षांच्या संसारात, साठ्यांनी घरकामात इकडची काडी तिकडे म्हणून केली नव्हती. स्वैपाकखोलीतील त्यांची मजलही, चहा पुढे कधीच गेली नव्हती. आणि तो ही एकच कप... कधी काळी बायको नसतांना, करायची वेळ आली तरच. नाहीतर त्यांनी पत्नीसाठीही चहा ठेवलाय... नी दोघांनी गप्पा मारत चहा प्यायलाय, असं कधीच घडलं नव्हतं. 

आयकर विभागातील मोठ्या हुद्द्यावरुन निवृत्त झाल्यावर... साठ्यांचा सगळा वेळ, वाचनात वा बाहेर एकट्याने फिरण्यात जाई. तर साठेबाईंचा वेळ अगदी लग्न झाल्यापासूनच, स्वैपाकखोलीत अधिक गेला होता. आणि आता म्हातारपणी निरनिराळ्या देवळांतून, वेगवेगळ्या भजनी मंडळांसोबत जात होता. अशा तर्‍हेने साठे पती - पत्नीचं आयुष्य, एकमेकांसोबत पण तरीही दोन समांतर रेषेंसारखं चाललं होतं. फारच कमीवेळा साठे दांपत्य, एकत्र असं बसलं असेल शेजारी शेजारी. आणि कधी बसलंच चुकून, तर संवाद अगदी शुन्यच घडत असे दोघांत म्हंटलं तरी चालेल.

साठेबाईंनी घरादाराचं स्वास्थ्य बिघडू नये म्हणून, स्वतःची तब्येत जिवापाड जपलेली. कारण आपण उताणे झालो तर... घर उपडं होईल, ह्याची खात्री होती त्यांना. साठ्यांचं सगळं आयुष्य... स्वतःच्या घरचं सुख सोडून, दुसर्‍यांच्या घरच्या सुबत्तेवर छापा टाकण्यात गेलेलं. तर एकुलत्या एक मुलीचं आयुष्य गेलेलं, अखंड अभ्यासात. त्यामुळे घरकामात ती ही, वडिलांच्या पाऊलावर पाऊल होती. उशिराने झालेली लेक, त्यामुळे बाबांची अत्यंत लाडकी... मुळातच अफाट बुद्धिमत्ता, त्यातून शिक्षणात गोडी. म्हणूनच मग साठेबाईंनीही... म्युच्युअली घरातील कामांची जबाबदारी, एकहाती सांभाळलेली. MS होऊन... डिग्र्यांची बारा डब्यांची गाडी नावामागे लाऊन, लेक लग्न करुन अमेरीकेत स्थाईक झाली. आणि पुन्हा साठे जोडी दुकटी असूनही, एकटी पडली. तेव्हापासूनच हे आपापलं बाहेर रमणं, चालू झालं होतं दोघांचं. 

पण आयुष्यभर उपसलेले कष्ट साठेबाईंचे, अखेर त्यांच्या गुडघ्यांवाटे बाहेर आलेच. दोन्ही गूडघ्यांची सर्जरी करण्याचं ठरलं. लेकीने काँटॅक्ट्स वापरुन... चांगल्या हाॅस्पिटलमध्ये, चांगला डाॅक्टर मॅनेज करुन दिला. आॅपरेशन खूप छान झालं. साठेबाईंनी फिजिओथेरपीलाही, उत्तम प्रतिसाद दिला. आणि दोन आठवड्यांनी अखेरीस त्यांना, डिसचार्ज मिळणार होता... आजच. पण ह्या गेल्या दोन आठवड्यात... साठेंना मात्र कळून चुकली होती, खरी किंमत आपल्या पत्नीची. त्या पोळी - भाजी केंद्रातल्या पाचकळ उसळी, शेंगा-बटाटा नी वालपापडी... अशा ठरलेल्या बेचव भाज्यांचा विट आलेला साठ्यांना. पिठ तोंडाला लावलेल्या कोरड्या पोळ्या तर... तोडांत बोटं घालून घालून त्यांना, घशाखाली उतरवाव्या लागल्या होत्या. दूध, किराणा, सगळी बिलं, सोसायटीचा चेक वगैरे जन्मात न बघितलेल्या गोष्टी मॅनेज करतांना... पार दाणादाण उडाली होती साठ्यांची. आणि वरुन हाॅस्पिटलातली रोजची हजेरी होतीच. पिट्ट्या पडला होता एकंदरीतच, पंच्याहत्तरीच्या साठ्यांचा. पण हे सगळं जरी असलं... तरी बायकोच्या दोन आठवड्यांसाठी आजुबाजूला नसण्याने खरंतर, कमालीचे कासाविस झाले होते साठे. महती पटली होती त्यांना... चार तपं बायकोच्या सतत त्यांच्या, भोवताली उपलब्ध असण्याची.

आणि त्यामुळेच आपल्या निरस, अरसिक स्वभावाच्या विपरीत वागत... ही वेलकमची सर्व तयारी केली होती साठ्यांनी. त्यांनी पुन्हा घड्याळात पाहिलं... साडेअकरा होऊन गेले होते. आणि तेवढ्यात त्यांना दिसली अँब्युलन्स गेटपाशी आलेली. तळमजलाच असल्याने... त्या चामडी झोळणीतून चारजणांनी, पाचेक मिनिटांच्या आतच साठेबाईंना... अगदी व्यवस्थित बेडरुममधील पलंगावर निजवलं होतं. आता घरी रोज एक, फिजिओ मुलगी येणार होती. आणि हा पहिला आठवडातरी साठेबाईंना, त्या मुलीच्या उपस्थितीच जागचं उठायचं होतं. थँक्स आणि टिप घेऊन ती लोकं गेली. आणि घरी उरले फक्त साठे पती - पत्नी. अचानकच एक अवघडलेपण आलं दोघांच्याही वागण्यात. ह्यावेळेला स्वतःच्या घरी, आयुष्यात कधी पलंगावर आडव्या झाल्या नव्हत्या साठेबाई. आणि आयुष्यात कधी साठेंनीही पाहिलं नव्हतं, आपल्या पत्निला इतकं असहाय्य. दोघे एकमेकांच्या डोळ्यांत बघणं टाळत... एकमेकांकडून अपेक्षा करत होते, कोणीतरी काहीतरी विषय सुरु करण्याची. साठेबाईंनीच अखेर दोघांमध्ये गोठलेला बर्फ फोडला. 

"फुलं फारच सुरेख आहेत"

"हो... मूद्दामहून तुझ्यासाठी आणलीयेत"

"वाळल्यासारखे दिसताय हो"

"अगं काय हे... रोज तर भेटत होतो की आपण... आजच बरा दिसलो मी तुला वाळलेला"

"आपल्या स्वतःच्या घरात... आपलं माणूस... अधिक बारकाईने कळत असावं"

साठ्यांच्या डोळ्यांतून अचानकच, हलकसं पाणी तरळलं. आणि ते कळून साठेबाईंच्याही डोळ्यांत, बर्‍यापैकी पाणी साठलं. साठे जाऊन पत्नीच्या बाजूला बसले. बावरतच त्यांनी साठेबाईंचा हात, आपल्या हातात धरला... आयुष्यात पहिल्यांदाच. आणि चक्क पाणी वाहू लागलं त्यांच्या डोळ्यांतून. अहोंना असं बघितल्यावर मग, साठेबाई कुठल्या थांबायला. मनसोक्त रडून घेतलं दोघांनी. एकमेकांच्या मनासोबतच मग, एकमेकांतील वातावरणही मोकळं झालं. भिड चेपलेल्या साठेंनी आता, साठेबाईंच्या डोक्यावरुन हळूवारपणे हात फिरवायला सुरुवात केली. त्यांच्या डोळ्यांत बघून बोलले ते...

"अजिबात काळजी करायची नाही आता... आॅकवर्ड तर बिलकूल वाटून घ्यायचं नाही... फक्त हुकूम करायचा... मी जवळ असेनच, पण जरी नसलो तरी टाळी वाजवायची नी म्हणायचं... कोणेय रे तिकडे?... तुझा हा सेवक धावत येईल"

"इश्श्य... काय पण तुम्ही"

"अगं मग काय... तू तुझी पुर्ण हयात ह्या घरासाठी खाल्लेल्या खस्ता कळायला मला, माझी पुर्ण हयात जावी लागली गं... खरंच मला माफ कर... पण तू नसल्यावर मी एक भला मोठ्ठा झिरो आहे गं, नंबरच्या आधी लागणारा... तू असलीस की माझ्या आधी उभी रहातेस, नी मला आपसूकच किंमत येते"

"बास झालं बरं... आधीच पायांत कसलेतरी धातूचे पार्ट्स टाकल्यामुळे, सगळं जड जड झालंय... त्यातून पुन्हा आता तुमच्या ह्या कौतुकाचं वजन नको"

दोघेही हसू लागले एकमेकांकडे बघून. आणि तेवढ्यात फोन वाजला घरचा. साठ्यांनी तो हाॅलमध्ये जाऊन घेतला. मिनिटभरातच साठे आत आले, तेच मुळी हसत.

"अहो काय झालंय?... कोण होतं?"

"ह्या कोपर्‍यावरच्या पोळी - भाजी केंद्रातून फोन होता... काही अपरिहार्य कारणास्तव, आज डबा मिळणार नाही म्हणतायत"

"अरे कर्मा... आता हो काय?... आणि तुम्ही हसताय कसले?... ह्याचंही मेलं आजच ते, अपरिहार्य का काय ते कारण उपटायचं होतं?... आता ह्या उन्हात कुठे तुम्ही दुसरीकडे जाणार हो?"

"एक आयडीया आहे... तू मला इथून पडल्या पडल्या इन्स्ट्रक्शन्स दे... आणि मी स्वैपाकखोलीत काहीतरी करतो आपल्यासाठी... एक काम करतो... मस्त पिठलं भात करतो... तुला जामच आवडतं ना कांदा घालून केलेलं ते, सरसरीत पिवळं धम्मक पिठलं... सिंहगडावर गेलो होतो आपण फार पुर्वी, तेव्हा तीन भाकर्‍या चेपलेल्यास तू... अजून आठवतंय मला"

"कमालंच म्हणायची तुमची बाई" 

"बेडेकरांकडची लसूण चटणीही आहे घरी... आणि मस्त मुठीने कांदा फोडतो...  व्वाह!... पिठलं - भात - चटणी - कांदा... मजा आएगा"

"अहो अशक्य आहे हे... तुम्ही कधी भातही लावला नाहीयेत आत्तापर्यंत... आणि पिठलं कसलं करताय?... नाईतरी तुम्हाला कुठे आवडतं ते, तसलं पिवळं धम्मक पिठलं"

"गेलेलं अख्ख आयुष्य फक्त माझी आवड जपत आलीयेस गं तू, स्वतःच्या आवडींना मुरड घालत... आता उरलेलं आयुष्य मी फक्त तुझ्या आवडी जपणार... आणि तू मला अजिबात अडवायचं नाहीस"

"अहो पण..."

.

.

.

साधारण दिड तास भांड्या - कुंड्यांचे... नानाविध आवाज येऊन गेल्यावर, साठे भरलेलं ताट घेऊन बेडरुममध्ये साठेबाईंपाशी आले. वाफाळता भात, एका वाडग्यात लाल तिखट न वापरता... हिरव्या मिरचीचे तुकडे घालून केलेलं गरमागरम कांद्याचं पिठलं, डावीकडे लसणाची लाल चटणी आणि दोन भाग झालेला कांदा. साठेबाई सावकाश उठत, उशीला पाठ टेकून बसल्या. 

"द्या ते ताट इथे... नी दुसरं घेऊन या"

"अगं वेडी का काय?... एकाच ताटात जेवायचंय आपण आज"

"इश्श्य... काय हे... उगिच नै तर"

"अरे... स्वतःच्या घरी, स्वतःच्याच बायकोबरोबर जेवतोय ना... मी भरवतो तुला"

"चमच्याने नाही भरवायचं मग... तुमच्या हातांनी भरवा"

साठ्यांनी पिठलं भातात घालून, भात कालवला छानपैकी. चटणीत बोट बुडवून... एक घास आपल्या बोटांतून घेत, तो साठेबाईंना भरवला. साठेबाईंनी डोळे मिटून तो घास, तोंडामध्ये घोळवून घोळवून गिळला. तृप्ततेचे भाव उमटले होते त्यांच्या चेहर्‍यावर. आणि कसा झालाय स्वैपाक? हे त्यांच्या भरुन आलेल्या डोळ्यांनीच, साठ्यांना परस्पर सांगितलं होतं. तितक्यात लेकीचा फोन आला, अमेरीकेहून आईची चौकशी करायला.

"आई कशी आहेस गं?... सेटल झालीस का?"

"हो... अगदी"

"आवाज का गं असा दाटून आल्यासारखा वाटतोय?... तू रडतीयेस का?... अगं दुखणारच काही दिवस... सहन करावंच लागेल ना आई"

"हो गं बाळा... पण हे इतकं सुख... खरंच नाही होतेय गं सहन... भिती वाटतीये की..."

"हॅलो... हॅलो... हॅलो अगं आई... आ..."

फोन कट केला होता साठेबाईंनी, आणि स्विच्ड आॅफही केला. साठेंचाही फोन हातात घेत, तातडीने तो ही बंद करुन टाकला त्यांनी. त्यांच्या 'सुखाच्या ताटात' त्यांना, त्या क्षणी कोणीही वाटेकरी नको होता. श्रावणातल्या एकत्र पडणार्‍या उन - पावसासारखेच... त्यांचे डोळे वहात होते, तर जिवणी हसत होती. साठेबाईंनी साठ्यांकडे बघत... मान हलवली हलकीशी, आणि पुढच्या घासासाठी डोळे मिटून तोंड उघडलं. 

---सचिन श. देशपांडे

फोटोवर क्लिक करून वाचा एक सुंदर सकारात्मक कथा वरील कथा सचिन देशपांडे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.


ही कथा वाचून पहा.

गुरुदक्षिणा

Post a Comment (0)
Previous Post Next Post