उघड्या डोळ्यांची गांधारी

 उघड्या डोळ्यांची गांधारी!

✍️ संभाजी बबन गायके


पडाळीवरच्या घराच्या अंगणातील खडकावर उभं राहून टाचा थोडया उंचावल्या की शकूला आत्याचं घर दिसायचं. शकूला कधी कुणाला शंकुतला म्हणायची गरज वाटली नाही. दहा वर्षांची शकू संधी मिळेल तेंव्हा आत्याकडे पळायची, जो कुणी आत्याकडे जाणार असेल त्याच्याकडे हट्ट धरून त्याच्या सोबत बळेच जायची! कारण आत्याकडे चांगलं-चुंगलं खायला मिळायचं! शकूची आत्या म्हणजे तिच्या वडिलांची सोमाची अर्थात सोमनाथची थोरली बहीण,कांताबाई! सोमा घरात थोरला आणि त्याच्या पाठीवर दोन बहिणी कांताबाई आणि सावित्रीबाई, आणि नंतर दोन भाऊ असा त्याच्या वडिलांचा वंशविस्तार. सोमाच्या वडिलांनी भावकीच्या वादातून गावातलं घर सोडून शेतातल्या घरात म्हणजे पडाळीवर बिऱ्हाड हलवलेलं होतं. घर म्हणजे खडकावर थोडी सपाट जागा बघून चार वासे, चार बांबू आणि सात आठ जुने पत्रे एकत्र रचलेला आडोसा. मावळातील हट्टी पाऊस पत्र्याला भीक घालायचा नाही,आणि मनाला वाटेल त्या पत्र्याच्या छिद्रांतून घरात शिरायलाच जणू ऊन पडायचं! लोकांची भात खाचरं अर्धलीने कसून सोमाचे वडील पायली चार पायली भात घरी आणायचे,तर सोमासह त्याची आई खडी मशीनवर कामाला जायचे तेंव्हा कुठं दिव्यात वात, चुलीत लाकूड आणि पोटात घास जाई!


तशात कांताबाई जाणती झाली आणि या नीटस पोरीला शेजारच्या गावातल्या शेती,दुधाचा धंदा असलेल्या घरातून मागणं आलं! नवरदेव माळकरी असल्यानं बाकीचाही काही प्रश्न नव्हता,पोरगी खात्या-पित्या घरात पडेल म्हणून नाही म्हणायचं काही कारण नव्हतं. आता कांताबाई मोठ्या घरची सून आणि लवकरच कारभारीण झाली. काळ खाचरात तुंबून राहिलेल्या गढूळ पाण्यासारखा हळूहळू बांधातून झिरपत गेला. एकेदिवशी भर पावसाळ्यात सोमाच्या वडिलांनी मृत्यूच्या हाकेला ओ दिली आणि सोमाच्या डोक्यावर आपल्या बापाच्या संसाराचं ओझं आपसूक आलं! आई सोमकडेच राही, सोमाच्या दोन्ही भावांनी नंतर स्वतंत्र घरं केली.


एका गरीब घरातील मुलगी सोमाची बायको म्हणून त्याच्या फाटक्या, गळक्या संसारात आली. वडील गेले आणि बायको आली म्हणजे खाणारे एक तोंड कमी झाले होते ते पुन्हा पंगतीला बसले! तीन मुली,एक मुलगा असा सोमनाथचा पसारा वाढत गेला. 

शकू थोरली आणि त्यामुळे घरकाम आणि मजुरीला सर्वांत पात्र, आणि अगदी वयाच्या अकराव्या वर्षातच गृहकर्तव्यदक्ष! आणि नेमकं हेच तिच्या बालपणाच्या आड आलं! शकू रंगाने सावळी असली तरी दिसायला सर्वमान्य रूपाची,अबोल,पुढ्यात येईल तो घास खाणारी आणि वाट्याला येईल ते काम उपसणारी. अकाली प्रौढत्व म्हणजे काय याचा वस्तुपाठच जणू! 


त्यादिवशी कसलीशी सुट्टी होती म्हणून खडी मशिनवरचं काम बंद होतं त्यामुळे सोमाच्या घरातले सर्वच घरीच होते. शकू अंगणात आईपुढे बसून केस विंचरून घेत होती. तेवढ्यात तिचं लक्ष समोरच्या रस्त्याकडे गेलं. तिची आत्या, कांताबाई येत होती. तिच्या हातात एक मोठी पिशवी होती. तिच्यासोबत दुसरं कुणीही नव्हतं. कधीही पाऊस काळ लागेल म्हणून सोमा घरावरचे पत्रे नीट करायला पत्र्यावर चढला होता. बहिणीला बघून तो लगबगीनं खाली आला. शकू उठून घरात गेली. तिच्या हातचा काळा चहा आत्याला आवडतो, हे तिला माहित असल्यानं तिनं एक कप चहाचं आधण चुलीवर चढवलं. कांताबाई घरात आली. 


सोमाच्या बायकोनं तिच्यापुढं पाण्याचा तांब्या ठेवला. कांताबाईनं सावकाश पाण्याचे दोन-तीन घोट घेतले. “सोमादा,एक बोलायचं होतं!” ती सोमनाथला म्हणाली. अंगभर सोन्याचे दागिणे,हातात चांदीचे गोट,पायांत जोडवी असलेल्या आपल्या श्रीमंत बहिणीचं आपल्याकडे काय काम असावे? सोमाला प्रश्न पडला होताच, तो काही विचारणार तोवर कांताबाईने पिशवीतून एक नवं लुगडं आणि पेढ्यचा पुडा काढून सोमापुढे ठेवला आणि म्हणाली,”तुझी शकू देतोस का माझ्या शिरहारीला?” शिरहारी म्हणजे श्रीहरी! तिचा धाकटा लेक. 


कांताबाईचं घर माणसांनी आणि भाताच्या कणग्यांनी भरलेलं. एकत्र खटलं. एक दीर,जाऊ, त्यांच्या दोन मुली, दोन मुलगे. कांताबाईला दोन मुलगे आणि त्यांच्या पाठची मुलगी. पतीला होत होतं तोवर त्यांनी उत्तम शेती केली. नंतर थोरल्या मुलावर,सोपानवर शेतीचा कारभार सोपवला आणि ते नियमाचे पंढरपूरचे वारकरी बनले. गोठ्यात चार खिल्लारी बैल,बारा दुभत्या म्हशी,तीन गायी. कांताबाईने आपल्या मुलीचे लग्न तशाच तोलामोलाच्या घरात करून दिले. आणि आता घरात बाईमाणूस म्हणून कुणी तरी हवे म्हणून तिने सोपानचेही लग्न उरकून घेतले. त्याच्या लग्नाला दोन वर्षे उलटली तरी त्याला मूलबाळ होईना म्हणून त्याचं दुसरं लग्न करून दिलं. दुसरं लग्न केल्यानंतरही त्याची पहिली बायको गपगुमान नांदत होती. शेती,दूधदुभत्याच्या घरात पोटाला चार घास मिळण्याची हमी असते म्हणून पहिली आपल्या गरिबीच्या माहेरी निघून नाही जाऊ शकली, शिवाय कुंकवाचा अधिकार होताच. बाकी घरात कामाला माणूस लागतंच की! पण दुसरी बायको दोन वर्षे उलटून गेली तरी कांताबाईला नातू नाही देऊ शकली! खंडी खंडी भात,मसुरा पिकवणाऱ्या घरातल्या सुनेचं पोटपाणी पिकत नव्हतं हा विरोधाभासच म्हणावा! 


कांताबाईच्या मांडीवर नातू बसवू शकेल असं एक पुरुष शरीर तिच्या घरात होतं! देवीची वयाच्या तिसऱ्या वर्षी अवकृपा झालेलं! माणसाचं जग अंधाराने कायमचे भरून टाकणाऱ्या रोगाचं नाव देवी असावं हा केवढा दैवदुर्विलास! श्रीहरी काहीही पाहू शकत नव्हता,पण म्हणून अडून बसत नव्हता. भजनाच्या आवडीमुळे आणि सतत गावातल्या दत्तमंदिरात जाण्यामुळे तो गावासाठी हरी,हरीदा झालेला होता. त्याची मित्र मंडळी सतत त्याच्याभोवती असत. कांताबाईच्या घराच्या आणि शेताच्या मध्ये भरपूर रहदारीचा रस्ता धावत होता. श्रीहरी बैलजोडी अचूकपणे रस्त्याच्या पल्याड घेऊन जात असे,आणि इतक्या वर्षात त्याला कधीही काहीही झालं नव्हतं,बैलांना त्याची सवयच झाली होती,ते बिचारे मुके जीव अगदी सावधानतेने रस्त्याच्या पलीकडे जात,येत. श्रीहरी केवळ आवाजाच्या आधारानं वाहनांचा अंदाज घेत कासरा धरून बैलांमागे जाई,त्यांना नदीवर पाणी पाजून आणी! गुरांपुढं वैरणकाडी टाकण्याचं कामही श्रीहरी बिनचूक करी. धडपडला तर घरात दोन भावजया,चुलतभाऊ होतेच. 


अडीअडचणीला सोमा कांताबाईच्या सासरी जात असे,नव्हे त्याला जावेच लागे. त्याच्या संबंध नातेसंबंधात चार पैसे देऊ शकणारं एकच घर होतं ते कांताबाईचं. तिचे यजमान कुणाच्या अध्यात मध्यात न पडणारे. कांताबाई ठरवतील ती पूर्व मानायची त्या घराची रीत होती. त्यामुळे तिने माहेरी चार पायली भात पाठवला,जुनी लुगडी दिली भावजयीला तरी कुणाची काही ना नसायची. जावयाच्या दारात जाऊन काही मागणं अनुचित असूनही सोमाला त्याशिवाय पर्याय नसे!


सहसा कधी माहेरी न येणारी कांताबाई आज आली पण तिनं तर मोठा तिढ्यात टाकणारा प्रश्न पुढ्यात टाकल्यानं सोमा बावरून गेला होता. शकूनं तेवढ्यात पिचकलेल्या बशीत बिनकानाच्या कपात काळा चहा आणून कांताआत्यापुढे ठेवला. तिच्या नजरेतून नवं लुगडं आणि पेढ्याचा पुढा सुटला नाही. 

सोमा विचारात पडला. “चहा घे!” असं तो कांताबाईला म्हणाला, पण त्याच्या मनात मोठी खळबळ माजली होती. शकू मोठ्या मुलासाठी मागितली असती तर भाग वेगळा होता! सोमाची बायको त्याच्या तोंडाकडे बघतच राहिली. सर्वजण चिडीचूप बसलेले पाहून शकूला आश्चर्य वाटले!


सख्खी आत्या म्हणून सासुरवासाचा जाच होणार नव्हता,पोर कष्ट करील पण चार सुखाचे घास खाईल,या विचारानं सोमानं शकूला श्रीहरीला दिली. 


लग्न,नवरा,संसार, मुलं होणं म्हणजे काय याची पुसटशी कल्पना नसलेली शकू तिच्या आत्याची,कांताबाईची सून आणि धृतराष्ट्राची गांधारी म्हणून कष्टाच्या सिंहासनावर आरूढ झाली! गावातल्या जनतेला शकुबद्दल सहानुभूती असली तरी मामाच्या मुलीवर आत्याच्या मुलाचा तसा हक्क असतोच की, जाईल की श्रीहरीचा पण संसार कडेला असं ही बाया बापड्या म्हणत! 

शकूच्या थोरल्या जावा मुलं होत नाहीत म्हणून सतत काहीना काही उपासतापास,देवदेवस्की करत असत. जनावरांची व्यवस्था बघायला,पाणी भरायला,स्वयंपाक करायला शकूच्या रूपाने आणखी एक माणूस त्या घरात आलं होतं... एखादी गाय गोठ्यात आणून बांधावी तशी...बाजारातून विकत आणून!


शकूच्या निमित्ताने सोमाच्या कांताबाईकडच्या फेऱ्या आता तशा वाढल्या होत्या. आंधळ्या जावयाबरोबरचा आपल्या लेकीचा संसार कसा होईल याची त्याला चिंता लागून राहिलेली असायची.

खेड्यातल्या त्या घरात लवकरच दिवे मालवले जायचे आणि मग शकुही त्या अंधारात नवऱ्यासारखी आंधळी होऊन जायची. या अजाण पोरीनं नवऱ्याच्या हाताला धरून त्याला संसाराच्या वाटेवर चालवलं पण जास्त ठेचा तिनं खाल्ल्या! दिवस सरत गेले... ते कुणासाठी थांबतात? शकूच्या कोवळ्या मनात हळूहळू व्यवहाराच्या शहाणपणाने मूळ धरलं. आपल्या आयुष्यात काय घडतं आहे हे समजून यायच्या आत तिने त्या अंधारलेल्या वाटेवरचा बराच लांबचा पल्ला गाठला होता. इतर बायकांचे नवरे त्यांच्याकडे पाहून, हसून बोलत असताना पाहून तिच्या डोळ्यांसमोर नवऱ्याच्या चेहऱ्यावरची काळी आणि कोरी पाटी दिसायची! पण श्रीहरीच्या स्पर्शाची शरीरापल्याडची भाषाही तिला आता उमगू लागली होती! जरी आंधळी मी तुला पाहते हे गाणं तिच्या आयुष्यात उलट्या क्रमाने वाजत होतं! पण तिचं जीवनगाणं आता सुरात बहरत होतं! पदरात आलेले सूर आपल्या स्वतःच्या गाण्यात गुंफायला शकू शिकली होती.


फुटक्या कौलातून उजेडाचा मोठा कवडसा घरात यावा तसं झालं... शकू तिच्या आत्याला नातवंड देणार होती. मुलगी झाली तरी चालेल सुरुवातीला,पण वाट चालू होणं महत्वाचं... कांताबाईच्या मनानं तिला समजावलं!

सोपान आणि त्याच्या दोन्ही कारभारणी दैवाची ही करणी बघून स्तिमित झाले होते! महाभारतातला पंडु पाच पाच पुत्रांचा पिता आणि या घरातला अजून प्रतीक्षेत! आणि इथल्या धृतराष्ट्राचा वेल मांडवावर चढू पाहतोय! शकूच्या आयुष्याला आता एक ध्येय मिळालं होतं... सोन्यासारख्या घराला वारस देणारी गाय झाली होती ती! माणूस परिस्थिती नुसार वागतो, विचार करतो,आपण फार मनावर नाही घ्यायचं हे काळानं तिला शिकवलं होतं! अन्यथा तिच्या घरात कुरुक्षेत्र शिरायला वेळ नसता लागला. शकूच्या पोटी लागोपाठ दोन मुली आल्या! दीर, जावा आणि शकू यांमध्ये एक अनामिक दरी,पण शकू या दरीच्या खोलीला घाबरायची नाही, तिच्यात उतरून पलीकडे जायची. जावा सुद्धा बाईच होत्या ना, त्यांनाही आपल्या संसाराचं शिवार ओलं व्हावं असं वाटे, आणि त्या नकळत शकूच्या फुललेल्या वाफ्याकडे असूयेने पहात!


शकुला तिसऱ्या वेळी मुलगा झाला आणि कांताबाई भरून पावल्या!बारशाला सारं गाव बोलावलं! श्रीहरींच्या आंधळ्या डोळ्यांतून त्याची नजर चुकवून अश्रू ओघळलेच! शकूने थोरल्या जाऊबाईने सुचवलेलं नावच ठेवायचा आग्रह धरला आणि बाळाचं नाव अर्जुन ठेवले!

पुढे वाफ्याच्या कडेची माती भिजून मऊ व्हावी आणि तिथून पाणी बाहेर धावू लागावे तसं झालं. सोपानच्या दुसऱ्या बायकोला दिवस राहिले, मुलगा झाला! त्याचीही वाट सुरू झाली होती!

अंगण नातवंडांनी भरले पुढे! हस्तिनापूर झाले असते शकूच्या जागी दुसरी कुणी असती तर...इथं आता गोकूळ नांदत होतं!


शकू अजूनही आंधळ्याचा संसार डोळसपणे रेटते आहे....मुलं मोठी झालीत,सुना,जावई आहेत! श्रीहरी नावाचा धृतराष्ट्र शकू नावाच्या गांधारीचा हात धरून वाटचाल करतो आहे...या गांधारीने त्याचा हात अजूनही घट्ट धरून ठेवला आहे...वाट्याला आलेलं कर्म फळाची अपेक्षा न ठेवता करायचं हे तिला कुणी सांगितलं नव्हतं!

(पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वीची ही कथा,आज शब्दांत उतरून आली! कथांश सत्य,नांवे, गावे काल्पनिक. )

✍️संभाजी बबन गायके


वरील कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी लेखकाचे आहेत. आम्ही ही कथा लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post