ती कोण होती

 ती कोण होती?

✍️ अमृता देशपांडे 

‘निशा... निशा... अगं एकदा माझं ऐकून घेशील? प्लीज निशा तुला ईशाबद्दल, तुझ्या बहिणीबद्दल महत्त्वाचं काहीतरी सांगायचंय...'गेल्या सात-आठ दिवसांपासून रोहित काकुळतीला येऊन निशाला विनवत होता. 


'आता सगळंच तर संपलंय नं रोहित... आधीच तू माझा खूप गैरफायदा घेतलायस. त्यानंतर  तुझं आणि ईशाचं असं पळून जाणं... तुम्हां दोघांना कल्पना तरी आहे का, तुमच्या पळून जाण्यामुळे आमच्या आयुष्यात किती उलथापालथ झालीय...?' निशा


'हो, मला ठाऊक आहे की आमच्या पळून जाण्यामुळे तुम्हाला किती त्रास सहन करावा लागलाय. काकांचं त्या धक्क्यानंतर अकल्पित निधन, समाजात झालेली छि-थू ,  काकूंचं आजारपण मला  सगळं सगळं ठाऊक आहे. पण सगळं संपलंय असं नको नं गं म्हणू, वठलेल्या झाडाला नवी पालवी फुटावी , कोमेजल्या फांदीला कळ्यांनी लगडावे अशा काही घटना माणसाच्या आयुष्यात घडतात, आणि  त्याने आयुष्याला एक नवं वळण मिळतं. तसंच काहीसं घडलंय आमच्या बाबतीत...' रोहित शून्यात नजर हरवून बोलत होता.


'म्हणजे?' रोहितच्या अश्या बोलण्याने निशा गोंधळात पडली.


'सांगतो, सगळं सांगतो... तू फक्त एकदा माझ्यासोबत माझ्या घरी चल. माझ्या घराची अवस्था पाहूनच तुला सगळं समजून जाईल...' 


'ठीक आहे. मी येईन, पण आज नाही, उद्या. आणि मी जास्तवेळ थांबणार नाही. कारण मला एकाचवेळी घर, आॕफिस आणि आईचा दवाखाना सगळं सांभाळावं लागतं' निशा कठोरतेने म्हणाली


'मला कल्पना आहे त्याची... काकांच्या अकल्पित जाण्याने, आणि काकूंच्या आजारपणाने तुझ्यावर फार मोठं जबाबदारीचं ओझं येऊन पडलंय नं...शिवाय काकांचा बिझनेसही हल्ली तूच सांभाळतेस नं?' रोहित


'जबाबदाऱ्या आहेत, पण मी त्यांना ओझं नाही माझं कर्तव्य समजते ‘निशा

त्यानंतर पाच मिनीटं शांततेत गेली.

'बरं निशा, उद्या संध्याकाळी मी तुला न्यायला येईन... तयार रहा' रोहित


'नेमकं काय सांगायचं असेल रोहितला? वठलेल्या झाडाला नवी पालवी काय, कोमेजल्या फांदीला कळ्यांनी लगडणे काय...' दवाखान्यात जायच्या वाटेवर कारमध्ये बसल्या-बसल्या निशा विचार करू लागली, 


ईशा आणि निशा शशिकांत आणि सुप्रिया या दाम्पत्याच्या जुळ्या कन्यका. शशिकांतरावांचा नागपूरात टेक्सटाईल्सचा मोठा बिझनेस होता.  दिसायला अगदी हुबेहूब, परंतु स्वभावात मात्र जमिनअस्मानाचा फरक! ईशा चंचल तर निशा शांत, ईशा अभ्यासात कमकुवत तर निशा जात्याच हुशार, ईशाला नटण्या मुरडण्यात, ऐशोआरामात जगण्याची आवड तर निशाला पुस्तकांची, साध्या जगण्याची आवड... त्यामुळे साहजिकच शशिकांतरावांचा आणि सुप्रियाताईंचा निशावर जास्त जीव, तिच्यावर जास्त विश्वास. आणि ईशाला लहानपणापासून आईबाबांचा ओरडा खावा लागे. हो, पण त्यांनी कधीही दोघींवरच्या प्रेमात कुठेही कमी ठेवली नाही बरं ! 


रोहित हा त्यांचा लहानपणीपासूनचा शेजारी, समवयस्क असल्याने तिघांत चांगली मैत्री होती... परंतु जसजसे तिघे तरूण होत गेले, तसतसे  रोहितला ईशाबद्दल मैत्रीहुन अधिक आकर्षण जाणवू लागले. ईशाचं नटणं-मुरडणं, मादक हसणं कोणत्याही मुलाला भुरळ घालण्यासारखंच होतं. त्याचवेळी निशा मात्र अभ्यासात, पुस्तकांत, किंवा वडिलांना आॕफिसमधील कामांत मदत करण्यात मग्न असे.


'या रोहितने एकेकाळी आपल्याही मनाला भुरळ घातली होती. त्याचं गोड-गोड बोलणं, तारीफ करणं, गुलाब, चॉकलेट्स गिफ्टस् देणं यासगळ्याला एकेकाळी आपणही भुललो होतो... पण रोहितनी? रोहितनी मात्र आपल्या भोळेपणाचा गैरफायदा घेतला... गोड-गोड बोलून आपल्याकडून नोट्स लिहून घेणे, जर्नल्स पूर्ण करून घेणे यासाठी त्याने आपल्याशी प्रेमाचे नाटक केले. आणि आपणही त्याच्या नाटकांत गुंतत गेलो... त्याला खरंतर सुरवातीपासून ईशाच आवडत होती. हे आपल्या कधी लक्षातच आलं नाही. बरं रोहित तरी परका होता. पण ईशा! ती तर माझी सख्खी बहिण होती नं? तिने असं वागावं आपल्याशी?... नाहीतरी तिचा रागच होता आपल्यावर... 

आईबाबा तिच्यापेक्षा जास्त आपल्यावर प्रेम करतात असं वाटायचं  तिला नेहमी... वेडी! जगातले कोणतेच आईवडील आपल्या दोन लेकरांत भेदभाव करत नसतात. मुलांच्या चांगल्या-वाईट प्रगतीवरून वागणुकीत बदल होत असेल कदाचित, पण प्रेमात कधीच कमीअधिकपणा नसतो...' अशा सगळ्या विचारात असतानाच ड्रायव्हरच्या बोलण्याने निशा भानावर आली.  


ड्रायव्हरला गाडी पार्क करायला सांगून  सिटी हॉस्पिटलच्या भल्या मोठ्या गेटमधून आंत शिरली. आणि तडक अल्झायमर्स वॉर्डमध्ये गेली. तिची नजर शून्यात नजर लावून बसलेल्या आपल्या आईकडे गेली आणि तिच्या डोळ्यांत टचकन पाणी तरळलं. स्वतःला सावरत ती आईजवळ गेली.


'आई, बघितलंस का आज तुझ्यासाठी काय आणलंय? तुझ्या आवडती द्राक्षं आणलीयेत. डॉक्टर नकोनकोच म्हणत होते. डायबेटिस नाही का तुला? पण मीच हट्ट धरला, म्हटलं खाऊ द्या हो कधीतरी, फार आवडतात नं तुला...' पिशवीतून द्राक्षं काढत-काढत तिने आईकडे बघितले आणि ती दचकलीच. आईचे डोळे रागाने लाल-लाल झाले होते.


'ईशा, का आलीस तू इथे? आपल्या बाबांचा जीव घेऊन मन नाही भरलं तुझं कारटे? चालती हो इथून...' थरथरत्या आवाजात सुप्रियाताई ओरडत होत्या. निशाला कळून चुकलं,  आई आपल्याला ईशा समजतेय...


'आई, आई शांत हो. मी ईशा नाही निशा आहे. नीट बघ बरं माझ्याकडे...' आईचा चेहरा हाताने स्वतःकडे वळवत निशा उत्तरली.  


'निशा बाळा, तू आहेस होय... मला वाटलं ती अवलक्षणी...' परत शून्यात नजर फिरवत सुप्रियाताई


'हो हो, काही हरकत नाही. होतं असं कधीकधी... तू आधी शांत हो बरं...' असं म्हणत निशाने आईचं डोकं आपल्या छातीवर दाबलं आणि बराच वेळ तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिली. आईसोबतच चार घास पोटात ढकलून निशा घरी परतली.


रात्री बराचवेळ निशा भुतकाळातील आठवणींनी अस्वस्थ होती. ईशाचं फायनल इयरला असताना अचानक रोहितसोबत पळून जाणं, त्या धक्क्याने वडिलांचा हार्टअटॕक आणि मृत्यू, आईचं मानसिक संतुलन बिघडणं... शिवाय उद्या रोहित आपल्याला कोणते सत्य सांगणार, याची हुरहूर या सगळ्या संमिश्र भावनांनी रात्री केव्हातरी तिचा डोळा लागला. 

-----------------------------------------------

रोहित बरोबर आॕफिस सुटायच्या वेळी दारात हजर होता. आधीपासूनच तिथे येऊन थांबला असावा बहुतेक... 


आज कितीतरी वर्षांनी निशा रोहितच्या मागे बाईकवर बसली होती. परंतु आज वाटेत कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. एका जुन्या धाटणीच्या घरासमोर रोहितने बाईक थांबवली. घराच्या एका कोपऱ्यातल्या  छोट्याश्या खोलीसमोर रोहित गेला. खुणेनेच तिला घरात बोलावले. घरात पाऊल टाकताच निशा स्तब्ध झाली. ती एक लहानशीच बैठकीची खोली होती. आणि समोरच्याच भिंतीवर ईशाचा हार घातलेला फोटो लावलेला होता. त्या फोटोकडे बघताच निशाला क्षणभर  पायाखालची जमिन सरकल्यासारखी वाटली.  तिने रोहितकडे बघितले, तर त्यानेही मान खाली घातली. निशाला तर काही क्षण काहीच कळेना. ती मटकन खालीच बसली आणि तिला रडू कोसळले. रोहितनेही तिला मनसोक्त रडू दिलं. 


तेवढयात आंतून एक पन्नाशीची बाई पाण्याचे ग्लास भरून घेऊन आली. एकूण देहबोलीवरून आणि पेहरावावरून ती कामवाली बाई दिसत होती. पाणी पिल्यावर निशाला जरा शांत वाटलं. मग जरावेळानी रोहितने त्या बाईंना खुणेने काहीतरी सुचवले. तसे त्या बाई आंत जाऊन दोन्ही हातात काहीतरी घेऊन आल्या. आणि ते रोहितच्या हातात सुपूर्द केले.

'वठलेल्या झाडाची नवी पालवी, माझं आणि ईशाचं बाळ... आमचा ईशान'

बाळाला निशाकडे सोपवत रोहित ओक्साबोक्शी रडू लागला. निशाने क्षणभर बाळाकडे बघितलं आणि तिला भरून आलं... तिने बाळाला घट्ट छातीशी कवटाळलं. काय बोलावं? काय करावं? निशाला काहीच सुचत नव्हतं. मग रोहितनेच बोलायला सुरवात केली,


'इथून पळून आम्ही तडक मुंबई गाठली. काही दिवस हॉटेलात राहिलो. बरोबर घेतलेले पैसे चार दिवस पुरले. मग नोकरी-धंदा शोधणं भाग होतं. शिवाय हॉटेलमध्ये किती दिवस राहणार? मग मी दिवसभर नोकरीच्या शोधात बाहेर पडायचो आणि ईशा घराच्या शोधात... हातात डिग्री होती, त्यामुळे नोकरी मिळायला फार वेळ नाही लागला. पण घर काही मिळेना... अविवाहित तरूण जोडप्याला कोण घर देणार? मग एक दिवस देवळात जाऊन लग्न केलं. एक वन रूम किचनचं घर घेतलं भाड्यानी. आणि आमचा संसार सुरू झाला. वाटलं होतं, लग्न झालंय म्हटल्यावर दोघांचेही आईवडील जवळ करतील... पण इथे नागपूरला सगळंच बिघडलं होतं. 


माझ्या आईबाबांनी माझं नावच टाकलं होतं. तुमच्याकडे, काकांचा असा दुर्दैवी मृत्यू, काकूंचं हे असं... ईशाला सारखं वाटत रहायचं, माझ्यामुळे बाबांचा मृत्यू झाला, आई वेडसर झाली. ती दिवसरात्र स्वतःला कोसत रहायची. मला तिच्या डोळ्यांतले अश्रू बघवायचे नाहीत. मी तिला जास्तीत जास्त आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. अशातच ईशाला दिवस गेले. दिवस गेल्याचं कळल्यापासून ईशा स्वतःला फार जपायला लागली होती... मला म्हणायची, 'माझी आई, तुझे आईबाबा आपल्यावर चिडले आहेत नं ? थांब जरा... आपल्याला बाळ झालं ना, की आपण त्याला घेऊन नागपूरला जाऊया. आपल्या बाळाला बघितल्यावर तुझ्या आईबाबांचा राग नक्कीच निवळेल, आणि माझ्या आईचा वेडसरपणाही कमी होईल...'


  त्याच आशेवर आम्ही जगत होतो. आमच्या घरमालकीणबाई चांगल्या होत्या. त्यांनी ईशाचं बाळंतपणाचं सगळं व्यवस्थित केलं. बाळाचं बारसं केलं. आता आम्हांला ओढ लागली होती नागपूरला यायची... आम्ही मुंबईहून निघण्यापूर्वी आईबाबांना, तुला खूपवेळा फोन लावून पाहिले. पण आईबाबा फोन उचलेनात आणि तुझा आमच्याकडे असलेला नंबर बंद होता...' 


'र्ईशाला आणि बाळाला त्रास नको म्हणून आम्ही एका प्रायव्हेट गाडीने पंधरा दिवसांपूर्वीच इकडे यायला निघालो... आणि ... वाटलं होतं, चिमुकल्या बाळाला बघितल्यावर तुम्हा सगळ्यांचा राग कुठल्याकुठे पळून जाईल, आम्हाला आमच्या घरच्यांचे आणि आमच्या बाळाला आजी-आजोबांचे प्रेम मिळेल... पण नियतीला काही वेगळेच अपेक्षित होते...नाशिकजवळ आमच्या गाडीला एका टेम्पोने धडक दिली... आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं...नेमकी ईशा ज्या बाजूने बसली होती, त्याचबाजूने जबरदस्त धक्का बसला, आणि ईशाचा जागच्या जागी झोपेतच मृत्यू झाला. 


सुदैवाने बाळ तेव्हा माझ्या मांडीवर होतं. त्यामुळे मी आणि बाळ बचावलो. ड्रायव्हरलाही जबरदस्त मार लागला होता. त्याला नाशिकच्या इस्पितळात दाखल करून नाशिकलाच ईशाचा अंत्यसंस्कार उरकून, बाळाला घेऊन मी इथे आलो. आधी घरी गेलो, तर घराला कुलूप दिसलं. शेजाऱ्यांकडे  चौकशी केल्यावर समजलं की, आईबाबा कायमचे दादाकडे अमेरिकेला  गेले आहेत.


शेजाऱ्यांच्याच ओळखीने हे घर मिळालेय. या उमामावशी, दिवसभर  बाळाला सांभाळतात. आणि स्वयंपाकपाणीही करतात. आता तसेही मुंबईला परत जाऊन काही उपयोग नाही. मी माझी बदली नागपूरच्या आॕफिसमध्ये करून घेत आहे. तिकडच्या घरातील सामानही काही दिवसात इकडे घेऊन येईन. बाकी सगळं व्यवस्थित होईल गं निशा... पण बाळाचं काय? तश्या या मावशी बाळाला अगदी प्रेमाने सांभाळतात गं, पण त्याला अजून आईची गरज आहे नं गं? ती मी कशी पूर्ण करणार?...' रोहित आशाळभूत नजरेने निशाकडे बघू लागला. तिच्याही मनात कालवाकालव झाली. 


'माय मरो पण मावशी जगो' असं लोक म्हणतात. आईचं प्रेम तर नाही माझ्या बाळाच्या नशीबात... निदान मावशीचं प्रेम तरी लाभू देशील त्याला?...' रोहित हात जोडून विनवणी करत होता. 


'प्रश्नच नाही रोहित! निसर्गानं आम्हां दोघी बहिणींचं रूप एकसारखं बनवलंय, ते काही उगीच नाही... आजपासून ईशान माझा मुलगा आहे...' एवढं बोलून निशानं बाळाचे पटापट मुके घ्यायला सुरवात केली. तिच्यातलं ते मातृत्व पाहून उमामावशींच्याही डोळ्यात पाणी आलं.

-----------------------------------------------


निशाची एक जबाबदारी आता वाढली होती, त्यामुळे खरंतर तिची अधिकच ओढाताण होत होती. पण बाळाच्या ओढीने ती सर्व सहन करत होती. रोज सकाळी घरातून लवकर तयार होऊन आधी रोहितकडे जाणे, तिकडे बाळाची तयारी करून आॕफिस गाठणे, संध्याकाळी आईला हॉस्पिटलमध्ये जाऊन तिची विचारपूस, औषधपाणी करून परत बाळाला भेटायला रोहितच्या घरी जाऊन बाळाला भेटून रात्री उशीरा घरी परतणे असे तिचे रूटीन बनले होते. त्यात बऱ्याचदा तिचे रात्रीचे जेवण रोहितकडेच होई. 


'निशा, तुला राग येणार नसेल तर एक विचारू?' रोहितने एके दिवशी जेवता-जेवता विचारले

'बोल ना...' निशा

'तू अजून लग्न का नाही केलंस?' रोहितच्या या प्रश्नाने निशा क्षणभर दचकलीच...


'लग्न? त्याविषयी विचार करायला वेळंच मिळाला नाही कधी... म्हणजे असं काही नाहिये की मला लग्नच करायचं नाहिये... फक्त आयुष्याच्या प्रायोरिटीज बदलून गेल्या आहेत आता...’ निशा म्हणाली. 

दोघांचं बोलणं सुरूच होतं की बाळाने रडायला सुरवात केली. त्यामुळे जेवण उरकतं घेत निशाने बाळाकडे धाव घेतली. 

-----------------------------------------------

निशा रोज रोहितकडे येत होती ती बाळाच्याच ओढीने मात्र, त्यानिमित्ताने रोहितशीदेखील तिची मैत्री वाढू लागली. रोहितही तिची, आईची आपुलकीनी चौकशी करत होता. निशाच्या मनात तिच्याच नकळत रोहित हळूहळू  आपलं स्थान निर्माण करू लागला होता. अशातच एकदिवस रोहितने तिच्यासमोर विवाहप्रस्ताव ठेवला...

निशाने उत्तरासाठी रोहितकडे थोडा वेळ मागितला खरा... पण त्याच्या विवाहप्रस्तावामुळे तिच्या मनात प्रचंड खळबळ माजली होती. गेल्या दोन वर्षांपासून ऑफिस, घर आणि आजारी आई यांना सांभाळण्यात तिची नाही म्हटलं तरी खूप दमछाक होत होती. आयुष्याच्या या वळणावर तिलादेखील एका भक्कम आधाराची गरज होतीच. 'परंतु रोहित? याच रोहीतने एकेकाळी आपल्याला धोका दिला होता...  हो दिला असेल... पण ती एक अल्लड वयातली चूक होती... आणि आयुष्यात एवढे चढउतार सोसल्यावर माणसं बदलतात, शहाणी होतात ... आणि ईशान? तो तर आपलाच आहे नं, त्यालाही आईच्या प्रेमाची गरज आहे...' तिच्या मनात विचारांचं द्वंद्व सुरू होतं. सर्व विचाराअंती तिने रोहितला होकार द्यायचे ठरवले...

फा र कुठेही गाजावाजा न करता कोर्टात जाऊन त्यांनी लग्न केले. 

निशा खूप आनंदात होती. 'निशा, दोन वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न करणे हा आमचा वेडेपणाच झाला. त्यावेळी ना आम्हाला घरच्यांची पर्वा होती ना परंपरांची जाण, कदाचित त्यामुळेच हे असे अघटीत घडले. यावेळी मात्र मला ती चूक घडू द्यायची नाहिये. आपण उद्याच डोंगरगांवला आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जाऊया' लग्नाच्या पहिल्याच रात्री रोहितने आपल्या मनातली ईच्छा बोलून दाखवली. निशानेही त्याला आनंदाने होकार दिला.

ठरल्याप्रमाणे दोघे लहानग्या ईशानला घेऊन भल्या पहाटेच गाडीने डोंगरगांवला जायला निघाले. निशा ड्रायव्हर काकांना सोबत घेऊ म्हणाली होती, पण रोहित म्हणाला की आज त्याचा ड्राईव्हींग करण्याचा मूड आहे. अवघ्या अडीच-तीन तासांचा रस्ता होता. अजून फारसे उजाडलेही नव्हते, अर्धा - एक तास ड्राईव्ह करून झाले असेल... अचानक गाडी बंद पडली. एकाएकी गाडीला काय झाले हे पाहण्यासाठी रोहित गाडीखाली उतरला,  तर गाडीचे मागचे टायर पंक्चर झाल्याचे लक्षात आले. गाडीच्या डिक्कीत बघितले तर स्टेपनीही नव्हती. स्टेपनी नाही याचे खरंतर निशाला खूप आश्चर्य वाटले, कारण तिच्या ड्राईव्हर काकांना गाडी अपटूडेट ठेवायची सवय होती. मग स्टेपनी टायर गेला कुठे?

'कसल्या विचारात हरवलात मॅडम? काळजी करू नका. आपण काही शहरापासून फार लांब आलेलो नाही. मी जवळपास कुठे गराज किंवा मेकॅनिक मिळतो का ते पहातो.' असं म्हणून रोहित निघून गेला. ईशान झोपला होता. निशा कारच्या खिडकीतून आजूबाजूचा नजारा बघत होती. तिची गाडी उभी होती तो एक नदीवरचा पुल होता. नुकतंच तांबडं फुटलं होतं. रस्ता अजूनही निर्मनुष्य होता. ती गाडीच्या बाहेर आली. पुलाच्या कडावर उभं राहून ती नदीचं सौंदर्य न्याहाळत होती. तोच तिला पाठीमागे कुणी उभे असल्याची चाहुल लागली. तिने मागे वळून पाहिले, आणि ती किंचाळणार इतक्यात तिचे तोंड त्या व्यक्तीने दाबून धरले...

---------------------------------------------------------------------------------------------------------

'काम फत्ते!' ती हर्षोल्हासात समोरून येणा-या रोहितला म्हणाली.

'य्येस!' म्हणत रोहितने तिला टाळी दिली. दोघेही गाडीत बसले, आणि गाडी सुसाट पळाली. 

'ईशा, माय डार्लिंग! खरंच तुझी बहीण किती बावळट होती गं... मी जे-जे सांगत गेलो त्यावर तिने आंधळ्यासारखा विश्वास ठेवला, आणि कहर म्हणजे एकदा फसवल्या गेल्यावरसुद्धा परत माझ्या प्रेमात पडली? हा...हा...हा...!' - रोहित 

‘शूsss! आजपासून मला ईशा नाही म्हणायचं... निशा म्हणायचं, निशा.....हा...हा...हा...' ती हसत सुटली.

'हो... तुझ्या त्या बापानं त्याची सगळी इस्टेट तुझ्या बहिणीच्या नावे करून टाकली. आणि आपल्याला फुटकी कवडीही नाही? हं...' रोहित 

'पण आपणही काही कमी नाही. ते म्हणतात नं, घी अगर सीधी उंगलीसे ना निकले तो उंगली टेढी करनी पडती है...' ती मानेला झटके देत बोलली.

'ईशा, इथून नागपूरला परत गेल्यानंतर काही दिवस शांतच रहावं लागेल. खासकरून तुला खूपच सांभाळून रहावं लागेल...' रोहित 

' आय नो, आय नो! त्या निशाचे आजीबाई टाईप कपडे घालावे लागतील आणि आईशीही प्रेमाने वागावं लागेल...' ती त्रासिक चेहरा करून म्हणाली.

'अफकोर्स डार्लिंग! ए पण ती निशा आपल्या बाळाचं सगळं इतकं मायेनं करत होती... प्रेम उतूच चाललं होतं म्हण नं...' रोहित कुत्सितपणे बोलला, त्यावर दोघेही खळखळून हसले. इतक्यात ईशान उठून रडू लागला, तिने  जवळ घेतलं.


काही दिवस शांततेत गेल्यावर रोहित प्रॉपर्टीचे पेपर्स दोघांच्याही नावावर करावे म्हणून तिच्या मागे लागला. ती मात्र 'इतक्यात घाई काय आहे? तू आणि मी काही वेगळे आहोत का? जे माझं ते तुझं आणि जे तुझं ते माझं आहेच की...' असं उत्तर देऊन टाळत असे.  तेव्हापासून रोहितच्या वागण्यात तिला फरक जाणवू लागला. 

आणि एक दिवस रोहितने तिच्या गळ्याभोवती चाकू ठेवून प्रॉपर्टीचे पेपर्स तिच्या पुढ्यात टाकले, 'लवकरात लवकर या पेपर्सवर साईन कर आणि ही प्रॉपर्टी माझ्या नावावर कर...' तो म्हणाला. 

ते ऐकून ती जोरजोरात हसायला लागली. 'आणि मी या पेपर्सवर साईन केले नाही तर?' तिने त्याच्या डोळ्यांत डोळे घालून विचारले. 

'तर मी तुला मारून टाकेन!' रोहित चवताळून म्हणाला.

'अरेच्चा! पण मला तर तू आधीच मारलंय...' ती 

तिच्या उत्तराने तो पार गोंधळून गेला. 'म्हणजे?' 

'म्हणजे मी तुला समजावते रोहित डार्लिंग!' पडाद्याच्या मागून बाहेर येत ती म्हणाली. दोघी बहिणींना आमोरासमोर बघून अवाक झालेला रोहित आळीपाळीने दोघींकडे बघू लागतो. त्या गडबडीत चाकू त्याच्या हातून गळून पडतो. 

'असं काय करतो रोहित डार्लिंग? मला ओळखलं नाहीस? मी तुझी ईशा...' रोहित जवळ येत ती म्हणाली. ते ऐकताच रोहित घाबरत-घाबरत बाजूला बघतो. 

'भूत बघितल्यासारखा घाबरतोस काय रोहित? मी निशा, आणि मी जिवंत आहे!' एकमेकींना टाळ्या देत दोघी जोरजोरात हसायला लागतात. त्यामुळे रोहितचे डोके गरगरायला लागते.

'थांब थांब रोहित डार्लिंग, मी नीट समजावून सांगते,' रोहितला हात देऊन ईशा बोलू लागली, 'त्या दिवशी तुम्ही दोघे डोंगरगांवला जायला निघालात. आणि आपल्या प्लॅनप्रमाणे त्या नदीच्या किना-यावर गाडी पंक्चर झाली, झाली नव्हे मीच केली. मग रोहित तू मेकॅनिक शोधायला बाहेर पडलास...म्हणजे तसे नाटक केले. सगळ्या गोष्टी आपल्या प्लॅननुसार घडत होत्या. मी तिथेच एका झाडामागे दबा धरून उभी होती. रोहित दूर जाताच निशा, तू गाडीखाली उतरलीस. आणि मी तुला मारायला तुझ्या समोर आली...'

'आता पुढची गोष्ट मी सांगते ईशा...' ईशाला थांबवत निशा बोलू लागली, 'प्लॅन तर फार जबरदस्त होता तुझा रोहित, तुम्ही दोघं पळून गेलात म्हणून बाबांनी संतापून ईशाला प्रॉपर्टीतून बेदखल केलं. आणि तीच प्रॉपर्टी हडपण्यासाठी तुम्ही हा नीच प्लॅन बनवला? ईशाचा हार घातलेला फोटो बघून मी तुझ्यावर विश्वास ठेवला. वर त्या लहानग्या जीवाला बघितल्यानंतर माझं काळीज विरघळलं... पण तुम्ही दोघांनी यावेळीही माझा विश्वासघात केलात, माझ्या भावनांशी खेळलात... त्या दिवशी नदीच्या पुलावर ईशाला बघून मी खरं काय ते समजली.


 खरंतर ईशा, त्यावेळी मला तुझाही खूप राग आला होता. या नालायक माणसावर विश्वास ठेवून तू माझ्या, स्वता:च्या बहिणीच्या जीवावर उठलीस! तरीही माझी सक्खी बहिण या नात्यानी मी तुला समजावले, अगं जो माणूस जन्मदात्या आईवडिलांचा नाही होऊ  शकला तो तुझा काय होईल?... सुदैवानं यावेळी तरी ईशाला माझं म्हणणं पटलं. रोहित, तुझं खरं रूप जगासमोर यावं म्हणून आम्हीही एक नाटक करायचं ठरवलं. तुझा खेळ तुझ्यावरच उलटवायचं ठरवलं...' 

'हो रोहित, त्यादिवशी निशाच तुझ्यासमोर माझं रूप घेऊन आली. आणि इतके दिवस तिनेच माझं नाटक वाठवलं!' ईशा  

‘ज्या प्रॉपर्टीच्या लालसेपायी मी तुझ्यावर विश्वास ठेवून माझ्याच बहिणीच्या जीवावर उठले, तीच प्रॉपर्टी हडपण्यासाठी तू माझ्या जीवावर उठलास रोहित? तुझ्या प्रेमासाठी मी माझ्या आईवडिलांच्या इज्जतीची पर्वा ना करता पळून गेले. त्या धक्क्याने माझे बाबा देवाघरी गेले. आई भ्रमिष्ठ झाली. निशा, तुला आठवतो आपला कॉमन फ्रेंड अक्षय? त्याच्याकडून मला नागपूरच्या सगळ्या खबरा मिळत होत्या. 


राहून-राहून मला केल्या कृत्याचा पश्चात्ताप होत होता. आणि बाबांनी मला प्रॉपर्टीमधून बेदखल केल्याची बातमी ऐकल्यापासून रोहितचं बदललेलं वागणं मला खटकत होतंच. पण परत माघारी कोणत्या तोंडाने यावं हे कळत नव्हतं. त्यातच मला दिवस गेल्यानंतर परतीचे सगळे मार्गच बंद झाल्यासारखे वाटत होते. कदाचित याच पापाची शिक्षा देव मला आज भोगायला लावतोय. एवढं सगळं करून मी आज काय मिळवलं? तुझ्या खोट्या प्रेमापायी मी आज माझं अस्तित्वही गमावून बसले रोहित... कायद्याच्या दृष्टीने मी केव्हाच मृत झाले!...' शून्यात नजर हरवत ईशा बोलली.

'फार बडबड केलीत तुम्हा दोघींनी! ईशा, तू तर कायद्याच्या दृष्टीने मेलीच आहेस, आता तुझ्या या बहिणीलाही संपवून टाकतो...' रोहित चवताळून म्हणाला 

'थांब रोहित, एक पाऊलही पुढे टाकू नको. तुला काय वाटलं रे, प्लॅनिंग काय फक्त तुलाच करता येतं? मला मारलंस तर तू अजूनच अडकशील. या घरात सगळीकडे सीसीटिव्ही कॅमेरे बसवले आहेत. आणि माझ्या विनंतीवरून इंस्पेक्टर जोशी तुझ्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहेत. आणि तसंही मला मारून तुला काहीही फायदा होणार नाही. कारण मी ही सगळी  प्रॉपर्टी माझ्या मरणोत्तर एका सेवाभावी संस्थेला दान केली आहे.' एवढे बोलून निशाने इंस्पेक्टर जोशींना रोहितला घेऊन जायला फोन लावला. ईशालाही रोहितला मदत केल्यामुळे काही दिवसांसाठी शिक्षा होणार होती. जेलमध्ये जाण्यापूर्वी तिने आईला भेटून तिची माफी मागण्याची ईच्छा बोलून दाखवली, जी निशाने आनंदाने मान्य केली. 

जाता-जाता तिचे लक्ष बाळाकडे गेले. तिने प्रश्नार्थक नजरेने निशाकडे पाहिले. 'काळजी करू नको. इथून पुढे ईशान माझा मुलगा आहे.' निशा बाळाला छातीशी धरत म्हणाली. ईशा पाणावल्या डोळ्यांनी पोलिसांच्या जीपमध्ये चढली...

सौ. अमृता श्रीरंग देशपांडे


वरील कथा अमृता देशपांडे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post